ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Saturday, June 29, 2019

खुर्च्या

खुर्च्या

त्या अवाढव्य प्रेक्षागृहामध्ये
एकटा मी
स्टेजवर उभा राहून
समोर पहात होतो -
खुर्च्या... फक्त खुर्च्या...
अस्तित्वाच्या टोकापर्यंत
क्षीण होत जाणाऱ्या उजेडात
नुसत्या खुर्च्या...
रिकाम्या...
आणि तरीही सचेतन
नुकत्याच उठून गेलेल्या माणसांपेक्षाही
भयानक सचेतन
स्वतःचं भानामती विश्व
निर्माण करणाऱ्या
क्रूर...
स्टेजकडे एकटक पाहणाऱ्या
नि:शब्द... निर्दय...
हजारो माणसांची कलेवरं
प्रेक्षालयाच्या दरवाजाबाहेर
फेकून देणाऱ्या...
राक्षसिणी...
जागेवरून उठत नव्हत्या
करकचून बसलेल्या
आणि तरीही पसरत होत्या
सार्‍या हवेमध्ये
तडजोड नसलेल्या द्वेषाने...
मी चटकन विंगमध्ये गेलो
आणि जाता जाता ऐकला
हास्याचा एक प्रचंड स्फोट
गलिच्छ तिरस्काराने,
निथळलेला,
जो होता माझ्यासाठी
आणि त्या सर्वांसाठीही
जे खुर्च्यांवर बसून गेले होते
भूतकाळात
आणि बसणार होते
भविष्यकाळातही.

- कुसुमाग्रज (प्रवासी पक्षी)


Share/Bookmark

हिंमत

हिंमत

बातमी ऐकलीत ना ?
राजधानीतील सिंहासनाचे सिंह
राजकारणाला वैतागून
जंगलात पळून गेले आहेत
आणि आता शोध जारी आहे
अन्य प्राण्यांचा...
तसे अर्जदार खूपच आहेत
पण, कुंभाराच्या सेवेला विटलेले
दोघेजण आत्मविश्वासाने सांगताहेत
फक्त आम्हीच !
कारण वृत्तपत्रांचे अंक
त्यातील अग्रलेखासह
चावून गिळण्याची आणि पचवण्याची
हिंमत - फक्त आमच्यातच आहे.

- कुसुमाग्रज (प्रवासी पक्षी)


Share/Bookmark

Wednesday, June 19, 2019

अवघड सोपे झाले हो...

"अवघड सोपे झाले हो..."

'बालभारती'च्या इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात नवीन पद्धतीनं अंकांचं शब्दलेखन दिलेलं आहे, त्याबद्दल -

१) मुलांना एक, दोन, तीन, चार असे बेसिक अंक आणि दहा, वीस, तीस, चाळीस असे युनिट अंक पटकन कळतात. त्यापुढं पुन्हा एक, दोन, तीन जोडून आकड्यांची रचना समजणं खरंच खूप सोपं जातं.

२) दुसरीच्या पुस्तकात, एकवीसच्या 'ऐवजी' वीस एक, बावीसच्या 'ऐवजी' वीस दोन, असं दिलेलं नाही. उलट, वीस एक 'म्हणजे' एकवीस आणि वीस दोन 'म्हणजे' बावीस असं स्पष्ट करुन मांडलेलं आहे. यामुळं मुलांना एकवीस म्हणजे नक्की किती आणि बावीस म्हणजे नक्की किती हे चांगलं कळेल. तिसरीच्या पुढं वीस एक, वीस दोन नसेल. हे फक्त सुरुवातीला समजावून देण्यासाठी आहे.

३) दुसरीच्या मुलांना 'जोडाक्षरांचा खूप त्रास नको' असं एक  कारण या बदलासाठी दिलेलं आहे. पण जोडाक्षरं नको 'म्हणूनच' आकडे लिहायची पद्धत बदलली असा विरोधकांनी अर्थाचा अनर्थ केलेला आहे. त्याकडं दुर्लक्ष केलेलंच बरं.

४) नवीन पद्धतीनं 'मराठीचा गळा आवळला' वगैरे म्हणणाऱ्यांसाठी प्रश्न - एकोणसाठ आणि एकोणसत्तर हे आकड्यात लिहिताना तुमचा स्वतःचा गोंधळ व्हायचा की नाही. अनेकांचा आजही होतो. त्यापेक्षा पन्नास नऊ आणि साठ नऊ जास्त लॉजिकल नाही का ? (माझ्या मोबाईल नंबरमध्ये शेवटी शेहेचाळीस - ४६ आहे. संपूर्ण नंबर मराठीत सांगितला तरी शेवटचं शेहेचाळीस म्हणजे 'फोर सिक्स' हे मी गेली सतरा वर्षं सांगत आलोय !)

५) आधीच्या पिढीला शाळेत पावकी, दिडकीचे पाढे शिकवले जायचे. ती पद्धत बंद झाल्यावर तेव्हाच्या लोकांनी असेच गळे काढले होते. आपण शाळेत पावकी, दिडकी शिकलो नाही, मग काय नुकसान झालं ? किंवा शिकून काय फायदा झाला असता कुणी सांगू शकेल काय ? आता आपल्या मुलांसाठी काहीतरी सोपी पद्धत येतीय म्हटल्यावर आपण स्वागत करण्याऐवजी विरोध का करतोय ?

६) मोबाईलमुळं फोन नंबर लक्षात ठेवायची शक्ती नष्ट झाली, कॅल्क्युलेटरमुळं आकडेमोड करायची ताकद संपली, कॉम्प्युटरमुळं हातानं लिहायची सवय मोडली, अशा तक्रारी करणाऱ्यांनी मोबाईल, कॅल्क्युलेटर, कॉम्प्युटरवर बहिष्कार का नाही टाकला ? ही दांभिकता मुलांच्या फायद्याच्या आड का आणतोय आपण ?

७) दुसरीच्या पुस्तकात आकडे अक्षरांत लिहायची पद्धत बदलली, याला राजकीय रंग देणं तर महादुर्दैवी आहे. गणिताचं पुस्तक तयार करणाऱ्या समितीवर कोण आहे, तेवढी तरी माहिती घेऊन मगच त्यावर कॉमेंट करावी, ही विनंती.

८) मराठीतून आकडे सोपे करुन लिहिल्याबद्दल सोशल मिडीयावर 'बालभारती'ची अक्क्ल काढणाऱ्यांपैकी खरोखर किती जणांची मुलं मराठी मिडीयमच्या शाळेत शिकतात ?

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही नवीन पद्धत एकदा आपल्या मुलांना दाखवा आणि त्यांचं मत विचारा. मला अशा पद्धतीनं गणित शिकवलं असतं तर कदाचित मलाही तो विषय आवडला असता. असो.

मुलांच्या मनाचा विचार करुन, भाषेच्या खोट्या अस्मितेकडं दुर्लक्ष करुन, अभ्यासक्रमात आणि शिकवण्याच्या पद्धतीत धाडसी प्रयोग करणाऱ्या 'बालभारती'चे आणि विशेषतः डॉ. मंगला नारळीकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

- मंदार शिंदे
(नव्वद-आठ वीस-दोन चाळीस बारा चाळीस-सहा)

(वाचण्यासाठी इमेजवर क्लिक करा.)



Share/Bookmark

Sunday, June 16, 2019

मुलांच्या प्रश्नांना अधिकाऱ्यांची उत्तरं

"मुलांच्या प्रश्नांना अधिकाऱ्यांची उत्तरं"

जागतिक बालमजुरी विरोधी दिनानिमित्त पुणे महानगरपालिका आणि बालहक्क कृती समिती (आर्क) यांनी १२ जूनला 'बाल जनमत' कार्यक्रम आयोजित केला. नेहमीच्या औपचारिक कार्यक्रमात बदल करत, यावेळी एक नवीन प्रयोग करण्यात आला. महापालिकेच्या जनरल बॉडी मिटींग जिथं होतात, त्याच हॉलमध्ये मुलांचा मनपा अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद घडवून आणला. पुण्यातल्या वस्त्यांमध्ये, वसतीगृहांमध्ये राहणारी आणि वेगवेगळ्या संस्थांच्या मदतीनं मनपा शाळांमध्ये शिक्षण घेणारी जवळपास शंभर मुलं या हॉलमध्ये उपस्थित होती. पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी श्री. दीपक माळी, कामगार अधिकारी श्री. नितीन केंजळे, शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, अशा सर्वांना मुलांनी न घाबरता आपल्या मनातले प्रश्न विचारले.

आम्ही पूर्वी बालमजूर होतो, आता काही संस्थांच्या मदतीनं शाळेत जातो, शिकतो. पण आमच्यासारखी कितीतरी मुलं अजून बालमजुरीत अडकलेली आहेत, त्यांच्यासाठी महानगरपालिका काय करणार ?

रस्त्यावर सिग्नलला अनेक मुलं भीक मागताना दिसतात. त्यांचे आईवडीलच त्यांना भीक मागायला लावतात. हा बालमजुरीचाच प्रकार नाही का ? त्या मुलांना यातून बाहेर कसं काढणार ?

आमच्या वस्तीपासून शाळा दूर आहे. चालत शाळेत जावं लागतं. लहान मुलांना रस्ते ओलांडता येत नाहीत, मोठ्या बसमध्ये चढता येत नाही. यासाठी तुम्ही काय करणार ?

