सोसायटीच्या पार्किंगमधून गाडी काढत होतो. एक पाच-सहा वर्षांचा मुलगा पार्किंगमधे, गाड्यांच्या मधून, गेटपर्यंत पळत-पळत चालला होता. मागून त्याची आजी ओरडत होती, "शुभम, थांब पळू नको, इकडं ये." शुभम काही ऐकत नव्हता. पळता-पळता माझ्यासमोर येऊन उभा राहिला. मागून आजी ओरडली, "शुभम, थांब नाही तर ते दाढीवाले तुला घेऊन जातील..." शुभम थोडा घाबरला, पण तिथंच थांबून माझ्याकडं बघू लागला. मग आजी मला म्हणाल्या, "तुम्ही जरा भीती दाखवा हो त्याला. अजिबात ऐकत नाही माझं." मी एकदा आजीकडं बघितलं आणि मग शुभमकडं बघून हसलो. शुभम पण हसला. आजी पुन्हा म्हणाल्या, "शुभम, ते दाढीवाले रागावतील हं तुला." पण शुभमनं आता स्वतःचं मत बनवलं होतं. तो माझ्याकडं बघून गोड हसला आणि पुन्हा गाड्यांमधून पळू लागला. मी आजीबाईंना विचारलं, "का उगाच भीती घालता हो पोराला?" त्या म्हणाल्या, "काय करणार? माझं ऐकतच नाही तो. म्हणून अशी कुणाची तरी भीती घालावी लागते..." "अहो पण अशानं माझ्याबद्दल किंवा माझ्यासारखं दिसणार्यांबद्दल त्याच्या मनात कायमची भीती किंवा संशय निर्माण होईल ना!" "होऊ दे की मग. त्यानं माझं ऐकलं म्हणजे झालं. तुमच्याबद्दल काय मत होईल त्याचं मला काय..." असं म्हणून त्या शुभमच्या मागे पुन्हा ओरडत निघून गेल्या.
'आपलं' ऐकलं जावं यासाठी 'इतरां'बद्दल भीती दाखवण्याचं हे एकमेव उदाहरण नाही. वडीलधारी माणसं, समाजातले विचारवंत, आणि खास करुन मीडीया, असंच काहीतरी करताना दिसतात. सरकार युसलेस, राजकारण गलिच्छ, नेतेमंडळी गुंड, भांडवलदार पिळवणूक करणारे, श्रीमंत निर्दयी, गरीब विध्वंसक, वगैरे वगैरे... या सर्व 'इतरां'वर शिक्के मारले की सर्वसामान्य माणूस घाबरतो आणि त्यांच्यापासून लांब राहतो, त्यांच्यापासून स्वतःला 'वाचवण्याचा' प्रयत्न करतो. आणि अशा वेळी, ही भीती आणि संशय निर्माण करणार्यांवर त्याचा विश्वास बसू लागतो.
शुभमचं संरक्षण किंवा त्याचा विकास यापेक्षा त्यानं 'आपलं' ऐकणं त्याच्या आजीला महत्त्वाचं वाटलं. त्यासाठी विनाकारण एखाद्याबद्दल शुभमच्या मनात संशय आणि भीती निर्माण करण्यात तिला काही चुकीचं वाटलं नाही. स्वतःचं महत्त्व टिकवण्या किंवा वाढवण्यासाठी कळत-नकळत तुम्हीही असं काही करताय का? माणसा-माणसातली दरी वाढत चाललीय असं आपण म्हणतो खरं, पण आपणही ती दरी वाढवण्यात हातभार लावतोय का, याचा विचार केला पाहिजे...
ऐसी अक्षरे
Thursday, May 23, 2013
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment