नोव्हेंबर १९९६ मध्ये दै. सकाळ ने कुसुमाग्रजांची 'स्वातंत्र्यदेवीची विनवणी' ही कविता प्रसिद्ध केली. निमित्त होते भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाचे! स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षे लोटली तरी आपण स्वातंत्र्यदेवीला नुसते अभिवादनच करीत राहिलो. यावर स्वतः स्वातंत्र्यदेवता हात जोडून आपल्याला विनविते आहे की, मला आता अभिवादन करणे पुरे झाले, काही ठोस कृती करा.
स्वातंत्र्यदेवीची विनवणी
पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका।
मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका।।
सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे।
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत वरू नका।।
अज्ञानाच्या गळ्यात माळा, अभिमानाच्या घालू नका।
अंध प्रथांच्या कुजट कोठरी, दिवाभितासम दडू नका।।
जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा।
एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका।।
वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे।
करतिल दुसरे बघतिल तिसरे असे सांगुनी सुटू नका।।
जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा।
मेजाखालून मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका।।
बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना।
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांझ गोडवे गाऊ नका।
सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने।
करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा करू नका।।
प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे।
इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ फुंकू नका।।
पाप कृपणता पुण्य सदयता संतवाक्य हे सदा स्मरा।
भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका।।
गोरगरीबा छळू नका। पिंड फुकाचे गिळू नका।
गुणीजनांवर जळू नका।
उणे कुणाचे दिसता किंचित देत दवंडी फिरू नका।
मीच विनविते हात जोडुनी वाट वा़कडी धरू नका।।
परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी।
माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपु नका।।
भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे।
गुलाम भाषिक होऊनि अपुल्या प्रगतिचे शिर कापु नका।।
कलम करी ये तरी सालभर सण शिमग्याचा ताणू नका।
सरस्वतीच्या देवळातले स्तंभ घणाने तोडू नका।।
पुत्र पशुसम विकती ते नर, नर न नराधम गणा तया।
परवित्ताचे असे लुटारू नाते त्याशी जोडु नका।।
स्वच्छ साधना करा धनाची बैरागीपण नसे बरे।
सदन आपुले करा सुशोभित दुसऱ्याचे पण जाळु नका।।
तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी।
करमणुकीच्या गटारगंगा त्यात तयाला क्षाळु नका।।
सुजन असा पण कुजन मातता हत्यार हातामध्ये धरा।
सौजन्याच्या बुरख्याखाली शेपुट घालून पळू नका।।
करा कायदे परंतु हटवा जहर जातिचे मनातुनी।
एकपणाच्या मारून बाता ऐन घडीला चळू नका।।
समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका।
दासी म्हणूनी पिटू नका वा देवी म्हणुनी भजू नका।।
नास्तिक आस्तिक असा कुणीही माणुसकीतच देव पहा।
उच्च नीच हा भेद घृणास्पद उकिरड्यात त्या कुजू नका।।
माणूस म्हणजे पशू नसे। हे ज्याच्या हृदयात ठसे।
नर नारायण तोच असे।
लाख लाख जन माझ्यासाठी जळले मेले विसरू नका।
मीच विनविते हात जोडुनी वाट वाकडी धरू नका।।
ऐसी अक्षरे
Monday, September 27, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
Translation for the first 2 lines please
ReplyDeleteFifty years have passed,
DeleteEnough of the salutations.
Listen to me instead,
Beg you to avoid wrong paths.
खूप छान अशी रचना
ReplyDeleteखूप छान अशी रचना
ReplyDeleteमला शाळेत ही कविता होती , आजच्या युगासाठी ती महत्त्वाची आहे !
ReplyDelete