ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Friday, January 22, 2016

पेपरची भाषा

फार नाही, दहा-बारा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. महाराष्ट्र टाइम्सच्या फ्रंट पेजवर एका बातमीच्या हेडिंगमधे 'कुंचबणा' असा शब्द आला होता. त्यावरुन, म.टा.नं 'कुंचबणा' असा छापलाय तर तोच बरोबर शब्द आहे, 'कुचंबणा' चुकीचा आहे, असा एका मित्रानं माझ्याशी वाद घातला होता. इंग्रजी सुधारायचं असेल तर 'टाइम्स ऑफ इंडिया' वाचा, कुठल्याही इंग्रजी शब्दाचं करेक्ट स्पेलिंग हवं असेल तर 'टाइम्स'मधे बघा, असं मी स्वतः जवळच्या व्यक्ती/शिक्षकांकडून पूर्वी ऐकलेलं आहे. आता मात्र 'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'संध्यानंद' असे दोन पेपर समोर आले तर मी म.टा.मधले 'फोटो' बघतो आणि 'संध्यानंद'मधला मजकूर वाचतो.


Share/Bookmark

हरवलेला रस्ता... नव्हे, हरवलेला विचार

हा व्हिडिओ बघा. विकासाच्या नावाखाली किती अनैसर्गिक आणि तकलादू बनत चाललोत आपण. पूररेषेच्या आत झालेली (आणि होणारी) बांधकामं आपण बघून न बघितल्यासारखी करतो. सिमेंटच्या रस्त्यांमधे पावसाचं पाणी मुरत नाही, त्यावर ड्रेनेजच्या जाळ्या नसतात, रस्त्याच्या कडेला सुद्धा पेव्हिंग ब्लॉक्समुळं पाणी जायला जागा नसते, तरीसुद्धा आपण नगरसेवकाकडं जाऊन जाऊन आपल्या गल्लीबोळातले रस्ते सिमेंटचे का करुन घेतोय? तेही आपल्याच खर्चानं! पश्चिम महाराष्ट्रातल्या सुपिक शेतजमिनींचं प्लॉटिंग करुन त्यावर दहा-दहा फूट खोल फाउंडेशनचं सिमेंट ओतून आपण पुढच्या दहा पिढ्यांचं नुकसान करतोय, असं का वाटत नाही आपल्याला? ही कसल्या डेव्हलपमेंटची हाव सुटलीय आपल्याला? ज्यांना कळत नाही त्यांचं तर सोडाच, पण ज्यांना हे कळतंय तेसुद्धा एक तर मूग गिळून गप्प बसलेत किंवा तेच या सार्वजनिक अज्ञानाचा फायदा घ्यायला सरसावलेत. आपण काय करणार आहोत यावर?

Share/Bookmark

लोका सांगे शहाणपण...

डहाणूकर कॉलनीच्या सिग्नलला थांबलो होतो. वनदेवीकडून एकजण मोटारसायकलवरुन आला आणि डावीकडं डहाणूकरमधे वळला. बरोबर चौकात कुठून तरी पाण्याचा ओघळ आला होता. बिचा-याची गाडी घसरली आणि तो माझ्यासमोरच पडला. मी माझी गाडी साईड-स्टँड करून त्याच्याकडं पळत गेलो. त्याची गाडी उचलली, त्याला उठवलं.
"पाणी सांडलेलं कळलंच नै," तो म्हणाला.
मी म्हटलं, "असू दे, होतंय असं. आधी गाडी बाजूला घ्या. कुठं लागलं-बिगलं का बघा."
तो 'थँक्स' म्हणत गाडी गियरमधनं काढत होता.
इतका वेळ माझ्या मागच्या गाडीवरचा एक तरुण पुणेकर गाडीवरुन न उतरताच त्या पडलेल्या माणसाला ओरडून म्हणाला, "टायर गुळगुळीत झालंय, बदलून घ्या आधी!"
प्रसंग काय आणि माणसं बोलतात काय... धन्यहे!


