दि. १९/११/२०१९
बालहक्क कृती समिती अहवालाचे प्रकाशन
२० नोव्हेंबर १९८९ या दिवशी जगातील निरनिराळ्या देशांच्या अधिकृत प्रतिनिधींनी एकत्र येऊन, लहान मुलांच्या संरक्षण आणि हक्कांच्या पूर्ततेसाठी एका आंतरराष्ट्रीय कायदेशीर आराखड्यास मंजुरी दिली. युनाइटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन दी राइट्स ऑफ दी चाईल्ड अर्थात 'यूएनसीआरसी' या नावाने प्रसिद्ध असलेल्या या करारास २० तारखेला तीस वर्षे पूर्ण होत आहेत. या जागतिक कराराच्या स्थानिक अंमलबजावणीसाठी जगभरात अनेक संस्था आणि संघटना स्थापन करण्यात आल्या. त्यापैकी पुणे आणि महाराष्ट्र पातळीवर कार्यरत असलेली बालहक्क कृती समिती (आर्क) ही एक महत्त्वपूर्ण संघटना आहे.
१४ नोव्हेंबर बालदिन आणि २० नोव्हेंबर बालहक्क दिनाचे औचित्य साधून, गेल्या ३० वर्षांतील बालहक्क संबंधी घडामोडींचा व सद्यस्थितीचा आढावा घेणारा अहवाल बालहक्क कृती समितीतर्फे प्रसिद्ध करण्यात आला. 'युएनसीआरसी'ची कलमे व भारतातील बालकांचे संरक्षण, शिक्षण, सहभाग, तसेच बालमजुरीसंबंधी कायदे, यांच्या अनुषंगाने प्रबोधन, संशोधन आणि मदत कार्य बालहक्क कृती समितीद्वारे केले जाते. यातील ठळक उपक्रमांचा, तसेच बालकांना त्यांचे हक्क मिळवून देण्याच्या मार्गातील आव्हानांचा आढावा या अहवालात घेण्यात आलेला आहे.
बाल हक्कांसंबंधी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, शासन, पालक, तसेच समाजातील सर्व घटकांना उपयुक्त माहिती या अहवालातून मिळू शकेल, असे बाल हक्क कृती समितीच्या प्रतिनिधींनी सांगितले. वाढते शहरीकरण व औद्योगिकीकरण, राज्य व देशातील रोजगाराच्या असमान संधी, त्यामुळे वाढत चाललेल्या स्थलांतराशी निगडीत समस्या, तसेच तंत्रज्ञान व पर्यावरण बदलामुळे मुलांच्या विकासामध्ये उभी राहिलेली नवी आव्हाने, यांचा विचार मुलांसोबत काम करताना महत्त्वाचा आहे. बालहक्क कृती समितीच्या सदस्य संस्था या दृष्टीने पुणे आणि परीसरात काम करत करीत आहेत.
या अहवालाच्या माध्यमातून बालहक्क आणि त्यांच्या अंमलबजावणीतील आव्हाने व उपाययोजना याबाबत माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न बाल हक्क कृती समिती (आर्क) तर्फे करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment