"राजकारणात वाइटांची गर्दी वाढत असंल, तर याचा अर्थ असाही होतो, की त्यांना निवडून देणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. हे सारं घडत असताना आपण नेत्याची व्याख्याही बदलत असतो. चांगला नेता कोण? जो प्रत्येक लग्नाला जातो आणि ज्याच्यामुळं लग्न दोन-चार तास लांबणीवर पडतं, तो...? जो प्रत्येक मयताला जातो आणि तो गेल्याशिवाय मयताला अग्नी लागत नाही किंवा ज्याच्यावर मातीही पडत नाही, तो?... जो लग्न ठरवायला जातो आणि मोडायलाही जातो, तो?... जो पोलिस ठाण्यात वारंवार जाऊन ट्रॅफिकचे नियम तोडणाऱ्या पोरांना सोडवून आणतो, तो?... लोकप्रतिनिधींची मूलभूत कर्तव्यं बाजूला पडली असून, समाजानंच त्यांच्यावर नवी कर्तव्यं लादली आहेत. दिल्लीत तोंड न उघडणारा, मुंबईत विधानसभेत न जाणारा नेता आपल्याला आता चालतो. तो फक्त लग्नाला आणि मयताला आला तरी भागतं.. जे काम तलाठ्यानं आणि सरकारी दवाखान्यातल्या कंपाउंडरनं करायचं असतं, त्यात हा नेता लक्ष घालतो. लोकप्रिय नेता म्हणून चमकोगिरी करायला लागतो... मी हलवल्याशिवाय समाज हलणार नाही, मी चालवल्याशिवाय समाज चालणार नाही आणि मी बोलतं केल्याशिवाय समाज बोलणार नाही, असं सांगणारा खरा नेता, की लोकांना स्वावलंबी, स्वाभिमानी बनवणारा खरा नेता, याचा फैसला करण्याची वेळ आता आली आहे. आपण नको त्या ठिकाणी निष्ठा टाकून निष्ठावान कार्यकर्ते होणार, की निष्ठावान नागरिक होणार, हेही ठरवण्याची वेळ आली आहे."
- उत्तम कांबळे
- उत्तम कांबळे
No comments:
Post a Comment