ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Friday, February 5, 2016

सक्तीची सुरक्षा

हेल्मेट सक्ती (आणि सीटबेल्ट सक्ती) म्हणजे 'आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी' असा प्रकार वाटतो. हेल्मेट वापरणं किंवा सीटबेल्ट लावणं हे स्वतःच्या सुरक्षेसाठी केलं पाहिजे, हे मान्य. पण या गोष्टी न केल्यास आपल्या स्वतःलाच फक्त त्रास होईल. याउलट लेनची शिस्त न पाळणं, लेन कटींग, सिग्नल जंपिंग, नो एन्ट्रीत गाडी घालणं, ओव्हरस्पीडींग अशा जास्त धोकादायक गोष्टींकडं ट्रॅफीक पोलिस सर्रास दुर्लक्ष करतात आणि हेल्मेट घातलं नाही किंवा सीटबेल्ट लावला नाही म्हणून अडवून अडवून पावत्या फाडतात. वर सांगितलेल्या लेन कटींग, सिग्नल जंपिंग, नो एन्ट्रीत गाडी घालणं, ओव्हरस्पीडींग वगैरे गोष्टींनी स्वतःपेक्षा जास्त इतरांच्या जीवाला धोका निर्माण केला जातो. त्याबद्दल आधी कडक उपाययोजना झाली पाहिजे, मग 'सक्तीच्या सुरक्षे'चं बघू! मी स्वतः कित्येक ठिकाणी सिग्नलवरच्या ट्रॅफिक पोलिसांना आणि कंट्रोल रुमला असे प्रकार दाखवून दिले आहेत. यावर मिळालेला रिस्पॉन्स जबरदस्त डीमोटिव्हेटिंग आहे.

सातारा रोडच्या एका सिग्नलला तीन ट्रॅफिक पोलिस थांबले असताना लोक सर्रास सिग्नल तोडत होते. मी याबद्दल विचारलं तर पोलिसांनी मला काय सांगावं? "आम्ही बिनपावतीपुस्तकाचे पोलिस असल्यानं आम्हाला कुणी घाबरतच नाही. पावतीपुस्तक मिळालं तरच आम्ही लोकांना अडवू शकतो." दुस-या एका नव्यानं जॉईन झालेल्या पोलिसानं तर मला स्वतःच्या पायाला बांधलेलं बँडेज दाखवलं. सिग्नल तोडून येणा-या एका बाईकला अडवण्याचा प्रयत्न करत असताना त्या बाईकवाल्यानं याच्या पायावरुन गाडी घातली होती.

