ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Thursday, September 2, 2010

कविसंमेलन

सनईचे मंगल सूर सभागृहात मंगलमय वातावरण तयार करीत असताना, व्यासपीठावर मात्र अजूनही माईक, बॅनर, हार, सतरंजी, व माणसे, अशा सर्व महत्त्वाच्या व बिन-महत्त्वाच्या वस्तूंची मांडणी व पुनर्मांडणी चालू होती. कोणत्याही क्षणी कविसंमेलनास सुरुवात होईल, असे दर पाच मिनिटांनी जाहीर करण्यात येत होते. अशाच कित्येक क्षणांच्या प्रतिक्षेनंतर, व्यासपीठावर आगमनकर्ते झालेल्या कवींचे सर्व काव्यरसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

पांढरी विजार व खादीच्या कुर्त्यातील निवेदकाने सराईतपणे माईकचा ताबा घेत स्वागतपर निवेदन सुरु केले,

"सुस्वागतम्‌, सुस्वागतम्‌ ! अखिल भारतीय मराठी काव्यसंघटनेच्या तालुका पातळीवरील आंतरराष्ट्रीय कविसंमेलनात मी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो. सुस्वागतम्‌ ! आमच्या या कविसंमेलनास इतका उदंड प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा नसल्याने काही गैरसोय झाल्यास रसिकांनी संयोजकांना क्षमा करावी. हा उदंड प्रतिसाद असाच टिकवून ठेवण्यासाठी आम्ही सभागृहाचे दरवाजे बाहेरुन बंद केले आहेत; तरी संपूर्ण कार्यक्रम आपण आहे त्या जागेवरुन, उघड्या डोळ्यांनी व बंद कानांनी... माफ करा... बंद डोळ्यांनी व उघड्या कानांनी... माफ करा... जाऊ दे, कोणतीही उघडझाप न करता पहावा व ऐकावा, अशी मी नम्र व उग्र विनंती करतो.

"ओळख त्याची करुन द्यावी
ज्याला कुणीच ओळखत नाही,
..
..
ओळख त्याची करुन द्यावी
ज्याला कुणीच ओळखत नाही,
..
यांना तर सगळेच ओळखतात
फक्त कुणीच ओळख दाखवत नाही !

"तर असे हे मराठी भाषेतील दिग्गज, खंदे, उमदे, तरुण, तडफदार, इमानदार, जहागिरदार वगैरे वगैरे कवी, या व्यासपीठाची शोभा आणि सभागृहाचे भाडे वाढवीत बसले आहेत. या सर्वांची मी ओळख करुन देतो -

"हे आहेत ज्येष्ठ कवी घो. घो. घनघोर..."

टाळ्यांच्या गजरात घो. घो. घनघोर दोन्ही हात वर करीत उभे राहिले. खादीचा कुर्ता-पायजमा, जुनी करकरीत (म्हणजे जुनी असली तरी कर्र-कर्र असा आवाज करणारी) कोल्हापुरी चप्पल, काळ्या चपट्या काड्यांचा जाड भिंगाचा चष्मा, अशा वेषातील घो. घो., महाभारतातील भीमाच्या गदेसारखे आपल्या खांद्यावर एक फावडे टाकून का आले होते, याचा प्रेक्षकांनाच काय पण संयोजकांना देखील उलगडा होत नव्हता. परंतु, घो. घो. हे एक ज्येष्ठ व जनसामान्यांचे असामान्य कवी असल्याने, त्यांना प्रश्न विचारायची कुणाचीच हिंमत नव्हती.

"दुसरे कवी आहेत, गिरीजा तनुजा अनुजा सुत..."

इतक्या लांबलचक नावाच्या तुलनेत अगदीच किरकोळ उंची असणारे गितअसुत (म्हणजे गिरीजा तनुजा अनुजा सुत) हात उंचावत उभे राहिले. घोघों च्या धिप्पाड देहाच्या तुलनेत अगदीच सुमार उंचीचे गितअसुत कुणाला दिसलेच नाहीत, त्यामुळे ते अजून व्यासपीठावर आलेच नसावेत असे वाटून कुणी टाळ्याच वाजविल्या नाहीत. शरीराच्या मानाने बराच मोठा पठाणी अंगरखा व खांद्यावरुन पांघरलेला लाल चौकड्यांचा स्कार्फ सांभाळत, गितअसुत आपल्या जागेवर जाऊन बसले. त्यांच्या पायातील मोजड्या नव्या असल्या तरी घोघोंच्या जुन्या कोल्हापुरीइतकी देखील करकर त्यांच्यात नव्हती, त्यामुळे सभागृहातील सुई-पतन (पिन-ड्रॉप) शांततेत देखील त्यांच्या उठबशीची जाणीव कुणाला झाली नाही.

