ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Tuesday, July 21, 2020

Inspired by Corona

कोरोनाची प्रेरणा


    कुणाला कुठल्या गोष्टीतून कशाची प्रेरणा मिळेल हे काही आपण आधीच ओळखू शकत नाही. वरवर नुकसानकारक दिसणाऱ्या गोष्टीतून काहीतरी उपयोगी आणि उपकारक घडू शकते, 'जसे समुद्रमंथनातून विष बाहेर आले' असे आमचे क्षीरसागर सर सांगून गेले. आता उपयोगी आणि उपकारक गोष्ट म्हणून सरांना 'विष'च का आठवावे हा काही आपल्या चर्चेचा विषय नव्हे. खरे तर या सरांचे नावसुद्धा आता नीटसे आठवत नाही, पण 'समुद्रमंथना'ची गोष्ट त्यांनी सांगितली होती आणि विष्णू देवाची एन्ट्री वर्णन करताना 'तो क्षीरसागरात शेषनागावर पहुडलेला असतो' असे सरांनी सांगितलेले आठवते. त्यामुळे सरांचे आडनाव क्षीरसागर किंवा शेषन असावे असे पुसटसे वाटत होते. पण 'शेषन' आडनावाच्या माणसाने गांधींना आणि पवारांना सुखाने पडू दिले नाही तिथे विष्णू देवाची काय कथा? म्हणून सरांचे आडनाव क्षीरसागरच असावे असा आपला अंदाज... असो!
    तर, कुठल्या गोष्टीतून कुणाला कशाची प्रेरणा मिळावी, हा आपला मुख्य मुद्दा होता. आता हेच बघा ना, 'क्रौंच' हे नाव भारतीय कमी आणि फ्रेंच जास्त वाटावे असे असले तरी, एका शिकाऱ्याच्या बाणाने घायाळ झालेल्या क्रौंच पक्ष्याला बघून व्यासांना म्हणे अख्खे महाभारत सुचले. तेसुध्दा फ्रेंचमध्ये नव्हे तर संस्कृतमध्ये! तर असे कुणालाही कशातून काहीही सुचू शकते.
    नुकताच कोरोना विषाणू जगभरात पसरू लागल्यापासून लोकांच्या जीवनमानासोबतच त्यांच्या विचारांवर पण चित्रविचित्र परिणाम झालेला दिसू लागला आहे. ('डोक्यावर' हा शब्द खोडून 'विचारांवर' हा शब्द लिहिलेला आहे, याची कृपया नोंद घ्यावी, अध्यक्ष महाराज!) तर, कोरोना विषाणूचा प्रसार माणसाकडून माणसाकडे वेगाने होत असल्यामुळे जगभरातल्या शासनकर्त्यांनी एक अभूतपूर्व निर्णय घेतला आणि माणसांचा माणसांशी संपर्कच येऊ नये यासाठी उपाययोजना केल्या. 'ज्योत से ज्योत जलाते चलो' असे गुणगुणत हा विषाणू गाव, शहर, जिल्हा, राज्य, देश, खंड यांच्या सीमा झुगारून पेटवापेटवी करत निघाला असताना शासनाने 'जरासी सावधानी, जिंदगीभर आसानी' असे धोरण जाहीर केले. लहानपणापासून 'माणूस हा समाजशील प्राणी आहे' असे शिकलेल्या जनतेला मात्र हे सामाजिक अंतर पाळणे जड गेले यात नवल नाही.
    आपल्या प्रियजनांच्या आठवणीने 'मिलो न तुम तो हम घबराए' असे वाटत होतेच, पण कोरोना संसर्गाच्या भीतीने 'मिलो तो आँख चुराए' असाही प्रकार सुरू होता. रोज अमुक इतके नवीन रुग्ण आढळले, अमुक बरे झाले, तमुक मरण पावले, असे अधिकृत आणि अनधिकृत आकडे टीव्ही, वर्तमानपत्र, सोशल मिडीया अशा सर्व दिशांनी येऊन आदळू लागले. लोकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येईना, एका शहरात राहत असून भेट होईना, दूध आणि भाजीसाठी बाहेर पडायचीसुद्धा भीती वाटू लागली. अशा भयग्रस्त, चिंताजनक आणि अनिश्चित वातावरणातदेखील कुणीतरी आम्हाला 'कोरोनावर काहीतरी इनोदी लिवा' म्हणून संपर्क केला.