शाळा भरताना आणि सुटताना शाळेबाहेर खूप गर्दी होते. आम्हाला खूप भीती वाटते. यावर तुम्ही काय करणार ?

शाळेत दिल्या जाणाऱ्या खिचडीमध्ये किडे मिळाले. तक्रार केली तरी कुणी काहीच केलं नाही. यावर तुम्ही काय कारवाई करणार ?

शाळेत जाण्या-येण्याच्या रस्त्यावर मुलींची छेड काढण्याचे प्रकार घडतात. यावर तुम्ही काय उपाय करणार ?

आमच्या शाळेला खेळाचं मैदान नाही. आम्ही मुलांनी खेळायचं कुठं ?

आठवीपर्यंतच्या शाळा प्रत्येक वॉर्डात आहेत. पण नववी ते बारावी शाळा खूप कमी आहेत. त्या शाळांची संख्या कधी वाढणार ?

मागच्या वर्षी शाळेचे युनिफॉर्म, बूट, वह्या-पुस्तकं, शाळा सुरु झाल्यावर दोन-तीन महिन्यांनंतर मिळाले. यावर्षी कधी मिळणार ?

आमच्या शाळेत इंग्रजी नीट शिकवत नाहीत. आम्हाला चांगलं इंग्रजी कसं शिकायला मिळणार ?

शाळेतली इतर मुलं दादागिरी करतात, दिसण्यावरुन आणि जातीवरुन चिडवतात. मुख्याध्यापकांकडं तक्रार करुन काहीच झालं नाही. आम्ही अशा शाळेत कसं जाणार ?

शाळेतले टॉयलेट अस्वच्छ असतात, घाण वास येतो. आम्ही टॉयलेट कसं वापरणार ?

कित्ती कित्ती प्रश्न...!

आधी मुलं प्रश्न विचारायला थोडी लाजत होती, घाबरत होती. पण एकदा सुरुवात झाल्यावर एकामागून एक प्रश्नांची रांगच लागली. शिक्षण हक्क कायद्यामध्ये आठवीपर्यंतच नव्हे, तर बारावीपर्यंत शिक्षण मोफत मिळावं अशी मागणीही काही मुलांनी केली. दारुमुळं आमच्या घरचं आणि वस्तीतलं वातावरण खराब होतं, त्यामुळं दारुबंदी झालीच पाहिजे अशी एका मुलानं मागणी केली. एका मुलीनं तर, टिकटॉकवर बंदी घाला असं उपमहापौरांना विनवून सांगितलं.

शाळेत खेळाचं मैदान नसेल तर जवळचं सार्वजनिक उद्यान मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करुन द्या, असं उपमहापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं. शाळेबाहेरच्या गर्दीवर आणि छेडछाडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शाळा परिसरात विशेष व्यक्ती नेमायच्या सूचनाही त्यांनी केल्या. खिचडीत किडे सापडणं, दादागिरीकडं दुर्लक्ष करणं, विषय व्यवस्थित न शिकवला जाणं, अशा तक्रारी आलेल्या शाळांची आणि मुख्याध्यापकांची नावं विचारुन घेतली आणि योग्य कारवाई करण्याचं मुलांना आश्वासन दिलं. दूरच्या वस्तीतून मुलांना शाळेत नेण्या-आणण्यासाठी योग्य व्यवस्था करायला संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं. शाळेतले टॉयलेट स्वच्छ ठेवण्यासाठी संबंधित आरोग्य कोठीला योग्य ते आदेश देऊ, असं सांगितलं. मुलांना भीक मागायला आणि मजुरीला लावणाऱ्या पालकांचं प्रबोधन करु आणि अशा मुलांना शाळेत दाखल करु, असंही सांगितलं.

मुलांना महापालिकेच्या सभागृहात आणून, अधिकाऱ्यांशी थेट संवाद घडवण्याच्या कल्पनेचं उपमहापौरांनी कौतुक केलं. ते मुलांना म्हणाले, "या हॉलमध्ये पुण्याचे लोकप्रतिनिधी - नगरसेवक आणि अधिकारी एकत्र येऊन शहरातल्या सर्व कामांचं नियोजन करतात. उद्या तुमच्यापैकी काहीजण त्या अधिकारानं इथं येऊन बसावेत, यासाठी आम्ही शक्य तेवढे प्रयत्न जरूर करु."

आपले प्रश्न योग्य व्यक्तींपुढं थेट मांडायची संधी मिळणं, हीसुद्धा प्रश्न सोडवण्याच्या मार्गावरची महत्त्वाची पायरी आहे, नाही का ?

