ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Wednesday, July 9, 2014

घरच्या मिरचीची गोष्ट

मिरजेजवळच्या भोसे गावात शेतक-यांच्या ग्रुपला भेटायला गेलो होतो. चर्चा शेतकरी-अडते-ग्राहक यावर आली तेव्हा एका शेतक-यानं सांगितलेला अनुभव -

"वडलांनी शेतात मिरची लावली होती. मिरची काढून मिरज मार्केटला पोचवायची होती. दीडशे रुपये देऊन तीन बायका लावल्या होत्या मिरची काढायला. मी तेव्हा मिरजेला नोकरी करायचो. जाता-जाता मार्केटला मिरचीचं पोतं पोच करायला वडलांनी सांगितलं. मोटरसायकलवर पोतं टाकून निघालो. गाडी सुरु करताना वडलांनी घरातून एक रिकामी पिशवी आणून दिली आणि सांगितलं, घरची मिर्ची हाय, जाता-जाता मिरजेच्या काकाकडं थोडी दिऊन जा. तिथून निघालो ते थेट मिरज मार्केटला. मोटरसायकलवर पोतं बघून तिथला एकजण पुढं आला. 'काय घिऊन आलाय?' मी सांगितलं - मिरची. म्हणाला, 'कशाला आणलाय? कोण इचारतंय इथं मिर्चीला?' मी निम्मा गार झालो. म्हटलं, घिऊन तर आलोय. किती मिळत्याल बोला. जरा अंदाज घेत बोलला - एका पोत्याचं पन्नास! मी म्हटलं, दीडशे रुप्ये निस्ती मजुरी झाल्या मिर्ची काढायची. मोटरसायकलवर घिऊन आलोय त्ये येगळंच. मिर्ची लावल्यापास्नं किती खरीचल्यात त्ये तर सांगतच न्हाई... मग होय-न्हाय करत शेवटी शंभरला तयार झाला. मला पण कामावर जायला उशिर होत होता. शंभर रुपये घेऊन पोतं टाकलं आणि कामावर गेलो. दुपारी जेवणाच्या सुट्टीत वडलांनी दिलेली रिकामी पिशवी बघितली आणि काकांसाठी मिरच्या काढायच्या राह्यल्या ते आठवलं. घरची मिरची, एवढं सांगून काकांकडं पोचवली नाही तर घरी गेल्यावर शिव्याच पडतील. तसाच पुन्हा निघालो, मार्केटला आलो. तो सकाळचा माणूस कुठं दिसेना, पण त्याच्याकडनं मिरच्या घेऊन विकायला बसलेल्या बायका सापडल्या. त्यांच्याकडं गेलो नि सांगितलं, जरा ह्या पिशवीत मिरच्या भरुन द्या. त्यांनी विचारलं, किती दिऊ? मी म्हटलं, द्या चार-पाच किलो, घरच्याच हैत! असं म्हटल्यावर बाई तागडी ठिऊन माझ्याकडं बघाय लागली. म्हणाली, कुठनं आलायसा? चार रुप्ये पाव हाय मिर्ची. किती भरु सांगा. मी म्हटलं, अवो सकाळी मीच टाकून गेलोय की पोतं तुमच्यासमोर. तवा काडून घ्याची राह्यली म्हून परत आलो. बाई काय ऐकंना. काकांकडं तर मिरची द्यायचीच होती. शेवटी झक मारत साठ रुपये देऊन चार किलो मिरची विकत घेतली आणि काकांकडं पोच केली!"

उत्पादक ग्राहक झाला की काय होतं याचं उत्तम उदाहरण. म्हणून तर मी नेहमी म्हणतो, प्रोड्युस करु शकणा-यांनी कन्झ्युमर होणं ही डेव्हलपमेंट नाहीये भौ! :-)


Share/Bookmark

No comments:

Post a Comment