ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde
Showing posts with label bjp. Show all posts
Showing posts with label bjp. Show all posts

Saturday, November 23, 2019

अनपेक्षित की बेसावध?

अनपेक्षित की बेसावध - एक थरारक सत्यकथा

लेखकः मंदार शिंदे ९८२२४०१२४६
वाचन वेळः ७ मिनिटे

कॉलेज संपवून नोकरी लागण्याचा काळ. एक-दोन वर्षांचा प्रत्येकाचा अनुभव. वेगवेगळ्या कंपन्या आणि वेगवेगळ्या शिक्ट. पण एका-एका फ्लॅटवर पाच-सात जण एकत्र रहायचो. कुणाची सुट्टी गुरुवारी, तर कुणाची रविवारी. त्यामुळं १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, २ ऑक्टोबर हे राष्ट्रीय सुट्टीचे दिवस सोडून क्वचितच सगळे एकत्र भेटायचो. एखाद्याच्या वाढदिवसाचं आणि ३१ डिसेंबरला न्यू इयरचं निमित्त मात्र अगदीच न चुकवण्यासारखं. सगळेच गाव सोडून आलेले. आपापल्या फॅमिलीपासून लांब राहणारे आणि 'आपली' नवीन फॅमिली वसवण्याच्या प्रयत्नातले…

काही नशीबवान मुलांनी नोकरी मिळाल्यावर वर्षभरातच छोकरी गटवलेली, तर काही जणांनी गावाकडंच शाळा-कॉलेजातली जुनी सेटींग टिकवलेली. काही अगदीच आत्मविश्वास-शून्य मुलांनी मामाची मुलगी वगैरे हेरून ठेवलेली. ग्रुपमध्ये एकमेकांना एकमेकांची ही सगळी सेटींग माहिती असायची. एटीएम कार्डच्या मागं पिन लिहून 'माझेपण पैसे काढून आण' आणि ई-मेल अकाउंटचा पासवर्ड लिहून देऊन 'माझापण बायोडेटा फॉरवर्ड कर' असं विश्वासानं एकमेकांना सांगण्याचा जमाना होता तो. इंटरव्ह्यूला जायचंय म्हणून दहा किलोमीटर जायला आपली बाईक न देणारे मित्र, शंभर किलोमीटरवरुन 'मुलीला' घेऊन यायचंच म्हटल्यावर स्वतः पेट्रोल टाकून गाडीची किल्ली ताब्यात द्यायचे. वरुन काळजीनं विचारायचे सुद्धा - 'एकटाच जाशील का येऊ सोबत?' राष्ट्र निर्मितीच्या कार्यात सहभागी व्हायची संधी सहसा सोडायचे नाहीत असे सच्चे मित्र... मग किल्ली बाईकची असो किंवा फ्लॅटची... असो!!

तर अशाच एका मित्राची एक सेटींग 'जवळ-जवळ' फिक्स झाली होती. आता जवळ-जवळ म्हणजे किती? तर त्याच्या म्हणण्यानुसार ऐंशी टक्के वगैरे फिक्सच... म्हणजे आता कोणत्याही क्षणी शपथविधी, सॉरी सप्तपदी उरकावी लागेल अशी परिस्थिती त्यानं वर्णन केलेली. पण मुलीच्या बाजूनं तशी काही चिन्हं दिसत नव्हती. म्हणजे 'होय' पण म्हणत नव्हती आणि 'नाही' पण म्हणत नव्हती. नुसतीच चर्चा आणि सल्ला-मसलत सुरु होती. वाढदिवसाला केक घेऊन भेटायला यायची, व्हॅलेंटाईन डे साठी ग्रीटींग देऊन जायची. (व्हॉट्सऐप आणि फेसबुक अजून जन्माला यायचे होते.) अशी जवळ-जवळ तयारच होती, पण ऑफिशियली युती जाहीर करायची काही लक्षणं दिसत नव्हती.