"तिसरे कवी आहेत, श्री. प्रकाश काळोखे..."

काळ्या बारीक काड्यांचा चष्मा, काळा टी-शर्ट, काळी जीन्स, व काळे बूट, अशा अवतारातील प्रकाश काळोखेंच्या डोक्याचे व दाढीचे केस मात्र पांढरे होते. टाळ्यांच्या गजरात, विशेषतः युवा वर्गाच्या प्रोत्साहनाचा स्वीकार करीत प्रकाश काळोखे आपल्या जागेवर जाऊन बसले.

"... तर रसिकहो, मी अत्यंत जड अंतःकरणाने आपणा सर्वांना या तिघांच्या हाती सोपवीत आहे. हे रसिक प्रेक्षका, त्यांना माफ कर, कारण ते काय बोलत आहेत ते तुलाच नव्हे, तर त्यांनाही समजत नाही...

"सर्वप्रथम आपल्यासमोर येत आहेत ते थोर कवी, ज्यांनी उभ्या मराठी काव्यसृष्टीला आडवे पाडून देशोधडीला लावले; ज्यांची कविता एकदा ऐकल्यावर पुन्हा दुसर्‍यांदा ऐकण्याची हिंमत होणार नाही, असे रांगडे कवी - घो. घो. घनघोर. त्यांचे गाजलेले काव्यसंग्रह आहेत - 'तान्या गाईचं वेडं कोकरु', 'म्हशीचं बकरु', आणि 'शेळीचं लेकरु'. तर येत आहेत, घो. घो. घनघोर, घो. घो. घनघोर..."

घोघोंनी माईकचा ताबा घेईपर्यंत सभागृह 'घो. घो., घो. घो.' अशा घोषणांनी दुमदुमले होते. मात्र, घोघोंचा आवाज येताच सभागृहात पुन्हा सुई-पतन शांतता पसरली. आपल्या घनगंभीर आवाजात घो. घो. बोलू लागले,

"माझ्या काव्याची शीतं... तुमच्या पतरावळीवर सांडतो, जेऊन घ्या.

"कवितेचं नाव आहे - 'अक्कल करीयेला जाते तेव्हा'

लग्नाची वरात
मुंडवळ्या हातात,
ती पायातल्या पायात हसली
का हसली? का हसली?
आमाला तर बाबा काईच कळत न्हाई
आमाला तर बाबा काईच कळत न्हाई.

चंद्राची कोर
नाचतो मोर,
जीवाला घोर
का रुसली? का रुसली?
आमाला तर बाबा काईच कळत न्हाई
आमाला तर बाबा काईच कळत न्हाई.

डोक्यात फूल मोगर्‍याचं
गळ्यात डोरलं दुसर्‍याचं,
कडंला लेकरु शेजार्‍याचं
का रडली? का रडली?
आमाला तर बाबा काईच कळत न्हाई
आमाला तर बाबा काईच कळत न्हाई."

'आम्हाला तर बाबा काहीच कळलं नाही, आम्हाला तर बाबा काहीच कळलं नाही', असा प्रतिध्वनी सभागृहातून उमटत असतानाच घो. घों. नी पुन्हा घसा खाकरुन सुरुवात केली,

"माझ्या पुढच्या छोट्याशा कवितेचं छोटंसं नाव आहे - 'चिऊ'

चिव चिव चिव चिव चिव
चिव चिव चिव चिव चिव
एक झाड.........
त्याच्यावर एक घरटं......
घरट्यात चिमण्या......
चिव चिव चिव चिव चिव
चिव चिव चिव चिव चिव

अथांग निळसर तळं......
त्यात टाकला खडा......
अचानक आवाज आला.....
डुबुक डुबुक डुबुक डुबुक
डुबुक डुबुक डुबुक डुबुक

भयाण हवेली......
म्हैस मेली.....
दरवाजा उघडला.....
कर्र...कट्‍ कर्र...कट्‍ कर्र...कट्‍
कर्र...कट्‍ कर्र...कट्‍ कर्र...कट्‍"

