"जात ही मनाची अवस्था किंवा वृत्ती आहे. जातिविनाश म्हणजे भौतिक बंधनांचा विनाश नव्हे. जातिविच्छेद म्हणजे मनोवृत्तीतील परिवर्तन... हिंदू जातिभेद पाळतात कारण ते बुद्धिहीन वा अमानुष आहेत म्हणून नव्हे, तर ते धर्मपरायण असल्यामुळे! याला त्यांच्या मनात जातीय वृत्ती रूजविणारा धर्म जबाबदार आहे. खरा शत्रू जातिभेद पाळणारे लोक नसून त्यांना तो धर्म पाळावयास शिकविणारी शास्त्रे आहेत. त्यामुळे शास्त्रप्रामाण्यावरील श्रद्धा नष्ट करणे हाच खरा उपाय आहे. लोकांच्या श्रद्धा व मते यांची जडणघडण शास्त्रे करीत असताना आणि त्यांचा लोकांच्या मनावरील पगडा कायम असताना तुम्हाला यशाची अपेक्षा कशी करता येईल? धर्मशास्त्रप्रामाण्यास स्वत: आव्हान द्यायचे नाही, लोकांना शास्त्रांच्या आज्ञांवर विश्वास ठेवू द्यायचा आणि पुन्हा त्यांच्या वागणुकीवर व कृतींवर अमानुष, अविवेकी अशा विशेषणांनी टीका करायची, हा समाजसुधारणेचा मार्ग विपरीतच म्हटला पाहिजे. श्रीमान गांधींसकट कुणीही ही गोष्ट लक्षात घेतलेली दिसत नाही की, लोकांच्या कृती म्हणजे शास्त्रांचा त्यांच्या मनावर झालेल्या संस्कारांचा परिपाक होय. त्यामुळे त्यांची वागणूक ज्या शास्त्रांवर आधारित आहे त्या शास्त्रांवरील विश्वास उडाल्यावाचून ते आपले वर्तन बदलणार नाहीत. म्हणून समाजसुधारकांचे सर्व प्रयत्न फसले यात नवल नाही... धर्मशास्त्रांच्या जोखडातून प्रत्येक स्त्री-पुरुषास मुक्त करा. म्हणजे मग पहा, ते स्वत:च सहभोजन व आंतरजातीय विवाह करतात की नाही!.... शास्त्रप्रामाण्य धुडकावण्याची भगवान बुद्धाने जी भूमिका स्वीकारली ती तुम्ही स्वीकारा!"
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 'दि अॅनहिलेशन ऑफ कास्ट' या पुस्तकातून
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 'दि अॅनहिलेशन ऑफ कास्ट' या पुस्तकातून
No comments:
Post a Comment