Share/Bookmark

Thursday, December 31, 2015

डायरी

पानं भरा, पानं भरा
डायरीची ह्या पानं भरा.
ही भरली की दुसरी भरा,
दुसरीनंतर तिसरी भरा.
वय वाढतै, दिवस जातैत
शेडुलं बीजी बीजी होतैत
'वेळच नै' हे पण लिवा
पानं भरा, पानं भरा...
दिवसा घटना, रात्री चकना
त्येच्याशिवट झोपच यैना
झोपतली मग सप्नं लिवा
पानं भरा, पानं भरा...
फेसबुक ट्विटर गुगल फिगल
तुमची डायरी जग वाचंल
खाजगी प्रायवेट शेयर करा
पानं भरा, पानं भरा...
(पुढच्या पानावर...)
(मागच्या पानावरनं...)
डैरीत डैरी पुठ्ठ्याची...
एक डैरी भरु बै दोन डैरी भरु...
ये गं ये गं डैरी, तुझी पानं भरी...
डैरी आली पण वर्ष गेलं...
भरली डायरी तीनशे पासठ पानांची...
डैरी भरली नै म्हून वर्ष संपैचं थांबत नै...
वर्ष संपल्याचं दुख्ख नै पण डैरी कोरी -हात्ये...
म्हणी लिवा, गाणी लिवा
कविता-किस्से, रांगोळीचे शिक्के
मेंदी काडा, रेसिपी मांडा
मापं काडा, मापं लिवा
अशुद्ध किव्वा सुद्द लिवा
काय केलं त्ये लिवा, नाय केलं त्ये बी लिवा
पानं भरा, पानं भरा
भरा भरा, भराभरा...
भरभर भरा, डाय-या भरा
आयुक्ष भर्भर चाल्लंय, धरा!

- अक्षर्मन


Share/Bookmark

Saturday, December 5, 2015

रविंद्र संगीत - एक जिवंत अनुभव

गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांची ओळख जन-गण-मन, शांतिनिकेतन, आणि नोबेल पुरस्कार एवढीच नाही, तर दीडेकशे वर्षांपूर्वी आधुनिक , काळाच्या पुढची काव्यं, नाटकं, कथा रचणारे साहित्यिक टागोर, मृत्यू आणि आत्मा-परमात्मा संबंधांवर सुंदर भाष्य करणारे तत्वज्ञ टागोर, लयबद्ध आणि कर्णमधूर रविंद्र संगीताचे निर्माते टागोर, वयाच्या साठीनंतर चित्रकलेच्या क्षेत्रात मुक्त मुशाफिरी करणारे चित्रकार टागोर, शिक्षणाला चार भिंती आणि छापील शब्दांच्या बाहेर आणून शिकण्याची प्रक्रिया आनंददायी बनवणारे टागोर, अशा गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांच्या अनेक ओळखी आहेत. आणि रविंद्र संगीताच्या साथीनं टागोरांचं जीवन-दर्शन घडवणारा राधा मंगेशकर यांचा 'रविंद्र संगीत' हा कार्यक्रम तितकाच जिवंत आणि रोमांचकारी बनतो तो केवळ त्यांच्या सुमधूर आवाजानं नव्हे तर मनापासून केलेल्या निवेदनानं. रविंद्र संगीतातली दहा उत्तम गाणी त्या रविंद्र संगीताचे सर्व नियम पाळून आणि प्रत्येक बंगाली गाण्याचा शब्दार्थ व भावार्थ मराठीत समजावून सांगत सादर करतात. मग ते 'आये तो बे सोहोचरी, हाते हाते धोरी धोरी, नाचीबी घिरी घिरी गाहीबी गान' हे आनंदगान असो, की कदंब वृक्षाभोवती घिरट्या घालणा-या कृष्णछायेचं गूढगीत असो, राधा मंगेशकरांच्या अर्थपूर्ण निवेदनातून या बंगाली गीतांचा अर्थही कळतो आणि त्यांच्या मूळ लयबद्ध रचनेचा आनंदही घेता येतो. 'तोमार होलो शुरु, आमार होलो शारा' हे तत्वज्ञानाच्या वाटेनं जाणारं गीत आणि 'हे खोनिकेर ओतिथी' हे सुख आणि दुःखाच्या पलिकडची भावना व्यक्त करणारं गीत अर्थाइतक्याच ताकदीनं राधा मंगेशकर गातात. दोन गाण्यांच्या मधे टागोरांचा जीवन-प्रवास, 'गीतांजली' आणि नोबेल पुरस्काराचे किस्से, टागोरांच्या घरांचे, वस्तूंचे फोटो, या सगळ्यातून वातावरण रविंद्रमय होऊन जातं आणि मानवी जीवनाचं अंतिम सत्य सांगत कार्यक्रमाचा शेवट होतो - 'जोडी तोर दाक सुने केऊ ना असे, तोबे एकला चालो रे... एकला चालो एकला चालो एकला चालो रे...'


Share/Bookmark

Monday, November 30, 2015

शिक्षणाच्या आयचा घो

एका फारच नावाजलेल्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमधे काही कामासाठी गेलो होतो. प्रचंड डोनेशन आणि अफाट फी घेणारं हे इंटरनॅशनल लेव्हलचं कॉलेज. तिथल्या एका सिनियर पोस्टवरच्या व्यक्तिनं मला सहज पुरवलेली माहिती - (माझी त्या व्यक्तीशी कोणतीही पर्सनल ओळख नसताना व आम्ही पहिल्यांदाच एकमेकांना भेटत असताना ही माहिती दिली याचा अर्थ त्या व्यक्तीला मनापासून हेच वाटत असणार...)