दरवाजाच्या उल्लेखाने रसिकांना, सभागृहाच्या बाहेरुन बंद करण्यात आलेल्या दरवाजांची आठवण झाली व भीती घालविण्यासाठी ते जोरजोरात टाळ्या वाजवू लागले. इतक्यात निवेदकाने पुन्हा माईकचा ताबा घेतला व पुढील निवेदन सुरु केले,

"रसिकहो, घो. घों. च्या दमदार कवितांनंतर, आपल्या वास्तवदर्शी व विद्रोही कविता घेऊन येत आहेत, गिरीजा तनुजा अनुजा सुत ऊर्फ गितअसुत. यांचे गाजलेले, गंजलेले, नावाजलेले काव्यसंग्रह आहेत - 'एक ढेकूण', 'एक मच्छर', 'एक ऊ', 'एक पिसु', आणि विक्रमी खपाचा काव्यसंग्रह - 'एक अमीबा'. तर येत आहेत – वास्तवदर्शी कवी गितअसुत."

यावेळेस गितअसुतांच्या अस्तित्त्वाची श्रोत्यांना प्रथमच जाणीव होऊन ते टाळ्या वाजवीत, खुर्च्यांवर उभे राहत गितअसुतांना पहायचा प्रयत्न करु लागले. गितअसुत माईकजवळ गेले, दोन-तीन वेळा टक-टक करुन व फुंकर मारुनही आवाज येत नसल्याने त्यांनी वळून निवेदकाकडे रागाने बघितले. काहीतरी घोटाळा झालाय हे लक्षात येऊन निवेदक लगबगीने माईककडे येत असतानाच, गितअसुत कडाडले,

"जवळ येऊ नकोस...
...वास येतोय !!!"

या अनपेक्षित हल्ल्याने दचकलेला निवेदक जागेवरच थबकला व ओशाळवाणा होत आपल्याच कपड्यांचा वास घेऊ लागला. तितक्यात गितअसुत पुन्हा गरजले,

"जवळ येऊ नकोस...
...वास येतोय...
...माझ्या अंगाचा !!"

निवेदकाला हायसे वाटले आणि गितअसुतांच्या फार जवळ न जाताच त्याने आपल्या जागेकडे धाव घेतली. गितअसुत पुढे सुरु झाले,

"जवळ येऊ नकोस...
...वास येतोय...
...माझ्या अंगाचा !!
कारण... कारण साला एक ढेकूण रात्रभर सतावतो...

रात्री उशीरा झोपतो
सकाळी उशीरा उठतो,
अंघोळ करायला वेळच कुठे असतो?
मी माझं दुःख का विसरतो??
कारण... कारण साला एक ढेकूण रात्रभर सतावतो...

सकाळी उठतो
गर्दीत घुसतो,
आपला घाम दुसर्‍याला पुसतो
मी माझं दुःख का विसरतो??
कारण... कारण साला एक ढेकूण रात्रभर सतावतो..."

आपल्या सैलसर अंगरख्यामध्ये पाठीमागून हात घालत गितअसुतांनी काहीतरी शोधल्यासारखे केले. मग एक चिमूट माईकसमोर नाचवीत ते पुन्हा ओरडले,

"हाच तो, हाच तो...
आत्ता सापडलाय...
रात्रभर माझं रक्त पिऊन टुंब झालाय...
हाच.. हाच जो माझ्या कवितेची प्रेरणा बनलाय...
त्यालाच मी आता हाताने चिरडलाय...
त्यालाच मी आता हाताने चिरडलाय..."

इतक्या वास्तवदर्शी सादरीकरणाची अपेक्षा नसल्याने निवेदकाने दुरुनच गितअसुतांना आपल्या जागेवर परतण्याची विनंती केली व माईकजवळ जाताच आपल्या खिशातील रुमाल त्यावर टाकून, शक्य तितक्या जास्त अंतरावरुन पुढचे निवेदन सुरु केले,

"रसिकहो, आता येणारा कवी हा अंधाराचा पुजारी आहे, अंधाराचा भक्त आहे, आणि ज्यांना आपण 'अंतराळ कवी' म्हणून ओळखतो, ते ताज्या दमाचे कवी आहेत - प्रकाश काळोखे. त्यांचे गाजलेले काव्यसंग्रह आहेत - 'अंधाराशी जडले नाते', 'अंधाराचे हास्य', 'प्रकाशाचे रहस्य', 'अंतराळाचे भाष्य', आणि त्यांचा नुकताच येऊ घातलेला काव्यसंग्रह आहे, 'गेला लादेन अंतराळात'. तर येत आहेत - प्रकाश काळोखे."

