राजकीय नेता म्हणजे आक्रमकपणे भाषण ठोकणारा वक्ता, हे समीकरण मोडीत काढलं अटल बिहारी वाजपेयी यांनी. तसंच, चांगला नट म्हणजे एका दमात मोठमोठी पल्लेदार वाक्यं डिलीव्हर करू शकणारा कलाकार, या गृहीतकाला छेद दिला विक्रम गोखले यांनी. वाजपेयींची भाषणं ऐकत आणि विक्रम गोखलेंचा अभिनय बघत आम्ही मोठे झालो. बोलल्या गेलेल्या किंवा बोलायच्या प्रत्येक शब्दाचा परिणाम एनहान्स करण्यासाठी शब्दांच्या आणि वाक्यांच्या मधले पॉजेस किती महत्वाचे असतात, ते या दोघांमुळं कळालं. मोठमोठी वाक्यं बोलताना दम लागतो म्हणून थांबणं वेगळं आणि शब्दा-वाक्यांमधल्या नेमक्या जागा ओळखून तिथं नेमके पॉजेस घेणं वेगळं! या दोघांना ते जसं जमलं तसं इतर कुणाला क्वचितच जमलं असेल - राजकारण आणि अभिनय दोन्ही क्षेत्रांत.
सुरुवातीला त्यांच्या गंभीर भूमिकाच बघायला मिळाल्यामुळं असेल, पण 'वजीर'मधल्या विक्रम गोखलेंना 'माझे राणी माझे मोगा' गाण्यात बघताना काहीतरी वेगळंच वाटायचं. पण पुढं 'लपंडाव' बघितला आणि त्यांच्या अभिनयाची रेन्ज लक्षात यायला लागली.
लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, अशा मराठीतल्या दिग्गज कलाकारांना हिंदी सिनेमात अगदीच किरकोळ कामं करताना बघून वाईट वाटायचं. विक्रम गोखलेंनीसुद्धा हिंदी सिनेमात व्हिलनचे वगैरे रोल केले. पण नंतरच्या काळात 'हम दिल दे चुके सनम' किंवा 'भुलभुलैया' यासारख्या मेनस्ट्रीम मूव्हीजमध्ये त्यांना महत्वाच्या रोलमध्ये बघून भारी वाटलं होतं.
कारगील युद्धाच्या वेळी विक्रम गोखलेंनी दिलीप कुमारला उद्देशून लिहिलेलं पत्र पेपरमध्ये वाचलं होतं. पाकिस्तान सरकारनं दिलीपकुमारला दिलेला 'निशाण-ए-पाकिस्तान' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर निषेध म्हणून दिलीपकुमारनी परत करावा, असं जाहीर आवाहन त्या पत्रात केलं होतं. त्यातली राजकीय भूमिका, देशभक्तीची संकल्पना, वगैरे तेव्हाच्या वयानुसार आणि आकलनानुसार योग्यच वाटलं होतं; पण त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे, एक कलाकार, एक नट इतकी स्पष्ट भूमिका घेऊ शकतो आणि इतक्या मुद्देसूदपणे जाहीररित्या मांडू शकतो, याबद्दल वाटलेली कौतुकाची भावना जास्त मोठी होती.
विक्रम गोखलेंना टीव्ही आणि सिनेमाच्या स्क्रीनवर खूप बघितलं. नाटकातला त्यांचा स्टेजवरचा अभिनय बघायची संधी मात्र मिळाली नाही. मागच्याच आठवड्यात जितेंद्र जोशीच्या 'गोदावरी'मध्ये त्यांना बघून बरं वाटलं. तसं बघितलं तर, संपूर्ण सिनेमात एकच वाक्य त्यांना वेगवेगळ्या प्रसंगात म्हणायचं होतं. पण न बोलता त्यांनी चेहरा आणि विशेषतः डोळ्यांमधून इतर कलाकारांशी आणि प्रेक्षकांशी साधलेला संवाद आणखी कुणाला जमला असता असं वाटत नाही.
काही कलाकारांचे संवाद, त्यांनी बोललेले शब्द, त्यांच्या ॲक्शन्स आपल्याला त्यांची आठवण करून देत राहतात. विक्रम गोखलेंच्या धीरगंभीर आवाजासोबतच त्यांचे प्रेग्नंट पॉजेस आणि त्यांचा शब्देविण संवादु नेहमी आठवत राहील हे नक्की...
- मंदार शिंदे ९८२२४०१२४६
२७/११/२०२२
No comments:
Post a Comment