"यू नो सर, धिस कॉलेज ओन्ली फॉर बिग फॅमिली स्टुडंट्स..." (ही व्यक्ती बाकी सगळ्यांशी मराठीत बोलत होती, पण माझ्याशी बोलताना मात्र दर वाक्याला इंग्रजीचा मुडदा का पाडत होती कोण जाणे!) "ओन्ली रिच चिल्ड्रन्स लर्न हियर सर. ऑल आर कमिंग फ्रॉम आऊट ऑफ स्टेट, नो महाराष्ट्रा स्टुडंट. बिकॉज ऑफ टू थिंग, सर. वन इज बिग फी. महाराष्ट्रा स्टुडंट डोण्ट अफॉर्ड धिस बिग फी, सर. ॲन्ड सेकंड इज दॅट दे डोण्ट सूट द कोर्स, सर. धिस मॅनेजमेंट कोर्स, सर. महाराष्ट्रा स्टुडंट ॲन्ड फॅमिली थिंक ट्रॅडिशनल, सर. ट्रॅडिशनल पिपल्स डू आर्ट, सायन्स, कॉमर्स, सर. धिस ऑल रिच पिपल्स फ्रॉम नॉन-महाराष्ट्रा डू मॅनेजमेंट, सर. बट यू नो सर, दे आर ऑल लाईक 'अमीर बाप की बिगडी औलाद'. दे डोण्ट हॅव मनी व्हॅल्यू, सर..." आणखी बरंच काही.

एका फॉर्मल मीटिंगमधे, आपल्याच कॉलेजात बसून ही सिनियर व्यक्ती अशा दिव्य भाषेत आपला कॉलेजबद्दलचा दिव्य दृष्टीकोन मला सांगत होती. आणि अशा कॉलेजमधे आपल्या मुलांना प्रवेश मिळावा म्हणून आई-बाप प्राण पणाला लावतात. (ॲक्चुअली पैसे पणाला लावतात, पण पैसे हाच त्यांचा प्राण असल्यानं...)

मोराल ऑफ द स्टोरी काय, तर कॉलेजमधे ॲडमिशन तिथल्या शिक्षकांचा ॲटिट्यूड बघून नव्हे, तर कॉलेजच्या ब्रॅन्डकडं बघून घेतली जाते. आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यातली महत्त्वाची तीन-चार वर्षं त्यांना अशा निगेटीव्ह माइंडसेटच्या अगाध 'शिक्षकां'सोबत काढावी लागतात. आणि मग हीच मुलं पुढं जाऊन मॅनेजर, शिक्षक, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई-बाप होतात. तुम्ही बाभळीचं रोप लावून गुलाब फुलायची अपेक्षा करु शकत नाही, मग या अशा शाळा-कॉलेजांत मुलांना का पाठवता, याचा विचार केलाय का कधी?


Share/Bookmark

Tuesday, October 27, 2015

मसाला दुधाची आठवण

चिंचवड स्टेशनजवळ रहायला होतो तेव्हाची गोष्ट. चाकणवरुन रात्री दहा वाजता सेकंड शिफ्ट सुटली की अकरा वाजेपर्यंत चिंचवडच्या रुमवर पोचायला हरकत नव्हती. पण कंपनीतनं थेट रुमवर आलो असं फार क्वचित व्हायचं. अरुणची ट्रॅक्स क्रूझर गाडी पिक-अप ड्रॉपसाठी असायची. नाशिक फाट्यावरुन वळण्यासाठी गाडीला दोन ऑप्शन असायचे - एक तर डावीकडं वळून बोपोडीपर्यंत ड्रॉप करुन मग पिंपरी - चिंचवड - निगडी वगैरे, किंवा उजवीकडं वळून पिंपरी - चिंचवड - निगडी वगैरे करुन शेवटी बोपोडी. या दोन्ही ऑप्शनमधे चिंचवड सगळ्यात शेवटी यायचं कारण नव्हतं. पण बोपोडी - पिंपरी - निगडी आणि शेवटी चिंचवड असा अरुणचा स्पेशल रुट होता. कधी कधी तर पिंपरी - निगडी - बोपोडी आणि मग पुन्हा चिंचवड असा द्राविडी प्राणायामसुद्धा करायचा. यामागं एक विशेष कारण होतं - मसाला दूध.

