ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Thursday, December 31, 2015

डायरी

पानं भरा, पानं भरा
डायरीची ह्या पानं भरा.
ही भरली की दुसरी भरा,
दुसरीनंतर तिसरी भरा.
वय वाढतै, दिवस जातैत
शेडुलं बीजी बीजी होतैत
'वेळच नै' हे पण लिवा
पानं भरा, पानं भरा...
दिवसा घटना, रात्री चकना
त्येच्याशिवट झोपच यैना
झोपतली मग सप्नं लिवा
पानं भरा, पानं भरा...
फेसबुक ट्विटर गुगल फिगल
तुमची डायरी जग वाचंल
खाजगी प्रायवेट शेयर करा
पानं भरा, पानं भरा...
(पुढच्या पानावर...)
(मागच्या पानावरनं...)
डैरीत डैरी पुठ्ठ्याची...
एक डैरी भरु बै दोन डैरी भरु...
ये गं ये गं डैरी, तुझी पानं भरी...
डैरी आली पण वर्ष गेलं...
भरली डायरी तीनशे पासठ पानांची...
डैरी भरली नै म्हून वर्ष संपैचं थांबत नै...
वर्ष संपल्याचं दुख्ख नै पण डैरी कोरी -हात्ये...
म्हणी लिवा, गाणी लिवा
कविता-किस्से, रांगोळीचे शिक्के
मेंदी काडा, रेसिपी मांडा
मापं काडा, मापं लिवा
अशुद्ध किव्वा सुद्द लिवा
काय केलं त्ये लिवा, नाय केलं त्ये बी लिवा
पानं भरा, पानं भरा
भरा भरा, भराभरा...
भरभर भरा, डाय-या भरा
आयुक्ष भर्भर चाल्लंय, धरा!

- अक्षर्मन


Share/Bookmark

Saturday, December 5, 2015

रविंद्र संगीत - एक जिवंत अनुभव

गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांची ओळख जन-गण-मन, शांतिनिकेतन, आणि नोबेल पुरस्कार एवढीच नाही, तर दीडेकशे वर्षांपूर्वी आधुनिक , काळाच्या पुढची काव्यं, नाटकं, कथा रचणारे साहित्यिक टागोर, मृत्यू आणि आत्मा-परमात्मा संबंधांवर सुंदर भाष्य करणारे तत्वज्ञ टागोर, लयबद्ध आणि कर्णमधूर रविंद्र संगीताचे निर्माते टागोर, वयाच्या साठीनंतर चित्रकलेच्या क्षेत्रात मुक्त मुशाफिरी करणारे चित्रकार टागोर, शिक्षणाला चार भिंती आणि छापील शब्दांच्या बाहेर आणून शिकण्याची प्रक्रिया आनंददायी बनवणारे टागोर, अशा गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांच्या अनेक ओळखी आहेत. आणि रविंद्र संगीताच्या साथीनं टागोरांचं जीवन-दर्शन घडवणारा राधा मंगेशकर यांचा 'रविंद्र संगीत' हा कार्यक्रम तितकाच जिवंत आणि रोमांचकारी बनतो तो केवळ त्यांच्या सुमधूर आवाजानं नव्हे तर मनापासून केलेल्या निवेदनानं. रविंद्र संगीतातली दहा उत्तम गाणी त्या रविंद्र संगीताचे सर्व नियम पाळून आणि प्रत्येक बंगाली गाण्याचा शब्दार्थ व भावार्थ मराठीत समजावून सांगत सादर करतात. मग ते 'आये तो बे सोहोचरी, हाते हाते धोरी धोरी, नाचीबी घिरी घिरी गाहीबी गान' हे आनंदगान असो, की कदंब वृक्षाभोवती घिरट्या घालणा-या कृष्णछायेचं गूढगीत असो, राधा मंगेशकरांच्या अर्थपूर्ण निवेदनातून या बंगाली गीतांचा अर्थही कळतो आणि त्यांच्या मूळ लयबद्ध रचनेचा आनंदही घेता येतो. 'तोमार होलो शुरु, आमार होलो शारा' हे तत्वज्ञानाच्या वाटेनं जाणारं गीत आणि 'हे खोनिकेर ओतिथी' हे सुख आणि दुःखाच्या पलिकडची भावना व्यक्त करणारं गीत अर्थाइतक्याच ताकदीनं राधा मंगेशकर गातात. दोन गाण्यांच्या मधे टागोरांचा जीवन-प्रवास, 'गीतांजली' आणि नोबेल पुरस्काराचे किस्से, टागोरांच्या घरांचे, वस्तूंचे फोटो, या सगळ्यातून वातावरण रविंद्रमय होऊन जातं आणि मानवी जीवनाचं अंतिम सत्य सांगत कार्यक्रमाचा शेवट होतो - 'जोडी तोर दाक सुने केऊ ना असे, तोबे एकला चालो रे... एकला चालो एकला चालो एकला चालो रे...'


Share/Bookmark

Monday, November 30, 2015

शिक्षणाच्या आयचा घो

एका फारच नावाजलेल्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमधे काही कामासाठी गेलो होतो. प्रचंड डोनेशन आणि अफाट फी घेणारं हे इंटरनॅशनल लेव्हलचं कॉलेज. तिथल्या एका सिनियर पोस्टवरच्या व्यक्तिनं मला सहज पुरवलेली माहिती - (माझी त्या व्यक्तीशी कोणतीही पर्सनल ओळख नसताना व आम्ही पहिल्यांदाच एकमेकांना भेटत असताना ही माहिती दिली याचा अर्थ त्या व्यक्तीला मनापासून हेच वाटत असणार...)

"यू नो सर, धिस कॉलेज ओन्ली फॉर बिग फॅमिली स्टुडंट्स..." (ही व्यक्ती बाकी सगळ्यांशी मराठीत बोलत होती, पण माझ्याशी बोलताना मात्र दर वाक्याला इंग्रजीचा मुडदा का पाडत होती कोण जाणे!) "ओन्ली रिच चिल्ड्रन्स लर्न हियर सर. ऑल आर कमिंग फ्रॉम आऊट ऑफ स्टेट, नो महाराष्ट्रा स्टुडंट. बिकॉज ऑफ टू थिंग, सर. वन इज बिग फी. महाराष्ट्रा स्टुडंट डोण्ट अफॉर्ड धिस बिग फी, सर. ॲन्ड सेकंड इज दॅट दे डोण्ट सूट द कोर्स, सर. धिस मॅनेजमेंट कोर्स, सर. महाराष्ट्रा स्टुडंट ॲन्ड फॅमिली थिंक ट्रॅडिशनल, सर. ट्रॅडिशनल पिपल्स डू आर्ट, सायन्स, कॉमर्स, सर. धिस ऑल रिच पिपल्स फ्रॉम नॉन-महाराष्ट्रा डू मॅनेजमेंट, सर. बट यू नो सर, दे आर ऑल लाईक 'अमीर बाप की बिगडी औलाद'. दे डोण्ट हॅव मनी व्हॅल्यू, सर..." आणखी बरंच काही.

एका फॉर्मल मीटिंगमधे, आपल्याच कॉलेजात बसून ही सिनियर व्यक्ती अशा दिव्य भाषेत आपला कॉलेजबद्दलचा दिव्य दृष्टीकोन मला सांगत होती. आणि अशा कॉलेजमधे आपल्या मुलांना प्रवेश मिळावा म्हणून आई-बाप प्राण पणाला लावतात. (ॲक्चुअली पैसे पणाला लावतात, पण पैसे हाच त्यांचा प्राण असल्यानं...)

मोराल ऑफ द स्टोरी काय, तर कॉलेजमधे ॲडमिशन तिथल्या शिक्षकांचा ॲटिट्यूड बघून नव्हे, तर कॉलेजच्या ब्रॅन्डकडं बघून घेतली जाते. आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यातली महत्त्वाची तीन-चार वर्षं त्यांना अशा निगेटीव्ह माइंडसेटच्या अगाध 'शिक्षकां'सोबत काढावी लागतात. आणि मग हीच मुलं पुढं जाऊन मॅनेजर, शिक्षक, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई-बाप होतात. तुम्ही बाभळीचं रोप लावून गुलाब फुलायची अपेक्षा करु शकत नाही, मग या अशा शाळा-कॉलेजांत मुलांना का पाठवता, याचा विचार केलाय का कधी?


Share/Bookmark

Tuesday, October 27, 2015

मसाला दुधाची आठवण

चिंचवड स्टेशनजवळ रहायला होतो तेव्हाची गोष्ट. चाकणवरुन रात्री दहा वाजता सेकंड शिफ्ट सुटली की अकरा वाजेपर्यंत चिंचवडच्या रुमवर पोचायला हरकत नव्हती. पण कंपनीतनं थेट रुमवर आलो असं फार क्वचित व्हायचं. अरुणची ट्रॅक्स क्रूझर गाडी पिक-अप ड्रॉपसाठी असायची. नाशिक फाट्यावरुन वळण्यासाठी गाडीला दोन ऑप्शन असायचे - एक तर डावीकडं वळून बोपोडीपर्यंत ड्रॉप करुन मग पिंपरी - चिंचवड - निगडी वगैरे, किंवा उजवीकडं वळून पिंपरी - चिंचवड - निगडी वगैरे करुन शेवटी बोपोडी. या दोन्ही ऑप्शनमधे चिंचवड सगळ्यात शेवटी यायचं कारण नव्हतं. पण बोपोडी - पिंपरी - निगडी आणि शेवटी चिंचवड असा अरुणचा स्पेशल रुट होता. कधी कधी तर पिंपरी - निगडी - बोपोडी आणि मग पुन्हा चिंचवड असा द्राविडी प्राणायामसुद्धा करायचा. यामागं एक विशेष कारण होतं - मसाला दूध.

चिंचवडच्या चापेकर चौकात तेव्हा आतासारखा उड्डाणपूल नव्हता. चापेकरांच्या पुतळ्यासमोर मसाला दुधाची एक गाडी लागायची. रात्री खूप उशिरापर्यंत तिथं दूध प्यायला गर्दी असायची. एका मोठ्ठ्या काळ्या कढईत दूध आटवत ठेवलेलं असायचं. ग्लासभर गरम गरम मसाला दूध पिऊन ढेकर दिल्याशिवाय दिवस संपला असं वाटायचंच नाही. त्यामुळं निगडी - बोपोडी दोन्ही टोकांचे ड्रॉप संपवून आम्ही रात्री उशिरा मसाला दूध प्यायला खास चिंचवडला यायचो. कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध पिण्याचं अप्रूप मात्र आमच्या या नेहमीच्या दुग्धप्राशनामुळं पूर्ण संपलं होतं. (नेहमीच्या म्हणजे नक्की कधी ते पुढं सांगेन. सात्विक विचाराच्या वाचकांनी इथपर्यंतच वाचावं, ही नम्र विनंती!)

तर आम्ही नेहमी मसाला दूध प्यायला चिंचवडच्या चापेकर चौकात जायचो. नेहमी म्हणजे ज्या दिवशी दारु प्यायला गेलो नाही त्या दिवशी! ते उलट-सुलट रुट मारुन शेवटी चिंचवडला येण्यामागचं खरं मोटीव्हेशन होतं - कामिनी बार. हा रात्री उशिरापर्यंत चालू असायचा. उशिरा म्हणजे खरंच रात्री बारा-साडेबारा-एक वगैरे, मसाला दुधाच्या गाडीपेक्षासुद्धा उशिरा. इथं आम्ही फक्त प्यायचो आणि बोलायचो. बाकी डायव्हर्जन कसलंच नाही. कारण इथं स्टार्टर-मेनकोर्स-डेझर्ट वगैरेसारखे डिस्टर्बन्स नव्हते. हा प्युअर बार होता. शेजारी त्यांचंच प्युअर व्हेज फ्यामिली गार्डन रेस्टॉरंट होतं. खाणारे सगळे तिकडं. इथं डाळ-शेंगदाणे सोडले तर बाकी फक्त बीयरचा महापूर. तेव्हा अजून ब्रँड वगैरे ठरायचा होता. कधी कॅनॉन, कधी किंगफिशर, कधी झिंगारो, कधी खजुराहो... कधी कधी तर सुरुवातीपासून शेवटापर्यंत तीन-चार ब्रँड बदललेले असायचे, कळत-नकळत.

काही विशेष कारण नव्हतं रोज प्यायचं. कसलं दुःख आहे, टेन्शन आहे, स्ट्रेस आहे, असा कुठलाच बहाणा नाही. स्वच्छ मनानं, आत्ता प्यावीशी वाटते म्हणून, प्यायचो. आणि बोलायचो खूप. तेव्हा जग फार बघून झालं नव्हतं. फार मोठं अनुभवांचं गाठोडंही पाठीशी नव्हतं (आताही आहे असं काही म्हणणं नाही). पण बोलायला आणि ऐकायला खूप आवडायचं (जे आताही आवडतं). मग त्यासाठी ही आयडीयल जागा होती.

