ऐसी अक्षरे
Monday, July 3, 2023
एक 'भारी' अनुभव!
नुकताच केदार शिंदेचा 'महाराष्ट्र शाहीर' येऊन गेला. लगेच 'बाईपण भारी देवा' सिनेमाचा ट्रेलर बघायला मिळाला. बहुतेक हा सिनेमा आधी बनवून तयार असावा. नावावरून आधी वाटलं, बाई'पण' भारी असते असं काहीतरी म्हणायचंय की काय! पण ट्रेलर बघितल्यावर कळालं, 'बाईपण' भारी असतं असं म्हणायचंय. विषय थोडा 'क्लिशे' वाटला खरा; पण केदार शिंदे ‘क्लिशे’ विषय घेऊन ‘विषय खोल’ सिनेमा बनवू शकतो, हे माहिती असल्यानं सिनेमा बघणार हे ठरलंच होतं.
स्क्रिप्टवर मजबूत पकड, शार्प डायलॉग्ज, सुंदर फ्रेम्स, कलाकारांच्या ‘बाई’गर्दीत सुद्धा प्रत्येक पात्राला न्याय देणारं फूटेज, आणि पारंपारिक-आधुनिक संगीताचं बेमालूम मिश्रण, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे एक ‘भारी’ मराठी सिनेमा! रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, अशा दिग्गज आणि अनुभवी कलाकारांपासून, सुकन्या, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा परब, अशा वेगवेगळ्या वयोगटातल्या 'डॉन' बायकांना एकत्र आणायचं काम कौतुकास्पद आहेच; पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यापैकी कुठल्याही कलाकाराला भाव खायची संधी न देता, 'बाईपण भारी देवा' हा शेवटपर्यंत 'दिग्दर्शकाचा सिनेमा' राहतो आणि आपल्याला नेमकं कुणाचं काम आवडलं किंवा कुठला भाग आवडला, हे अजिबात ठरवताच येऊ नये, याची व्यवस्था केदारनं केलेली दिसते.
सिनेमाची स्टोरी किंवा खरंतर वेगवेगळ्या पात्रांच्या समांतर चालणाऱ्या स्टोऱ्यांचं कोलाज, या दृष्टीकोनातून विचार करण्याऐवजी, हा म्युझिकल प्रवास अनुभवणं मी कधीही प्रेफर करेन. परंपरा विरुद्ध मॉडर्न लाईफस्टाईल, एकत्र कुटुंब विरुद्ध विभक्त कुटुंब, करियर की घर, दुष्ट की सज्जन, चांगले की वाईट, असा कुठलाच सामना किंवा जय-पराजय या सिनेमामध्ये बघायला मिळणार नाही. बघणाऱ्यानं आपल्या आयुष्यातल्या पात्रांशी आणि प्रसंगांशी आणि परिस्थितीशी संबंध जोडायचा प्रयत्न केला तरी यातून कसलाही बोध, निर्णय, आदर्श मिळवता येणार नाही. जे घडतंय त्याची मजा घ्यायची, जे पटतंय ते बरोबर न्यायचं, पटत नसेल ते सोडून द्यायचं, असा हलका-फुलका सिनेमा आहे 'बाईपण भारी देवा!’ पु. ल. देशपांडेंच्या 'वाऱ्यावरची वरात'मध्ये सुरुवातीला सूत्रधार (म्हणजे खुद्द पु. ल.) म्हणे - "आजचा आमचा हा कार्यक्रम असाच आपला मजेचा आहे, हसून सोडून द्यायचा आहे. त्याच्यात उगीचच साहित्यिक मूल्य वगैरे पहायचं नाही हं! म्हणजे ते सापडणार नाहीच..." या ‘डिस्क्लेमर’नंतर 'वाऱ्यावरची वरात' बघितली, की त्यातल्या साहित्यिक मूल्यानं आणि जीवन दर्शनानं प्रेक्षकांचे डोळे दिपून जातात, पण ते त्यांच्या लक्षातसुद्धा येत नाही. केदार शिंदेचा हा सिनेमा असाच काहीसा अनुभव देतो, असं मला माझ्या अनुभवावरून नमूद करावंसं वाटतं.
सिनेमातल्या तांत्रिक गोष्टींवर इथं चर्चा करणार नाही, पण दोन प्रसंगांचा उल्लेख करायचा मोह टाळता येत नाहीये. झोया अख्तरच्या 'गली बॉय'मध्ये एका प्रसंगात रणवीर कारमध्ये बसलेला असतो आणि सभोवतालच्या रोषणाईचं प्रतिबिंब त्याच्या गाडीवर (त्याच्यावर नाही, त्याच्या गाडीवर) पडलेलं दिसतं. या सुंदर फ्रेमची आठवण करून देणारा एक उत्कृष्ट प्रसंग 'बाईपण भारी देवा' मध्ये बघायला मिळतो. कुठला ते प्रत्यक्ष स्क्रीनवर बघायला जावंच लागेल. दुसरा एक प्रसंग म्हणजे, 'टाईम मशीन’चं तंत्र वापरून भूतकाळ आणि वर्तमानकाळाची गुंफण करणारी एक सुरेख फ्रेम सिनेमाच्या शेवटच्या टप्पात बघायला मिळते. कथा, संवाद, संगीत, दृश्य प्रतिमा, रंगसंगती, या सगळ्या गोष्टींवर दिग्दर्शकाची हुकूमत एकाच वेळी दाखवणारे हे काही प्रसंग आहेत.
'बाईपण भारी देवा' या सिनेमाची स्टोरी म्हणजे एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. इथं फक्त सिनेमा बघून आलेला फील शेअर केला आहे. मोठ्या स्क्रीनवर हा फील घ्यायलाच लागतोय गड्यांनो... जा आणि भारी वाटून घ्या!
- मंदार शिंदे
०२/०७/२०२३
shindemandar@yahoo.com
Friday, June 9, 2023
यदा कदाचित रिटर्न्स!
जवळपास बावीस वर्षांपूर्वी, म्हणजे १३ डिसेंबर २००१ या दिवशी, पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात एक नाटक बघितलं. 'भीमाच्या गदेसारखी मजबूत कॉमेडी' अशी जाहिरात केली जात असलेलं संतोष पवारांचं 'यदा कदाचित'! प्रत्येक वाक्याला हसायला लावणारं आणि त्याच वेळी गंभीर विचार करायला लावणारं नाटक. स्टेजवर संतोष पवार आणि त्यांच्या टीमनं घातलेला धुमाकूळ न विसरता येण्यासारखा.
पुढं या नाटकाची सीडी हाती लागली. यूट्यूब आणि ओटीटीच्या जन्माआधीची गोष्ट. रेकॉर्डरवर ऑडीयो कॅसेटची ए आणि बी साईड आलटून-पालटून ऐकायची सवय होती. अशा वेळी नाटकाची सीडी मिळाल्यावर साहजिकच नाटकाची पारायणं सुरू झाली. त्यात दोन महत्त्वाची नाटकं म्हणजे, 'पती सगळे उचापती' आणि 'यदा कदाचित'. पुन्हा-पुन्हा बघून या नाटकांमधले डायलॉग पाठ झाले होते.
कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर कितीही वेळा हे नाटक बघितलं, तरी प्रत्यक्ष स्टेजवरचा धिंगाणा अनुभवणं वेगळीच गोष्ट. सध्याच्या काळातले जिवंत आणि ज्वलंत विषय रडत नाही, तर हसत-खेळत सोप्या पद्धतीनं लोकांसमोर मांडायचे, ही 'यदा कदाचित'ची खासियत. त्यासाठी ऐतिहासिक आणि पौराणिक पात्रांपासून राजकीय आणि फिल्मी नेत्या- अभिनेत्यांपर्यंत कुणालाही स्टेजवर खेचून आणायला संतोष पवार कचरत नाहीत, घाबरत नाहीत. सोबत लावणी आणि गवळणीपासून बॉलिवूड डान्स आणि शारीरिक कसरतींचा तडका असतोच. म्हणजे एन्टरटेनमेन्टची फुल ग्यारंटी!
त्यामुळं 'यदा कदाचित रिटर्न्स'ची तयारी सुरू झाल्याचं कळाल्यापासून अपार उत्सुकता. मुंबई-ठाण्यापासून सुरुवात करत, शेवटी ८ जून २०२३ या दिवशी पुण्यातला शुभारंभाचा प्रयोग ठरल्याचं समजलं आणि बावीस वर्षांनंतर पुन्हा एकदा 'यदा कदाचित'ची जादू प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय भावना आणि अस्मिता घाऊक प्रमाणात दुखावल्या जाण्याच्या काळात, 'यदा कदाचित रिटर्न्स' क्वचित आडून आणि बहुतेकदा थेट भाष्य करतं. 'राजा नागडा आहे' आणि 'पोपट मेला आहे' हे सांगायला महान कलाकार आणि सेलिब्रिटी घाबरत असतील, तर त्यांनी 'यदा कदाचित रिटर्न्स' नक्की बघावं. त्यातून त्यांना प्रेरणा तरी मिळेल किंवा किमान सत्याची ओळख तरी पटेल.
नवीन संचातले कुठलेच कलाकार नवखे वाटत नाहीत आणि वीस सेकंदांच्या रील्सच्या जमान्यात दोन अंकी (मराठी) नाटकातली एनर्जी एकदाही ड्रॉप होत नाही, याबद्दल सर्व कलाकार आणि विशेषत: दिग्दर्शक कौतुकास पात्र आहेत. पात्रांची निवड आणि स्क्रिप्ट यावर चोख काम झालेलं आहे. कमरेखालचे विनोद करताना चावट आणि अश्लील यामधला बॅलन्स 'बऱ्यापैकी' साधला आहे. गाणी, संगीत, लाईट्स उत्तम आहेत.
'मराठी नाटक' म्हणजे लांबच लांब मोनोलॉग्ज, शब्दबंबाळ संवाद, मेलोड्रॅमाटीक स्क्रिप्ट, आणि 'विनोदी नाटक' म्हणजे अंगविक्षेप आणि चावटपणा, या दोन्ही संकल्पनांना छेद देणारा 'यदा कदाचित' हा एक यशस्वी प्रयोग आहे आणि तो आता 'रिटर्न' आला आहे. ही संधी सोडू नका!
०८/०६/२०२३
मंदार शिंदे (9822401246)
यदा कदाचित रिटर्न्स!
Sunday, April 23, 2023
Thursday, April 20, 2023
Sunday, April 16, 2023
Main Hoon Badal (Poetry)
मैं हूँ बादल, मैं हूँ बादल
रंग है मेरा जैसे काजल
उडता फिरता आसमान में
धरती पर बरसाऊँ मैं जल
मैं हूँ बादल, मैं हूँ बादल
पेड और पौधे मुझको प्यारे
हरियाले और शीतल न्यारे
इनसे मिलने आऊँगा कल
मैं हूँ बादल, मैं हूँ बादल
मेरा काम है पानी देना
सूखे जग की प्यास बुझाना
नदियों का मैं भर दूँ आंचल
मैं हूँ बादल, मैं हूँ बादल
तुमने जब जब मुझको बुलाया
मैं भी दौडा दौडा आया
रुकने दो अब मुझको दो पल
मैं हूँ बादल, मैं हूँ बादल
- मंदार 9822401246
Main Hoon Badal (Poetry)
Sunday, April 9, 2023
Tuesday, April 4, 2023
MallPractice and The Show - Marathi Play
अस्वस्थ झालो आहे
अशांत झालो आहे
सत्य विवस्त्र बघुनि
निशब्द झालो आहे
बेसावध त्या क्षणी
अचानक
डोळ्यांना जे दिसले
डोळे मिटल्यावर जे
येऊन
कानांवर आदळले
अनपेक्षित जरी
अनोळखी नव्हते
स्वीकारु की नको
अजुनि
द्विधेत पडलो आहे
अस्वस्थ झालो आहे
अशांत झालो आहे
सत्य विवस्त्र बघुनि
निशब्द झालो आहे
क्षणात हसरे
क्षणात रडवे
क्षणाक्षणाला
नाट्य हे घडते
नाटक म्हणुनि
सोडुनि देऊ
प्रयत्न करतो आहे
अस्वस्थ झालो आहे
अशांत झालो आहे
सत्य विवस्त्र बघुनि
निशब्द झालो आहे
कधी आरोपी
मीच बळी कधी
दोष कुणाचा
चूक कुणाची
शिक्षा द्यावी की
करुनि घ्यावी
मंथन करतो आहे
अस्वस्थ झालो आहे
अशांत झालो आहे
सत्य विवस्त्र बघुनि
निशब्द झालो आहे
ऋजुता सोमण, अतुल पेठे आणि प्रदीप वैद्य यांचा एक जादूचा प्रयोग सध्या सुरु आहे.
'मॉलप्रॅक्टीस ऍंड द शो' असं नाव आहे.
लाईट्स कमाल..
नृत्य कमाल..
संगीत कमाल..
कन्सेप्ट कमाल..
क मा ल !
आणखी काही सांगत नाही. सांगू शकत नाही.
ही जादू संपायच्या आधी बघा, एवढंच.
कदाचित जादू तशीच राहील,
पण ही जादूगार मंडळी गायब होतील.
मग परत येतील,
दुसरीच काहीतरी जादू घेऊन...
तोवर ही चुकवू नका.
'मॉलप्रॅक्टीस ऍंड द शो'
७ एप्रिल २०२३ पर्यंत(च)
द बॉक्स, कर्वे रोड, पुणे
MallPractice and The Show - Marathi Play
Subscribe to:
Posts (Atom)