लहान मुलांना गोष्टी का सांगाव्यात?
खूप छान लेख आहे हा. मला आवडलेले काही मुद्दे -
“ज्ञान अथवा बोध मिळेल तेवढेच सांगावे व तेवढेच ऐकावे अशा केवळ व्यापारी धोरणावर गोष्टी सांगणे आम्हाला पसंत नाही. निव्वळ मनाचा आनंद, मौज, हास्य, विनोद यांनाही जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून शिक्षणातही ते असले पाहीजे. किंबहुना गोष्टी ऐकण्यात यांनाच स्थान मिळाले पाहिजे,” हे ताराबाई मोडक यांचे विचार सर्वांनीच नेहमी लक्षात ठेवणे आवश्यक.
मुले निर्जीव वस्तूंमध्ये देखील प्राण फुंकून त्यांना जिवंत करत असतात. मुलांना सांगायच्या गोष्टींमधून माणसांपेक्षा जास्त प्राणी, पक्षी, झाडे, फुले, एवढेच नाही तर, सध्याच्या काळातील मोबाईल, कार, विमान, जेसीबी, अशी पात्रे भेटत राहिली पाहिजेत, असे वाटते.
मुले झोपताना, जेवत असताना त्यांच्या हाती मोबाईल देण्याऐवजी गोष्टी ऐकवल्या तर ते निश्चितच अधिक फायदेशीर ठरेल, या विधानाशी पूर्णपणे सहमत.
गोष्टीदरम्यानच्या संवादाचे महत्त्व समजून घेणे गरजेचे. मुलांनी शांत बसून पूर्ण गोष्ट ऐकावी अशी अपेक्षा करणे बरोबर नाही. मधे-मधे प्रश्न विचारायला, स्वतःचे अनुभव आणि विचार मांडायला वाव मिळावा.
रेडिओ किंवा इतर माध्यमांद्वारे गोष्ट ऐकवणे हे एकांगी असल्याने गोष्टीदरम्यान चर्चा घडवून आणता येत नाही. प्रत्यक्ष गोष्ट सांगण्यातला हा सर्वात मोठा फायदा आहे, हे अगदी बरोबर!
मुलांसोबत काम करणाऱ्या सर्व पालकांनी, शिक्षकांनी, छोट्या-मोठ्या माणसांनी जरूर वाचावा असा लेख.
- मंदार शिंदे (गोष्टी सांगणारा माणूस)
No comments:
Post a Comment