गुरुवारच्या 'लोकसत्ते'तलं व्यंगचित्र सध्याच्या 'मोर्चा'मय वातावरणावर मार्मिक भाष्य करणारं आहे. खिडकीतून बाहेर जमलेली गर्दी पाहणा-या नेत्याला सहाय्यक सांगतोय, "फारच भव्य! त्यातील काहींना पाणी पाहिजे, काहींना नोक-या तर काहींना कर्जमुक्ती! इतकंच नव्हे तर त्यातील दहा पंधरा जणांना मुख्यमंत्रिपदही पाहिजे!!"
**********
'माझी फिल्लमबाजी'मधे शिरीष कणेकर म्हणतात, "सभेला किती लोक आले हे कोण आणि कसं मोजतं? म्हणजे, डोकी मोजावीत तर तिथं जमलेल्यांपैकी कितीजणांना ती असतात माहिती नाही. बरं, पाय मोजून भागाकार करावा तर दोनानं भागावं की चारानं हाही प्रश्नच!" :-)
**********
शक्यतो आजूबाजूला घडणा-या प्रत्येक गोष्टीची पॉझिटीव्ह बाजू शोधण्याची मला सवय आहे, सहसा निगेटीव्ह विचार मी करत नाही. पण जन्मावरुन ठरणा-या जातीचा अभिमान व्यक्त करण्यासाठी आणि जातीआधारित शक्तिप्रदर्शन करण्यासाठी एकत्र रस्त्यावर उतरलेल्या गर्दीकडून कसल्याही विधायक आणि समाजोपयोगी कार्याची मला स्वतःला अपेक्षा नाही. लाखो लोकांनी एकत्र येण्यामागं जन्माधारित जातीची अट असणं हा गेल्या शेकडो वर्षांत समता आणि बंधुतेसाठी काम करून गेलेल्या सर्व सुधारकांचा दणदणीत पराभव आहे. (बाय द वे, गेल्या वर्षी पन्नास लाख लोकांनी नाशिकमधे एकत्र येऊन हिंदू धर्माचं आणि हिंदू जनतेचं किती आणि काय भलं केलं याचं उदाहरण समोर असताना पाच-पंचवीस लाख 'मराठ्यां'च्या नुसत्या संख्येनं हुरळून गेलेले लोक बघितले की गलबलूनच येतंय मला तर... जिज्ञासूंनी 'एक मराठा = लाख मराठा' या समीकरणावरही गौर फरमावावा! :-P)
ऐसी अक्षरे
Friday, September 23, 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment