ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Tuesday, November 15, 2011

फिरती शाळा

झोपडी तिथे बालवाडी।
मूल तिथे शाळा।
चाकांवरती पुस्तकमेळा।
आली आली दारी शाळा॥

शिक्षणाचा हक्क प्रत्येक मुलाला आपल्या घटनेनं दिला आहे. शिक्षणाच्या सोयीसाठी शहरांतल्या वॉर्डांपासून अतिदुर्गम खेड्यांपर्यंत सर्वत्र शाळा व शिक्षक उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारी यंत्रणा सतत प्रयत्नशील आहेच. तरीही सर्व मुलं व त्यांच्या पालकांपर्यंत शिक्षणविषयक योजनांचा संपूर्ण लाभ आजही पोहोचलेला दिसत नाही. कधी आर्थिक अडचणींमुळं, कधी सामाजिक परिस्थितीमुळं, तर कधी कौटुंबिक वा वैयक्तिक कारणांमुळं, समाजाच्या विशिष्ट स्तरातल्या मुलांना शिक्षणापासून वंचित रहावं लागतं. या प्रत्येक मुलापर्यंत पोहोचून त्याच्या समस्यांचं निराकरण करणं, व त्याला शिकण्यासाठी प्रवृत्त करणं, हे प्रत्यक्ष शिकवण्याइतकंच अवघड पण महत्त्वाचं कार्य आहे. मुंबई व पुण्यासारख्या महानगरांत तर शिक्षणाचे असंख्य पर्याय पूर्वीपासून उपलब्ध आहेत. तरीही आपल्या आजूबाजूला शिक्षणापासून दूर राहिलेला मोठा वर्ग दिसतो. ह्या वर्गातली मुलं कुठल्याही कारणामुळं शाळेपर्यंत पोहोचू शकत नसतील तर आपण शाळाच मुलांच्या दारात घेऊन जावी या विचारानं 'डोअर स्टेप स्कूल' या संस्थेची स्थापना १९८८ साली मुंबईत झाली.

मुख्यतः ३ ते १४ वयोगटातल्या मुलांसाठी 'डोअर स्टेप स्कूल' विविध उपक्रम राबवते. पुणे आणि मुंबई या दोन शहरात संस्था कार्यरत असून, ५०,००० हून जास्त मुलांपर्यंत नियमितपणे पोहोचते आहे. मूळ शिक्षण प्रवाहापासून निरनिराळ्या कारणांमुळं दूर राहणार्यार मुलांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम संस्था चालवते. यामध्ये, बालवाडी, अभ्यासवर्ग, साक्षरतावर्ग, वाचनवर्ग, आणि वस्ती वाचनालयं, तसंच मुलांना शाळेत नेण्या-आणण्याची सोय, फिरती शाळा अशा सुविधा आहेत. मुलांच्या प्रत्यक्ष समस्यांचा अभ्यास करत, जसजशी गरज भासेल तसतसे उपक्रम संस्था हाती घेत आली आहे. मुलं आणि शाळा यांच्यातलं अंतर मिटवण्याच्या ध्यासातून संस्थेनं काही नाविण्यपूर्ण कल्पनाही अंमलात आणल्या आहेत. त्यातील दोन मुख्य कल्पना म्हणजे, (१) शाळांमधून चालणारे वाचनवर्ग, आणि (२) फिरती शाळा किंवा स्कूल ऑन व्हील्स.

कामगार वस्ती वा झोपडपट्टी भागांमध्ये मुलांसाठी नियमित स्वरुपात वर्ग भरवता यावेत, मुलांना अभ्यासासाठी पुरेशी जागा मिळावी, यासाठी 'डोअर स्टेप स्कूल' तात्पुरत्या वर्गखोल्या उभारण्यासाठी प्रयत्नशील असते. परंतु, पुष्कळदा जिथं मुलं हमखास सापडतात, तिथं आजूबाजूला वर्ग घेण्यासारखी जागा नसते. उदाहरणार्थ - रस्त्यात सिग्नलजवळ दिसणारी मुलं, रेल्वे स्टेशन, किंवा क्रॉफर्ड मार्केट सारख्या बाजारांजवळ फिरणारी मुलं इत्यादी. अशा मुलांना शिकवायचं असेल तर प्रथम बसायची सोय कुठं करायची असा प्रश्न उभा राहतो. ही अडचण दूर करण्यासाठी संस्थेनं 'फिरत्या मुलांसाठी फिरती शाळा' ही संकल्पना प्रत्यक्षात आणली.



ही 'फिरती शाळा' किंवा 'स्कूल ऑन व्हील्स' म्हणजे वर्गखोली प्रमाणे सोय असलेली बस. जिथं मुलं असतील तिथं ही बस नेऊन, मुलांचा वर्ग बसमध्येच घ्यायचा ही कल्पना. एकावेळी २० ते २५ मुलांना सहज बसून शिकता येईल अशी बसची अंतर्गत रचना. मुलांना बसण्यासाठी जागेचा मोठा प्रश्न 'स्कूल ऑन व्हील्स'नं सोडवला. त्यामुळं अधिकाधिक मुलांपर्यंत संस्थेचे उपक्रम नेणं शक्य झालं आहे. या बसचा उपयोग वर्ग म्हणून तर होतोच, शिवाय मुलांना म्युझियम, झू, बँका, दवाखाने, अशा ठिकाणच्या शैक्षणिक सहलीसाठीही होतो. तसंच शाळेच्या वेळेत मुलांची ने-आण करण्यासाठीही या बस वापरता येतात.

अशा तर्‍हेची पहिली 'फिरती शाळा' १९९८ मध्ये सुरु झाली. आज पुणे व मुंबई मिळून एकूण सहा फिरत्या शाळा 'डोअर स्टेप स्कूल'मार्फत चालवल्या जातात. आजवर या दोन शहरांतील असंख्य मुलांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे व घेत आहेत. अशाच एका नव्या 'स्कूल ऑन व्हील्स'चं उद्घा्टन झालं २२ सप्टेंबर २०११ रोजी, 'डोअर स्टेप स्कूल'च्या कोथरुड कार्यालयाजवळ. आता पुण्यातल्या आणखी काही ‘फिरत्या’ मुलांना ही ‘फिरती शाळा’ शिक्षणाच्या वाटेवर नक्कीच घेऊन जाईल.

'डोअर स्टेप स्कूल'बद्दल अधिक माहितीसाठी संपर्क - श्रीमती रजनी परांजपे (९३७१००७८४४). संस्थेची वेबसाईट आहे - www.doorstepschool.org

(पूर्वप्रसिद्धीः दै. सकाळ व महाराष्ट्र टाइम्स, पुणे)

Share/Bookmark

No comments:

Post a Comment