ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Friday, January 27, 2023

उत्खनन



खोदायला चालू केलं की,
उघडे पडायला लागतात
जमिनीचे थर.
पृष्ठभाग म्हणजे सरफेस,
मग मधला थर -
असंख्य गोष्टींनी भरलेला.
त्याखाली झिजलेला खडक -
तुकड्या-तुकड्यांमध्ये विखुरलेला.
मग मूळ खडक -
अभेद्य राहिलेला
अजून तरी.
या सगळ्यामध्ये झिरपणारं
नितळ स्वच्छ पाणी.
जितकं खोल जावं
तितकी विविधता
एकाच जमिनीत.

हे असंच काहीतरी
माणसाचं सुद्धा असतं,
नाही का?

खोदायला चालू केलं की,
उघडे पडायला लागतात
मनाचे थर.
सगळ्यांना दिसणारा चेहरा
म्हणजे सरफेस.
मग मधला थर -
इच्छा आकांक्षा भावनांनी भरलेला.
त्याखाली झिजलेला खडक -
अनुभव आणि आठवणींचा पसारा.
मग मूळ खडक -
भाव-भावनांच्या पलिकडचा,
अभेद्य राहिलेला
अजून तरी.
या सगळ्यामध्ये झिरपणारी
येणारी-जाणारी माणसं
बनणारी तुटणारी नाती.
जितकं खोल जावं
तितकी विविधता
एकाच माणसात.

काहीतरी विशिष्ट उद्देश
असल्याशिवाय करू नये
उत्खनन -
जमिनीचं आणि
माणसांचं सुद्धा.
नको असलेलंच काहीतरी
येईल उफाळून बाहेर,
आणि मग आवरता येणार नाही
दाबलेल्या भावनांचा,
आठवणींचा आवेग.

एवढं कळत असूनसुद्धा
उकरतच असतो आपण
मनावर साठलेली माती.
आणि नाराजसुद्धा होतो
जेव्हा लक्षात येते
आयुष्याची झालेली माती.


    नाटकातल्या पात्रांचं ‘उत्खनन’ सुरु असताना प्रेक्षकांच्या मनाचे पापुद्रे सुटू लागतात, ही ताकद प्रदीप वैद्यांच्या लिखाणाची की नरेश आणि कौमुदी या कलाकारांच्या सादरीकरणाची, हे ठरवणं या नाटकाच्या बाबतीत जरा अवघडच आहे. ‘उत्खनन’ या नाटकाचा विषय जितका गूढ आणि खोल आहे, तितकंच त्याचं व्हिज्युअल प्रेझेंटेशन प्रभावी आणि ठोस आहे. नाटकाचा सेट मल्टी-लेव्हल असल्यामुळं खोली आणि उंची दाखवणं (आणि समजणं) सोपं झालंय. लाईट्सचा आणि अंधाराचा योग्य वापर, विशेषतः खिडकीतून येणाऱ्या मर्यादीत उजेडाचा इफेक्ट एखाद्या जुन्या इंग्रजी सिनेमातल्या सीनची आठवण करून देतो. नरेशच्या आवाजात मोनोलॉग ऐकणं तर खास आहेच, पण कौमुदीचं व्हॉइस मोड्युलेशन आणि सेटवरचा सहज वावर खूपच इम्प्रेसिव्ह. याशिवाय, दिवस-रात्र आणि ऋतुबदलासाठी वापरलेले सेटवरचे काही सरप्राइज एलिमेंट्स प्रत्यक्ष बघूनच अनुभवले पाहिजेत. एकदा बघितल्यावर स्टोरी कळाली, या प्रकारातलं हे नाटक नाही. यातल्या प्रसंगांचे साक्षीदार होण्यासाठी पुन्हा-पुन्हा बघावंसं वाटेल असं हे नाटक आहे. पुढचा प्रयोग अजिबात चुकवू नका. न जाणो, नाटकातलं उत्खनन सुरु असताना तुमच्या मनावरची पण एखादी खपली निघू शकेल.

मंदार शिंदे
9822401246
27/01/2023




Share/Bookmark

No comments:

Post a Comment