तुमचा 'प्लॅन बी' काय आहे?
विकास आणि विनाश. एकाच नाण्याच्या दोन बाजू. कुणाचा तरी विकास म्हणजे कुणाचा तरी विनाश. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष. लगेच किंवा कालांतरानं. संपूर्णपणे विनाश टाळून विकास साधणं शक्य आहे का? या प्रश्नापासून सुरु झालेला आणि उत्तराऐवजी पुन्हा त्याच प्रश्नापाशी नेऊन सोडणारा एक 'प्रयोग' म्हणजे - नारकोंडम!
'नारकोंडम' या विचित्र नावावरून या नाटकाच्या / दीर्घांकाच्या विषयाची कल्पना येत नाही, ही नाटक आणि प्रेक्षक या दोघांसाठी जमेची बाजू. नाटक बघायला जाणार असाल तर या नावाबद्दल माहिती 'गुगल' करणं कटाक्षानं टाळा. (आणि नसाल बघायला जाणार, तर द्या सोडून. उगाच काहीतरी शोध लावून सोशल मिडीयावर सस्पेन्स फोडू नका.)
बुद्धीबळाच्या पटावरचे हे काळे आणि हे पांढरे, अशा पात्र परिचयातून नाटकाची सुरुवात होते; पण हळूहळू काळ्याचे पांढरे आणि पांढऱ्यातले काळे आपल्याला दिसायला लागतात. शेवटी तर प्रेक्षक म्हणून गेलेल्या आपल्यालाच निर्णायक चाल खेळायचं आव्हान हे नाटक देतं. प्रेक्षकांपासून एका वेगळ्या उंचीवर - स्टेजवर - न घडता हे नाटक प्रेक्षकांच्या आजूबाजूला घडतं. प्रेक्षकांना आपल्यामध्ये सामावून घेतं. त्या-त्या प्रसंगामध्ये आपण स्वतः उपस्थित आहोत, त्या नेपथ्याचाच एक भाग आहोत, असा एक वेगळा अनुभव या दीड तासांमध्ये मिळतो. एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी, मोकळ्या आकाशाखाली, मग पुढच्याच क्षणी बंद केबिनमध्ये किंवा घराच्या दिवाणखान्यात, अशा वेगवेगळ्या जागांवर आपल्याला प्रत्यक्ष घेऊन जायची किमया या नाटकाचे संवाद आणि ते सादर करणारे कलाकार साधतात. पात्रांच्या स्वभाववैशिष्ट्यानुसार, धूर्त, अनुभवी, आक्रमक, हट्टी, भावनिक, संतुलित, अशा निरनिराळ्या भूमिकांचा आनंद आपल्याला घेता येतो. दीपाली, लक्ष्मी, रणजीत, अवनीश, पराग, हृषीकेश, प्रदीप अशा सगळ्या कलाकारांनी धावफलक हलता ठेवायची जबाबदारी चपखल पार पाडलीय. हा दीर्घांक असला तरी, कथानकाला आणि सादरीकरणाला स्वतःचा एक विलक्षण वेग आहे. खटकेबाज संवाद आणि सर्वच पात्रांची एकमेकांसोबत जुगलबंदी यामुळं, विषय गंभीर असला तरी नाटक बघायला मजा येते. प्रदीप वैद्यांच्या दिग्दर्शनाची कमाल म्हणजे, नाटक पहिल्या पाच-सात मिनिटातच पकड घेतं आणि शांतपणे एक-एक पदर उलगडत फक्त दीड तासात एक मोठा विषय आपल्यापर्यंत पोहोचवतं.
आपल्या आजूबाजूला अनेक छोट्या-मोठ्या घटना घडत असतात. काही घटना घडून गेल्यावर आपल्याला समजतात; काही घडत असताना त्यांचे अपडेट आपल्याला अर्धवट स्वरुपात मिळत असतात. पण जे घडून गेलंय किंवा घडतंय, त्याच्या पलिकडं - पडद्यामागं - काय घडलं असेल, घडत असेल, याबद्दल आपल्याला नेहमीच कुतूहल वाटत असतं. मग हाती लागलेल्या मर्यादीत माहितीच्या आधारावर आणि तर्क व कल्पनाशक्तीच्या जोरावर काहीतरी लिहिलं जातं, सादर केलं जातं. असाच एक सशक्त प्रयोग आहे - 'नारकोंडम'! वर उल्लेख केल्यानुसार, विनाश टाळून विकास साधण्याचा काही पर्यायी मार्ग - प्लॅन बी - खरंच असतो का, याबद्दल प्रश्नांची पेरणी करून हे नाटक संपतं, एवढंच कथानकाबद्दल सांगेन. बाकी तुमचा इतर काही महत्त्वाचा 'प्लॅन बी' नसेल, तर नक्की या नाटकाच्या पुढच्या प्रयोगाला जा आणि एका उत्तम सादरीकरणाचा आनंद लुटा!
- मंदार शिंदे 9822401246