पुणे स्टेशनजवळ मालधक्क्याच्या सिग्नलला एक पीएमपीएमएल बस तुफान वेगानं सिग्नल तोडून माझ्यासमोरुन गेली. समोरुन येणा-या काही गाड्यांना जवळजवळ घासूनच बस निघून गेली. मी बसचा नंबर घेऊन तिथंच उभ्या असलेल्या ट्रॅफिक पोलिसाला दिला. त्यानं सांगितलं की असे शंभरजण दिवसभरात सिग्नल तोडतात, आम्ही सगळ्यांवर कारवाई करु शकत नाही. मी ताबडतोब शंभर नंबरवर फोन करुन त्या बसचा नंबर, ठिकाण, आणि ड्युटीवरच्या ट्रॅफिक पोलिसांचा रिस्पॉन्स हे सगळं सांगितलं. कंट्रोल रुमचा रिस्पॉन्स अजून ग्रेट होता. त्यांनी विचारलं, "सिग्नल तोडणा-या बसनं तुम्हाला किंवा तुमच्या गाडीला धडक दिली का? तुम्हाला किंवा तुमच्यासमोर कुणाला दुखापत झाली का? बसच्या धडकेनं कुणाचा मृत्यू झाला का?" मी म्हटलं, "म्हणजे हे सगळं व्हायची वाट बघून मगच तक्रार द्यायची का?" यावर ते म्हणाले, "साहेब, इथं पुण्यात माणसं मेली तरी त्याचा तपास करायला आम्हाला फोर्स पुरत नाहीत. तुम्ही असे सिग्नल तोडल्याबद्दल फोन करायला लागले तर आम्ही काम कसं करायचं?" मी म्हटलं, "म्हणजे अपघात आणि गुन्हे टाळणं हे तुमच्या दृष्टीनं कामच नाही. अपघात किंवा गुन्हा होईपर्यंत तुम्ही वाट बघणार आणि मग फोर्स अपुरी असल्यानं त्याचाही छडा लागणार नाही..." त्यांचं स्टँडर्ड स्पष्टीकरण मला पटणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी स्पष्ट सांगून टाकलं, "आम्ही यात काहीही करु शकत नाही. तुम्ही पीएमपीएमएलकडं तक्रार करा." मी पीएमपीएमएलच्या हेल्पलाईनला फोन करुन पुन्हा बसचा नंबर, वेळ, ठिकाण, घडलेला प्रकार, हे सगळं सांगितलं. यावर त्यांनी ताबडतोब सांगून टाकलं की, ती बस नक्कीच कॉन्ट्रॅक्टवरचा ड्रायव्हर चालवत असणार. आणि मग ते कॉन्ट्रॅक्टच्या ड्रायव्हरचे अनेक प्रॉब्लेम मला सांगू लागले. मी म्हटलं, "तुम्ही माझी तक्रार नोंदवून घ्या आणि चौकशी करा. इथं ड्युटीवर असणा-या ट्रॅफिक पोलिसांनीसुद्धा ती बस वेगानं सिग्नल तोडून जाताना बघितलीय." यावर उत्तर मिळालं, "बघा, ट्रॅफिक पोलिस तिथं असून कारवाई करत नसतील तर आम्ही काय करणार? त्या बसनं काही अपघात केला किंवा कुणाचं नुकसान, दुखापत केली तर आम्ही तक्रार घेऊ शकतो..." या घटनेनंतर आठवड्याभरातच मी हा सिग्नल क्रॉस करत असताना स्टेशनकडं जाणा-या एका पीएमपीएमएल बसनं सिग्नल तोडून माझ्या कारला धडक दिली. कारच्या मागच्या दरवाज्याला स्क्रॅचेस पडले आणि क्वार्टर पॅनल चेपलं. मी सावध असल्यानं गाडीचा स्पीड वाढवला आणि मोठा अपघात टाळला. पण मी पुढं निघून आल्यानं बस सिग्नल तोडून पळून गेलीच आणि मला नंबरही नोट करता आला नाही. माझ्याकडं गाडी नंबर असताना मिळालेला रिस्पॉन्स इतका खतरनाक होता की आता गाडी नंबर नसताना कम्प्लेंट करायचा विचारसुद्धा मी केला नाही.

एनएच फोरवर (किंवा एकंदरीतच कुठल्याही हायवेवर) प्रवास करणा-यांना नेहमी येणारा अनुभव म्हणजे जड वाहनं उजव्या लेनमधे डिव्हायडरला चिकटून जात असतात. या जड वाहनांचा स्पीड चाळीसपेक्षाही कमी असतो, त्यामुळं हलकी आणि वेगानं जाणारी वाहनं अक्षरशः सूरपारंब्या आणि पकडापकडी खेळल्यासारखी चालवली जातात. वास्तविक हायवेवर ठिकठिकाणी 'जड वाहने डाव्या बाजूने चालवावीत' असे बोर्ड लावले आहेत, पण हा नियम कुठंच पाळला जात नाही. याबद्दल हायवे हेल्पलाईनवर फोन करुन तक्रार देण्याचा प्रयत्न केला तर ते म्हणाले, "आम्हालाही माहिती आहे हा प्रॉब्लेम. पण आम्ही तरी कुठं-कुठं पुरे पडणार? देशातल्या सगळ्याच हायवेंवर हा प्रॉब्लेम आहे..." मी म्हटलं, "देशाचं सोडा. मी आत्ता अमूक-अमूक ठिकाणी आहे. माझी तक्रार नोंदवून घ्या आणि इथं जेवढी वाहनं नियमभंग करतायत त्यांच्यावर कारवाई करा..." मी हे बोलेपर्यंत फोन कट झाला (की कट केला माहिती नाही) आणि मी परत चार-पाच वेळा फोन लावला तर नुसतीच रिंग झाली, फोन उचलला गेला नाही!