ग्रुपमधल्या अनुभवी मित्रांनी या मजनूला साईडला घेऊन समजावला. अनुभवी म्हणजे कसे, तर स्वत: कधीच सरकार स्थापन केलं नसलं तरी, इच्छुक उमेदवारांना स्वखर्चानं आळंदीला नेऊन त्यांचा शपथविधी पार पाडणं, आणि वेळप्रसंगी अशा अल्पमतातल्या सरकारमधला अविश्वास ठराव हाताळून सरकार पडण्यापासून वाचवणं, अशा बाबतीतला दांडगा अनुभव या मित्रमंडळींना होता. तर हे अनुभवी मित्र म्हणाले, गड्या हे काय खरं न्हाई.. तू काम-धंदा, अभ्यास-पाणी सगळं विसरून, आईबापाचा पैसा उडवून आणि कमावत्या मित्रांच्या कमाईचं पेट्रोल जाळून खंगत चाललायस. तुझी स्व-बळावर संसार करायची ताकद न्हाई आन पोरगी लई दिवस हे बघत बसंल असं वाटत न्हाई. तू म्हणतुस तसं जे काय जवळ-जवळ ऐंशी टक्के ठरलंय, त्याच्या फुडचं वीस टक्के तिच्याशी डायरेक बोलून कन्फर्म करुन घे गड्या…

अनुभवी मित्रांचा सल्ला आमच्या कुमार गौरव ऊर्फ तुषार कपूर ऊर्फ स्वप्निल जोशीला पटला. (आमच्या मित्रासाठी हीच तीन नावं 'नमुन्या'दाखल वापरण्याचं विशेष कारण आहे. समजलं तर ठीक, नाहीतर सोडून द्या.) आमच्या हिरोनं हिरोईनकडं डायरेक्ट विषय काढला. समोरून उत्तर आलं, अजून माझं काय ठरलंच नाही. तू आधी शिक्षण पूर्ण कर, मग नोकरी कर, स्व-बळावर उभा रहा, मग मी आमच्या घरच्या आघाडीवर विषय चर्चेला घेते. बहुमताचा कौल बघून ठरवू काय करायचं ते…

मुलगी 'नाही' म्हटली नाही, या आनंदात हिरोनं आम्हाला पार्टी दिली. मुलीनं 'होय' तरी कुठं म्हटलंय, अशी शंका ग्रुपमधल्या राज्यपालांनी बटर पनीरमध्ये बटर रोटी बुडवून खाताना बोलून दाखवली. 'आमचा एकमेकांवर विश्वास आहे' असं म्हणून हिरोनं वेळ मारुन नेली. पनीर आणि रोटी पचायच्या आतच नको ती बातमी आली आणि जवळ-जवळ ऐंशी टक्के फिक्स असलेली आमच्या हिरोची शीट प्रचंड बहुमतानं आपटली.

बातमी अशी होती की, हिरोईनच्या हिरोबरोबर सुरु असलेल्या वाटाघाटी तिच्या घरच्या घटक पक्षांना समजल्या आणि सत्ता हातातून जायच्या आधीच तातडीनं 'राष्ट्रपती राजवट' लागू करत हिरोईनला तिच्या मामाच्या गावी हलवण्यात आलं. इकडं हिरोईनला परत मिळवण्याच्या लढाईची मोर्चेबांधणी करण्यासाठी हिरोनं मित्रपक्षांशी मिटींगा आयोजित केल्या. चहा, मसाला दूध, लिंबू सरबत, देशी-विदेशी थंड-गरम ग्लासांच्या साक्षीनं आणाभाका घेतल्या गेल्या. गनिमी कावा करु, जिंकू किंवा मरू, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, वगैरे प्रेरणादायी घोषणा आणि सुभाषितांची देवाण-घेवाण झाली. पण…

हे सगळं होईपर्यंत शत्रूपक्ष वाट बघत बसणार होता काय? आर्मीनं 'सर्जिकल स्ट्राईक' केल्यागत घाईगडबडीनं मुलीचं लग्नच लावून टाकल्याची बातमी आली. म्हणजे मुलगा शोधला कधी? मुलगी दाखवली कधी? बोलणी केली कधी? देण्या-घेण्याच्या याद्या लिहिल्या कधी? बस्ता आणि टॉवेल-टोपी आणि साड्या-बांगड्या आणि मेंदी-हळदी हे सगळं उरकलं कधी?? का डायरेक्ट शपथविधीच उरकून घेतला राज-भवनावर जाऊन…?

