ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Friday, May 24, 2013

तुला भेटल्यावर...




ओळख पटली माझी मला, तुला भेटल्यावर
मी म्हणजे 'मी' नाही, कळले तुला भेटल्यावर

पाऊस-पाणी म्हटली गाणी, भिजलो अन् सुकलो
पाणी आभाळातील नव्हते, कळले सुकल्यावर

गुण आवडले - दोषही प्यारे, प्रीती जडताना
वाटे सगळे बदलावेसे, नाते ठरल्यावर

नशा नकोशी वाटू लागते, चढू लागताना
जरा घेऊनी झिंगू, वाटे पुन्हा उतरल्यावर

पैसा आला, घेऊन झाली गाडी अन्‌ माडी
जगायचे पण राहून गेले, कळले खपल्यावर

... मंदार
२४.०५.२०१३


Share/Bookmark

Thursday, May 23, 2013

भीती घालावी लागते...?

सोसायटीच्या पार्किंगमधून गाडी काढत होतो. एक पाच-सहा वर्षांचा मुलगा पार्किंगमधे, गाड्यांच्या मधून, गेटपर्यंत पळत-पळत चालला होता. मागून त्याची आजी ओरडत होती, "शुभम, थांब पळू नको, इकडं ये." शुभम काही ऐकत नव्हता. पळता-पळता माझ्यासमोर येऊन उभा राहिला. मागून आजी ओरडली, "शुभम, थांब नाही तर ते दाढीवाले तुला घेऊन जातील..." शुभम थोडा घाबरला, पण तिथंच थांबून माझ्याकडं बघू लागला. मग आजी मला म्हणाल्या, "तुम्ही जरा भीती दाखवा हो त्याला. अजिबात ऐकत नाही माझं." मी एकदा आजीकडं बघितलं आणि मग शुभमकडं बघून हसलो. शुभम पण हसला. आजी पुन्हा म्हणाल्या, "शुभम, ते दाढीवाले रागावतील हं तुला." पण शुभमनं आता स्वतःचं मत बनवलं होतं. तो माझ्याकडं बघून गोड हसला आणि पुन्हा गाड्यांमधून पळू लागला. मी आजीबाईंना विचारलं, "का उगाच भीती घालता हो पोराला?" त्या म्हणाल्या, "काय करणार? माझं ऐकतच नाही तो. म्हणून अशी कुणाची तरी भीती घालावी लागते..." "अहो पण अशानं माझ्याबद्दल किंवा माझ्यासारखं दिसणार्‍यांबद्दल त्याच्या मनात कायमची भीती किंवा संशय निर्माण होईल ना!" "होऊ दे की मग. त्यानं माझं ऐकलं म्हणजे झालं. तुमच्याबद्दल काय मत होईल त्याचं मला काय..." असं म्हणून त्या शुभमच्या मागे पुन्हा ओरडत निघून गेल्या.

'आपलं' ऐकलं जावं यासाठी 'इतरां'बद्दल भीती दाखवण्याचं हे एकमेव उदाहरण नाही. वडीलधारी माणसं, समाजातले विचारवंत, आणि खास करुन मीडीया, असंच काहीतरी करताना दिसतात. सरकार युसलेस, राजकारण गलिच्छ, नेतेमंडळी गुंड, भांडवलदार पिळवणूक करणारे, श्रीमंत निर्दयी, गरीब विध्वंसक, वगैरे वगैरे... या सर्व 'इतरां'वर शिक्के मारले की सर्वसामान्य माणूस घाबरतो आणि त्यांच्यापासून लांब राहतो, त्यांच्यापासून स्वतःला 'वाचवण्याचा' प्रयत्न करतो. आणि अशा वेळी, ही भीती आणि संशय निर्माण करणार्‍यांवर त्याचा विश्वास बसू लागतो.

शुभमचं संरक्षण किंवा त्याचा विकास यापेक्षा त्यानं 'आपलं' ऐकणं त्याच्या आजीला महत्त्वाचं वाटलं. त्यासाठी विनाकारण एखाद्याबद्दल शुभमच्या मनात संशय आणि भीती निर्माण करण्यात तिला काही चुकीचं वाटलं नाही. स्वतःचं महत्त्व टिकवण्या किंवा वाढवण्यासाठी कळत-नकळत तुम्हीही असं काही करताय का? माणसा-माणसातली दरी वाढत चाललीय असं आपण म्हणतो खरं, पण आपणही ती दरी वाढवण्यात हातभार लावतोय का, याचा विचार केला पाहिजे...

Share/Bookmark

Sunday, May 19, 2013

इतिहास आणि नागरिकशास्त्र

जोपर्यंत आपल्या शाळांमधून 'इतिहास' शिकवला जातोय, तोपर्यंत आपलं 'नागरिकशास्त्र' सुधारण्याची काही शक्यता नाही. स्वातंत्र्यलढा, असहकार चळवळ, राज्यक्रांती, या गोष्टींपासून बरोब्बर उलटी आणि लोकशाहीला हानीकारक प्रेरणा घेतली जातीय...


Share/Bookmark

Thursday, May 16, 2013

पावसाचे थेंब चार...

तापलेल्या या जमिनीला
आणखी काय हवं यार?
थोडा थंड वारा आणि
पावसाचे थेंब चार...

ताप विसरून क्षणभर
जमीन होते थंडगार,
मातीचा जो वास येतो
घ्यावा वाटे वारंवार...

पाऊस येतो आडवा-तिडवा
भिजवून टाकतो घरदार,
टप्-टप् टप्-टप् थेंब साठून
छपरावरून पडते धार...

रस्त्यावरून माणसं, गाड्या
झेलत जातात पावसाचे वार,
सुटका केली उन्हापासून
म्हणून 'त्या'चे मानतात आभार...

- अक्षर्मन


Share/Bookmark

Saturday, May 11, 2013

विना सहकार नहीं उद्धार

असहकार आणि स्वार्थ हे माणसाच्या मुलभूत गुणधर्मांपैकी आहेत. दुसऱ्या व्यक्तीशी, संस्थेशी, यंत्रणेशी, वातावरणाशी - स्वतःचा स्वार्थ नसेल तर - सहकाराच्या भूमिकेत जायला माणूस नैसर्गिकपणे कचरतो. परवा एक मित्र म्हणाला, "मला सामाजिक कार्यात पहिल्यापासून रस आहे. आमच्या कॉलनीतल्या लोकांना मी सांगितलं की, आपल्या भागातल्या रस्त्याचं काम होत नसेल तर आपण 'असहकार' पुकारू, 'रास्ता रोको आंदोलन' करू. पेपरवाल्यांना बोलवू. अमूक-तमूक वर्तमानपत्राचे संपादक माझ्या खास ओळखीचे आहेत, ते स्वतः येतील. फोटोसहीत मोठी बातमी येईल..." मी विचारलं, "त्यानं काय होईल?" "काय होईल म्हणजे? आख्ख्या शहराला कळेल की आमचा भाग, आमची कॉलनी कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित आहे." "पण आख्ख्या शहराला कळाल्यानं रस्त्याचं काम होईल?" "ते माहित नाही; पण लोकांमधे चर्चा तरी होईल ना..." "पण त्यापेक्षा तुमच्या भागातल्या नगरसेवकाला अथवा थेट नगरपालिकेला निवेदन दिलं तर काम होण्याची जास्त शक्यता नाही का?" "हं, शक्यता आहे, पण असं काम झाल्याचं कधी ऐकलं नाही. आंदोलन, मोर्चा, अन्यायाला वाचा फोडणं वगैरे असलंच छापून येतं पेपरात..."

ही असहकाराची भावना काढून टाकल्याशिवाय सर्वसमावेशक विकासाची कल्पना प्रत्यक्षात येऊ शकणार नाही. अशा लोकांमधे राहून, याच लोकांना सोबत घेऊन, याच लोकांच्या प्रगतीसाठी सहकारातून कामाचे डोंगर उभे करणाऱ्या नेत्यांचं अशा वेळी कौतुक वाटतं.

Share/Bookmark