'चश्मेबद्दूर' पिक्चरमधे फारुख शेख आणि दिप्ती नवल एका गार्डनमधल्या ओपन रेस्टॉरंटमधे बसलेले असतात. (हे खरंखुरं गार्डनमधलं रेस्टॉरंट असतं, टेबलाभोवती कुंड्या ठेवलेलं पहिल्या मजल्यावरचं गार्डन रेस्टॉरंट नाही.) ऑर्डर घ्यायला आलेल्या वेटरला ते विचारतात, "यहां अच्छा क्या है?" वेटर शांतपणे उत्तर देतो, "जी यहां का माहौल बहुत अच्छा है!"

तर अशा माहौलसाठी जवळपास रोज जाऊन बसायचो. खूप बोलायचो, ऐकायचो, प्यायचो, मझा होती. (टीपः मजा वेगळी, मज्जा वेगळी, आणि मझा वेगळी. ह्यांतला फरक सांगून कळत नाही, अनुभवावा लागतो.) नंतर रहायच्या जागा बदलत गेल्या, 'बसायच्या' जागाही बदलत गेल्या, पार्टनर बदलत गेले, विषय बदलत गेले, पण संवादाची आवड मात्र तेवढीच राहिली, किंबहुना वाढत गेली.

कोजागिरी आली की लोक मसाला दुधावर बोलतात. आमच्या दुधाच्या आठवणीदेखील शेवटी दारुवर जाऊन थांबतात...

स्थितप्रज्ञ आम्ही, अम्हाला नसावी
प्रतिक्षा गटारी नि कोजागिरीची
दवा द्या की दारु, सुखानेच मारु
मझा त्याची तुम्हा न कळायाची


Share/Bookmark

Sunday, October 25, 2015

केतकी गुलाब जूही...

शंकर-जयकिशनपैकी शंकर हे मन्ना डे यांचे मोठे चाहते होते. मुकेशना राज कपूर यांचा आवाज मानला जाण्याच्या काळात शंकर-जयकिशननी राज कपूरची 'आ जा सनम मधुर चाँदनी में हम...' आणि 'ये रात भीगी भीगी, ये मस्त फिजाएँ...' अशी गाणी मन्ना डे यांच्याकडून गाऊन घेतली. १९५६ सालच्या 'बसंत बहार'मधे मोहम्मद रफी, लता मंगेशकर, आशा भोसले यांच्याबरोबर मन्ना डे यांनाही एसजेंनी गाणी दिली. एकूण नऊ-दहा गाण्यांच्या जागा होत्या. एका गाण्यासाठी शंकरनी मन्नादांना बोलावून घेतलं आणि सांगितलं, "या सिनेमात तुम्हाला एक ड्युएट गायचं आहे."

मन्नादा म्हणाले, "अरे वा! कुणाबरोबर? लता, आशा...?"

शंकर म्हणाले, "नाही नाही, हे जरा वेगळ्या पद्धतीचं क्लासिकल ड्युएट आहे. सिनेमातल्या एका कॉम्पिटीशनसाठीचं हे गाणं आहे. तुम्ही हिरोसाठी गाणार आहात आणि हिरो कॉम्पिटीशन जिंकणार आहे."

"बरं, समोर कोण गाणार आहे?" मन्नादांनी विचारलं.

शंकर उत्तरले, "भीमसेन जोशी."

मन्नादा तिथून चक्क पळून गेले. घरी गेल्यावर बायकोला म्हणाले,

"शंकर पागल झालेत. माझं आणि भीमसेन जोशींचं ड्युएट रेकॉर्ड करायचं म्हणतायत."

"मग करा की..." बायको म्हणाली.

"करा की काय? हे कॉम्पिटीशनचं गाणं आहे. कॉम्पिटीशन हिरो जिंकणार आहे आणि शंकर म्हणतायत की या क्लासिकल ड्युएटमधे मी हिरोसाठी गायचं आणि भीमसेन जोशींना हरवायचं! मला नाही जमणार बुवा..."

मन्नादांच्या बायकोनं त्यांची समजूत काढली, "हे बघा, गाण्याची सिच्युएशन आधीपासून तयार आहे. हिरोनं जिंकायचं असेल तर शंकर-जयकिशन तशाच पद्धतीनं गाणं बांधतील ना. शिवाय भीमसेनजी खूप मोठे कलाकार आहेत. ते सिच्युएशन समजून घेऊन थोडं कमी गातील, तुम्ही थोडी मेहनत करुन जास्त गा, म्हणजे होऊन जाईल..."

होय-नाही करत शेवटी मन्नादा तयार झाले आणि 'केतकी गुलाब जूही चम्पकबन फूले' हे गाणं रेकॉर्ड झालं. मन्नादा व्हर्सटाईल सिंगर असले तरी त्यांनी शास्त्रीय संगीताचं कसलंही फॉर्मल ट्रेनिंग घेतलं नव्हतं. 'केतकी गुलाब जूही'च्या रेकॉर्डिंगनंतर भीमसेन जोशी मन्नादांना म्हणाले, "तुम्ही क्लासिकल गात जा, चांगले गाता!" पण क्लासिकलसाठी करावा लागणार रियाज आणि मेहनत मन्नादांना अवघड वाटत असल्यानं ते फारसे त्या प्रकाराकडं वळले नाहीत.

पुढं एकदा एका मुलाखतीत मन्नादा म्हणाले होते, "ही फिल्म इंडस्ट्री फारच अजब चीज आहे. इथं मला किशोरकडून 'इक चतुर नार' (पडोसन) गाण्यात हरावं लागलं आणि इथंच भीमसेनजींना 'केतकी गुलाब जूही'मधे माझ्यासारख्याकडून हरावं लागलं..."


Share/Bookmark

Saturday, October 24, 2015

तिच्याविना...

का भास तिचा होई मना, रोज रोज पुन्हा पुन्हा
अडखळतो - सावरतो, रोज रोज पुन्हा पुन्हा

ना पटले जरी सत्य हे, सांगितले मी तिला
हा श्वास चाले बघुनी तुला, रोज रोज पुन्हा पुन्हा

ती येऊनी प्रत्यक्ष कधी जागविते चेतना
अन्‌ त्रास देती आठवणी मग रोज रोज पुन्हा पुन्हा

ती असता जग सुंदर, ती नसता भेसूर का
जग बदलते हे असे कसे, रोज रोज पुन्हा पुन्हा

हे जगणे ना संभव अता, तिच्याविना तिच्याविना
हे झुरणे घेई प्राण अता, रोज रोज पुन्हा पुन्हा

- अक्षर्मन


Share/Bookmark

Saturday, September 26, 2015

पाळी मिळी गुपचिळी - डॉ. शंतनू अभ्यंकर यांचा लेख

मॅन्युफॅक्चरींग आणि आयटी इंडस्ट्रीत काम करताना या विषयावर सार्वजनिक चर्चेचे प्रसंग फारसे यायचे नाहीत. शैक्षणिक क्षेत्रातदेखील हा प्रश्न कधी जाणवला नाही. पुरुषप्रधान (की पुरुषकेंद्रीत?) समाजव्यवस्थेतल्या पुरुष मित्रांच्या गप्पांमधे "अरेरे, आता चार दिवस उपवास!" एवढाच काय तो या गोष्टीचा उल्लेख. मुली-बायका आपापसांत तरी या विषयावर बोलतात की नाही याबद्दलच शंका, मग मित्र-मैत्रिणींमधे यावर चर्चा कुठून होणार... खाद्यपदार्थांच्या उद्योगात आल्यावर मात्र अनपेक्षितपणे या प्रश्नाला तोंड द्यावं लागलं. आपलं प्रॉडक्ट भारी असलं पाहिजे, प्रॉडक्टबद्दल आपल्याला बोलता आलं पाहिजे, म्हणजे झालं असं आधी वाटायचं. पण अगदी सुरुवातीलाच एका कस्टमरनं गुगली टाकलेली आठवते. "तुमच्याकडून घेतलेले पदार्थ आम्ही नैवेद्याला ठेवणार आहोत, त्यामुळं त्यादिवशी बनवणा-या बाईचा 'प्रॉब्लेम' नसावा एवढं बघा," असं एका कस्टमर बाईंनी फोनवर सांगितलं. यावर काय उत्तर द्यावं हेच सुचेना. लहानपणापासून ऐकलेल्या - वाचलेल्या महात्मा फुले, राजा राम मोहन रॉय, र. धों. कर्वे यांच्या गोष्टी आठवल्या. शिक्षण, टेक्नॉलॉजी, पैसा या गोष्टींनी पुढारलेल्या आपल्या प्रगत समाजाची दांभिकता लख्खपणे समोर आली. आपल्याला शाळेत, पुस्तकांतून दिले जाणारे पुरोगामित्वाचे धडे खोटे आहेत, प्रत्यक्षात आपण एका दुतोंडी समाजाचा भाग आहोत, याची लाज वाटली. आता या प्रसंगानंतर बराच काळ लोटलाय. हळूहळू अशी भरपूर सत्यं नागवी होत गेली. प्रत्येक वेळी त्यांना टाळणं शक्य नव्हतं, प्रत्येक वेळी भांडणंदेखील शक्य नव्हतं. आता असे प्रश्न अनपेक्षित नाही वाटत. (होय, आजही काही कस्टमर अशा गोष्टींची 'काळजी घ्यायला' सांगतात. आणि असं सांगणा-यांमधे सत्तरीतल्या आजीबाईंपासून तिशीतल्या वहिनीसाहेबही आहेत, आणि ही 'उदात्त परंपरा' जपणा-यांमधे धुणीभांडी करणा-या बायकांपासून सीएफओ-सीईओ लेव्हलच्या मॅडमदेखील आहेत. पुरुषांचं या विषयातलं ज्ञान आणि इंटरेस्ट तर अजूनच अगाध...) आता यावर न चिडता बोलणंही जमू लागलंय. पण अजूनही अशी माणसं - पुरुष आणि बायका - बघून उद्विग्नता येतेच... हे सगळं आज आठवण्याचं कारण म्हणजे डॉ. शंतनू अभ्यंकर यांचा 'पाळी मिळी गुपचिळी' हा लेख. मासिक पाळीविषयी आणि त्याभोवतीच्या प्रथा, समज-गैरसमजांविषयी सर्व स्त्री-पुरुषांनी मुळातूनच वाचावा आणि विचार करावा असा हा लेख -

"पाळी मिळी गुपचिळी"

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. जि. सातारा. पिन ४१२ ८०३ मो.क्र.९८२२०१०३४९

नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे पेशंटची रांग ओसरल्यावर सिस्टरांनी एकामागून एक एम.आर. (औषध कंपनीचे प्रतिनिधी) आत सोडायला सुरवात केली. दुपार टळायला आली होती आणि जांभया दाबत, मोबाईलवर, फेसबुकवर, अपडेट्स टाकत आणि त्याचवेळी नेटवर कोणतातरी संदर्भ शोधत मी त्यांचे बोलणे या कानानी ऐकत होतो आणि त्या कानानी सोडून देत होतो. फार गांभीर्याने ऐकावं असं त्या पोपटपंचीत नसतंच काही. पण इतक्यात एका वाक्याने माझे लक्ष वेधले गेले. तो म्हणाला, “आता सणाचे दिवस जवळ आले डॉक्टर, आता खूप बायका पाळी पुढे जाण्यासाठी गोळ्या घ्यायला येतील. तेव्हा लक्षात असू दया आमच्याच कंपनीच्या गोळ्या दया. प्लीज सर!! सणासुदीच्या दिवसांमुळे कंपनीने टार्गेट वाढवून दिले आहे; आणि तुम्ही मनावर घेतल्या शिवाय ते मला गाठता येणार नाही.” एवढं बोलून गोळ्यांचं एक नमुना पाकीट माझ्या टेबलावर ठेवत तो निघाला सुद्धा. माझा अहं कुरवाळून आपला काम सफाईदारपणे करून तो निघून गेला. मी मात्र अचंबित झालो.

एका लहानश्या गावातल्या एका लहानश्या डॉक्टरपर्यंत आवर्जून आर्जवं करणे कंपनीला सहजपणे परवडत होतं, म्हणजे हे पाळी पुढे ढकलण्याचे मार्केट किती प्रचंड लाभदायी आहे बघा! औषध कंपन्या आपला माल खपवण्यासाठी कोणत्याही थराला जातात हे माहीत होतं, पण त्या हे ही टोक गाठतील असं माझ्या ध्यानीमनीही आलं नव्हतं. पाळी या प्रकाराबद्दल भारतीय समाजमनाची नस बरोब्बर हेरून योग्य वेळी त्यांनी आपला माल पुढे केला होता. मला कौतुकच वाटलं त्या कंपनीचं.

खरं तर ही मागणी नेहेमिचीच, पूजा, सत्यनारायण, तीर्थयात्रा, उत्सव, सण वगैरे निमित्ताने केली जाणारी. क्वचित प्रवास, परीक्षा वगैरे कारणेही असतात, पण ती अपवादानेच. किती साधी सोपी रुटीन गोष्ट होती ही. बायकांनी यायचं, पाळी पुढे जायच्या गोळ्या मागायच्या आणि चार जुजबी प्रश्न विचारून आम्ही त्या द्यायच्या. माझी चिठ्ठीही नेहेमीचीच. मुकाटपणे दिली जाणारी. पण मनातल्या मनात मी वैतागतो, चरफडतो. म्हणतो, ‘काय मूर्ख बायका आहेत या! शुद्धाशुद्धतेच्या कुठल्या मध्ययुगीन कल्पना उराशी बाळगून आहेत.’

वेळ असला की माझ्यातला कर्ता सुधारक बोलता होतो. एरवी मागताक्षणी चिठ्ठी लिहून देणारा मी, समोरच्या स्त्रीला प्रश्न विचारतो, ‘काय शिक्षण झाले आहे तुमचे?’

‘क्ष’

क्ष ची  किंमत अशिक्षित पासून डॉक्टरेट पर्यंत काहीही असू शकते.

‘आलीच जर पाळी,  तर तुम्ही समारंभात सहभागी होऊ नये हे तुम्हाला पटतंय का?’

‘...आता घरचंच कार्य म्हटल्यावर...’,‘...आमच्या घरी नाही चालत...’,‘...आमचं काही नाही पण सासुबाईंचं फार असते...’, ‘आमच्या घरी सगळंच पाळलं जाते...’; असं काहीतरी उत्तर येते. क्ष ची किंमत काहीही असो.

‘नाही, मला हे पटत नाही, हे मला मनाविरुद्ध करावे लागतंय!’, असं उत्तर वीस वर्षात एकदाही ऐकलं नाही.

पाळी आलेल्या स्त्रीला अस्वच्छ अपवित्र समजणे याची पाळेमुळे पार खोलवर रुजलेली आहेत. स्त्रियांच्या बाबतीत घडणाऱ्या, निसर्गनेमाने घडणाऱ्या, एका अत्यंत शारीर कार्याला धर्मिक, वैयक्तिक, कौटुंबिक आणि आर्थिक धुमारे फुटले आहेत. कुठून येतात या कल्पना? अगदी लहानपणापासून मनात कोरल्या जातात त्या. आई, मोठ्या बहिणी, शेजारी पाजारी सगळीकडे असतात त्या. आपण फक्त मनानं स्पंज सारख्या त्या टिपून घ्यायच्या.

शाळेत कधी कधी जायचा प्रसंग येतो. मुला-मुलींसमोर ‘वयात येताना’ या विषयावर बोलायला. सगळ्या मुली पाळीला सर्रास ‘प्रॉब्लेम’ असा शब्द वापरतात. प्रॉब्लेम आला/ गेला/ येणार वगैरे. मी गमतीने म्हणतो, ‘अहो पाळी ठरल्यावेळी न येणं, हा खरा प्रॉब्लेम! पाळी येणं हा प्रॉब्लेम कसा?’ मुलींना मी सांगतो, प्रॉब्लेम शब्द वापरू नका. पाळी आली असं म्हणा. मराठीत बोलणे फारच गावठी वाटत असेल तर एम.सी. म्हणा, मेंन्सेस म्हणा; आणखी इंग्रजी फाडायचं असेल तर चम म्हणा; पण प्रॉब्लेम म्हणू नका. प्रॉब्लेम म्हटल्यावर एका अत्यावश्यक नैसर्गिक शरीरक्रीयेविषयी मनात नकारात्मक भावना नाही का निर्माण होतं? पण हा प्रश्न गैरलागूच म्हणायचा. प्रॉब्लेममुळे नकारात्मक भावना नसून; मुळातल्या नकारात्मक भावनेपोटी हा शब्द वापरला जातो. काहीही असो पण हा शब्द वापरू नये असं मला वाटतं. यामुळे मुळातली नकारात्मकता आणखी गडद होते. त्यावर लोकमान्यतेच्या पसंतीची मोहोर उमटते.

ह्या मुळातल्या गैरसमजाचे पडसाद इतरही सर्वमान्य शब्दांमध्ये दिसतात. काही कारणाने पाळीचा त्रास झाला तर पिशवी धुतात/साफ करतात. याचा वैद्यकीय अर्थ पिशवीच्या आतलं अस्तर खरवडून काढून टाकतात. हेतू हा की रक्तस्त्राव थांबावा, तपासणीसाठी अस्तराचा तुकडा मिळावा आणि नव्याने तयार होणारे अस्तर एकसाथ, एकसमान तयार व्हावे. पण हे सारे व्यक्त करणारा शब्दच नाहीये. क्युरेटींग हा इंग्रजी शब्द रूढ आहे पण त्यामागचा हा भाव कुणालाच कळत नाही. सर्रास पिशवी धुणे /साफ करणे वगैरे चालू असतं.

एकदा पाळी हा प्रॉब्लेम ठरला की पुढे सगळे ओघानेच येतं. पाळी म्हणजे शरीरात महीनाभर साठलेली घाण बाहेर टाकण्याची एक क्रिया, हे ही मग पटकन पटते. समाजानी पाळी आणि अपावित्र्याचा संबंध जोडला आहे, यात काही आश्चर्य नाही. मलमूत्राच्या वाटेशेजारीच पाळीची वाट आहे. मलमूत्रविसर्जन ही तर निश्चितच उत्सर्जक क्रिया आहे. चक्क शरीरातील घाण वेळोवेळी बाहेर टाकणारी क्रिया. अज्ञानापोटी समाजाने पाळीलाही तेच लेबल लावलं. खरंतर शरीरातील पेशी सातत्याने मरत असतात आणि नव्याने तयार होत असतात. आपली त्वचा झडते, पुन्हा येते, केस झडतात पुन्हा येतात, लाल पेशींचे आयुष्य १२० दिवसांचे असतं; तसंच काहीसं हे आहे. गर्भपिशवीचे अस्तर ठराविक काळ गर्भधारणेला आधार ठरू शकते. मग ते निरुपयोगी ठरतं. बाहेर टाकलं जातं, पाळी येते. पुन्हा नव्यानं अस्तर तयार होतं. (मासिक चक्रं). मुद्दा एव्हढाच की मासिक पाळी ही उत्सर्जक क्रिया नाही. पण कित्येक स्त्रियांना आणि पुरुषांना असं वाटतं की महिनाभराची सगळी घाण गर्भपिशवीत साठते आणि ती महिनाअखेरीस बाहेर टाकली जाते.

अशा बायकांसाठी वेगळी झोपडी, वेगळी जागा, वेगळं अन्न चार दिवस बाहेर बसणं, पूजाअर्चा, देवळात जाणं बंद, पाचव्या दिवशी  अंघोळ करणं, पाळीच्या वेळी धार्मिक कार्यात सहभागी न होणं या सगळ्या रूढी आणि परंपरा याचाच परीपाक आहेत. जात कोणतीही असो, धर्म कोणताही असो याबाबतीत सर्व धर्म भलतेच समान आहेत. 

पाळीच्या या चार दिवस विश्रांतीचं समर्थन करणारीही जनता आहे. ‘तेवढंच त्या बाईला जरा सूख, जराशी विश्रांती...’ वगैरे. म्हणजे एरवी श्वास घ्यायलाही फुरसत नाही एवढा कामाचा रामरगाडा! अपावित्र्यातून निपजलेली ही विश्रांती; आदरभावातून, ऋणभावनेने मिळालेली नाही ही. घराला विटाळ होऊ नये म्हणून ही बाकी घरानी केलेली तडजोड आहे. त्या बाईप्रती आदर, तिच्या कामाप्रती कृतज्ञता, तिच्या घरातील सहभागाचा सन्मान कुठे आहे इथे? नकोच असली विश्रांती. हे बक्षीस नाही, बक्षिसी आहे ही! उपकार केल्यासारखी दिलेली ही बक्षिसी बाईनी नाकारायला हवी.

का होतं, कसं होत वगैरे काहीही जीवशास्त्र माहीत नसताना पाळी हा प्रकार भलताच गोंधळात टाकणारा होता, आदिमानवाला आणि त्याच्या टोळीतल्या स्त्रियांना. महिन्याच्या महिन्याला रक्तस्त्राव होतो, चांद्रमासाप्रमाणेच की हे, निश्चितच दैवी अतिमानवी योजना ही. जखम-बिखम काही नाही, वयात आल्यावर स्त्राव होतो, म्हातारपणी थांबतो, गरोदरपणी थांबतो...! किती प्रश्न, किती गूढ, किती कोडी. पण म्हणून आजही आपण आदिमानवाचीच री ओढायची म्हणजे जरा जास्तच होतंय!

पाळी येण्यामागचं विज्ञान समजलं, पाळीवर परिणाम करणाऱ्या गोळ्याही निघाल्या. पण आपण याचा उपयोग सजगपणे करणार नाही. आपण या गोळ्या आपल्या शरीराबद्दलच्या, पाळीच्या अपावित्र्याच्या पारंपारिक कल्पना दृढ करण्यासाठी वापरणार! वा रे आपली प्रगती! वा रे आपली वैज्ञानिक दृष्टी!

पण समाजानं जरी अपावित्र्य चिकटंवलं असलं तरी ते तसंच चालू ठेवलं पाहिजे असं थोडंच आहे? निसर्गधर्मानुसार आलेली पाळी चालत नाही आणि औषध घेऊन पुढे गेलेली चालते, हे ठरवलं कोणी? ही बंधनं विचारपूर्वक नाकारायला नकोत? ‘देहीचा विटाळ देहीच जन्मला; सोवळा तो झाला कवण धर्म? विटाळा वाचून उत्पतीचे स्थान, कोण देह निर्माण, नाही जगी’ असं संत सोयराबाईनी विचारलं आहे.

हे असलं काही बोललं की प्रतिपक्षाची दोन उत्तरं असतात. एक, पुरुषप्रधानतेमुळे बायकांचे मेंदू पुरुषांच्याच ताब्यात असतात; आणि दुसरं समजा घेतल्या गोळ्या आणि ढकलली पाळी पुढे तर बिघडलं कुठं?

पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं की ही समाजरचना अमान्य करण्याचे पहिलं पाऊल म्हणून या गोष्टीकडे बघा. गोष्ट साधीशीच आहे. ठामपणे सांगीतल तर पटणारी आहे. स्वतःला पटली असेल तर ठामपणे सांगता येतेच पण मुळात स्वतःचीच भूमिका गुळमुळीत असेल तर प्रश्नच मिटला.

‘घेतल्या गोळ्या तर बिघडतं काय?’ या प्रश्नाचं उत्तर असं की, म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो! आई करते म्हणून थोरली  करते आणि ताई करते म्हणून धाकटी! डोकं चालवायचंच नाही असं नकळत आणि आपोआप होत जातं

हे सारं कुठेतरी थांबायला हवं. स्वताःच्या आणि परस्परांच्या शरीराकडे निरामय दृष्टीने स्त्री-पुरुषांना पहाता यायला हवं. कुणीतरी कुठूनतरी सुरुवात करायला हवी.

डॉ. शंतनू अभ्यंकर

वाई, जि. सातारा. पिन ४१२ ८०३.
मो.क्र.९८२२०१०३४९

(मूळ लेख - http://shantanuabhyankar.blogspot.in/2015/09/blog-post_2.html)


Share/Bookmark

Monday, September 21, 2015

जाणीव

आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लाखो रुपये खर्चून त्यांना शिक्षण देणा-या पालकांनी, विशेषतः मातांनी सर्व मुलांना लहानपणापासूनच स्वयंपाकघरातल्या कामाचीही सवय लावावी. यामुळे मोठेपणी ही 'पुरुष' मंडळी स्वावलंबी तर होतीलच, पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातल्या बायकांकडून आयत्या जेवणाची अपेक्षा करताना त्यामागच्या कष्टांची त्यांना किमान जाणीव तरी राहील.


Share/Bookmark

Wednesday, September 9, 2015

इंग्रजीचा उदो उदो...

आम्हाला इंग्रजी शिकवणारे सर म्हणायचे, "इंग्रजी बोलता आली नाही तरी चालेल पण इंग्रजी पूर्ण कळाली पाहिजे." त्यांचं म्हणणं असं होतं की, इंग्रजी शिकायला सुरु करतानाच जर इंग्रजी बोलण्यावर, म्हणजे स्पोकन इंग्लिशवर भर दिला तर भाषेच्या नियमांकडं हमखास दुर्लक्ष होतं. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीशी इंग्रजीतून बोलण्याचा प्रयत्न करता, तेव्हा समोरची व्यक्तीदेखील तुमचं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. या प्रक्रियेमधे इंग्रजीचं व्याकरण, शब्दप्रयोग, वगैरे गोष्टींपेक्षा संदर्भासहीत मुद्द्यांकडं जास्त लक्ष दिलं जातं. एकदा का तुम्ही चुकीचे शब्दप्रयोग किंवा चुकीची वाक्यरचना करुनही तुमचं म्हणणं समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचवू शकलात, की तुम्ही त्याच चुका नेहमी-नेहमी करत राहता. अशा पद्धतीनं एक भाषा म्हणून तुम्ही इंग्रजीवर प्रभुत्व मिळवू शकत नाही, फक्त कामचलाऊ इंग्रजी बोलू व समजू शकता, जी आपल्या आजूबाजूला सर्रास आढळून येते.

आमचे सर असंही म्हणायचे, "इंग्रजी बोलण्याची तुम्हाला इतकी गडबड का? आधी ती भाषा नीट शिकून तर घ्या. इंग्रजी बोलता आलं नाही म्हणून तुमचं काम अडेल अशी परिस्थिती आपल्या देशात तरी यायची शक्यता नाही. इथं तुम्ही मातृभाषेत किंवा हिंदीत संवाद साधू शकता. अगदी परदेशातच जायचं असेल तर इंग्रजीशिवाय अडण्याची शक्यता मान्य. पण एका मराठी माणसानं दुसर्‍या मराठी माणसाशी मोडक्या-तोडक्या इंग्रजीत संवाद साधणं, यातून ना संवाद घडतो ना भाषेचं ज्ञान मिळतं."