इकडं आमच्या दोस्ताची दाढी झपाट्यानं वाढू लागली. विश्वासघात झाला, दगाफटका झाला, असं तो भेटेल त्याला सांगू लागला. हे लग्न टिकूच शकत नाही, तिला फसवून तिकडं नेलंय, जबरदस्ती लग्न लावलंय, असं ओरडू लागला. आईबापानं केलेली अर्थसंकल्पीय तरतूद सिगारेटवर आणि मित्रांकडून मिळालेला आपत्कालीन रिलीफ फंड पेट्रोलवर जाळू लागला. जे झालं ते अनपेक्षित नव्हतंच, फक्त तू बेसावध राहिलास असं अनुभव मित्रांनी समजावलं... पण 'ती' परत येईल यावर त्याचा पूर्ण विश्वास होता.

आणि झालंही तसंच... पाच दिवस नांदून माहेरी परत आल्यावर तिनं रिक्षा पकडली आणि थेट भेटायलाच आली. अंगावर हिरवी साडी, हातात हिरवा चुडा, गळ्यात मंगळसूत्र. मेंदीचा आणि हळदीचा रंग अजून उतरलासुद्धा नव्हता. नशिबात हेच लिहिलं होतं म्हणाली. सगळं आपल्या मनासारखं होत नसतंय म्हणाली. तुझं भविष्य उज्वल आहे (म्हणजे वर्तमानकाळ अंधकारमय आहे), तुला माझ्यापेक्षा चांगली मुलगी मिळेल (म्हणजे माझा नाद आता सोड), पुढच्या वेळी असा बेसावध राहू नकोस (म्हणजे आधी शपथविधी उरकून घे, नंतर बहुमत सिद्ध करता येतं), असा आयुष्यभर उपयोगी पडणारा धडा शिकवून निघून गेली.

आमचा मित्र ह्यातनं काय शिकला किंवा नाहीच शिकला, हे महत्त्वाचं नाही. आपल्यावर अशी वेळ येऊ नये, म्हणून आपण सावध रहावं यासाठी ही गोष्ट जशी आठवली तशी सांगितली. गोष्ट उलगडून सांगताना राजकीय संदर्भ आणि राजकीय शब्द वापरले असले तरी ही गोष्ट अजिबात राजकीय नाही, ह्याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती…

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६
२३/११/२०१९


Share/Bookmark

Sunday, October 6, 2019

कोथरुडचा घाट

कोथरुडचा घाट

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार आणि अजित पवारांचा प्रभाव कमी करण्यासाठी, भाजपमधून स्थानिक नेत्यांना राज्य सरकारात महत्वाचं स्थान देणं गरजेचं होतं. महानगरपालिकेवर भाजपनं आपला झेंडा फडकवला असला तरी, सुरेश कलमाडींच्या नंतर 'पुण्याचा नेता कोण' हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. गिरीश बापट यांना लोकसभेत पाठवल्यानंतर राहिलेल्या सात आमदारांपैकी एकाचीही राज्याच्या राजकारणावर छाप पाडण्याची क्षमता नव्हती. भविष्यात पुन्हा सत्तेची सूत्रं एखाद्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या नेत्याकडं जाऊ द्यायची नसतील, तर पुण्यातून निवडून गेलेल्या आमदाराला महत्वाचं पद मिळणं आवश्यक होतं. चंद्रकांतदादा पाटील यांच्या रूपानं भाजपला असा उधार पण सक्षम आमदार सापडला आहे. उपमुख्यमंत्री लेव्हलचं महसूल खातं आणि भाजप प्रदेशाध्यक्ष पद सांभाळणाऱ्या चंद्रकांत दादांमुळं पुण्याला नवीन नेता लाभणार असं दिसतंय.

