मुलांच्या गोपनीयतेचा भंग करू नका आणि त्यांचा आत्मसन्मान हिरावून घेऊ नका!
- एलिन मार्कवीस, स्वतंत्र कायदेशीर सल्लागार
कोविड मदत कार्य पहिल्या लाटेकडून दुसऱ्या लाटेकडे जात असताना आणि आता तिसऱ्या लाटेची भीती जाणवत असताना, काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
मी माझ्या अनेक मित्र-मैत्रिणींना आणि संस्थांना, ते मदत करत असलेल्या मुलांची ओळख उघड न करण्याबद्दल सांगत आले आहे. त्यांचे फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करणे बेकायदेशीर आहे. माझ्या माहितीनुसार, मदत कार्याचा भाग म्हणून देखील मुलांची ओळख फोटोमधून उघड करणे या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात जाते :- (ii) आत्मसन्मान आणि स्वयंमूल्य तत्व; (viii) निंदा न करणाऱ्या शब्दप्रयोगाचे तत्व; (xi) खाजगीपणा व गोपनीयता जपण्याच्या हक्काचे तत्व; (xiv) नव्याने सुरुवात करण्याचे तत्त्व, इत्यादी.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ मधील कलम ७४ नुसार मुलांची ओळख उघड करण्यास प्रतिबंध केला गेला आहे. कोणत्याही वर्तमानपत्र, नियतकालिक, बातमीपत्र, किंवा ऑडिओ-व्हिज्युअल माध्यम, अथवा संवादाच्या इतर कोणत्याही स्वरूपातील कोणत्याही अहवालामध्ये, एखाद्या बालकाची ओळख उघड होईल अशा प्रकारे नाव, पत्ता, अथवा शाळा किंवा इतर कोणताही तपशील, अथवा अशा कोणत्याही बालकाचे छायाचित्र प्रसिद्ध केले जाऊ नये. या तरतुदींचा भंग करणारी कोणतीही व्यक्ती, सहा महिन्यांपर्यंतच्या तुरुंगवासाच्या अथवा दोन लाख रुपयांपर्यंत दंडाच्या किंवा दोन्ही शिक्षेस पात्र राहील.
मुलांच्या कल्याणासाठी काम करत असताना, मुलांच्या संरक्षणासाठी आणि सर्वोत्तम हितासाठी केलेल्या कायदेशीर तरतुदींकडे दुर्लक्ष किंवा त्यांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेऊया.
लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही एखाद्या बालकाचा, तुम्ही त्याला किंवा तिला देत असलेल्या वस्तूसोबत सेल्फी काढून पोस्ट करता, किंवा तुम्ही ज्यांना मदत केली आहे अशा अनेक मुलांचे फोटो पोस्ट करता, तेव्हा तुम्ही त्यांचा आत्मसन्मान हिरावून घेता, त्यांच्या गोपनीयतेचा भंग करता, आणि त्यांना आयुष्यभरासाठी कलंकित करता.
No comments:
Post a Comment