ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Wednesday, March 2, 2011

'वाहवा' - कवी म. भा. चव्हाण



आधुनिक मराठी गझलचे प्रणेते, कवी म.भा.चव्हाण यांच्या 'वाहवा' या गझला, रुबाया आणि शेरोशायरीच्या संग्रहासाठी गझलसम्राट सुरेश भट यांनी लिहिलेली प्रस्तावना -

“श्री. म. भा. चव्हाण ह्यांचा हा पहिला गझलसंग्रह! ह्या संग्रहात त्यांच्या एकूण ५२ निवडक गझला आहेत. मी स्वतः या गझला निवडलेल्या आहेत आणि त्यात वेचक तेवढेच शेर राहू दिलेले आहेत. या संग्रहाच्या निमित्ताने 'गझल' हा एक सुंदर मराठी काव्यप्रकार महाराष्ट्रात लोकप्रिय होऊन रुजायला निश्चित मदतच होणार आहे.

तसा विचार केला तर श्री. म. भा. चव्हाण यांनी आजपर्यंत कविता, पोवाडा, लावणी, अभंगापासून वगापर्यंत सर्वच प्रकार हाताळलेले आहेत. पण माझे स्वतःचे असे मत आहे की, त्यातल्या त्यात त्यांना गझल व लावणी हे दोन काव्यप्रकार फार धार्जिणे आहेत. निखळ मराठी भाषा आणि मराठमोळा अभिव्यक्ती ही चव्हाणांच्या लिखाणाची अंगभूत वैशिष्ट्ये आहेत.

आज मराठी गझल हा नितांत सुंदर काव्यप्रकार महाराष्ट्रातील बहुजन समाजाने, सामान्य जनतेने उचलून धरलेला आहे. रसिक तर आधीपासूनच आहेत; पण उत्तम गझल लिहिणारेही निर्माण होत आहेत.

श्री. म. भा. चव्हाण या नव्या साहित्यिक वस्तुस्थितीचे जिवंत उदाहरण आहेत!

काव्य असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र असो, जो अस्सल असेल तोच शेवटापर्यंत आणि शेवटानंतरही टिकतो; आणि उसने चन्द्रबल आणून काही काळापुरते 'पुढे' येणारे लोक फक्त मागेच जात नाहीत, तर काळाच्या गर्तेत खोल गाडले जातात. त्यांची नावनिशाणीही शिल्लक उरत नाही.

या गझलसंग्रहानंतरचा काळ म्हणजे श्री. म. भा. चव्हाण यांची खरी कसोटी आहे. मराठी माणसांना हा गझलसंग्रह आवडणार आहे, याची दखल घेतली जाईल हे मला ठाऊक आहे; पण हा तर प्रारंभ आहे. चव्हाणांनी याहून अधिक सुंदर लेखन सातत्याने केले पाहिजे आणि स्वतःचे व काळाचे भान ठेवले पाहिजे.

आज श्री. म. भा. चव्हाण यांचा हा गझलसंग्रह आपण वाचत आहात. उद्या फक्त चव्हाणच नव्हेत, तर त्यांच्या पाठोपाठ अनेक प्रतिभाशाली कवींचे गझलसंग्रह मराठी माणसांना वाचायला मिळणार आहेत. इतर काव्यप्रकारांबरोबरच मराठी गझलही महाराष्ट्रात फुलत जाणार आहे.

गझल लिहिणारे कवी इतर कोणत्याही काव्यप्रकाराला दूषणे देत नसतात. दुसर्‍याला नावे ठेवून स्वतःच्या निर्मितीचा अस्सलपणा आणि मोठेपणा शाबित करता येत नसतो. सर्वांनी आपापल्या परीने लिहावे आणि मराठी मायबोली समृद्ध करावी. मराठी काव्याचे आकाश सार्‍या काव्यप्रकारांसाठी आहे आणि याउपरही कुणाचा आक्षेप असेल, तर श्री. म. भा. चव्हाण उत्तर देतील -

केलेस तू खरेदी आकाश हे कधी?
माझा पतंग मीही उडवून पाहिला!

श्री. म. भा. चव्हाण ह्यांच्या ह्या गझलसंग्रहामुळे मराठी काव्यक्षेत्रात एक उल्लेखनीय भर पडणार आहे, हे निश्चित.”

- सुरेश भट




Share/Bookmark

No comments:

Post a Comment