महानगरातील कवी
एवढ्या मोठ्या या शहरात
कुठे तरी एक कवी राहात आहे
एखाद्या घुप्प विहिरीत दबलेल्या खोल
मौनासारखा
अर्थात या मौनातही आहेत
अनेक अध्याहृत शब्द,
आणि शब्दाशब्दात अल्लड कोवळ्या
पंखांची
एक अनिवार फडफड
या महानगरीत कवी राहतो हे खरे आहे
मात्र तो कधीही काही बोलत नाही
अधूनमधून अकारण
तो बराच अस्वस्थ होतो
उठून बाहेर पडतो
कुठून तरी शोधून आणतो
एक खडू
आणि समोरच्या मोकळ्या भिंतीवर
एकच अक्षर लिहितो - ‘ह’
हे साधे सरळ क्षुद्र ‘ह’
शहरातून सर्वत्र आरपार
घुमत राहाते कितीतरी वेळ
‘ह’ म्हणजे काय?
एका दमेकरी म्हातारीने खोकत खोकत
पोलिसाला सवाल टाकलेला
पोलिसाने तो शिक्षकाला टाकला
आणि शिक्षकानेही पुन्हा तोच प्रश्न विचारला
वर्गात खाली मान घालून बसलेल्या
मागल्या बाकावरील मठ्ठ मुलाला
तर, आता ‘ह’ म्हणजे काय?
अवघे महानगर प्रश्नग्रस्त, या मायापुरीत -
- हे कुणालाच माहीत नाही
हा जो कवी आहे न्
जेव्हा त्याने हात उंचावून
स्वच्छ कोऱ्या भिंतीवर लिहून टाकले ‘ह’
तेव्हा क्षणार्धातच त्याची हत्या झाली
आता, ती का? बस्स…
तर हे एवढेच काय ते खरे आहे वगैरे
बाकी एकूण सगळी बकवास
अलंकार, रसभेद इ. इ.
यापेक्षा अधिक असे त्या कवीबद्दल
काहीच माहीत नाही
तेव्हा क्षमस्व.
मूळ कविता - श्री. केदारनाथ सिंह
मराठी अनुवाद - वसंत केशव पाटील
No comments:
Post a Comment