चिंचवडच्या चापेकर चौकात तेव्हा आतासारखा उड्डाणपूल नव्हता. चापेकरांच्या पुतळ्यासमोर मसाला दुधाची एक गाडी लागायची. रात्री खूप उशिरापर्यंत तिथं दूध प्यायला गर्दी असायची. एका मोठ्ठ्या काळ्या कढईत दूध आटवत ठेवलेलं असायचं. ग्लासभर गरम गरम मसाला दूध पिऊन ढेकर दिल्याशिवाय दिवस संपला असं वाटायचंच नाही. त्यामुळं निगडी - बोपोडी दोन्ही टोकांचे ड्रॉप संपवून आम्ही रात्री उशिरा मसाला दूध प्यायला खास चिंचवडला यायचो. कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध पिण्याचं अप्रूप मात्र आमच्या या नेहमीच्या दुग्धप्राशनामुळं पूर्ण संपलं होतं. (नेहमीच्या म्हणजे नक्की कधी ते पुढं सांगेन. सात्विक विचाराच्या वाचकांनी इथपर्यंतच वाचावं, ही नम्र विनंती!)

तर आम्ही नेहमी मसाला दूध प्यायला चिंचवडच्या चापेकर चौकात जायचो. नेहमी म्हणजे ज्या दिवशी दारु प्यायला गेलो नाही त्या दिवशी! ते उलट-सुलट रुट मारुन शेवटी चिंचवडला येण्यामागचं खरं मोटीव्हेशन होतं - कामिनी बार. हा रात्री उशिरापर्यंत चालू असायचा. उशिरा म्हणजे खरंच रात्री बारा-साडेबारा-एक वगैरे, मसाला दुधाच्या गाडीपेक्षासुद्धा उशिरा. इथं आम्ही फक्त प्यायचो आणि बोलायचो. बाकी डायव्हर्जन कसलंच नाही. कारण इथं स्टार्टर-मेनकोर्स-डेझर्ट वगैरेसारखे डिस्टर्बन्स नव्हते. हा प्युअर बार होता. शेजारी त्यांचंच प्युअर व्हेज फ्यामिली गार्डन रेस्टॉरंट होतं. खाणारे सगळे तिकडं. इथं डाळ-शेंगदाणे सोडले तर बाकी फक्त बीयरचा महापूर. तेव्हा अजून ब्रँड वगैरे ठरायचा होता. कधी कॅनॉन, कधी किंगफिशर, कधी झिंगारो, कधी खजुराहो... कधी कधी तर सुरुवातीपासून शेवटापर्यंत तीन-चार ब्रँड बदललेले असायचे, कळत-नकळत.

काही विशेष कारण नव्हतं रोज प्यायचं. कसलं दुःख आहे, टेन्शन आहे, स्ट्रेस आहे, असा कुठलाच बहाणा नाही. स्वच्छ मनानं, आत्ता प्यावीशी वाटते म्हणून, प्यायचो. आणि बोलायचो खूप. तेव्हा जग फार बघून झालं नव्हतं. फार मोठं अनुभवांचं गाठोडंही पाठीशी नव्हतं (आताही आहे असं काही म्हणणं नाही). पण बोलायला आणि ऐकायला खूप आवडायचं (जे आताही आवडतं). मग त्यासाठी ही आयडीयल जागा होती.

'चश्मेबद्दूर' पिक्चरमधे फारुख शेख आणि दिप्ती नवल एका गार्डनमधल्या ओपन रेस्टॉरंटमधे बसलेले असतात. (हे खरंखुरं गार्डनमधलं रेस्टॉरंट असतं, टेबलाभोवती कुंड्या ठेवलेलं पहिल्या मजल्यावरचं गार्डन रेस्टॉरंट नाही.) ऑर्डर घ्यायला आलेल्या वेटरला ते विचारतात, "यहां अच्छा क्या है?" वेटर शांतपणे उत्तर देतो, "जी यहां का माहौल बहुत अच्छा है!"

तर अशा माहौलसाठी जवळपास रोज जाऊन बसायचो. खूप बोलायचो, ऐकायचो, प्यायचो, मझा होती. (टीपः मजा वेगळी, मज्जा वेगळी, आणि मझा वेगळी. ह्यांतला फरक सांगून कळत नाही, अनुभवावा लागतो.) नंतर रहायच्या जागा बदलत गेल्या, 'बसायच्या' जागाही बदलत गेल्या, पार्टनर बदलत गेले, विषय बदलत गेले, पण संवादाची आवड मात्र तेवढीच राहिली, किंबहुना वाढत गेली.

कोजागिरी आली की लोक मसाला दुधावर बोलतात. आमच्या दुधाच्या आठवणीदेखील शेवटी दारुवर जाऊन थांबतात...

स्थितप्रज्ञ आम्ही, अम्हाला नसावी
प्रतिक्षा गटारी नि कोजागिरीची
दवा द्या की दारु, सुखानेच मारु
मझा त्याची तुम्हा न कळायाची


Share/Bookmark