ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Tuesday, June 13, 2017

वयानुरुप शिक्षणाच्या प्रवाहात...

हनुमान वस्ती, वाल्हे ता. पुरंदर, जि. पुणे इथल्या जि.प. शाळेमधे मुख्याध्यापक म्हणून काम करताना श्री. अनिल चाचर सरांनी अनेक शालाबाह्य मुलं शाळेत दाखल केली. यामधे आजूबाजूच्या वस्त्या आणि पाड्यांवर राहणार्‍या पारधी, डोंबारी समाजाच्या मुलांचा समावेश होता. चौथीपर्यंत ह्या हनुमान वस्ती, वाल्हेच्या शाळेत वर्गशिक्षिका वैशाली पवार आणि मुख्याध्यापक अनिल चाचर यांच्याकडं शिकलेल्या पारधी कुटुंबातल्या दोन विद्यार्थिनी, तेजस्वी सुनिल शिंदे आणि सोनाली लखन शिंदे आज दहावीची परीक्षा पास झाल्या. तेजस्वीला ४२.६०% आणि सोनालीला ४४.००% मार्क्स मिळाले. घरातून आणि समाजातून कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नव्हतीच, पण दोघीही जिद्दीनं शिकत राहिल्या.

वय जास्त असल्यानं चौथीनंतर या मुली शाळेत जात नव्हत्या. नंतर वयानुरूप त्यांना आठव्या इयत्तेत प्रवेश मिळवून दिला आणि मुली शाळेत जाऊ लागल्या. मुलींच्या शैक्षणिक गरजा पूर्ण केल्या. आठवी, नववी, दहावीपर्यंत मुली शाळेत जात राहिल्या. आज दहावीचा निकाल लागला. खरं तर टक्केवारीची अपेक्षा नव्हतीच. सरांनी मुलींचं अभिनंदन केलं. पुढच्या शिक्षणासाठी आई वडिलांना समजावून सांगितलं, होणाऱ्या पतिराजांनाही समजावून सांगितलं. (होय, या मुलींची आधीच लग्नं ठरली आहेत.) या बालविवाह जमलेल्या मुलींचं शिक्षण कसं होणार, हा खरा चिंतेचा विषय होता. पण मुली आता दहावीतून अकरावीत गेल्या. बारावीनंतर दोघीही पोलिस व्हायचं म्हणतायत. शाळेच्या फीपासून सामाजिक विरोधापर्यंत असंख्य अडचणी आहेत, पण मुली शिकल्या पाहिजेत, हीच चाचर सरांची प्रामाणिक इच्छा आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार शालाबाह्य मुलांना त्यांच्या वयानुसार योग्य इयत्तेत दाखल करण्यात यावं, असा नियम आहे. म्हणजे दहा वर्षांच्या मुलाला थेट चौथीत किंवा चौदा वर्षांच्या मुलाला थेट आठवीत प्रवेश दिला जातो. अशी वयानुरूप दाखल केलेली मुलं कशी शिकतील याबद्दल बर्‍याच लोकांच्या मनात शंका असते. तेजस्वी आणि सोनालीनं चौथीनंतर वयानुरुप थेट आठवीत शिक्षण सुरु केलं आणि आज दहावी पास होऊन दाखवलंय. मुलांना एकदा शिक्षणाची गोडी लागली की ती शिकत जातात, आपण फक्त त्यांना योग्य वातावरण आणि साधनं पुरवत रहायचं, हेच खरं.

- मंदार शिंदे
९८२२४०१२४६


Share/Bookmark

No comments:

Post a Comment