खालील ई-मेलमध्ये ८ जून २०१९ रोजी दिलेल्या तक्रारीवर कारवाई केली असती तर २५ नोव्हेंबर रोजी पुणे-सांगली शिवशाही बसचा अपघात टाळता आला असता. परंतु ही तक्रार ई-मेलद्वारे प्राप्त होऊनही तिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष अथवा टाळाटाळ करणाऱ्या MSRTC च्या सर्व अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच शिवशाही बस ताबडतोब सेवेतून काढून टाकण्यात याव्यात!!
**८ जून २०१९ रोजी महामंडळाचे चेअरमन, जनरल मॅनेजर, डेपो मॅनेजर, आणि इतर अधिकाऱ्यांना पाठवलेली ई-मेल...**
शिवशाही बसने प्रवास करतेवेळी नेहमी अडचणी येतात. बसचे ड्रायव्हर नीट बस चालवत नाहीत. बस चांगल्या कंडीशनमध्ये नसतात. एसीचे आऊटलेट तुटलेले असतात. बस बाहेरुन चेपलेल्या, घासलेल्या असतात. खूप प्रवाशांचा हाच अनुभव वेळोवेळी ऐकलेला आहे.
२२/०४/२०१९ रोजी रात्री १२ः०० वाजता मी पुणे - सांगली शिवशाहीने स्वारगेटवरुन निघालो. कात्रजला वर्कशॉपमध्ये ड्रायव्हरने बस थांबवली. टायर पंक्चर आहे हे माहिती असून बस स्वारगेटला आणली होती आणि प्रवासी भरुन आणले होते. तिथून पुढचे दोन तास बस कात्रजच्या घाटाजवळ वर्कशॉपच्या बाहेर मुख्य रस्त्यावर थांबवून ठेवली. जवळ स्वच्छतागृह, उपाहारगृह, पिण्याचे पाणी, काहीही सोय नव्हती. बस हायवेला लावल्याने उतरुन जाणे शक्य नव्हते. रात्री दोन वाजता दुसऱ्या बसमध्ये बसायला सांगितले, मग बस निघाली. ड्रायव्हर चुकीच्या पद्धतीने बस चालवत होते. समोरच्या गाडीच्या अगदी जवळ जात होते. पूर्ण अंतर ब्रेकचा अंदाज येत नसल्यासारखी बस चालवली.
०८/०६/२०१९ रोजी सकाळी ६ः०० वाजता पुणे-मिरज शिवशाहीने स्वारगेटवरुन निघालो. साडेआठच्या सुमारास आणेवाडी टोलनाक्यावर शिवशाहीला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. त्या ट्रकला त्यामागील दुसऱ्या ट्रकने जोरात धडक दिली होती. शिवशाहीचे फार नुकसान झाले नव्हते, पण ड्रायव्हरने बस तिथेच उभी करुन ठेवली. मिरज डेपोला फोन लावत होते, पण कुणी फोन उचलत नव्हते. मी स्वतः पुणे डेपोला फोन लावला. ते म्हणाले, आणेवाडी आमच्या हद्दीत येत नाही, तुम्ही सातारा डेपोला फोन लावा, ते दुसरी गाडी पाठवतील. मी सातारा डेपोला फोन लावला. ते म्हणाले, ड्रायव्हरशी बोलून व्यवस्था करतो. पण शिवशाहीचा ड्रायव्हर फोनवर बोलायला तयार होईना. प्रवाशांची आधी व्यवस्था लावून द्या, मग तुमची प्रक्रिया करा, असे मी त्यांना सांगितले. पण प्रवाशांकडे दुर्लक्ष करुन ते फोनवर नुकसान भरपाईबद्दल बोलत राहिले. मग सातारा ट्रॅफीक पोलिस, ग्रामीण पोलिस, यांना येतील तसे माहिती देत राहिले. दरम्यान मागून दुसरी पुणे - सांगली शिवशाही आली. त्यामध्ये सहा-सात जागा होत्या, पण त्या ड्रायव्हरने गाडी लॉक केली व या ड्रायव्हरसोबत सीटांचा हिशोब करु लागले. शिवशाही बसवर लिहिलेल्या टोल फ्री नंबरवर सतत फोन लावला, पण फोनवर काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मागून महामंडळाच्या दुसऱ्या गाड्या जात होत्या, पण शिवशाहीच्या ड्रायव्हरने प्रवाशांची सोय करुन देण्यास किंवा दुसरी गाडी मागवण्यास नकार दिला. सातारा डेपोला फोन का करत नाही, दुसऱ्या बसमध्ये व्यवस्था करुन का देत नाही, असे विचारल्यावर उर्मटपणे उत्तरे दिली. शेवटी सातारा पोलिसांनी फोटो वगैरे काढून घेतल्यावर ड्रायव्हरने बस काढली.
१. अपघात झाल्यावर डेपोतून तातडीने सहकार्य करण्याऐवजी हद्दींचे हिशोब का सांगत बसतात ? पुणे डेपोतून सातारा डेपोला फोन करुन गाडीची व्यवस्था का करु शकले नाहीत ?
२. शिवशाहीवर लिहिलेला टोल फ्री नंबर बंद का आहे ? बंद असलेला नंबर बसवर का लिहिला आहे ?
३. हायवेला बस थांबलेली असताना मागून येईल त्या महामंडळाच्या बसमध्ये तातडीने व्यवस्था का होत नाही ? पूर्वी अशी व्यवस्था लगेच व्हायची, तिकीटावर सही करुन लगेच दुसऱ्या गाडीत बसवून द्यायचे. शिवशाहीच्या बाबतीत मात्र अतिशय खराब अनुभव आहेत. शिवशाहीसाठी महामंडळाचे वेगळे नियम आहेत काय ?
४. शिवशाहीचे ड्रायव्हर अतिशय वाईट पद्धतीने बस चालवतात. हायवेला या बसेसच्या रॅश ड्रायव्हींगचा आणि लेन कटींगचा वाईट अनुभव मला स्वतःला अनेक वेळा आलेला आहे. महामंडळाच्या इतर बसचे ड्रायव्हर आणि शिवशाहीचे ड्रायव्हर यांच्यामध्ये एवढा फरक का आहे ? शिवशाहीचे ड्रायव्हर महामंडळाचे कर्मचारी नाहीत काय ?
५. शिवशाहीचा अपघात झाला आहे असे डेपोला कळवल्यावर त्यांनी 'बस मंडळाची आहे की खाजगी' अशी विचारणा का केली ? शिवशाही बस महांमंडळाच्या नाहीत काय ?
**ही ई-मेल मिळाल्याची पोच महामंडळाचे चेअरमन, जनरल मॅनेजर आणि डेपो मॅनेजरकडून मिळाली, पण त्यापुढं कसली चौकशी किंवा कारवाई झाली याबद्दल आजतागायत माहिती मिळालेली नाही...**
मी स्वतः 'शिवशाही'वर व्यक्तिगत बहिष्कार टाकलेला आहे. वेळ लागला तरी चालेल, थोडी गैरसोय झाली तरी चालेल, पण महामंडळाच्या एशियाड किंवा परिवर्तन (लाल डबा) किंवा साध्या गाडीनेच प्रवास करतो. शक्य तितक्या लोकांना 'शिवशाही'मधून प्रवास न करण्याचा सल्ला देतो. विशेष म्हणजे, 'शिवशाही'बद्दल सगळ्याच लोकांच्या तक्रारी आहेत, पण महामंडळ मात्र साध्या गाड्या बंदच करुन 'शिवशाही' वाढवायच्या मागं लागलेलं आहे.
टाईम्स ऑफ इंडीयाच्या बातमीनुसार, जुलै २०१७ ते ऑक्टोबर २०१९ दरम्यान 'शिवशाही'चे १,०७५ अपघात झाले असून, त्यामधे ५० लोक ठार तर ३६७ लोक जखमी झाले आहेत. एस.टी.चं हे खाजगीकरण प्रवाशांच्या जीवाशी खेळतंय, असं तुम्हाला वाटत नाही का?
तुम्हीसुद्धा 'शिवशाही'बद्दल तुमचे अनुभव आणि तक्रारी नक्की महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडं पाठवा. त्यांचे ई-मेल ऐड्रेस खाली दिले आहेत...
chairmanmsrtc@gmail.com, stcsvo@gmail.com, gmtraffic.msrtc@nic.in, gmplanning@rediffmail.com, msrtcedp@gmail.com, clolegal@rediffmail.com, clo.msrtc@rediffmail.com
======================
ताजा कलम -
नोव्हेंबर २०१९ मध्ये शिवशाही बसला झालेल्या अपघाताबद्दल वरील पोस्ट लिहिली होती. जून २०१९ मध्ये मला आलेल्या अनुभवाबद्दल तक्रारीचा उल्लेख त्यामध्ये केला होता. जून ते नोव्हेंबर एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत फॉलोअप घेतला. जानेवारी २०२० मध्ये संबंधित शिवशाही पुरवठादार कंपनीवर दंडात्मक कारवाई केल्याचे पत्र मिळाले आहे.
सर्वांच्या माहितीसाठी मुद्दाम पत्र इथे शेअर करतोय. पुन्हा सांगतो - लेखी तक्रारीची दखल घ्यावीच लागते. फक्त सोशल मिडीयावर निषेध व्यक्त करुन उपयोग नाही. आपली (लेखी) तक्रार नक्की योग्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा.
एस. टी. महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांचे आभार व अभिनंदन!
No comments:
Post a Comment