पुन्हा एकदा युवा वर्गाकडून प्रकाश काळोखेंचे दमदार स्वागत झाले. पांढर्‍या दाढीचा हा कृष्ण-धवल कवी तरुणांमध्ये एवढा प्रसिद्ध कसा यावर निवेदक विचार करीत असतानाच, प्रकाश काळोखेंचा चिरका आवाज सभागृहात घुमला,

"माझ्या कवितेचं नाव आहे - 'सूर्य अंधारात चाचपडला'

अंधाराचा प्रत्येक किरण
प्रकाशाला छेदून येताना,
तिकडं अंतरीक्षात सूर्य अंधारात चाचपडला
तिकडं अंतरीक्षात सूर्य अंधारात चाचपडला.

पृथ्वीच्या गर्भात
सूर्याचं पिल्लू,
आता एकच लढाई -
प्रकाशाची नि अंधाराची,
कधीही न संपणारी.
पण मी... मी ती थांबवणार
मांडवली करुन मी ती संपवणार.

पृथ्वीच्या गर्भात
इंडोसल्फानचा डबा,
आता पुन्हा लढाई -
प्रकाशाची नि अंधाराची,
कधीही न संपणारी.
पण आता... आता मी ती थांबवणार
सूर्याचं बटनच बंद करणार,
आणि लाईट बिल वाचवणार !!!"

निवेदक अवाक्‌ होऊन बघत असतानाच, टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात प्रकाश काळोखे आपली पुढची कविता घेऊन सरसावले,

"माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे - 'हेलपाटा'

ती गेली मी आलो
ती आली मी गेलो,
ती बसली मी उठलो
ती उठली मी बसलो,
जाता येता, येता जाता
कशासाठी घालतोय मी हेलपाटा?

ती स्तब्ध मी निस्तब्ध
ती बद्ध मी कटीबद्ध,
ती लक्ष मी दशलक्ष
ती द्राक्ष मी रुद्राक्ष,
जाता येता, येता जाता
का घालत नाही मी हेलपाटा?"

प्रकाश काळोखेंच्या जयजयकारात सभागृह दुमदुमून गेले. श्रोते कसेबसे थोडे शांत झाल्यावर निवेदकाने समारोपाचे निवेदन सुरु केले,

"रसिकजनहो, वेळ आली आहे आपल्या अखिल भारतीय मराठी काव्यसंघटनेच्या तालुका पातळीवरील आंतरराष्ट्रीय कविसंमेलनाच्या सांगतेची. सालाबादप्रमाणे यंदाही संमेलनाची सांगता ज्येष्ठ कवी घो. घो. घनघोर यांच्या सामाजिक आशयाच्या कवितेने होईल."

घो. घो. पुन्हा घसा खाकरुन पुढे सरसावले,

"कवितेचं नाव आहे - 'ऊसाचं बेणं'

ऊसाला पाणी नाही
पाण्याला नदी नाही ।
नदीला धरण नाही
धरणाला पैसा नाही ।
पैशाने ऊस पिकत नाही ॥
पैशाने ऊस पिकत नाही ॥

ऊसाला पाणी नाही
पाण्याला पाऊस नाही ।
पावसाला झाडं नाहीत
झाडांना पैसा नाही ।
पैशाने ऊस पिकत नाही ॥
पैशाने ऊस पिकत नाही ॥"

कविता संपताच श्रोत्यांमधील काही उत्साही कार्यकर्त्यांनी तिथेच घोषणाबाजी सुरु केली,

"पानी आडवा - पानी जिरवा
झाडं लावा - झाडं जगवा"

"अरं येऊन येऊन येनार कोन?
पावसाशिवाय हाईच कोन?"

आपल्या अखिल भारतीय मराठी काव्यसंघटनेच्या तालुका पातळीवरील आंतरराष्ट्रीय कविसंमेलनाची ही फरफट पाहून संयोजक डोक्याला हात लावून बसले. आता पुढच्या वर्षापासून हे विकतचे दुखणे नकोच, असा ठाम निश्चयही त्यांनी दरवर्षीप्रमाणे करुन टाकला.

(कविता व संवादांमध्ये योगदान – निलेश घोळवे, अजय देशमुख, निलेश कदम, अच्युत जंगले)

Share/Bookmark

1 comment:

  1. छान झालं आहे लिखाण. मजा आली. आणि मुख्य म्हणजे (निदान माझ्या दृष्टीने तरी) संभाषणात्मक झालं आहे.

    ReplyDelete