ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Wednesday, November 25, 2026

Are These Solutions Innovative or Illusive?

 


पुणे महानगरपालिकेने सध्या अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू केलेली आहे. त्यातच पुढे बेकायदेशीर होर्डींग, फ्लेक्स, बॅनर यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यासाठी ‘भाऊ फ्लेक्स काढा’ अशा विनोदी नावाची एक स्वतंत्र वेबसाईट तुमच्या-आमच्या पैशातून बनवून घेतली आहे.

प्रत्यक्षात गेल्या 10-12 वर्षांपासून पुणे महानगरपालिकेची ऑनलाईन तक्रार निवारण यंत्रणा कार्यरत आहे. व्हॉट्सॲप, ईमेल, पीएमसी केअर ॲप, आणि वेबसाईट अशा विविध मार्गांनी तक्रार नोंदवण्याची सोय आहे. त्यावर फोटो, लोकेशन, वॉर्ड ऑफीस, अशा सर्व गोष्टी नोंदवता येतात. तक्रारीचा टोकन क्रमांक मिळतो, त्यावरून तक्रारीची सद्यस्थिती आणि कोणत्या अधिकाऱ्याकडे पाठवली ते बघता येते. यावर अनधिकृत होर्डींग, फ्लेक्स, बॅनर याबद्दल तक्रार नोंदवता येत असेल तर अजून एक वेबसाईट कशासाठी बनवली?

मार्च 2026 महिन्यात पुणे वाहतूक पोलिसांच्या पीटीपी ॲपमधे बेकायदेशीर फलक (होर्डींग) विरुद्ध तक्रार नोंदवण्याची सोय करून देण्यात आली. यावर फोटो आणि लोकेशनसहीत नोंदवलेल्या तक्रारी परस्पर बंद करून टाकल्या आणि फलक काढून टाकल्याचा शेरा नोंदवण्यात आला. काही दिवसांनंतर पीटीपी ॲपमधून हा पर्याय हळूच गायब करण्यात आला.

ऑक्टोबर 2025 महिन्यात पुणे महानगरपालिका आयुक्तांनी काढलेल्या लेखी आदेशानुसार, परवानगी शिवाय बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून, प्रती बोर्ड Rs.1,000 दंड अधिक कारवाईसाठी येणारा खर्च वसूल करायचा होता; ज्या प्रिंटींग प्रेसमधे सदरचे बॅनर छापण्यात आले, त्यांच्यावर देखील कारवाई करायची होती; शहरात कुठेही अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड, बॅनर लावल्याचे आढळून आल्यास संबंधित सहाय्यक आयुक्त यांना जबाबदार धरायचे होते; महाराष्ट्र मालमत्तेस विरूपणास प्रतिबंध करण्याकरीता अधिनियम, 1995 अंतर्गत संबंधितांवर पोलिस स्टेशनमधे रीतसर फिर्याद देऊन एफआयआर नोंदवायची होती.

ऑक्टोबर 2025 पासून नोव्हेंबर 2026 पर्यंत या आदेशानुसार किती जणांवर कारवाई केली, किती दंड वसूल केला, किती एफआयआर नोंदवल्या, याबद्दल कसलीही माहिती न देता, नोव्हेंबर 2026 मधे नवीन वेबसाईट आणि नवीन घोषणा का केल्या जात आहेत?

महानगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि सर्व विभागांमधील कर्मचारी शहराच्या कानाकोपऱ्यात कामासाठी फिरत असतात; त्यांना कधीच अनधिकृत होर्डींग, फ्लेक्स, बॅनर दिसत नसतील का?

नागरिकांनी तक्रार करायची आणि त्यावर (केलीच तर) कारवाई केल्यासारखी दाखवायची, हा प्रकार असाच सुरू राहणार की आता भाऊ दादा साहेब यांना खरोखर फ्लेक्स काढायला लागणार? तुम्हाला काय वाटतं?

~ मंदार शिंदे
25112026



Share/Bookmark

No comments:

Post a Comment