माझा इंग्रजी शिकण्याला किंवा वापरण्याला अजिबात विरोध नाही. पण इंग्रजी भाषा म्हणून न शिकता तिला थेट मातृभाषा बनवण्याच्या प्रयत्नात आपण आपल्या स्वतःचं आणि पुढच्या पिढीचं फार मोठं नुकसान करतोय, असं मला वाटतं. अजूनही आपल्या आजूबाजूला, समाजात वावरताना अथवा कोणत्याही इंडस्ट्रीत काम करताना, इंग्रजीचं महत्त्व 'सादरीकरणाची भाषा' अर्थात 'प्रेझेंटेशन लँग्वेज' म्हणूनच असल्याचं दिसून येतं. या प्रेझेंटेशनसाठी संबंधित विषयाचं ज्ञान, अभ्यास, अनुभव, कल्पनाशक्ती, इत्यादी गोष्टी भाषेपेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत. मात्र या गोष्टी मांडण्यासाठी जी इंग्रजी भाषा वापरायची, तिच्या दडपणाखाली या मुलभूत गोष्टींकडंच दुर्लक्ष केलं जाताना दिसतं. तुमच्यापैकी बर्‍याच जणांनी हा अनुभव घेतला असेल - एखादा तांत्रिक मुद्दा मांडताना किंवा तुमच्या कामाबद्दल चर्चा करताना तुम्ही व्यवस्थित इंग्रजी बोलू शकता. पण हवा-पाण्याच्या गप्पा मारताना मात्र तुम्हाला ना इंग्रजी शब्द आठवतात, ना एक पूर्ण वाक्य इंग्रजीतून बोलता येतं. याच गोष्टीची भीती किंवा लाज वाटून अनेक जण इंग्रजीचं दडपण घेतात. पण असं का होतं, यामागचं कारण शोधण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे?

कोणतीही भाषा शिकण्यातला पहिला टप्पा असतो ऐकण्याचा. लहान मुलांच्या कानावर जी आणि जशी भाषा पडते, तसेच भाषिक संस्कार त्यांच्यावर होतात. तुम्ही 'चांगली' इंग्रजी भाषा ऐकलीच नाहीत, तर तुम्हाला चांगली इंग्रजी बोलता कशी येणार? आपण इंग्रजीच्या नावाखाली जे काही आजूबाजूला ऐकतोय, त्याला भाषा तरी म्हणावं का? हा ऐकण्याचा टप्पा तर आपण सोडूनच देतो आणि मुलांना थेट ए-बी-सी-डी गिरवायला शिकवतो. मुलं या 'ए-बी-सी-डी'चा अर्थ आणि संदर्भ आपापल्या मातृभाषेत शोधण्याचा प्रयत्न करतात, जो त्यांना कधीही सापडत नाही. आणि जी भाषा त्यांना अजून आपली वाटतच नाही, त्या भाषेत त्यांनी बोलावं अशी अपेक्षा त्यांच्याकडून केली जाते. इथूनच इंग्रजीचं दडपण यायला सुरुवात होते. मग काही जण चुकीचं इंग्रजी रेटायचा प्रयत्न करतात आणि त्यात यशस्वी झाले की आयुष्यभर चुकीचीच भाषा रेटत राहतात. राहिलेले, कायम इंग्रजीची भीती आणि न्यूनगंड मनात घेऊन या भाषेला टाळायचा प्रयत्न करत राहतात. इंग्रजी बोलायची वेळ आली की हे रस्ता बदलून दुसरीकडंच जातात आणि समोर आलेली संधी हकनाक गमावून बसतात.

ही परिस्थिती बदलायची असेल तर आपण इंग्रजीकडं वेगळ्या दृष्टीनं बघितलं पाहिजे. इंग्रजी ही एक भाषा म्हणून शिकली आणि शिकवली गेली पाहिजे. पहिल्या दिवसापासून इंग्रजीतून बोलण्याची गडबड न करता, टप्प्याटप्प्यानं मुळाक्षरं, शब्दार्थ, वाक्यरचना, अलंकार शिकत गेलं पाहिजे. त्याच बरोबरीनं 'चांगली' इंग्रजी कानावर पडण्याची सोयदेखील केली पाहिजे. आणि एकदा या भाषेवर प्रभुत्व आलं की, यू कॅन टॉक इंग्लिश, यू कॅन वॉक इंग्लिश, यू कॅन लाफ इंग्लिश, यू कॅन रन इंग्लिश, बिकॉज इंग्लिश इज सच अ फन्नी लँग्वेज!


Share/Bookmark

Monday, September 7, 2015

...पण काळ सोकावता कामा नये!

पुण्यातल्या सातारा रोडवरच्या डी-मार्टमधे काहीतरी खरेदी करायला गेलो होतो. रविवार असल्यामुळं डी-मार्टला सकाळी-सकाळीच नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्याचं स्वरुप आलं होतं. मला पाहिजे असणारी वस्तू पटकन घेऊन सर्वांत छोटी रांग असलेल्या काउंटरवर आलो. बिल केलं. रक्कम होती ३०९. काउंटरवरच्या मुलीला पाचशेची नोट आणि वर दहा रुपये सुट्टे दिले. सुट्टे २०१ परत मिळणं अपेक्षित असताना, अगदी सिन्सियरली त्या मुलीनं शंभराच्या दोन नोटा आणि एक चॉकलेट दिलं.

सुट्ट्या पैशांच्या ऐवजी चॉकलेट मिळण्याची ही काही पहिलीच वेळ किंवा पहिलंच ठिकाण नव्हे. मला चॉकलेट खायला आवडत नाही, असंही नाही. पण म्हणतात ना - म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये!

डी-मार्टच्या वीसही काउंटर्सवर बिलिंगसाठी रांगा वाढत असल्यानं, काउंटरवरच्या मुलींना डिस्टर्ब करण्याऐवजी एक्झिट गेटजवळ बसलेल्या डी-मार्टच्या दुसर्‍या स्टाफ मेंबरकडं गेलो.

मीः नमस्कार, मला तुमच्या बिलिंग पद्धतीबद्दल तक्रार द्यायची आहे. कुणाशी बोलावं लागेल?
डी-मार्ट स्टाफः बोला काय तक्रार आहे?
मीः तुमच्या सगळ्या बिलिंग काउंटर्सवर एक-दोन रुपये सुट्टे देण्याऐवजी सर्रास चॉकलेट दिले जातात.
डी-मार्ट स्टाफः नाही सर, एखाद्या वेळी असं झालं असेल, पण नेहमी नाही होत...
मीः मला स्वतःला आत्ता एक रुपयाऐवजी चॉकलेट मिळालं आहे.
डी-मार्ट स्टाफः कदाचित त्या काउंटरवरची चिल्लर संपली असेल...
मीः काय सांगताय? अजून तुमचं स्टोअर उघडून दोन ताससुद्धा झाले नाहीत आणि काउंटरवरची चिल्लर संपली?
डी-मार्ट स्टाफः होऊ शकतं सर, आज रविवार आहे ना...
मीः पण ही फक्त आजची गोष्ट नाही. मी आजतागायत जितक्या वेळेला डी-मार्टमधे खरेदी केलीय, तितक्या वेळेला मला एक-दोन रुपयांऐवजी चॉकलेटच देण्यात आलेत.
डी-मार्ट स्टाफः नेहमी-नेहमी असं नाही होणार सर. आजच कदाचित झालं असेल. मार्केटमधे सुट्ट्या पैशांचं शॉर्टेजच आहे...
मीः म्हणजे डी-मार्टला मार्केटमधून सुट्टे पैसे मिळत नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे का?
डी-मार्ट स्टाफः तसं नाही, पण कधीतरी सुट्टे पैसे संपल्यावर काउंटरवरुन चॉकलेट दिले जातात.
मीः कधीतरीच द्यायचे असतील तर ते चॉकलेट कुठं ठेवले पाहिजेत? काउंटरशेजारी एखाद्या डब्यात की थेट कॅशबॉक्समधे?
डी-मार्ट स्टाफः कॅशबॉक्समधे चॉकलेट नसतात सर...
मीः चला, तुमच्या वीस काउंटरपैकी कुठल्याही काउंटरवरचा कॅशबॉक्स उघडून बघा आणि मग मला सांगा कधीतरी द्यायचे चॉकलेट कॅशबॉक्समधे का ठेवलेत?
डी-मार्ट स्टाफः तसं नाही सर... आम्ही ठेवतो थोडे चॉकलेट कॅशबॉक्समधे, पण कस्टमरला विचारतो - 'सुट्टे पैसे हवेत की चॉकलेट?' आणि मगच चॉकलेट देतो.
मीः अच्छा? चला, तुमच्या वीसपैकी कुठल्याही एका काउंटरवर मला दाखवा, एका तरी कस्टमरला हा प्रश्न विचारला जातोय का? मला स्वतःला तर कधीही हा प्रश्न विचारण्यात आलेला नाही.
डी-मार्ट स्टाफः तुम्ही कुठल्या काउंटरवर बिल केलंत सर? मी त्या काउंटरवरच्या एक्झिक्युटीव्हशी बोलून तुमचे सुट्टे पैसे परत करायला लावतो...
मीः प्रश्न माझ्या एकट्याच्या किंवा आजच्या सुट्ट्या पैशांचा नाही. प्रॉब्लेम तुमच्या काउंटरवरच्या एक्झिक्युटीव्हचा सुद्धा नाही. प्रॉब्लेम तुमच्या सिस्टीमचा आणि ट्रेनिंगचा आहे. सुट्ट्या पैशांऐवजी कस्टमरला सर्रास चॉकलेट दिलं जाणं, ही तुमची प्रोसिजर झालीय. माझं ऑब्जेक्शन ह्या प्रोसिजरवर आहे.
डी-मार्ट स्टाफः मान्य आहे सर, पण सुट्टे पैसे नसले की आम्हाला असं करावंच लागतं.
मीः ठीक आहे, मग इथं तुम्ही ऑफिशियल बोर्ड का लावत नाही - 'सुट्टे पैसे नसल्यास आम्ही चॉकलेट्स देतो आणि घेतोसुद्धा!' असा?
डी-मार्ट स्टाफः असा बोर्ड आम्हाला नाही लावता येणार सर. पण मी तुमचा प्रॉब्लेम माझ्या सिनियर्सना सांगतो...
मीः तुम्हालाच अजून माझं म्हणणं नीट कळालेलं नाही तर तुम्ही ते दुसर्‍यांना कसं सांगणार? त्यापेक्षा मीच तुमच्या सिनियर्सना समजावून सांगतो. कुठं भेटतील ते?
डी-मार्ट स्टाफः थांबा, मी त्यांनाच इकडं बोलावून घेतो...

यानंतर त्यांनी आपल्या मोबाईलवरुन फोन लावून मॅनेजरना बोलावून घेतलं. मी पुन्हा पहिल्यापासून सगळी कहाणी सांगितली.

डी-मार्ट मॅनेजरः तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल सॉरी सर. मी आत्ताच त्या काउंटरवरच्या मुलीला बोलावून तुमचे सुट्टे पैसे परत करायला सांगतो.
मीः तुम्हाला माझं म्हणणं कळतंच नाहीये का? प्रश्न माझ्या एकट्याच्या किंवा आजच्या सुट्ट्या पैशांचा नाही. प्रॉब्लेम तुमच्या काउंटरवरच्या एक्झिक्युटीव्हचा सुद्धा नाही. प्रॉब्लेम तुमच्या सिस्टीमचा आणि ट्रेनिंगचा आहे. सुट्ट्या पैशांऐवजी कस्टमरला सर्रास चॉकलेट दिलं जाणं, ही तुमची प्रोसिजर झालीय. माझं ऑब्जेक्शन ह्या प्रोसिजरवर आहे. कस्टमरला पैशांऐवजी दिलेल्या चॉकलेटचं अकौंटींग करणं तुम्हाला पण अवघडच जात असेल ना?
डी-मार्ट मॅनेजरः नाही सर, त्यासाठी आम्ही प्रत्येक बिलिंग काउंटरवर मोजून चॉकलेट्स देतो आणि कॅशचा हिशोब करताना शिल्लक चॉकलेट्सचं ऑडीट करतो.
मीः छान! म्हणजे डी-मार्टला रिझर्व्ह बँकेच्या रुपयाबरोबरच चॉकलेटची करन्सीसुद्धा मान्य आहे तर...
डी-मार्ट मॅनेजरः होय, सुट्ट्या पैशांच्या शॉर्टेजमुळंच आम्ही ही पद्धत वापरतो...
मीः ठीक आहे, मग तुम्ही कस्टमरला चॉकलेटच्या करन्सीमधे पेमेंट करता तसं कस्टमरनी तुम्हाला चॉकलेटच्या करन्सीमधे पेमेंट केलेलं चालेल का?
डी-मार्ट मॅनेजरः हो हो, नक्कीच चालेल. मी तुम्हाला पैशांऐवजी चॉकलेट देत असेन तर मला तुमच्याकडून चॉकलेट स्विकारलंच पाहिजे...
मीः मग तुम्ही तसा बोर्ड इथं लावू शकता का? - 'सुट्टे पैसे नसल्यास आम्ही चॉकलेट्स देतो आणि घेतोसुद्धा!'
डी-मार्ट मॅनेजरः बोर्डबद्दल मला माझ्या सिनियर्सना विचारावं लागेल, पण तुम्ही पुढच्या वेळी काउंटरवर सुट्ट्या पैशांऐवजी चॉकलेट्स दिली तर आम्हाला ती घ्यावीच लागतील. फक्त कुठलीही चॉकलेट्स अलाऊ करण्याऐवजी आम्ही ठराविकच चॉकलेट ह्यासाठी वापरतो.
मीः म्हणजे कुठली चॉकलेट्स?
डी-मार्ट मॅनेजरः सध्या तरी आम्ही 'फलेरो'ची चॉकलेट्स वापरतोय... आणि ती सुद्धा कस्टमरला विचारुनच देतो.
मीः ठीक आहे, मग पुढच्या वेळेपासून मी सुट्टे पैसे नसतील तर डी-मार्टच्या काउंटरवर 'फलेरो'ची चॉकलेट्स देत जाईन. आणि तुम्ही तसा अधिकृत बोर्ड इथं लावत नाही तोपर्यंत इतर कस्टमर्सच्या माहितीसाठी मी स्वतः ह्या करन्सीचा प्रचार करेन. पण तुमच्या कुठल्याही काउंटरवर 'सुट्ट्या पैशांऐवजी चॉकलेट्स चालतील का?' असा प्रश्न विचारला जात नाही, त्याचं काय?
डी-मार्ट मॅनेजरः त्याबद्दलच्या सूचना मी ताबडतोब सगळ्या काउंटर्सवर देतो...

