ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Sunday, May 26, 2019

असा विचार केला तर...?

असा विचार केला तर…?
(लेखकः मंदार शिंदे ९८२२४०१२४६)
वाचण्यासाठी लागणारा वेळः ०९ मिनिटं

काही दिवसांपूर्वी इंडीयन प्रिमियर लीग (आय.पी.एल.) या क्रिकेटच्या स्पर्धा भारतात पार पडल्या. त्यात चेन्नईच्या संघाला मुंबईच्या संघानं हरवलं म्हणे. देशातल्या लाखो-करोडो क्रिकेटप्रेमींचं या स्पर्धेकडं आणि अंतिम निकालाकडं बारीक लक्ष होतं. विशेष म्हणजे, कुणी किती विकेट घेतल्या किंवा कुणी किती रन्स काढल्या, यापेक्षा थोडी जास्तच चर्चा मैदानाबाहेरच्या किंवा खेळाशी थेट संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल सुरु होती. उदाहरणार्थ, कोण कुठल्या कॅप्टनबद्दल काय बोलला, कुणी कुणाला कशा शिव्या घातल्या, कुणी कुणाला कशी खुन्नस दिली, वगैरे वगैरे. बरं, ही खुन्नस आणि त्या शिव्या फक्त खेळाडूंपुरत्या मर्यादीत नव्हत्या. प्रत्येक संघाचे पाठीराखे आणि चाहते आपापल्या संघाच्या आणि खेळाडूंच्या वतीनं स्वतःच्या घरी, कॉलेजात, ऑफीसात, बसमध्ये, हॉटेलमध्ये, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मिडीयावर वादावादी आणि भांडणं करताना दिसत होते. टीव्हीवर आणि मोबाईलवर स्कोअर बघणं, हॉटेलमध्ये जेवताना मोठ्या स्क्रीनवर मॅच बघणं, कोण कुणाला हरवणार आणि कोण कप जिंकणार यावर पैजा लावणं, असा हा ‘राष्ट्रीय सोहळा’ काही दिवस सुरु होता. सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, चेन्नईच्या संघात खरोखर चेन्नईचे किती खेळाडू होते आणि मुंबईच्या संघात खरे मुंबईकर खेळाडू किती होते, हा संशोधनाचाच विषय आहे. मग, चेन्नईचे फॅन्स आणि सपोर्टर्स प्रत्यक्षात खरे मुंबईकर असू शकतील आणि मुंबईचे फॅन्स आणि सपोर्टर्स मूळचे चेन्नईकर असू शकतील. पण तरी भांडणं, वाद-विवाद, आणि वेळेचा खर्च कमी झाला असेल असं अजिबात नाही. असा हा सगळा जांगडगुत्ता माझ्या मेंदूच्या कुवतीपलीकडचा आहे, हे मी मान्य करतो.
अशा या ‘राष्ट्रीय सोहळ्या’त काडीचाही रस नसल्यानं, टिंबाएवढाही सहभाग मी घेतला नाही. आणि तरीही, मी आनंदानं, सुखानं, समाधानानं, शांततेनं वगैरे जगतो आहे. म्हणजे, माझ्या सहभागामुळं कुठली तरी टीम जिंकता जिंकता हरली असती, किंवा हरता हरता जिंकली असती का ? किंवा मी एखाद्या चेन्नई फॅनचं मन वळवून त्याला मुंबईचा फॅन बनवू शकलो असतो का ? किंवा चेन्नई आणि मुंबई यांपैकी फायनल कुणी जिंकली यावर माझं पुढचं आयुष्य अवलंबून होतं का ? या सर्व प्रश्नांची उत्तरं अर्थातच ‘नाही’ अशी आहेत. बरोबर ना ?
याचाच अर्थ, देशातल्या एक टक्क्याहून कमी लोकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या आणि जास्तीत जास्त पंचवीस - तीस टक्के लोकांपर्यंत पोहोचलेल्या या ‘राष्ट्रीय’ सोहळ्यात भाग न घेऊन काही गमावलंय, असं मला तरी वाटत नाही. हां, पण क्रिकेट हा माझा सर्वांत प्रिय खेळ असता, दिवसातून दहा वेळा स्कोअर चेक करण्यापेक्षा जास्त महत्त्वाची कामं माझ्याकडं नसती, किंवा ही स्पर्धा बघण्यातून मला काहीतरी वैयक्तिक फायदा मिळणार असता, तर मात्र मी नक्कीच दिवसभर आय.पी.एल. बघत बसलो असतो, हेसुद्धा प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे.
तर, आय.पी.एल.चं फक्त उदाहरण आहे आणि मला वेगळ्याच विषयावर इथं लिहायचं आहे, हे चाणाक्ष वाचकांच्या आतापर्यंत लक्षात आलं असेलच ! तर मुद्दा असा आहे की, लोकसभेच्या निवडणुका आता संपल्या असून, लागायची ती… सॉरी, लागायचा तो निकाल लागलेला आहे. देशातल्या एक टक्क्यापेक्षा कमी लोकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या आणि जास्तीत जास्त पंचवीस - तीस टक्के (एकूण लोकसंख्येपैकी) लोकांनी मत नोंदवून साजरा केलेल्या या ‘राष्ट्रीय सोहळ्या’त विशेष भाग घेऊन आपण काय कमावलं आणि न घेऊन खरंच किती गमावलं, यावर चिंतन करण्याची ही योग्य वेळ आहे, असं मला वाटतं.
या आधीच्या म्हणजे, २०१४ सालच्या लोकसभेच्या निवडणुका बहुतेक पहिल्यांदाच प्रत्यक्ष मैदानापेक्षा सोशल मिडीयावर जास्त ‘लढल्या’ गेल्या असाव्यात. पूर्वी निवडणुका जाहीर झाल्या की, सगळे ‘बिनपगारी फुल अधिकारी’ कार्यकर्ते हातातला काम-धंदा सोडून आपापल्या आवडीच्या उमेदवाराच्या संपर्क कार्यालयात ‘ड्युटी’वर स्वतःहून हजर व्हायचे. आपली आणि आपल्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांच्या उद्याच्या जेवणाची सोय झालेली नसली तरी चालेल, पण पुढच्या पाच वर्षांसाठी देशाच्या कारभाराची घडी नीट बसवण्याची नैतिक आणि राजकीय जबाबदारी स्वेच्छेनं अंगावर घेऊन हे कार्यकर्ते ‘मैदानात’ उतरायचे. नोकरीच्या ठिकाणी कामचुकारपणा करणारी माणसं प्रचाराच्या कामात मात्र आश्चर्यकारकरीत्या चोख असायची. स्वतःच्या बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका पाहुण्यांना द्यायला जात नसतील, पण आपल्या उमेदवाराची पत्रकं मात्र दारोदारी फिरुन वाटली जायची. उमेदवारांकडून ‘श्रमपरिहारा’ची सोय केली जात असली तरी, फक्त तेवढ्यासाठी ही एवढी सगळी माणसं झपाटल्यागत काम करायची, असं म्हणणं चुकीचंच नाही तर अन्यायकारकही ठरेल.
२०१४ च्या निवडणुकीवेळी ‘प्रचार’ करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या कित्येक पटीनं वाढलेली दिसली. पण हे कार्यकर्ते आपापला कामधंदा सुरु ठेवून, फावल्या वेळात फॉरवर्ड… सॉरी, प्रचार करणारे कार्यकर्ते होते. प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची टंचाई मात्र तीव्रतेनं जाणवू लागली. मग उमेदवारांनीसुद्धा आपल्या मतदारसंघाच्या नकाशात सोशल मिडीयालाही सामावून घेतलं. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऐपवर लाईक, शेअर, कमेंट, फॉरवर्ड, कॉपी-पेस्ट, टॅग, रिप्लाय, लव्ह, हा-हा, ब्लॉक आणि ट्रोल करुन-करुन हे शिंगरु कार्यकर्ते हेलपाट्यानंच दमू लागले. यांच्यासाठी तर ‘श्रमपरिहारा’ची सोयसुद्धा नव्हती. त्याबाबतीत त्यांना खरेखुरे स्वयंसेवक - स्वतःची सेवा स्वतःच करणारे - बनावे लागले.
२०१४ पूर्वी प्रत्यक्ष प्रचाराचा अनुभव असूनही, २०१४ मध्ये मी ह्या सोशल मिडीयावरच्या ‘सोहळ्या’त सहभागी झालो. आपल्याला पटणाऱ्या पक्षाचा, उमेदवाराचा प्रचार करताना इथं प्रत्यक्ष जबाबदारी घ्यावीच लागत नाही, हे लक्षात आलं. (प्रत्यक्ष दारोदारी जाऊन प्रचार केला की, तेच लोक उद्या तुम्हाला तुमच्या उमेदवाराबद्दल प्रश्न विचारु शकतात. तसं काही ऑनलाईन प्रचारात घडत नाही. ऑनलाईन पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर डिलीट करुन टाकली, असा सोयीस्कर प्रकार !) आपल्या पक्षाच्या चांगल्या गोष्टी मांडणं आणि विरोधकांच्या चुका शोधून काढणं, हासुद्धा आता अभ्यासाचा विषय न राहता, हमाली काम बनून गेलं. म्हणजे, जुने संदर्भ, बातम्या, कात्रणं, डायरीतल्या नोंदी, जुन्या लोकांशी चर्चा, मतदारसंघाचा दौरा, पाहणी, आकडेवारी, हे सगळं कटकटीचं, गुंतागुंतीचं आणि वेळखाऊ काम वाटू लागलं. त्यापेक्षा ‘की-वर्ड’ टाकून गुगल आणि विकीपेडीयावर ‘अधिकृत’ संदर्भ बसल्या जागी मिळू लागले. तिकडून उचलायचे आणि इकडं चिकटवायचे की झालं काम ! त्याहीपुढं जाऊन मग पगारी आय.टी. सेलकडून रोजच्या रोज लेख, फोटो, आलेख, आणि आकडेवारीचा रतीबच सुरु झाला. आकडेवारी, अनुभव, आणि अभ्यासातून मतं बनवण्याचा काळ मागं पडला आणि तयार मतंच थेट आपल्या घरात, हातात, आणि मेंदूत फीड केली जाऊ लागली.
तर, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचा ‘ऑनलाईन’ प्रचार जोरात सुरु होता. आपल्याच आजूबाजूच्या, आपल्याच माहितीतल्या ‘आपल्या’ माणसांशी वारंवार ऑनलाईन खटके उडू लागले. आपल्याला पटणाऱ्या विचारसरणीपेक्षा कुणाचे वेगळे विचार असू शकतील हे पटेनासं झालं. आपल्या विचारांपेक्षा वेगळा (विरुद्धच असेल असं नाही, फक्त वेगळा) विचार मांडणारा प्रत्येकजण आपला विरोधकच वाटू लागला. अशा विरोधकांचीसुद्धा मतं आपल्याइतकीच ठाम आहेत हे माहिती असूनही, त्यांची ‘चुकीची’ मतं बदलण्याचा अट्टाहास सुरु झाला. प्रचार मागं पडून ‘प्रचारकी’ बोलणंच वाढलं. गंमत म्हणजे, समोरासमोर प्रत्यक्ष भेटल्यावर हसत-खेळत चर्चा करणारेच ऑनलाईन चर्चेत मात्र भयंकर उग्र बनून हमरी-तुमरीवर येत होते. मग कुणाला ब्लॉक करणं, कुठल्या ग्रुपमधून बाहेर पडणं, कुणाच्या इनबॉक्समध्ये घुसून ‘ग्यान’ पाजळणं, असले प्रकार घडू लागले. सोशल मिडीयावरील प्रचाराच्या उदयाचा साक्षीदार आणि प्रतिनिधी म्हणून मीसुद्धा यातल्या काही गोष्टी केल्या, खोटं कशाला बोला ?
२०१४ च्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि मग ‘खरा’ प्रचार कुणी, कसा, कधी केला ते हळू-हळू लक्षात येऊ लागलं. आपण आपल्याच माणसांशी वाद घातले, स्वतःचा वेळ घालवला, संबंध बिघडवून घेतले, प्रसंगी वैयक्तिक आणि व्यावसायिक नुकसानही सोसलं. पण एवढं करुन आपण ‘खरा प्रचार’ केला का, याचं उत्तर ‘नाही’ असंच द्यावं लागेल. दोन मित्र सोशल मिडीयावर भांडत राहिले आणि तिसऱ्याच माणसानं दोघांचा उपयोग करुन चौथ्या माणसाला निवडून आणलं, असा काहीतरी घनचक्कर प्रकार घडलेला दिसला. फक्त आपला उमेदवार किंवा पक्ष निवडून आला म्हणजेच प्रचार यशस्वी झाला, असं मला अजिबात म्हणायचं नाही. निवडून कुणीही येऊ दे, पण प्रचाराच्या प्रक्रियेत कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय मिळालं, हे जास्त महत्त्वाचं नाही का ? इथं, ‘काय मिळालं’ म्हणजे पगार, पैसा, जेवण, पार्टी, पद या अर्थानं विचारलेलं नसून, व्यक्तिशः तुम्हाला काय अनुभव आले, किती लोकांना भेटता आलं, कितीजणांच्या ओळखी वाढल्या, किती महत्त्वाचे मुद्दे समजले, माहितीत किती भर पडली, वगैरे दृष्टीनं मोजणी अपेक्षित आहे. ही कमाई झाली नसेल तर, तुमचा उमेदवार निवडून येऊ दे अगर न येऊ दे, तुम्ही स्वतः मात्र हरलात हे मान्य करावंच लागेल.
२०१९ च्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि मागच्या अनुभवावरुन तातडीनं काही गोष्टी अंमलात आणल्या. कामाव्यतिरिक्त जवळपास सगळ्या व्हॉट्सऐप आणि फेसबुक ग्रुपमधून बाहेर पडलो. ट्विटरवर आणि फेसबुकवर शक्य तितक्या अनोळखी प्रोफाईल्सना अनफॉलो किंवा अनफ्रेन्ड केलं. उरलेले लोक ‘आपलेच’ आहेत - त्यांची मतं आपल्यापेक्षा वेगळी असली तरी - हे स्वतःला समजावलं. गुगल आणि इतर वेबसाईट्सवरुन ‘फीड’ केल्या जाणाऱ्या बातम्या अनसबस्क्राईब केल्या. घरात टी.व्ही. कधीच नव्हता, पण पेपरसुद्धा बंद करुन टाकला. फेसबुक आणि व्हॉट्सऐपवर शक्यतो राजकीय पोस्टला उत्तर द्यायचंच नाही किंवा ‘आत्ता नको, नंतर बघू’ असं स्वतःला सांगायला सुरुवात केली. ‘नंतर बघू’ म्हटलं की चांगल्या-चांगल्या गोष्टी करायच्या राहून जातात, मग या अशा गोष्टी राहून गेल्या तर काय बिघडलं ? प्रत्यक्ष मैदानात उतरुन प्रचार करायला वेळ नाही ना, मग ऑनलाईन ताकावर तहान भागवायचा प्रयत्नसुद्धा नको, असं ठरवलं. कितीही पथ्य पाळायचं ठरवलं तरी कधी-कधी सवयीनं आणि भावनेच्या भरात घसरायला होतंच. पण ‘नंतर बघू’ आणि ‘अभ्यास करुनच बोलू’ या दोन युक्त्या खरंच खूप कामाला आल्या.
मतदान मात्र न चुकता केलं. ‘कुणाला मत देऊ’ हा प्रश्न आपल्याला कुणी विचारावा एवढे आपण (अजून) मोठे झालेलो नाही, याची स्वतःला जाणीव करुन दिली. त्यामुळं, फुकटचे सल्ले - तेसुद्धा ‘ऑनलाईन’ - देण्यापासून स्वतःला रोखलं. प्रत्येकाची आपापली मतं असतात, स्वतःच्या अनुभवांवर आणि अपेक्षांवर ती बनवली जातात, काळ आणि परिस्थितीनुसार ती बदलतही जातात. त्यामुळं, आपण कुणाचं तरी ‘मत’परिवर्तन घडवून आणू शकतो, हा आपलंच नुकसान करणारा भ्रम आहे, एवढं लक्षात आलं तरी खूप झालं.
पण, विशिष्ट विचारांचा, पक्षाचा आणि उमेदवाराचा प्रचार केला नसला म्हणजे कसलाच प्रचार केला नाही, असं म्हणणं मात्र चुकीचं ठरेल. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर व्यक्त होणं, समस्यांचा अभ्यास करुन उपायांवर चर्चा करणं, आपण मिळवलेली माहिती - ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवणं, आपल्या कामातून कुणाला तरी मदत - फायदा - समाधान मिळवून देणं, हा सगळा प्रचाराचाच भाग आहे की ! माणूसपणाचा प्रचार, परस्पर संबंधांचा प्रचार, आनंदाचा प्रचार, विश्वासाचा आणि प्रेमाचा प्रचार…
खरंच की… आधी प्रेमानं माणसं तर जिंकू या, मग निवडणुका जिंकणं फार अवघड नाही. तुम्हाला काय वाटतं ?

© मंदार शिंदे ९८२२४०१२४६
२५/०५/२०१९


Share/Bookmark

No comments:

Post a Comment