"शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधे सुरुवातीच्या काळात सर्व जातीच्या तरुणांचा भरणा होता. नेतेमंडळी उच्चभ्रू वर्गातील असली तरी कार्यकर्त्यांमधे मराठ्यांपासून वैश्य-वाण्यापर्यंत आणि भंडार्यांपासून कुणब्यांपर्यंत, तसेच माळ्यांपासून अन्य अनेक जातिजमातींचा समावेश असे. प्रारंभीच्या काळात मराठी माणूस आणि त्याची आर्थिक उन्नती हा राजकीय स्वरुपापेक्षा सामाजिक स्तरावरील हाती घेतलेला कार्यक्रम हे त्यामागील मुख्य कारण होतं. जातीपातींचा विचार न करता, फक्त मराठी माणसाचा विचार करणारी संघटना, अशी प्रतिमा याच काळात निर्माण होत होती. पण शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली एकत्रित आलेल्या या तरुणांमधे सुरुवातीच्या काळात राजकीय महत्त्वाकांक्षा मात्र निर्माण झालेली नव्हती. राजकीय विचारसरणीनं प्रेरित झालेल्या कार्यकर्त्यांचं जातवार विभाजन हे त्या काळात वेगवेगळ्या पक्षांच्या छत्राखाली पूर्वीच झालं होतं. यशवंतराव चव्हाणांची घट्ट पकड असलेला काँग्रेस हा बहुजन समाजाचं म्हणजेच मराठ्यांचं राजकारण करत होता आणि काही प्रमाणात तरी ओबीसी (अर्थात, तेव्हा ओबीसी या शब्दाचा जन्म व्हायचा होता) काँग्रेसबरोबरच होते. जनसंघामधे शेटजी-भटजीचा विचार चालायचा, तर दलितांचा मुक्काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने स्थापन झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या वेगवेगळ्या छावण्यांमधे असायचा. पण त्याचवेळी महाराष्ट्रात सामान्यतः ३०-३५ टक्के असलेल्या मागासवर्गीयांना म्हणजेच प्रामुख्याने दलितांना सत्तेच्या सोयीच्या राजकारणासाठी आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न प्रमुख राजकीय पक्षही एकाचवेळी करत असत. १९७४ मधे मध्य-दक्षिण मुंबईत लोकसभेची पोटनिवडणूक झाली, तेव्हा काँग्रेसचे उमेदवार रामराव आदिक यांना शिवसेना आणि रिपब्लिकन या दोन्ही पक्षांनी पाठिंबा दिला होता; पण आश्चर्याची बाब अशी, की शिवसेना आणि दलित यांच्यातील संघर्षाची पहिली ठिणगीही याच निवडणुकीच्या वेळी पडली. त्यानंतर पुढे सेनेने सातत्याने दलितविरोध हीच भूमिका कायम ठेवली. इथं शिवसेनेनं दलितांविरोधातील हा पहिला आक्रमक आणि हिंसक पवित्रा प्रबोधनकारांच्या १९७३ मधे झालेल्या निधनानंतरच घेतला, हे नमूद करणं जरुरीचं आहे. सर्वसमावेशक विचार हा प्रबोधनकारांचा बाणा होता. त्यामुळेच ते असेपर्यंत दलितांच्या विरोधात जाण्याची शिवसेनेची हिंमत नव्हती, हाच या प्रकाराचा अर्थ आहे. पुढे १९८० च्या दशकात मराठवाड्यात आपलं बस्तान बसवताना तर शिवसेनेला या दलितविरोधी भूमिकेचा खूपच फायदा झाला. १९८४-८५ मधे हिंदुत्व-रक्षणाची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्याचा दावा केल्यानंतर, शिवसेनेच्या दलितविरोधी भूमिकेला अधिकच जोर चढला... मूळातच 'मराठी माणूस' असा सोयीचा विषय घेऊन मुंबई-ठाण्यापुरतं राजकारण करणार्या शिवसेनेने तोपावेतो कोणत्याही स्वरुपाची ठोस सामाजिक भूमिका कधीच घेतली नव्हती. त्यामुळे मराठवाड्यातसुद्धा ही दलितांच्या विरोधातील भूमिका घेणं शिवसेनेला सोयीचं गेलं."
- प्रकाश अकोलकर ('महाराष्ट्राचे राजकारण : नवे संदर्भ' या पुस्तकातून)
- प्रकाश अकोलकर ('महाराष्ट्राचे राजकारण : नवे संदर्भ' या पुस्तकातून)
No comments:
Post a Comment