टिळक रोडवरुन ग्राहक पेठेजवळ खजिना विहिरीकडं वळलं की वन-वे सुरु होतो, तो थेट नागनाथ पारापर्यंत जातो. या रस्त्याला नेहमी (नेहमीच!) राँग साईडनं लोक येतात. वरुन आवेश असा असतो की बरोबरच रस्त्यानं चाललेत. मी स्वतः या रस्त्याला तीन-चार वेळा पोलिसांनाच बाईकवरुन उलटं येताना थांबवलंय. यावर ते एकतर ओशाळवाणं हसून काहीतरी बोलून वेळ मारुन नेतात किंवा पोलिसी अरेरावीची भाषा वापरायचा प्रयत्न करतात. तरीही प्रकरण अंगावर येईल असं वाटलं तर चक्क पळून जातात. यामधे महिला पोलिसही पुरुष पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून नो एन्ट्रीत गाडी घालताना दिसतात. पुणे विद्यार्थी गृहाच्या शाळेत मुलांना सोडायला येणारे पालक आणि रिक्षावाले-व्हॅनवाले काका मुलांसोबत नो एन्ट्रीत गाडी घालून देशाच्या भावी आधारस्तंभांना प्रात्यक्षिकातून नियमभंगाचं ट्रेनिंग देतात. पालकांना अडवल्यास "तुम्ही काय कधी नियम तोडतच नाही काय?" किंवा "तुम्हाला काय करायचंय? आमचं आम्ही बघून घेऊ" असं मुलांदेखत बोलून त्यांना वर निर्लज्जपणाचंही प्रशिक्षण देतात (यातही स्त्री-पुरुष समानता आहेच). रिक्षा-व्हॅनवाले तर मुलांदेखतच अर्वाच्च्य, शिवराळ भाषेत उलट डाफरुन मुलांना दादागिरी आणि गुंडगिरीचं ट्रेनिंग देतात.

पर्वतीला गजानन महाराज मठाकडून शाहू कॉलेजकडं जाणारा रस्ता वन-वे आहे. तिथं तर समोरच खुद्द लक्ष्मीनगर पोलिस चौकी आहे. या रस्त्यानं सर्रास उलट्या गाड्या येत असतात. ब-याचदा त्यात पोलिसांच्याही गाड्या असतात. पोलिस चौकीत जाऊन तक्रार केली तर 'हे आमचं काम नाही, ट्रॅफिक ब्रँचला कळवा,' असं सांगतात.

बीआरटीच्या लेनमधून गाड्या चालवून अचानक बाहेरच्या रस्त्याला येणारे, सिग्नल सुटला की डिव्हायडरच्या पलीकडून रस्ता क्रॉस करणारे, आपण रेड सिग्नलला थांबलो की मागून कर्णकर्कश्श हॉर्न वाजवणारे, सर्कल असणा-या चौकात बरोब्बर सर्कल चुकवून घुसणारे तर जाता-येता केव्हाही कुठंही दिसतील. पण ट्रॅफिक पोलिस यावर काहीच करु शकत नाहीत. प्रशासनाकडं हे प्रकार थांबवण्यासाठी फोर्सच नाही. आणि गप्पा कसल्या मारतात तर, स्मार्ट सिटी आणि हेल्मेटसक्तीच्या!

(वर दिलेली उदाहरणं प्रातिनिधिक पण खरी आहेत. ज्यांना हेल्मेटसक्तीपेक्षा हे प्रश्न महत्त्वाचे वाटत असतील त्यांनी अन्याय्य हेल्मेटसक्तीविरुद्ध आपला निषेध पुढील व्यक्तींकडं नोंदवावा - (१) मा. श्री. के.के. पाठक, पोलिस आयुक्त कार्यालय, साधू वासवानी रोड, कॅम्प, पुणे - ४११००१; (२) मा. आमदार श्री. गिरीश बापट, पालकमंत्री - पुणे, २१२ शनिवार पेठ, अमेय अपार्टमेंट, पुणे - ४११०३०; (३) मा. श्री. दिवाकर रावते, परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य, चौथा मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई - ४०००३२.)