    आता अशा परिस्थितीत कुणाला 'विनोदी लेखन स्पर्धा' वगैरे आयोजित करण्याची प्रेरणा मिळावी, हेदेखील समुद्रमंथनातून निघालेल्या विषाइतकेच उपयोगी आणि उपकारक आहे, असे तथाकथित क्षीरसागर सर नक्कीच म्हणाले असते याबद्दल माझ्या मनात कोरोना विषाणूइतकीही शंका नाही. (स्पर्धेच्या आयोजकांवर विनोद करणे शिष्टसंमत नसल्यास सदर वाक्य कामकाजातून वगळण्यात यावे अशी मी विनंती करतो, अध्यक्ष महाराज!)
    तर, कोरोना विषाणू हा माणसाप्रमाणे कामचुकार आणि भ्रष्ट नसल्याचे लक्षात यायला बराच वेळ लागला. हा विषाणू गरीब-श्रीमंत, जात-धर्म, देश-विदेश अशा कुठल्याच गोष्टीवर भेदभाव करत नाही, आणि आपल्याला स्वतःपुरती सुटका करून घेण्यासाठी त्याचा 'भाव'देखील करता येत नाही, हा त्याचा स्वभाव उशीराच लोकांच्या लक्षात आला. इतर वेळी अभावानेच आढळणाऱ्या बंधुभावाचे दर्शन घडवीत लोकांनी मग सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेसाठी स्वतःला आपापल्या घरांमध्ये कोंडून घेतले.
    पण अशा आणीबाणीच्या परिस्थितीत गलितगात्र व्हायला आपण अर्जुन थोडीच आहोत? या वरवर नुकसानकारक दिसणाऱ्या गोष्टीने कितीतरी उपयोगी आणि उपकारक गोष्टींना प्रेरणा दिलेली बघायला मिळावी, हा मनुष्याच्या दुर्दम्य आशावादाचा दुर्मिळ आविष्कार मानता येईल काय? (हे विधान क्षीरसागर सरांच्या ज्ञानसागरातील शिंपल्यांमधील मोती गुंफून बनवले असले तरी भविष्यात आमच्या नावाने वापरण्यास हरकत नसावी, अध्यक्ष महाराज!)
    तर, या कोरोना संकटसमयी कुणा लेखकाला आपल्या लेखनाची समई पेटवून साहित्याचा उजेड पाडण्याची प्रेरणा मिळाली असेल. कुणा गवयाला राग मल्हार गाऊन सोशल मिडीयावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडण्याची प्रेरणा मिळाली असेल. कुणा सुगरणाला (सुगरणीचे पुल्लिंग) 'पाकातल्या भजीचे थालिपीठ' बनवून आपल्यात दडलेल्या पाककलेचे अचाट प्रदर्शन करण्याची प्रेरणा मिळाली असेल. कुणाला समाजसेवक बनून भुकेल्या पोटी अन्न भरवण्याची प्रेरणा मिळाली असेल, तर कुणाला 'स्वयं'सेवक बनून भरल्या पोटी अन्नाचा संग्रह करण्याची प्रेरणा मिळाली असेल. कुणाला हॉटेलचा धंदा बंद करून महापालिकेत नोकरी करण्याची प्रेरणा मिळाली असेल, तर कुणाला सॉफ्टवेअरमधील अनिश्चित नोकरी सोडून रोजच्या रोज रोख पैसे मिळवून देणारा भाजीचा धंदा करण्याची प्रेरणा मिळाली असेल.
    कुणाला कुठल्या गोष्टीतून कशाची प्रेरणा मिळेल हे काही आपण आधीच ओळखू शकत नाही. कोरोनामुळे समुद्रमंथन तर झालेले आहेच, आता त्यातून काय-काय बाहेर निघेल, काय उपयोगी असेल आणि किती टिकाऊ असेल, हे येणारा काळच ठरवेल. शेषनागावर निवांत पडून राहिलेल्यांची झोप कायमचीच उडाली असणार, एवढे मात्र नक्की!


- मंदार शिंदे
१९/०५/२०२०

Mobile: 9822401246Share/Bookmark

No comments:

Post a Comment