ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Friday, April 10, 2020

Formatting the life... (Marathi Poem)

मान्य आहे..
मान्य आहे तुम्हीही लिहिली असेल
एखादी फेसबुक पोस्ट
या लॉकडाऊनमध्ये..
काढलं असेल एखादं चित्र
आणि केलं असेल अपडेट स्टेटस..
लाटल्या असतील चपात्या,
उकळला असेल चहा,
किंवा बनवली असेल एखादी
स्पेशल डिश - केक, पिझ्झा, फ्रूट सॅलड वगैरे..
सांगितल्या असतील मुलांना गोष्टी
फेसबुक लाईव्ह, झूम, युट्युब चॅनेल वगैरे..
भांडीसुद्धा घासली असतील आणि
फरशी पुसली असेल लख्ख..
मजा म्हणून, गंमत म्हणून,
क्वचित अभिमानानं,
काढले असतील या सगळ्याचे
फोटो, व्हिडीओ आणि काय काय..
पोस्टसुद्धा केले असतील आणि
मिळवले असतील लाईक्स, शेअर वगैरे..
हरकत नाही..
हरकत नाही, ही वेळच आहे अशी
निराशा, दुःख, भीतीनं भरलेली..
अशावेळी आधार लागतोच,
शाबासकीचा, कौतुकाचा, स्तुतीचा..
पण उद्या जेव्हा परिस्थिती बदलेल,
लॉकडाऊन संपेल, जग पुन्हा धावू लागेल,
तुमची स्वप्नं, तुमच्या आकांक्षा,
तुम्हाला खेचून नेतील तुमच्या घरांमधून..
आणि गळून पडतील तुमच्या हातातले
पेन, ब्रश, पुस्तक, भांडी, झाडू वगैरे..
तेव्हा विसरु नका या गोष्टी,
ज्यांनी तुम्हाला आनंद दिला
निराशेच्या काळात, भीतीच्या अंधारात..
आणि परत कधीच
अडवू नका, चिडवू नका, तुडवू नका, त्यांना -
जे नेहमीच करत आलेत या गोष्टी
तुमच्या आनंदासाठी, तुमच्या मदतीसाठी..
लेखक, चित्रकार, गायक, शेफ वगैरे..
तासन्‌तास उभे राहून
गॅससमोर, बेसिनसमोर, आणि
कोऱ्या कागदांसमोर..
ज्यांनी नेहमीच बनवलं काहीतरी
पूर्वी कधीच अस्तित्वात नसलेलं, आणि
केलं सादर तुमच्यासमोर..
जे तुम्ही वाचलं, ऐकलं, चाखलं, आणि
फेकलंसुद्धा कधी-कधी, कारण
कदाचित तुम्हाला कल्पनाच नव्हती -
प्रत्येकाला आधार लागतोच
शाबासकीचा, कौतुकाचा, स्तुतीचा..
त्यात काय एवढं, म्हणू नका
भिकेचे डोहाळे, म्हणू नका
छंद, टाईमपास, म्हणू नका
प्रत्येकाची किंमत पैशात करु नका..
आजची वेळ लक्षात ठेवा
तुम्हाला पडलेले कष्ट लक्षात ठेवा.
चला, आता फेसबुकवर एखादी पोस्ट लिहा,
कालचं अपूर्ण चित्र पूर्ण करा,
चहा उकळला असेल तर गॅस बंद करा..
व्हायरसनं पोखरलेलं आयुष्य
मुळापासून फॉरमॅट करा..
मुळापासून फॉरमॅट करा...

- अक्षर्मन
(मंदार शिंदे)
१०/०४/२०२०


Share/Bookmark

No comments:

Post a Comment