Share/Bookmark

Friday, January 22, 2016

पेपरची भाषा

फार नाही, दहा-बारा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. महाराष्ट्र टाइम्सच्या फ्रंट पेजवर एका बातमीच्या हेडिंगमधे 'कुंचबणा' असा शब्द आला होता. त्यावरुन, म.टा.नं 'कुंचबणा' असा छापलाय तर तोच बरोबर शब्द आहे, 'कुचंबणा' चुकीचा आहे, असा एका मित्रानं माझ्याशी वाद घातला होता. इंग्रजी सुधारायचं असेल तर 'टाइम्स ऑफ इंडिया' वाचा, कुठल्याही इंग्रजी शब्दाचं करेक्ट स्पेलिंग हवं असेल तर 'टाइम्स'मधे बघा, असं मी स्वतः जवळच्या व्यक्ती/शिक्षकांकडून पूर्वी ऐकलेलं आहे. आता मात्र 'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'संध्यानंद' असे दोन पेपर समोर आले तर मी म.टा.मधले 'फोटो' बघतो आणि 'संध्यानंद'मधला मजकूर वाचतो.


Share/Bookmark

हरवलेला रस्ता... नव्हे, हरवलेला विचार

हा व्हिडिओ बघा. विकासाच्या नावाखाली किती अनैसर्गिक आणि तकलादू बनत चाललोत आपण. पूररेषेच्या आत झालेली (आणि होणारी) बांधकामं आपण बघून न बघितल्यासारखी करतो. सिमेंटच्या रस्त्यांमधे पावसाचं पाणी मुरत नाही, त्यावर ड्रेनेजच्या जाळ्या नसतात, रस्त्याच्या कडेला सुद्धा पेव्हिंग ब्लॉक्समुळं पाणी जायला जागा नसते, तरीसुद्धा आपण नगरसेवकाकडं जाऊन जाऊन आपल्या गल्लीबोळातले रस्ते सिमेंटचे का करुन घेतोय? तेही आपल्याच खर्चानं! पश्चिम महाराष्ट्रातल्या सुपिक शेतजमिनींचं प्लॉटिंग करुन त्यावर दहा-दहा फूट खोल फाउंडेशनचं सिमेंट ओतून आपण पुढच्या दहा पिढ्यांचं नुकसान करतोय, असं का वाटत नाही आपल्याला? ही कसल्या डेव्हलपमेंटची हाव सुटलीय आपल्याला? ज्यांना कळत नाही त्यांचं तर सोडाच, पण ज्यांना हे कळतंय तेसुद्धा एक तर मूग गिळून गप्प बसलेत किंवा तेच या सार्वजनिक अज्ञानाचा फायदा घ्यायला सरसावलेत. आपण काय करणार आहोत यावर?

Share/Bookmark

लोका सांगे शहाणपण...

डहाणूकर कॉलनीच्या सिग्नलला थांबलो होतो. वनदेवीकडून एकजण मोटारसायकलवरुन आला आणि डावीकडं डहाणूकरमधे वळला. बरोबर चौकात कुठून तरी पाण्याचा ओघळ आला होता. बिचा-याची गाडी घसरली आणि तो माझ्यासमोरच पडला. मी माझी गाडी साईड-स्टँड करून त्याच्याकडं पळत गेलो. त्याची गाडी उचलली, त्याला उठवलं.
"पाणी सांडलेलं कळलंच नै," तो म्हणाला.
मी म्हटलं, "असू दे, होतंय असं. आधी गाडी बाजूला घ्या. कुठं लागलं-बिगलं का बघा."
तो 'थँक्स' म्हणत गाडी गियरमधनं काढत होता.
इतका वेळ माझ्या मागच्या गाडीवरचा एक तरुण पुणेकर गाडीवरुन न उतरताच त्या पडलेल्या माणसाला ओरडून म्हणाला, "टायर गुळगुळीत झालंय, बदलून घ्या आधी!"
प्रसंग काय आणि माणसं बोलतात काय... धन्यहे!


Share/Bookmark

Thursday, December 31, 2015

डायरी

पानं भरा, पानं भरा
डायरीची ह्या पानं भरा.
ही भरली की दुसरी भरा,
दुसरीनंतर तिसरी भरा.
वय वाढतै, दिवस जातैत
शेडुलं बीजी बीजी होतैत
'वेळच नै' हे पण लिवा
पानं भरा, पानं भरा...
दिवसा घटना, रात्री चकना
त्येच्याशिवट झोपच यैना
झोपतली मग सप्नं लिवा
पानं भरा, पानं भरा...
फेसबुक ट्विटर गुगल फिगल
तुमची डायरी जग वाचंल
खाजगी प्रायवेट शेयर करा
पानं भरा, पानं भरा...
(पुढच्या पानावर...)
(मागच्या पानावरनं...)
डैरीत डैरी पुठ्ठ्याची...
एक डैरी भरु बै दोन डैरी भरु...
ये गं ये गं डैरी, तुझी पानं भरी...
डैरी आली पण वर्ष गेलं...
भरली डायरी तीनशे पासठ पानांची...
डैरी भरली नै म्हून वर्ष संपैचं थांबत नै...
वर्ष संपल्याचं दुख्ख नै पण डैरी कोरी -हात्ये...
म्हणी लिवा, गाणी लिवा
कविता-किस्से, रांगोळीचे शिक्के
मेंदी काडा, रेसिपी मांडा
मापं काडा, मापं लिवा
अशुद्ध किव्वा सुद्द लिवा
काय केलं त्ये लिवा, नाय केलं त्ये बी लिवा
पानं भरा, पानं भरा
भरा भरा, भराभरा...
भरभर भरा, डाय-या भरा
आयुक्ष भर्भर चाल्लंय, धरा!

- अक्षर्मन


Share/Bookmark

Saturday, December 5, 2015

रविंद्र संगीत - एक जिवंत अनुभव

गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांची ओळख जन-गण-मन, शांतिनिकेतन, आणि नोबेल पुरस्कार एवढीच नाही, तर दीडेकशे वर्षांपूर्वी आधुनिक , काळाच्या पुढची काव्यं, नाटकं, कथा रचणारे साहित्यिक टागोर, मृत्यू आणि आत्मा-परमात्मा संबंधांवर सुंदर भाष्य करणारे तत्वज्ञ टागोर, लयबद्ध आणि कर्णमधूर रविंद्र संगीताचे निर्माते टागोर, वयाच्या साठीनंतर चित्रकलेच्या क्षेत्रात मुक्त मुशाफिरी करणारे चित्रकार टागोर, शिक्षणाला चार भिंती आणि छापील शब्दांच्या बाहेर आणून शिकण्याची प्रक्रिया आनंददायी बनवणारे टागोर, अशा गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांच्या अनेक ओळखी आहेत. आणि रविंद्र संगीताच्या साथीनं टागोरांचं जीवन-दर्शन घडवणारा राधा मंगेशकर यांचा 'रविंद्र संगीत' हा कार्यक्रम तितकाच जिवंत आणि रोमांचकारी बनतो तो केवळ त्यांच्या सुमधूर आवाजानं नव्हे तर मनापासून केलेल्या निवेदनानं. रविंद्र संगीतातली दहा उत्तम गाणी त्या रविंद्र संगीताचे सर्व नियम पाळून आणि प्रत्येक बंगाली गाण्याचा शब्दार्थ व भावार्थ मराठीत समजावून सांगत सादर करतात. मग ते 'आये तो बे सोहोचरी, हाते हाते धोरी धोरी, नाचीबी घिरी घिरी गाहीबी गान' हे आनंदगान असो, की कदंब वृक्षाभोवती घिरट्या घालणा-या कृष्णछायेचं गूढगीत असो, राधा मंगेशकरांच्या अर्थपूर्ण निवेदनातून या बंगाली गीतांचा अर्थही कळतो आणि त्यांच्या मूळ लयबद्ध रचनेचा आनंदही घेता येतो. 'तोमार होलो शुरु, आमार होलो शारा' हे तत्वज्ञानाच्या वाटेनं जाणारं गीत आणि 'हे खोनिकेर ओतिथी' हे सुख आणि दुःखाच्या पलिकडची भावना व्यक्त करणारं गीत अर्थाइतक्याच ताकदीनं राधा मंगेशकर गातात. दोन गाण्यांच्या मधे टागोरांचा जीवन-प्रवास, 'गीतांजली' आणि नोबेल पुरस्काराचे किस्से, टागोरांच्या घरांचे, वस्तूंचे फोटो, या सगळ्यातून वातावरण रविंद्रमय होऊन जातं आणि मानवी जीवनाचं अंतिम सत्य सांगत कार्यक्रमाचा शेवट होतो - 'जोडी तोर दाक सुने केऊ ना असे, तोबे एकला चालो रे... एकला चालो एकला चालो एकला चालो रे...'


Share/Bookmark

Monday, November 30, 2015

शिक्षणाच्या आयचा घो

एका फारच नावाजलेल्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमधे काही कामासाठी गेलो होतो. प्रचंड डोनेशन आणि अफाट फी घेणारं हे इंटरनॅशनल लेव्हलचं कॉलेज. तिथल्या एका सिनियर पोस्टवरच्या व्यक्तिनं मला सहज पुरवलेली माहिती - (माझी त्या व्यक्तीशी कोणतीही पर्सनल ओळख नसताना व आम्ही पहिल्यांदाच एकमेकांना भेटत असताना ही माहिती दिली याचा अर्थ त्या व्यक्तीला मनापासून हेच वाटत असणार...)

"यू नो सर, धिस कॉलेज ओन्ली फॉर बिग फॅमिली स्टुडंट्स..." (ही व्यक्ती बाकी सगळ्यांशी मराठीत बोलत होती, पण माझ्याशी बोलताना मात्र दर वाक्याला इंग्रजीचा मुडदा का पाडत होती कोण जाणे!) "ओन्ली रिच चिल्ड्रन्स लर्न हियर सर. ऑल आर कमिंग फ्रॉम आऊट ऑफ स्टेट, नो महाराष्ट्रा स्टुडंट. बिकॉज ऑफ टू थिंग, सर. वन इज बिग फी. महाराष्ट्रा स्टुडंट डोण्ट अफॉर्ड धिस बिग फी, सर. ॲन्ड सेकंड इज दॅट दे डोण्ट सूट द कोर्स, सर. धिस मॅनेजमेंट कोर्स, सर. महाराष्ट्रा स्टुडंट ॲन्ड फॅमिली थिंक ट्रॅडिशनल, सर. ट्रॅडिशनल पिपल्स डू आर्ट, सायन्स, कॉमर्स, सर. धिस ऑल रिच पिपल्स फ्रॉम नॉन-महाराष्ट्रा डू मॅनेजमेंट, सर. बट यू नो सर, दे आर ऑल लाईक 'अमीर बाप की बिगडी औलाद'. दे डोण्ट हॅव मनी व्हॅल्यू, सर..." आणखी बरंच काही.

एका फॉर्मल मीटिंगमधे, आपल्याच कॉलेजात बसून ही सिनियर व्यक्ती अशा दिव्य भाषेत आपला कॉलेजबद्दलचा दिव्य दृष्टीकोन मला सांगत होती. आणि अशा कॉलेजमधे आपल्या मुलांना प्रवेश मिळावा म्हणून आई-बाप प्राण पणाला लावतात. (ॲक्चुअली पैसे पणाला लावतात, पण पैसे हाच त्यांचा प्राण असल्यानं...)

मोराल ऑफ द स्टोरी काय, तर कॉलेजमधे ॲडमिशन तिथल्या शिक्षकांचा ॲटिट्यूड बघून नव्हे, तर कॉलेजच्या ब्रॅन्डकडं बघून घेतली जाते. आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यातली महत्त्वाची तीन-चार वर्षं त्यांना अशा निगेटीव्ह माइंडसेटच्या अगाध 'शिक्षकां'सोबत काढावी लागतात. आणि मग हीच मुलं पुढं जाऊन मॅनेजर, शिक्षक, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई-बाप होतात. तुम्ही बाभळीचं रोप लावून गुलाब फुलायची अपेक्षा करु शकत नाही, मग या अशा शाळा-कॉलेजांत मुलांना का पाठवता, याचा विचार केलाय का कधी?


Share/Bookmark