आता दादांच्या एंट्रीसाठी कोथरूडच का? माधुरीताई मिसाळ (पर्वती), जगदीश मुळीक (वडगाव शेरी), भीमराव तापकीर (खडकवासला), योगेश टिळेकर (हडपसर), या सध्याच्या आमदारांपैकी कुणीच आपला मतदारसंघ चंद्रकांत दादांसाठी सोडायला तयार झाले नसते. तसंही या लोकांचं राजकीय पुनर्वसन करणं पक्षासाठी कठीणच काम ठरलं असतं. त्यापेक्षा निवडून आले तर ठीक, नाहीतर आपल्याच कर्मानं पडतील, हा सुज्ञ विचार इथं दिसतोय. गिरीश बापट यावेळी लोकसभेवर निवडून गेले असले तरी, दिल्लीच्या राजकारणात ते रमतील (किंवा टिकतील) असं दिसत नाही. त्यामुळं त्यांच्या जागी प्रॉक्सी आमदार तेच निवडतील आणि निवडून आणतील. पुणे कॅन्टोनमेंट राखीव मतदारसंघ असल्यामुळं तो पर्याय नव्हताच.

मग राहिले शिवाजीनगर आणि कोथरूड मतदारसंघ. यापैकी शिवाजीनगरला मागच्या वेळी भाजपचे विजय काळे निवडून आले असले तरी ती भाजपसाठी भरवशाची सीट नव्हे. उलट कोथरूडमध्ये प्रा. मेधा कुलकर्णी यांनी नगरसेवक ते आमदार या प्रवासात भाजपला चांगला बेस तयार करून दिला आहे. कोथरूडचा मतदार सुशिक्षित आणि सुजाण समजला जातो. राज्यात महत्वाचं स्थान असणाऱ्या नेत्याला कोथरूडचे मतदार दूरदृष्टीनं स्वीकारतील, असं वाटतंय. शिवाय राजकारण हा मेधाताईंचा पूर्णवेळ 'व्यवसाय' नसल्यामुळं त्यांचं राजकीय पुनर्वसन करणं फारसं अवघड जाणार नाही. प्रसंगी जनतेच्या प्रश्नांवर पक्षविरोधी भूमिका घ्यायला खंबीर असलेल्या मेधाताईंना पक्षामध्ये चांगलं आणि महत्त्वाचं स्थान मिळेल, असं वाटतंय. मागं-पुढं राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवण्यासाठी त्या उत्तम पर्याय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खासदार वंदनाताई चव्हाण यांना मिळालेलं स्थान भाजपमध्ये प्रा. मेधाताई मिळवू शकतील, असं दिसतंय.

भाजपचा प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्रीपदाचा दावेदार आपल्याच पूर्वीच्या बालेकिल्ल्यात शंभर टक्के रिस्क घेऊन उतरला असताना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं मात्र हाराकिरी करत चंद्रकांत दादांना आयताच 'पास' देऊन टाकला आहे. मनसेचे किशोर शिंदे चंद्रकांत दादांना फाईट देऊ शकतील, असं अजिबातच वाटत नाही. अगदी चंद्रकांत पाटलांना हरवून किशोरभाऊ आमदार झालेच तर, पूर्वी ११ लाखांची दहीहंडी करायचे ती २१ लाखांची करतील. यापेक्षा फार मोठ्या आणि वेगळ्या अपेक्षा त्यांच्याकडून करता येणार नाहीत, हे कोथरूडकर चांगले जाणतात. त्यामुळं कोथरूडची सीट जिंकणं, चंद्रकांत दादांना अग्निपरीक्षा द्यायला लावणं, पुण्यातल्या स्थानिक भाजप-सेना नेत्यांना शह देणं, भविष्यात दीर्घकाळासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला डोकेदुखी निर्माण करणं, असे जवळ-जवळ अर्धा डझन पक्षी एका तिकिटात मारले जातील, असं सध्यातरी वाटतंय. आता चंद्रकांत दादांना हा घाट पार करता येतोय, का आतले-बाहेरचे मिळून त्यांचा बाजीप्रभू देशपांडे करतायत, हे लवकरच बघायला मिळेल!

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६




Share/Bookmark