ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Saturday, June 10, 2017

श्रीमंत होण्याचा खात्रीशीर मार्ग

नुकताच 'लोकसत्ता लोकरंग'मधे मंदार भारदे यांचा 'मल्टिलेव्हल मर्कटलीला!' हा चेन मार्केटींग / 'एमएलएम'बद्दलचा लेख वाचला आणि गेल्या काही वर्षांतले माझे स्वतःचे अनुभव आठवले.

माझ्या माहितीत अनेक लोकांनी ह्या वेडापायी लाखाचे बारा हजार करुन घेतले आहेत. माझा एक मित्र तर 'एमएलएम चॅम्पियन'च होता. त्याच्याकडं तीन हजारांच्या डिजिटल डायरीपासून दीड लाखाच्या जपानी गादीपर्यंत काय वाट्टेल ती वस्तू विकायला असायची. हे सगळे उद्योग टिकून करत राहिला असता तर सध्याच्या 'डी-मार्ट'ला त्यानं नक्कीच टफ कॉम्पिटीशन दिली असती.

माझे पूर्वीचे काही रुम पार्टनर अशा एका स्कीमचे प्रणेते होते. ते रस्त्यानं जाणार्‍या कुणालाही पकडून रुमवर घेऊन यायचे. अशा 'लाईफ चेन्जिंग' स्कीम्स रस्त्यात उभ्या-उभ्या सांगितल्यानं त्यांची किंमत कमी होते, असं त्यांचं म्हणणं होतं. रुमवरसुद्धा नुसतं तोंडी स्कीम सांगत नसत. एक पिवळा कार्डशीट पेपर पसरायचा आणि त्यावर निळ्या आणि तांबड्या मार्करनं खूप सारे चौकोन, गोल, आणि रेषा काढून स्कीम सांगायची, असा काहीतरी सायकोलॉजिकल फंडा होता त्यांचा.

काही ओळखीच्या मित्रांकडं गेलं की ते दीडशे रुपयांची टूथपेस्ट आणि पाचशे रुपयांचं टॉयलेट क्लीनर घ्यायचा आग्रह करायचे. गॅस गीझरपासून गॅस लायटरपर्यंत आणि ट्यूबलाईटपासून लिपस्टिकपर्यंत कुठलीही गोष्ट हे लोक विकत असतात. मागे एक मित्र तर सोन्याच्या नाण्यांवर चालणारी एमएलएम स्कीम घेऊन आला होता. त्याची माहिती घेण्यासाठी ज्या बाईंकडं गेलो होतो, त्यांनी एक अतिशय सीक्रेट माहिती उघड करुन माझ्या ज्ञानात भर घातली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, 'क्रिकेट-बिकेट खेळून पैसे मिळतात, हा सर्वसामान्य लोकांच्या मनातला खूप मोठा भ्रम आहे. खुद्द सचिन तेंडुलकर ह्या सोन्याच्या नाण्याच्या स्कीमचा पायोनियर मेम्बर असल्यानं, पैशाची चिंता न करता तो क्रिकेटचा छंद जोपासू शकतो. पैसे मात्र त्याला ह्या स्कीममधूनच मिळतात.' ह्या बाईंचा कॉन्फीडन्स इतका जबरदस्त होता की मला अजूनही सचिन तेंडुलकरला बघितलं की त्याच्या खिशात 'ती' सोन्याची नाणी खुळखुळत असल्याचा आणि आपला सचिन परदेशी खेळाडूंना स्कीमचे फायदे समजावून सांगत असल्याचा भास होतो. ह्याच स्कीममुळं धीरुभाईंच्या निधनानंतर तोट्यात गेलेली रिलायन्स कंपनी पुन्हा वर आणण्यात मुकेश अंबानीला यश मिळालं, असंही बाईंनी ठासून सांगितलं होतं. यथावकाश ही 'सोन्याची नाणी' बनवणार्‍या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली आणि स्कीम आपोआपच बंद पडली.

ही स्कीम मला विकायचा प्रयत्न करणारा माझा मित्र कुठली-कुठली इंग्लीश पुस्तकं आणून द्यायचा. बिझनेस कसा करावा, श्रीमंत कसं बनावं, नेटवर्कींगशिवाय पैसे कमावणं भविष्यात अशक्य असणार, वगैरे विषयांवरची नामवंत लेखकांची ही पुस्तकं असायची. ही पुस्तकं आणखी इतर मित्रांना देऊन त्यानं त्यांनाही ह्या जाळ्यात ओढू नये, म्हणून मी त्याच्याकडून आलेली पुस्तकं परतच द्यायची नाहीत, असा गनिमी कावा करुन बघितला. अजून वाचून व्हायचंय, दुसर्‍याला वाचायला दिलंय, सापडतच नाही, वगैरे काहीही कारणं देऊन मी अप्रत्यक्षपणे अनेकांचं संभाव्य नुकसान वाचवू शकलो ह्याचा मला आनंद वाटतो. पण त्यामुळं माझा मित्र मात्र दुरावला गेला हीदेखील वस्तुस्थितीच आहे.

बिझनेस मिटींगच्या नावाखाली सेमिनारला बोलवायचं किंवा आरोग्याविषयी लेक्चरला बोलवून हेल्थ चेक-अपची स्कीम विकायची, असल्या प्रकारात लोक स्वतःची किंमत कमी करुन घेतात. माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीनं तर पोलिस आणि मिडीयाचा शेअर आधीच ठरवून स्कीम लाँच करायची असा प्लॅनच मला सांगितला होता. कितव्या टप्प्यातल्या लोकांपर्यंत पे-बॅक द्यायचा आणि चेन कुठं तोडायची हेदेखील त्याच्या प्लॅनिंगमधे ठरलं होतं.

असो. वर सांगितलेल्या लेखामुळं ह्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आणि पुन्हा अंगावर काटा आला. सध्या असं कुणी स्कीम वगैरे घेऊन आलं तर त्याला हेच काटे फेकून मारावेत, असं खरोखर मनापासून वाटतं.

- मंदार शिंदे
९८२२४०१२४६


Share/Bookmark

No comments:

Post a Comment