तर, यापुढं डी-मार्टमधे (आणि शक्य झाल्यास इतरही ठिकाणी), तुम्हाला न विचारता सुट्ट्या पैशांऐवजी चॉकलेट्स मिळाली तर तुम्ही त्याची तक्रार संबंधित अधिकार्‍यांकडं करुन तुमचे सुट्टे पैसे परत मिळवू शकता.

एनएच-फोरवरच्या सगळ्या टोल नाक्यांवर 'सुट्ट्या पैशांऐवजी चॉकलेट्स देऊ नयेत' असे बोर्ड लावण्यात आले आहेत. डी-मार्टसारख्या स्टोअर्सना ही अल्टरनेट करन्सी वापरायची एवढीच हौस असेल तर, आपणही जागरुक ग्राहक बनून त्यांना मदत केली पाहिजे. यापुढं तुम्हाला मिळालेली चॉकलेट्स साठवून ठेवा आणि पुढच्या वेळी तीच परत देऊन पैसे वाचवा!

हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवून, सर्वसामान्य ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यास मदत करा...


Share/Bookmark

Sunday, July 26, 2015

परप्रांतीय मुलांचा भाषेचा प्रश्न हाताळताना...

आम्ही पुण्यात शिक्षणहक्क कायद्याच्या प्रसारासाठी 'एव्हरी चाइल्ड काउंट्स' हे नागरीक अभियान चालवतो. यामधे ६ ते १४ वयोगटातील शालाबाह्य मुलं शोधून त्यांना जवळच्या म.न.पा. / जि.प. शाळांमधे प्रवेश घेण्यास मदत केली जाते. संपूर्ण पुण्यात हे अभियान राबवण्यासाठी स्वयंसेवक म्हणून विविध क्षेत्रातले नागरीक सहभागी होतात. शालाबाह्य मुलं शोधताना पुण्यातल्या अधिकृत झोपडपट्ट्यांबरोबरच नव्यानं वसवल्या जाणार्‍या वस्त्या आणि बांधकाम साईट्सवरच्या मजूर-वस्त्यांचं सर्वेक्षण केलं जातं. पुण्यातल्या बांधकामांवर काम करणारे बहुतांश मजूर कर्नाटक, राजस्थान, बिहार, आंध्र प्रदेश, अशा परराज्यांतून आलेले आहेत. त्यांची मुलं बर्‍याचदा शालाबाह्यच असतात. या मुलांच्या पालकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देणं, शाळेत जाण्याचे फायदे समजावणं, इत्यादी गोष्टी स्वयंसेवक पार पाडतात. पण शिक्षणासाठी तयार झालेल्या मुलांना जवळच्या म.न.पा. / जि.प. शाळांमधेच प्रवेश घेऊन दिला जातो आणि या शाळा मराठी माध्यमाच्या आहेत. अशा वेळी, मुलांना मराठी शाळेत दाखल करताना पालकांकडून काही ठराविक प्रश्न विचारले जातात -

- शिक्षकांची मराठी भाषा मुलांना समजणार का?
- आम्ही काम संपल्यावर आमच्या गावीच जाणार आहोत, तर आत्ता मराठी माध्यमात शिकून काय फायदा?
- आमची मातृभाषा तेलगु, तमिळ, कन्नड, बंगाली, हिंदी आहे, तर आमच्या मुलांनी मराठी का शिकायचं?

अशा प्रश्नांना उत्तर देणं स्वयंसेवकांना बर्‍याचदा अवघड जातं. आमच्या अनुभवानुसार आम्ही पुढीलप्रमाणे त्यांची उत्तरं देतो -

- शाळेत गेल्यानं प्रत्येक मूल ‘कसं शिकायचं’ हे शिकू लागतं. त्याच्या मनात शिक्षणाविषयी योग्य वयात गोडी निर्माण होते, मग माध्यम कोणतंही असो. जरी त्यानंतर मूल आपल्या मूळगावी गेलं, तरी तिथल्या शाळेत मातृभाषेतून सहज शिक्षण घेऊ शकतं.
- सहा-सात वर्षांच्या कोणत्याही मुला/मुलीला नवीन भाषा शिकणं अवघड नसतं. वेगळ्या भाषेची भीती लहान मुलांपेक्षा मोठ्यांच्याच मनात जास्त असते. वास्तविक, सहा-सात वर्षांच्या मुलाची मातृभाषा (लिपी) शिकण्याची प्रक्रियादेखील याच वयात सुरु असते. त्या भाषेबरोबरच मराठीदेखील ते पटकन शिकू शकतं.
- जर संपूर्ण कुटुंब कामानिमित्त चार-पाच वर्षांसाठी पुण्यात राहणार असेल, तर दैनंदिन व्यवहारात त्यांना मराठी भाषेचा उपयोगच होईल. स्थानिक भाषा येत असल्यामुळं मुलांचा आणि एकूणच कुटुंबाचा रहिवास सुखकारक होईल.
- मराठी आणि हिंदीची लिपी एकच म्हणजे देवनागरी आहे. त्यामुळं मुलांना मराठीबरोबरच हिंदी वाचन आणि लेखन सुलभ होईल. हिंदी ही संपूर्ण भारतात वापरली जाणारी भाषा असल्यामुळं, मराठी भाषा शिकणं कधीच वाया जाणार नाही.

शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणताना भाषाविषयक प्रश्नांवर आम्ही शोधलेली ही उत्तरं बहुतांश पालकांना पटतात. पुण्याबरोबरच नाशिकमधेही असाच एक अनुभव आला. नाशिकरोडला गेल्या तीन वर्षांपासून एक मोठी कन्स्ट्रक्शन साईट सुरु आहे. बांधकाम करणारे सर्व मजूर मध्य प्रदेशातून आले असून त्यांची मुलं जवळच्या नाशिक म.न.पा. शाळेत जातात. ही शाळा मराठी माध्यमाची आहे. तीन वर्षांपूर्वी पहिलीत प्रवेश घेतलेली मुलं आता चौथीत आहेत, त्यांना शाळेत जायला आवडतं, आणि त्यांची शैक्षणिक प्रगतीदेखील चांगली आहे. आता ही मुलं कधीही आपल्या मूळगावी परतली तरी त्यांचं शिक्षण नक्कीच चालू राहील. भाषा ही शिक्षण घेण्यातली अडचण बनू शकत नाही...


Share/Bookmark

Saturday, June 6, 2015

सिव्हिक सेन्स?

पुण्यातल्या एका मॉलच्या पार्किंगमधला सीन. एक माणूस मॉलमधून खरेदी केलेल्या सामानाची ट्रॉली ढकलत येतो. मागून येणार्‍या बाईंच्या हातात एक तशाच सामानाचं बास्केट, दुसर्‍या हाताशी लहान मुलगी. आपल्या कारची डिकी उघडून माणूस सामान आत भरतो. रिकामी ट्रॉली शेजारी पार्क केलेल्या कारसमोर सरकवतो. मग बाईंच्या हातातलं बास्केट घेऊन सामान डिकीत ओततो. रिकामं बास्केट शेजारच्या दुसर्‍या कारसमोर ठेवतो. डिकी बंद. महाराज, महाराणी, आणि राजकन्या गाडीत बसतात. गाडी पार्किंगमधून बाहेर येते, झूऽऽम्म निघून जाते. गाडीचा नंबर जीजे-१९ असा काहीतरी असतो. (त्यानं काही विशेष फरक पडत नाही म्हणा... म्हणजे मला तरी तसं वाटतं... म्हणजे काही विशेष फरक पडत नाही असं... पण 'द डेव्हिल इज इन द डिटेल्स'... असो, तर) त्या शेजारी पार्क केलेल्या दोन कारच्या मालकांनी काय करायचं? आणि त्या छोट्या राजकन्येनं काय आदर्श घ्यायचा आई-बापाकडून? 'सिव्हिक सेन्स' नावाची गोष्ट कधी शिकणार आपण?


Share/Bookmark

Sunday, May 31, 2015

पल दो पल का साथ हमारा...

नजरों के शोख नजारे, होठों के गर्म पैमाने
है आज अपनी मेहफिल में, कल क्या हो कोई क्या जाने
ये पल खुशी की जन्नत है, इस पल में जी ले दीवाने...
आज की खुशियाँ एक हकीकत, कल की खुशियाँ अफसाने हैं...
पल दो पल का साथ हमारा, पल दो पल के याराने हैं
इस मंजिल पर मिलने वाले, उस मंजिल पर खो जाने हैं...

'पल दो पल का साथ हमारा' हे साहिर लुधियानवी यांच्या गाजलेल्या गीतांपैकी एक. वर्ष होतं १९८०, चित्रपट होता 'द बर्निंग ट्रेन'. याच वर्षी, हे गीत लिहिणारे साहिर आणि हे गीत गाणारे मोहम्मद रफी या दोघांनीही तीन महिन्यांच्या अंतरानं अवेळी एक्झिट घेतली. (मोहम्मद रफी - जुलै १९८० आणि साहिर लुधियानवी - ऑक्टोबर १९८०)

हे गाणं लिहिताना आणि गाताना दोघांना समजलं असेल का की 'इस मंजिल पर मिलने वाले, उस मंजिल पर खो जाने हैं...'

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६


Share/Bookmark

Saturday, May 23, 2015

मोदी सरकारच्या तथाकथित आंतरराष्ट्रीय यशामागील सत्य

फेसबुक, व्हॉट्सॲप, आणि इतर अनेक वेबसाईट्सवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वारेमाप परदेश दौर्‍यांचं समर्थन करणारा हा मेसेज फिरतोय. 'खोटं बोल, पण रेटून बोल' या न्यायानं काही असंबंध तर काही धादांत खोटे संदर्भ जोडून हे मुद्दे सामान्य जनतेच्या गळी उतरवायचे प्रयत्न सुरु आहेत. काय आहे या मुद्द्यांमागचं सत्य? जाणून घ्यायचंय? मग वाचा खालची मुद्देसूद उत्तरं...

मुद्दा १. कच्च्या तेलावर "ON Time delivery premium charges" न लावण्याचा भारताचा प्रस्ताव सौदी अरेबियाने मान्य केला आहे. साधारणपणे, कपडे इस्त्री करताना धोबी आपल्याला जे urgent म्हणून charges लावतो तोच या  ON Time delivery premium charges चा अर्थ आहे.  यातून काही हजार कोटींची बचत नक्कीच होईल ! आणि पर्यायाने पेट्रोल ,डिझेल चे भाव कमी होतील.
सत्य काय आहे? - 'एशियन प्रिमियम' नावाचा अतिरिक्त भार तेल उत्पादक कंपन्यांनी रद्द करावा यासाठी मोदी सरकार 'प्रयत्नशील' आहे. (http://www.hindustantimes.com/business-news/india-in-talks-to-save-rs-18k-cr-on-oil-imports/article1-1288411.aspx) असे प्रयत्न याआधीचं काँग्रेस सरकारदेखील करत होतं. परंतु, हा अतिरिक्त भार रद्द झाला किंवा 'ऑन टाईम डिलीव्हरी प्रिमियम चार्जेस' लावणार नाही असं सौदी अरेबियानं मान्य केलं अशी कुठलीही बातमी जगातल्या कुठल्याही वृत्तपत्रानं, टीव्ही चॅनेलनं, किंवा वेबसाईटनं अजून तरी दिलेली नाही. उलट, सौदी अरेबियानं दर वाढवल्याचीच बातमी उपलब्ध आहे - (http://www.livemint.com/Politics/lXDInLANFYEFamzTKvQGyH/Saudis-raise-crude-oil-pricing-to-Asia-on-signs-of-demand-gr.html)

मुद्दा २. भूतान मध्ये भारत ४ अजस्त्र धरणे आणि  जलविद्युत प्रकल्प बांधेल. या प्रकल्पातून उत्पादित होणाऱ्या विद्युत उर्जेचा सिंहाचा वाटा भारताला मिळेल.
सत्य काय आहे? - पॉवर-टेक्नॉलॉजी डॉट कॉम या वेबसाईटनुसार, "मांग्डेछू हा रॉयल गव्हर्मेंट ऑफ भूतानच्या २०२० पर्यंत १०,००० मेगावॅट हायड्रोपॉवर उत्पादनासाठी भारत सरकारच्या सहाय्याने आखण्यात आलेल्या दहा जलविद्युत प्रकल्पांपैकी एक आहे. यासंदर्भातील भारत आणि भूतान या देशांदरम्यानच्या करारावर एप्रिल २०१० मधे सह्या करण्यात आल्या." (http://www.power-technology.com/projects/mangdechhu-hydroelectric-project-trongsa-dzongkhag) याच बातमीत असंही म्हटलंय की, "सदर जलविद्युत प्रकल्पातून निर्माण होणारी बहुतांश ऊर्जा भूतानची अंतर्गत गरज भागवण्यासाठी वापरली जाईल आणि शिल्लक ऊर्जा भारताला निर्यात केली जाईल." आता यामधे मोदी सरकारचं कर्तृत्व काय आणि सिंहाचा वाटा म्हणजे नक्की काय? (http://www.thehindu.com/todays-paper/india-bhutan-to-double-target-for-power-projects/article1259938.ece)

मुद्दा ३. नेपाळमध्ये भारत जगातला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प उभारेल. या प्रकल्पातून उत्पादित होणाऱ्या विद्युत उर्जेचा सिंहाचा वाटा भारताला मिळेल.
सत्य काय आहे? - नेपाळ सरकारनं जीएमआर या भारतीय कंपनीला ९०० मेगावॅटचा अप्पर कर्नाली जलविद्युत प्रकल्प उभारण्याची परवानगी २००८ साली दिली होती. नेपाळमधल्या राजकीय उलथापालथीमुळं हा प्रकल्प लांबणीवर पडत गेला आणि मोदी सरकारच्या नशिबानं सध्याच्या नेपाळी मंत्रिमंडळाकडून त्याला हिरवा कंदील मिळाला. (http://in.reuters.com/article/2014/09/18/nepal-india-electricity-idUSL3N0RJ53720140918) आणखी सत्य शोधायचं म्हटलं तर, २०२१ मधे पूर्ण होणार्‍या या जीएमआर प्रकल्पातून १२ टक्के वीज नेपाळला मोफत पुरवली जाईल, उरलेली वीज भारताला पुरवली जाईल, आणि या प्रकल्पात नेपाळ २७ टक्क्यांचा भागीदार असेल.

मुद्दा ४. व्हियेतनाम सोबत राजकीय संबंध मजबूत केल्यामुळे व्हियेतनामच्या समुद्रातील तेल उत्त्खाननाचे कंत्राट ONGC  ला मिळणार आहे. चीनशी संबंध बिघडतील या भीतीमुळे आधीचे  सरकार हे कंत्राट घ्यायला घाबरत होते.
सत्य काय आहे? - मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी एप्रिल २०१४ मधे इकॉनॉमिक टाइम्सनं दिलेल्या बातमीनुसार, व्हिएतनामनं ओएनजीसी विदेश (ओव्हीएल) या भारतीय कंपनीला नोव्हेंबर २०१३ मधे पाच आणि एप्रिल २०१४ मधे दोन, अशी एकूण सात कंत्राटं आधीच देऊ केली होती. ओव्हीएल १९८८ पासून व्हिएतनाममधे कार्यरत असून, कंपनीची व्हिएतनाममधली गुंतवणूक ५० कोटी अमेरिकन डॉलर्सहून जास्त झाली आहे. (http://articles.economictimes.indiatimes.com/2014-04-30/news/49523412_1_blocks-127-ovl-petrovietnam)

मुद्दा ५. अमेरिकेचे निर्बंध झुगारून इराण आता भारताला कच्चॆ तेल विकणार आहे आणि ते सुद्धा भारतीय रुपयांमध्ये ! याचाच अर्थ देशातील परकीय गंगाजळीला धक्का पोहोचणार नाही. इराण मधल्या 'चाबहार' बंदराचे बांधकाम भारत करणार आहे जिथे भारतीय नौकांना खास प्रवेशद्वार असेल.
सत्य काय आहे? - जुलै २०१३ मधे टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या बातमीनुसार, अमेरिका व इतर पाश्चात्त्य देशांनी आर्थिक निर्बंध लादल्यानं इराण भारताला विकलेल्या तेलाची किंमत पूर्णपणे रुपयांमधे स्विकारायला तेव्हाच तयार झालं होतं. (http://timesofindia.indiatimes.com/india/Iran-agrees-to-take-all-oil-payments-from-India-in-rupees/articleshow/21067897.cms) 'चाबहार' बंदर बांधण्यासाठी इराणला भारतानं मदत केली होती, पण ती मोदी सत्तेत आल्यावर नव्हे, तर १९९० च्या दशकात! अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रांचे निर्बंध झुगारुन भारतानं २०११-१२ मधे युद्धग्रस्त अफगाणिस्तानला मदत म्हणून एक लाख मेट्रीक टन गहू याच 'चाबहार' बंदरातून निर्यात केला होता. (http://www.telegraph.co.uk/news/worldnews/middleeast/iran/9115192/India-begins-use-of-Chabahar-port-in-Iran-despite-international-pressure.html)

मुद्दा ६. ऑसट्रेलिया भेटीदरम्यान पंतप्रधान टोनी अबोट यांनी भारताला युरेनियम पुरवठा करण्याचे मान्य केले  आहे.  ऑसट्रेलिया हा जगातील सगळ्यात मोठा युरेनियम उत्पादक देश आहे.
सत्य काय आहे? - 'सिडनी मॉर्निंग हेराल्ड' या ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रानं मार्च २०१३ मधे दिलेल्या बातमीनुसार, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड आणि भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यादरम्यान युरेनियम खरेदी-विक्रीसंदर्भात चर्चा १८ मार्च २०१३ रोजी सुरु होत असून, प्रत्यक्ष करारावर सह्या होण्यास व विक्री सुरु होण्यास दोन वर्षांचा कालावधी लागेल. (http://www.smh.com.au/world/australia-and-india-to-start-uranium-sale-talks-20130306-2fmoq.html) आता २०१३ नंतर दोन वर्षांनी मनमोहन सिंग जाऊन नरेंद्र मोदी आले तर मूळ कराराचं श्रेय कुणाला मिळणार सांगा बरं!

मुद्दा ७. चीन भारतात २० बिलियन $ ची गुंतवणूक करणार आहे (१,४०,००० कोटी रुपये !)
सत्य काय आहे? - चीनमधील भारतीय दूतावासाच्या अधिकृत वेबसाईटनुसार, चीनची भारतातील प्रत्यक्ष गुंतवणूक डिसेंबर २०११ पर्यंत ५७५ मिलियन डॉलर्स आणि ऑक्टोबर २०१२ पर्यंत ६५७ मिलियन डॉलर्स इतकी होती. (http://www.indianembassy.org.cn/DynamicContent.aspx?MenuId=3&SubMenuId=0) भारतातल्या २० बिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा प्रत्यक्षात कधी येईल माहिती नाही, पण त्याबरोबरच चीननं पाकिस्तानात ४६ बिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीचीसुद्धा घोषणा केलेली तुम्हाला माहिती असेलच. (https://www.wsws.org/en/articles/2015/04/28/paki-a28.html)

मुद्दा ८. भारतीय सरंक्षण व्यवस्थेने Pentagaon  सारख्या संस्थेसोबत करार केला आहे. पाकिस्तानसारखे देश आता भारतावर अतिरेकी हल्ले करण्याआधी दहा वेळा विचार करतील.
सत्य काय आहे? - पेन्टॅगॉन हे अमेरिकेच्या संरक्षण विभागाचं मुख्यालय असून, ११ सप्टेंबर २००१ रोजी दहशतवाद्यांनी अमेरिकन एअरलाईन्सचं एक विमान हायजॅक करुन थेट पेन्टॅगॉनच्या पश्चिम बाजूला धडकवलं होतं. या आत्मघातकी हल्ल्यात १८९ माणसं मेली होती. (http://en.wikipedia.org/wiki/The_Pentagon) शिवाय, या मुद्द्यामधे म्हटलेला करार म्हणजे रुटीन ॲग्रीमेंट असून, आतापर्यंत पेन्टॅगॉननं जगातल्या अनेक देशांसोबत असे शेकडो करार केले आहेत. परंतु या करारांचा अतिरेक्यांवर काही परीणाम झालेला अजून तरी ऐकीवात नाही. (http://articles.economictimes.indiatimes.com/2015-05-13/news/62124140_1_agreements-indian-embassy-defence)

मुद्दा ९. जपान भारतात ३० बिलियन $ ची गुंतवणूक करणार आहे (२,००,००० कोटी रुपये !). ही गुंतवणूक दिल्ली - मुंबई औद्योगिक कोरेडोर मध्ये करण्यात येणार आहे.
सत्य काय आहे? - जपानमधील भारतीय दूतावासाच्या अधिकृत वेबसाईटनुसार, नोव्हेंबर २००४ मधे जपानचे पंतप्रधान जुनिचिरो कोइझुमी आणि भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भारत-जपान आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी जॉइंट स्टडी ग्रुपची स्थापना केली. २००६ मधे आलेल्या या ग्रुपच्या अहवालानुसार २००७ साली आर्थिक भागीदारीचा करार करण्यात आला, जो चर्चेच्या १४ फेर्‍यांनंतर सप्टेंबर २०१० मधे अंमलात आणला गेला. २०११ मधे या करारावर सह्या करण्यात आल्या. डिसेंबर २००६ मधे जपानच्या भेटीवर गेलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सही केलेल्या 'एमओयु'च्या आधारे ऑगस्ट २००७ मधे 'दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर'ला मान्यता मिळाली. यासाठीचं विशेष विकास महामंडळ जानेवारी २००८ मधे स्थापन करण्यात आलं. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी ४.५ बिलियन डॉलर्स गुंतवणुकीची घोषणा तर जपान सरकारनं २०११ मधेच केली होती. या प्रकल्पासाठी जपान-इंडीया टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून, या टास्क फोर्सची दहावी बैठक ऑक्टोबर २०१२ मधे टोकियोत झाल्याचं या अधिकृत वेबसाईटवर म्हटलं आहे. (http://www.indembassy-tokyo.gov.in/india_japan_economic_relations.html) आता यात मोदी सरकारचं कर्तृत्व काय असेल बरं?

मुद्दा १०. पूर्वोत्तर सीमारेषा रस्ता बांधण्याचे भारत-चीन ने मान्य केले आहे. मागील सरकारच्या काळात कितीतरी वर्ष हा प्रस्ताव्व प्रलंबित होता. आणि यासाठीच चीन ने भारतातील गुंतवणूक थांबवली होती.
सत्य काय आहे? - भारत सरकारच्या ईशान्य भाग विकास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटनुसार, या रस्त्याचं काम सप्टेंबर २००५ पासूनच सुरु आहे. (http://www.mdoner.gov.in/content/sardp-ne) परंतु, खंडणी, अपहरण, आणि इतर दहशतवादी कारवायांमुळं हे काम सतत बंद पडत आलेलं आहे. (http://www.business-standard.com/article/companies/india-s-north-east-risky-terrain-for-road-construction-113112000828_1.html) मात्र या रस्त्यामुळं चीननं भारतातील गुंतवणूक थांबवल्याचा मुद्दा असंबंध आहे.

मुद्दा ११. भारत सरकारने येमेन मधून ४५००+ भारतीय लोकांना सुखरूप मायदेशी परत आणले. शिवाय ४१ देशातील लोकांना मायदेशी परत नेण्यास मदत केली. सौदी अरेबिया ने येमेन वर हा हल्ला केला होता आणि येमेन ने "नो फ्लाय झोन" घोषित केला होता. श्री नरेंद्र मोदी यांनी स्वत: सौदी अरेबिया चे राजे सुलेमान यांना दूरध्वनी करून भारतीय विमान सौदी अरेबिया च्या हदीत येऊ देण्याची मागणी केली. सुलेमान यांनी ती मान्य केली. अजित डोवल, सुषमा स्वराज आणि व्ही के सिंग यांनी या प्रकियेत महत्वाचा हातभार लावला. आणि हो ...४५०० भारतीयांपैकी फार कमी हिंदू होते बंर का !!!
सत्य काय आहे? - १९९० साली इराक-कुवेत युद्धातून एक लाखाहून अधिक भारतीयांची सुटका तेव्हाच्या सरकारनं आणि लष्करानं केली होती. २००६ मधे लेबनन युद्धातून २,२८० लोकांची 'ऑपरेशन सुकून' अंतर्गत सुटका करण्यात आली, ज्यामधे १,७६४ भारतीय, ११२ श्रीलंकन, ६४ नेपाळी, आणि इतर देशांतील नागरिकांचा समावेश होता. २०११ च्या लिबियन युद्धातून 'ऑपरेशन सेफ होमकमिंग' अंतर्गत १५,००० पेक्षा जास्त भारतीयांची सुटका करण्यात आली. (http://en.wikipedia.org/wiki/Operation_Safe_Homecoming आणि http://en.wikipedia.org/wiki/Operation_Sukoon) या यशस्वी कामगिरीचे श्रेय त्यावेळच्या सरकार आणि मंत्र्यांनी न लाटता, प्रत्यक्ष जमिनीवर उतरुन काम करणार्‍या लष्कराला देण्यात आलं होतं.

मुद्दा १२. श्री नरेंद्र मोदींच्या प्रयत्नामुळे फ्रांस ने भारताला ३६ लढाऊ विमाने देण्याचे मान्य केले. ह्या सौद्यामध्ये कोणीही मध्यस्थ नव्हता.
सत्य काय आहे? - जानेवारी २०१५ मधे एका मुलाखतीत, संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी फ्रान्सच्या दसॉल्ट कंपनीच्या राफेल लढाऊ विमानांऐवजी आपल्या हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडनं बनवलेल्या सुखोई-३०एमकेआय लढाऊ विमानांचा पर्याय सुचवला होता. दसॉल्ट कंपनीची राफेल विमानं प्रचंड महाग असून, भारतीय वायु सेनेच्या सर्व अटी त्यांनी पाळलेल्या नाहीत. त्यामुळं गेल्या तीन वर्षांपासून ही कंपनी भारताला १२६ राफेल लढाऊ विमानं विकण्यासाठी प्रयत्न करत असूनही संरक्षण मंत्रालय आणि भारतीय वायु सेनेनं हा व्यवहार थोपवून धरला होता. अशात नरेंद्र मोदींनी फ्रान्सला जाऊन त्या १२६ पैकी ३६ विमानं खरेदी केली आणि 'मेक इन इंडीया'च्या संकल्पनेलाही हरताळ फासला. (http://www.business-standard.com/article/economy-policy/parrikar-outlines-alternatives-to-rafale-115011300014_1.html)

मुद्दा १३. क्यानडा भेटीदरम्यान भारतीय न्युक्लीयर प्लांट साठी ५ वर्षे य़ुरेनिउम पुरवठा करण्याचे क्यानडा ने मान्य केले.
सत्य काय आहे? - भारत-कॅनडा नागरी अणुसहयोग करारावर २०१० मधेच सह्या झाल्या होत्या, पण कॅनडानं भारताला युरेनियमची प्रत्यक्ष विक्री करण्याचा करार २०१३ मधे झाला. सप्टेंबर २०१३ मधे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांच्या कॅनडा भेटीदरम्यान हा करार अंमलात आला. (http://www.stratpost.com/canada-to-supply-uranium-to-india)

मुद्दा १४. फ्रांस भारतामध्ये २ बिलियन युरो ची गुंतवणूक करणार आहे.
सत्य काय आहे? - अमूक कोटी डॉलर्सची गुंतवणूक आणि तमूक लाख युरोंची गुंतवणूक हे दोन दिवसांच्या भेटीत ठरणारे निर्णय नसून त्यामागे कित्येक वर्षांची आणि आधीच्या सरकारांची मेहनत असते. तरीसुद्धा नरेंद्र मोदींना प्रसिद्धीलोलुपतेचं श्रेय द्यावंच लागेल, कारण 'व्हायब्रंट गुजरात'च्या नावाखाली त्यांनी 'प्रॉमिस्ड इन्व्हेस्टमेंट्स'चा नवा फंडा राजकारणात आणला. 'व्हायब्रंट गुजरात' अंतर्गत २००३ ते २०१५ पर्यंत मोदींनी १,४८९ बिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकींसाठी जगभरातल्या कंपन्यांसोबत करार केले आहेत. एका संशोधनपर लेखानुसार, यापैकी फक्त ९ टक्केच रक्कम प्रत्यक्ष गुंतवण्यात आली आहे. (http://scroll.in/article/700301/if-all-the-investments-promised-at-vibrant-gujarat-were-added-up-they-would-nearly-equal-indias-gdp) आता फ्रान्स, चीन, जपान नक्की किती गुंतवणूक करतात ते पाहण्यासाठी आपल्याला बरीच वाट पहावी लागेल...

मित्रांनो, मोदी सरकारच्या (खोट्या) प्रचाराचे मुद्दे संपायची काही लक्षणं नाहीत. पण प्रत्येक मुद्द्यावर थोडा वेळ दिला तर त्यामागचं सत्य आपल्याला नक्की सापडेल. आता एवढं लांबलचक स्पष्टीकरण वाचायला आणि त्याबरोबर दिलेल्या लिंक्सवर जाऊन माहिती तपासून बघायला तुमच्याकडं वेळ नसेलही. तरीसुद्धा, म्हणतात ना - 'म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो!' तेव्हा काळ सोकावू नये यासाठी खर्‍या देशभक्तांना सजग रहावंच लागेल आणि असत्य खोडून काढण्यासाठी सत्य समोर आणावंच लागेल. तुम्हालाही जर अंधभक्तांच्या दिशाभूल करणार्‍या पोस्ट थोपवायच्या असतील तर ही सत्य परिस्थिती मांडणारी पोस्ट नक्की शेअर करा, फॉरवर्ड करा. 'खोटं बोल पण रेटून बोल' या प्रवृत्तीला एकच उत्तर - 'खरं काय ते न घाबरता बोल!'

(या लेखातील मुद्दे व लिंक्स फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्किंग वेबसाईटवरुन घेण्यात आले आहेत.)


Share/Bookmark

Monday, May 18, 2015

गांधी मला भेटला

गांधी मला
वसंत दत्तात्रेय गुर्जरच्या १० x १२ च्या खोलीत
६ x २ १/२ च्या बाजल्यावर
भारतीय जनतेच्या प्रतीकांत भेटला
तेव्हा तो म्हणाला -
सत्यापासून सौंदर्य वेगळे असूं शकत नाही
सत्य हेच सौंदर्य आहे, त्या सत्याच्या द्वारां मी सौंदर्य पाहतो
सत्याचा आग्रह ठेवल्यामुळेच तडजोड करण्यात
असलेल्या सौंदर्याचे मोल जाणता येते
सत्य हे वज्राहूनि कठोर आणि कुसूमाहूनहि कोमल आहे

गांधी मला आकाशवाणी मुंबई ब केंद्राच्या
५३७.६ किलोसायकल्सवर
गांधीवंदना या कार्यक्रमांत भेटला
तेव्हा तो बोलला---
महात्म्याचे वचनदेखील बुद्धीच्या कसोटीवर घासून घ्या
आणि ते कसास न उतरल्यास त्याचा त्याग करा
आकाशवाणीच्या निवेदिकेनं सांगितलं -
गांधीवंदना हा कार्यक्रम आपण
६ वाजून ५५ मिनिटं ते ७ वाजून २ मिनिटंपर्यंत
तांत्रिक बिघाडामुळे ऐकूं शकला नाहीत
त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोंत

गांधी मला चार्तुवर्ण्याच्या देवळांत भेटला
तेव्हा तो बनियाच्या धर्माला अनुसरून
पैशाची मोजदाद करत होता
(कुणाचं लक्ष नाही असं पाहून त्यानं कनवटीला निळी पत्ती लावली)
गांधी मला
बौद्ध मठांत भेटला
तेव्हा तो बीफचिली ओरपत होता

गांधी मला
चर्चमध्ये भेटला
दर आठवड्याला क्षमा करणार्‍या येशूपुढे
तो गुडघे टेकून उभा होता

गांधी
चुकला (नंगा) फकीर
मला मशिदींत भेटला
तेव्हा तो धर्मांतर करत होता

गांधी मला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रबुद्ध भारतांत भेटला
तेव्हा तो म्हणाला -
हरिजनांची सेवा माझ्या जीवनाचा प्राणवायू आहे
मला पुनर्जन्म नको आहे
पण येणारच असेल तर अस्पृश्याचा यावा
म्हणजे येणारी दुःखं, यातना, अपमान यांचा मला अनुभव येईल
अस्पृश्यता जिवंत राहण्यापेक्षां
अस्पृश्यता असलेला हिंदुधर्म मेलेला मला चालेल
असं बोलून तो तडक भारतमातेच्या मंदिरात आंघोळ करून
गंगेच्या पात्रात उतरला

गांधी मला
सानेगुरुजींच्या आंतरभारती शाळेंत
आयला झवून बापाला सलाम करणार्‍या
धडपडणार्‍या मुलांना
श्यामच्या गोड गोष्टी सांगताना भेटला
तेव्हा श्यामची आई त्याला म्हणाली -
निरोध वापरा बिनविरोध

गांधी मला
भर रस्त्यावर हेमामालिनीच्या
नावानं हस्तमैथुन करतांना दिसला
देशांतला हा पहिलाच स्ट्रीट प्ले
अहिंसेचा हाहि एक प्रयोग

गांधी मला
टागोरांच्या गीतांजलीत भेटला
तेव्हा तो गोलपिठ्यावर
कविता लिहीत होता

गांधी मला
बाबा आमट्यांच्या एकात्म भारतांत
अपंगांच्या महोत्सवात भेटला
तेव्हा तो म्हणाला---
हात हे याचनेसाठी दुसर्‍यापुढे पसरण्यासाठी नसतात
आणि दान हे माणसाला नादान बनवते
असं म्हणून
त्यानं अमेरिकन डॉलरचा चेक अॅक्सेप्ट केला

गांधी मला आचार्य भगवान रजनीशांकडे
ध्यानधारणेत
संभोगातून समाधीकडे म्हणत
शेळीकडे वळताना दिसला

गांधी मला
मार्क्सच्या टोअॅटोमधून ड्रायव्ह इन थिएटरमध्ये
जगातील कामगारांनो एक व्हा
हा पिक्चर पहात टाइम किल करताना भेटला

गांधी मला
माओच्या लाँगमार्चमध्ये भेटला
तेव्हा तो शेतकर्‍याच्या वेषांत
खेड्यातून शहरांत स्थायिक व्हायला निघाला होता

गांधी मला
डांग्यांच्या गिरणीची भिंत चढून जाताना दिसला
तेव्हा तो ओरडला---
बिर्लाबावटे की जय

गांधी मला
काळागांधीच्या दवाखान्यांत
सावरकरांना सँपलची बाटली विकताना भेटला
गांधी मला
अटलबिहारी वाजपेयींच्या पेशवाईंत भेटला
तेव्हा तो गांधीवादी समाजवादाची जपमाळ ओढत होता

गांधी मला
चारु मजुमदारच्या नक्षलबाडीत भेटला
तेव्हा तो घोषणा देत होता -
आमरबाडी तोमार बाडी
सकलबाडी नक्षलबाडी
लालकिलेपे लाल निशान
माँग रहा हैं हिंदुस्तान

गांधी मला
क्रेमलिनमध्ये ब्रेझनेवच्या हस्ते
शांततेचं नोबेल पारितोषिक घेतांना भेटला
गांधी मला
व्हाइटहाऊसमध्ये
रेगनच्या न्यूट्रॉनची कळ दाबताना भेटला
माणसं मेलेल्या जगांतली
स्थावरजंगम मालमत्ता दाखवून
गांधी रेगनचं सांत्वन करत होता

गांधी मला
छत्रपती शिवाजी विडीचे झुरके घेत
फोरासरोडला ५८० नंबरच्या कमर्‍यांत
रंगरंगोटी केलेल्या लोकशाही नांवाच्या रांडेकडे भेटला
तेव्हां ती म्हणाली -
तूं कुठली चिकित्सा करणार आहेस?
तूं कुठला प्रयोग करणार आहेस?
तूं कुठला प्रकाश दाखवणार आहेस?

गांधी मला
परमपूजनीय सरसंघचालक
बाळासाहेब देवरसांच्या संघस्थानावर
अखंड हिंदुस्थानाच्या जयघोषांत
अर्धीचड्डी सांवरत़ ६१-६२ उठाबशा काढत घोषणा देताना दिसला
मी हिंदू आहे आणि त्याचा मला अभिमान आहे
वंदेमातरम्
कॉन्व्हेंटमध्ये शिशूंना शिकवून इंग्लड-अमेरिकेंत स्थायिक करीन

गांधी मला
जमाते इस्लामच्या घोगारी मोहोल्ल्यांत
पेट्रोडॉलरच्या थ्री-इ-वनमध्ये
पाकिस्तानविरुद्ध हिंदुस्थान क्रिकेट कॉमेंट्री ऐकताना दिसला
पाकिस्तानचा हिंदुस्थानवर २ गडी राखून विजय
हे ऐकतांच तो नमाज पढला
मोहोल्ला-मोहोल्ल्यात जाऊन त्यानं ग्रीनबोर्डाला हार घातला

गांधी मला
सदाशिव पेठेतल्या ना.ग. गोर्‍यांच्या वाड्यांत भेटला
तेव्हा तो म्हणाला
स्वातंत्र्याला इतकीं वर्षं झाली तरी आम्हाला
भारत माझा देश आहे
या देशावर माझे प्रेम आहे
इथल्या विविधतेने नटलेल्या समृद्ध परंपरांचा मला अभिमान आहे
मी माणसांचा मान ठेवीन
मी माझ्या देशाशी निष्ठा ठेवीन
असं म्हणावं लागत याची मला खंत वाटते
असं मला लंडनच्या टेम्स नदीच्या तीरावर सुचलं

गांधी मला
आयर्विनच्या व्हाइसरॉय हाउसमध्यें भेटला
तेव्हा तो स्वातंत्र्यसैनिकांच्या
पेन्शनीचा हिशेब करत होता

गांधी मला
स्वयंघोषित नेताजी राजनारायणच्या
कुटुंबकल्याण केंद्रात भेटला
तेव्हां उघडाबंब गाद्यागिरद्यांवर लोळत
मालिश करून घेत
बदामपिस्ते मिठाई खात
भारत मे समाजवाद क्यों नही आता
ह्यावर तो पत्रकार परिषद घेत होता

गांधी मला
अखिल भारतीय हिजड्यांच्या संमेलनात
कुटुंबनियोजनावर भाषण करताना दिसला
तेव्हा आशाळभूत चव्हाण
रिकाम्या असलेल्या खुर्चीवर लक्ष ठेवून
संपूर्ण बेरजेचं राजकारण शिजवत होता

गांधी मला
आम जनता की संपत्ति असलेल्या पृथ्वीवर
बेवारस मुलांच्यात नवरा-बायकोचा खेळ करतांना भेटला
तेव्हा तो म्हणाला
निधर्मी देश क्या पहचान
छोडो चड्डी मारो गांड

गांधी मला
हाजी मस्तानच्या साम्राज्यांत दिसला
तेव्हा त्यानं चक्क पंचा सोडला
त्याच्या पंच्यावर मी कधींच गेलो नाही
पंचा काय धोतर काय नि पटलून काय
सत्याचे प्रयोग कशांतूनहि होतात
हो
अगदी कवितेंतूनसुद्धा

गांधी मला
बाटाच्या कारखान्यांत
बुटाला शिलाई मारतांना दिसला
तेव्हा बाबूजी गांधीना म्हणला
इस देश में चमार कभी प्राइम मिनिस्टर नही हो सकता

गांधी मला
मोरारजीच्या ओशियानात भेटला
शिवाम्बूच्या तारेंत तो म्हणाला
स्त्रिया ह्या मूर्ख आणि विवेकशून्य असतात
मी हे कोणाच्या संदर्भात म्हटलं -
हे आपल्या लक्षांत आलं असेलच

गांधी मला
नियतीशी संकेत करतांना
नेहरूंच्या तीन मूर्तीत भेटला
तुम्ही आमच्या विश्वासातले
गादी नंतर इंदिरेच्या हवाली करा

गांधी मला
चरणसिंगांच्या सूरजकुंडात भेटला
तेव्हा तो राष्ट्राला उद्देशून म्हणाला—
मेरे जिंदगीकी तमन्ना पुरू हो गयी

गांधी मला
कमलेश्वरच्या परिक्रमांत दिसला
तेव्हा तो म्हणाला—
मनोरंजनाची ए यू साधनं
तळागाळातल्या जनतेपर्यंत पोंचवायचं माझं स्वप्न साकार झालं
(कॅमेरामननं कॅमेरा त्याचा आंडपंचा आणि काठी यावर केंद्रीत केला होता)

गांधी मला रतन खत्रीच्या अड्ड्यावर दिसला
तेव्हा तो मटक्यांतून
राष्ट्रीय एकात्मतेची तीन पानं काढत होता

गांधी मला
सर्वभूमि गोपलकी म्हणणार्‍या
विनोबांच्या धारावीत
टिनपाट घेऊन हायवेच्या रांगेत
क्रुश्चेव्हला गार्ड ऑफ ऑनर देतांना दिसला

गांधी मला
इंदिरा गांधींच्या १ सफदरजंग कारस्थानात भेटला
धटिंगण आय-माय कार्यकर्त्यानं
त्याच्या गांडीवर लाथ मारली
तेव्हातो ओरडला -
देश की नेता इंदिरा गांधी
युवकों का नेता संजय गांधी
बच्चों का नेता वरुण गांधी
भाड में गया महात्मा गांधी

गांधी मला
अजितनाथ रे च्या न्यायालयात
आरोपीच्या पिंजर्‍यात दिसला
सत्याचे प्रयोग करून
देश धोक्यात आणल्याबद्दल
राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली
त्याला फांशी दिला

गांधी मला
अत्र्यांच्या शिवशक्तीत
गांधींवर अग्रलेख लिहितांना दिसला
गांधीत आम्ही ईश्वराचे दर्शन घेतले
धन्य झालो
अब्जावधी वर्षांत आता ईश्वर पृथ्वीवर येणार नाही
स्वदेशी रहा - स्वदेशी बना
असं म्हणून त्यांनी देशीला जवळ केलं

गांधीबाबा राजघाटावर
वसंत दत्तात्रेय गुर्जरच्या
खांद्यावर हात ठेवून म्हणाला -
देव मेला आहे देवमाणूसही मेला आहे
आता सैतानांच्या विश्वात मेलेल्या देवाला मुक्ती नाही
आणि देवमाणसाला तर नाहींच नाही
--आणि क्षणार्धात तो समाधीत गेला....

- वसंत दत्तात्रेय गुर्जर, प्रास प्रकाशन

(स्रोत - https://www.facebook.com/notes/sunil-tambe/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%BE/1087264747955359)


Share/Bookmark

Saturday, April 18, 2015

I am the King here!

This happened at one of our favourite restaurants yesterday. A group of young boys was having dinner on a table next to ours. One of the boys asked the owner (fondly called as 'Dada') for a straw in his cold drink. The restaurant was full and everybody was all ears to Dada's reply - 'Bada ho gaya na ab tu? Straw se piyega?' ('You're a grown up boy now, aren't you? Do you still drink with a straw?') In a 'service' industry with 'Customer is God' motto, we love such guys with 'I am the King here' attitude. What say?


Share/Bookmark

Friday, March 20, 2015

आप यूँ फासलों से गुजरते रहे

आप यूँ फासलों से गुजरते रहे
दिल से कदमों की आवाज आती रही
आहटों से अंधेरे चमकते रहे
रात आती रही, रात जाती रही

गुनगुनाती रहीं मेरी तनहाइयाँ
दूर बजती रहीं कितनी शहनाइयाँ
जिंदगी जिंदगी को बुलाती रही
आप यूँ फासलों से गुजरते रहे
दिल से कदमों की आवाज आती रही

कतरा कतरा पिघलता रहा आसमाँ
रुह की वादियों में न जाने कहाँ
इक नदी दिलरुबा गीत गाती रही
आप यूँ फासलों से गुजरते रहे
दिल से कदमों की आवाज आती रही

आप की गर्म बाहों में खो जायेंगे
आप की नर्म जानों पे सो जायेंगे
मुद्दतों रात नींदें चुराती रही
आप यूँ फासलों से गुजरते रहे
दिल से कदमों की आवाज आती रही

- जाँ निसार अख्तर / खय्याम / लता मंगेशकर

'शंकर हुसैन' पिक्चरमधलं हे गाणं खास लतादीदींच्या आवाजातल्या शेवटच्या कडव्यासाठी तरी ऐकलंच पाहिजे. 'मुद्दतों रात नींदे चुराती रही' या ओळीआधीचा पॉज आणि नंतरचा इफेक्ट शब्दांत मांडता येणार नाही, फीलच करावा लागेल... आप यूँऽऽ फासलों से...
(यूट्युबवर शोधलं नाही, पण 'विविधभारती'वर अधून-मधून लागतं हे गाणं.)


Share/Bookmark

Thursday, February 26, 2015

बाई आणि पुरुष

नोकरी करणार्‍या बाईला प्रमोशन/पगारवाढ आणि धंदा करणार्‍या बाईला काम कुणाबरोबर तरी 'झोपल्या'मुळं(च) मिळतं, असं मागच्याच नव्हे तर आत्ताच्या पिढीतले लोकही उघड-उघड (अर्थात् त्या बाईच्या माघारीच) म्हणताना दिसतात. पण मग नोकरीत प्रमोशन/पगारवाढ मिळणारे किंवा धंद्यात ऑर्डर मिळवणारे पुरुष कुणाबरोबर झोपतात, याचं उत्तर मात्र त्यांच्याकडं कधीच नसतं! टी-शर्ट आणि जीन्स घालणार्‍या बाईचं कॅरेक्टर लो, पण तेच घालणारा पुरुष स्टायलिश? स्वतःच्या कमाईवर कुटुंब पोसणार्‍या बाईचं चरित्र संशयास्पद, पण तेच करणारा पुरुष कर्तृत्ववान? नवरा आणि मुलांपेक्षा करीयर आणि कामाला जास्त महत्त्व देणारी बाई निर्दयी, पण करीयर आणि कामाच्या नावाखाली बायको-पोरांकडं दुर्लक्ष करणारा पुरुष कामसू? सिगरेट ओढणारी आणि ड्रिंक्स घेणारी बाई एक तर 'अव्हेलेबल' किंवा सरळ-सरळ राक्षसी, आणि हीच सिगरेट-दारु पुरुषांसाठी मात्र स्ट्रेस रिलीफची औषधं? कुठून मिळतात हे व्ह्यूज? कशी तयार होतात ही मतं? कोण आहे जबाबदार? आपली एज्युकेशन सिस्टीम, मीडिया, हमारी संस्कृती और हमारी परंपरा? की खरंतर घराघरांतून कळत-नकळत केले जाणारे 'संस्कार'? लहान वयातच मुला-मुलींसमोर बाई आणि पुरुषांना जसं वागवलं जातं, त्यांच्याबद्दल जसं बोललं जातं (खरंतर गॉसिपिंग केलं जातं) त्याप्रमाणंच त्यांची मतं बनत जाणार ना! या बाबतीत पुरुष तर होपलेसच आहेत. निदान बायकांनी तरी आपल्या मुला-मुलींचे डोळे लहानपणीच उघडावेत...


Share/Bookmark

Monday, February 16, 2015

मृत्यू

"मृत्यू हा शेवट नसतोच. त्या व्यक्तीचाही नाही आणि इतरांचा तर नाहीच नाही. मृत्यूनंतर तर ते माणूस बहुतेकांना खरंखुरं उलगडायला लागतं. माणूस अस्तित्वात नाही म्हटलं की तो लख्ख कळतो एकाएकी वीज चमकल्यासारखा. आणि मग हळहळ वाटायला लागते, की हे आधी कसं दिसलं नाही? इतकं कसं काळोखं असतं आपलं जगणं की जवळचं माणूसदेखील नीट दिसू नये... आणि मृत्यूच्या प्रकाशातच ओळखू यावा त्याचा चेहरा."

- भिन्न, कविता महाजन


Share/Bookmark

Sunday, February 15, 2015

निषेध आणि कारवाई

संतोष पवारच्या 'यदाकदाचित'मधला युधिष्ठिर आपल्या मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टींचा सारखा-सारखा निषेध करत असतो.
द्रौपदीला सीता समजून चुकीच्या स्वयंवरात शिरलेल्या रावणाचापण तो निषेध करतो.
गोंधळलेला रावण दुर्योधनाच्या कानात कुजबुजतो,
"एऽऽ, ते बघ तो निषेध करतोय..."
यावर दुर्योधन युधिष्ठिराकडं तुच्छ कटाक्ष टाकत मोठ्ठ्यानं म्हणतो,
"करु दे. जल्ला त्यानं आयुक्षात तेवडाच केलाय!"

(संदर्भः
१. नेमाडेंसाठी 'बास्टर्ड' शब्द वापरला म्हणून विनोद तावडे सलमान रश्दीवर कारवाई करणार म्हणे;
२. पिक्चरमधे मुंबईऐवजी बॉम्बे शब्द वापरल्यास सेन्सॉर बोर्ड कारवाई करणार म्हणे;
३. 'एआयबी रोस्ट'मधे लैंगिक विनोद केले म्हणून करण जोहर आणि इतर कलाकारांवर कारवाई करणार म्हणे;
४. आणि असेच रोज-रोज समोर येणारे इतर अनेक संदर्भ...)


Share/Bookmark

Sunday, January 11, 2015

आज-कल याद कुछ और रहता नहीं

इश्क के मैंने कितने फसाने सुने
हुस्‍न के कितने किस्से कितने पुराने सुने
ऐसा लगता है फिर इस तरह टूट कर
प्यार हमने किया इक जमाने के बाद...
आज-कल याद कुछ और रहता नहीं
एक बस आप के याद आने के बाद...

- आनंद बक्षी


Share/Bookmark

Monday, January 5, 2015

The Boss!

From playing mouth-organ for Hemant Kumar's 'Hai Apna Dil Toh Awara' in 1958 to winning third Filmfare Award for Best Music Direction in 1995... This man was, is, and will always remain The Boss of Indian Film Music.

Take a bow, Pancham! We owe a lot to you...






Share/Bookmark

Friday, January 2, 2015

Terracotta

Beautiful terracotta artifacts from 'इस्किलार कलादालन, तळेगांव'.
Thanks to Rupak Sane and Jyoti Rupak Sane...



Share/Bookmark