- मंदार शिंदे 9822401246




Share/Bookmark

Friday, June 14, 2019

अमर, समर आणि किशोर

'किशोर' मासिकाच्या जून २०१९ अंकात 'अमर आणि समर'ची गोष्ट छापून आलीय... शाळेत असताना 'किशोर' आवडीनं वाचण्यापासून आता 'किशोर'साठी लिहिण्यापर्यंत एक चक्र पूर्ण !

मुलांना आवडेल असं नवनवीन ताजं-ताजं लेखन शोधून छापणार्‍या कार्यकारी संपादक किरण केंद्रे यांचे, आणि अख्खी गोष्ट एका सुंदर चित्रातून मांडणाऱ्या जान्हवी जेधे यांचे खूप खूप आभार !

गोष्ट कशी वाटली ते नक्की सांगा.

(वाचण्यासाठी इमेजवर क्लिक करा.)



Share/Bookmark

Thursday, June 6, 2019

उपरोधाचा अवरोध

आसाम पोलिसांनी ४ जून २०१९ रोजी एक ट्विट केलंय -

@assampolice "चगोलिया तपासणी नाक्याजवळ काल रात्री कुणाचा एक ट्रक आणि भरपूर (५९० किलो) गांजा हरवला आहे का ? चिंता करु नका. कृपया धुबरी पोलिसांशी संपर्क साधा. ते नक्कीच तुम्हाला मदत करतील. ;) धुबरी टीमचे अभिनंदन."

जगन्नाथाच्या कृपेनं हे ट्विट महाराष्ट्रातल्या सर्वांत ज्येष्ठ नेत्यांच्या नजरेतून अजूनपर्यंत तरी सुटलेलं दिसतंय. नाहीतर आत्तापर्यंत त्यांनी 'अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांना उघडपणे मदत केल्याबद्दल' आसाम पोलिसांवर उदाहरणीय कारवाईची मागणी नक्कीच केली असती, नाही का ? आणि आत्तापर्यंत आसाम राज्याच्या पोलिस महासंचालकांची ट्रॅफीक डिपार्टमेंटला बदलीसुद्धा झाली असती. अशा 'कारवायां'च्या बाबतीत आपल्या लोकांचा स्पीडच जबरदस्त आहे.

(डिस्क्लेमरः या पोस्टचा निधी चौधरी यांच्या महात्मा गांधींबद्दलच्या उपरोधिक ट्विटशी कसलाही संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)




Share/Bookmark

Monday, June 3, 2019

उपरोध आणि कारवाई


प्रशासकीय अधिकारी निधी चौधरी यांचं १७ मे २०१९ रोजीचं मूळ ट्विटः (मराठी भावानुवाद)

"१५० वं जयंती वर्ष मस्त साजरं होतंय 😭

आता आपल्या नोटांवरुन ह्याचा फोटो काढून टाका, जगभरातून त्याचे पुतळे पाडून टाका, त्याच्या नावच्या संस्था आणि रस्त्यांची नावं बदलून टाका!
आपल्याकडून त्याला हीच खरी श्रद्धांजली असेल!
३०.०१.१९४८ साठी तुमचे आभार, गोडसे" 
@nidhichoudhari

या वादग्रस्त (नसलेल्या) ट्विटमधून महात्मा गांधींचा अवमान केल्याबद्दल, महाराष्ट्रातील सर्वांत ज्येष्ठ नेत्यांनी प्रशासकीय अधिकारी निधी चौधरी यांच्यावर उदाहरणीय कारवाई करण्याची लेखी मागणी तातडीने व आवर्जून केली.

या पाठोपाठ, निधी चौधरी यांची मुंबई अतिरिक्त मनपा आयुक्त पदावरुन पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात उपसचिव म्हणून (तातडीने) बदली केली गेली. शिवाय, महाराष्ट्र शासनाने निधी चौधरी यांच्याकडून सदर ट्विटबाबत लेखी खुलासादेखील मागवला.

एका ज्वलंत राष्ट्रीय मुद्यावर एकमताने व एकदिलाने तत्पर कारवाई करुन एका भ्रष्ट व कामचुकार सनदी महिला अधिकाऱ्याचे सार्वजनिक गर्वहरण केल्याबद्दल सत्ताधारी मा. मुख्यमंत्री साहेब व विरोधक मा. सर्वव्यापी सर्वज्ञ जाणते साहेब या दोघांचेही हार्दिक अभिनंदन !!

(डिस्क्लेमरः शेवटच्या ओळीतला उपरोध समजणाऱ्यांनी तो उपरोध नसल्याचे मानून घ्यावे व उपरोध न समजणाऱ्यांनी कृपया तो उपरोध असल्याची नोंद घ्यावी, ही नम्र पोकळ भयग्रस्त मध्यमवर्गीय मध्यममार्गी विनंती. धन्यवाद !)


Share/Bookmark