झाले मोकळे शिक्षण…
> मंदार शिंदे
शाळेच्या पारंपरिक मार्गाला पर्याय म्हणून होमस्कूलिंग पद्धतीने मुलांना शिक्षण देण्याकडे पालकांचा कल वाढत आहे. याचबरोबर केंद्राने सर्व राज्यांना मुक्त शिक्षण शाळा चालवण्याची परवानगी दिली आहे. यामुळे चाकोरीबद्ध शिक्षणातून सुटत आनंदी शिक्षणाचा पर्याय मुलांना आणि पालकांना स्वीकारता येत आहे. बिनभिंतीच्या शाळेतलं हे शिक्षण नक्कीच जगाशी आणि वास्तवाशी जोडणारं असेल. याबाबत अनुभवी पालक आणि शिक्षण अभ्यासक या दोन्ही भूमिकांच्या अनुषंगाने मांडण्यात आलेला लेख.
स्वत-च्या जागेत घर बांधण्यापेक्षा मोठय़ा सोसायटीत फ्लॅट विकत घेणं जास्त चांगलं असं एक मित्र मला पटवून देत होता. स्वत-ची जागा घ्या, त्यावर स्वतंत्र वीज-पाणी कनेक्शन घ्या, कॉन्ट्रक्टर शोधा, सरकारी परवानग्या मिळवा, स्वच्छतेपासून सुरक्षेपर्यंत सगळ्या गोष्टींची सोय स्वत-च बघा आणि एवढे उपद्व्याप करून शंभर टक्के मनासारखं घर बांधून होईलच असं नाही असे त्याचे काही मुद्दे होते. याउलट मोठय़ा सोसायटीत फ्लॅट घेतला की, या सगळ्या सोयी एका दमात मिळून जातात. बिल्डरला पैसे दिले की, आपली जबाबदारी संपली. मग वीज-पाणी-रस्ता, पार्किंग, सिक्युरिटी, परमिशन वगैरे सर्व गोष्टी बिल्डरच मिळवून देतो.
मला काही स्वत-च्या जागेत घर बांधायचं नव्हतं किंवा फ्लॅटही विकत घ्यायचा नव्हता. त्यामुळे चहा संपेपर्यंत त्याचे मुद्दे मी शांतपणे ऐकून घेतले आणि घरी निघून आलो. नेमकी त्याच दिवशी महाराष्ट्र राज्य सरकारनं ओपन एस.एस.सी. बोर्ड अर्थात ‘मुक्तशाळा’ सुरू करण्याची घोषणा केली आणि ‘होम स्कूलिंग’ या विषयावर अचानक मोठी चर्चा सुरू झाली. आम्ही स्वत-च्या मुलाला सात-आठ वर्षांपासून होम स्कूलिंग (खरं तर अनस्कूलिंग) पद्धतीनं शिकवत असल्यानं आम्हाला या चर्चेची सवय होतीच, पण सर्वसामान्यपणे लोकांच्या मनात या विषयाबद्दल इतकं कुतूहल आणि आस्था असल्याचं नव्यानंच समजलं. अशाच काही चर्चांमधून आलेल्या मुद्द्यांवर इथं विचार केलेला आहे. याला ‘होम स्कूलिंग’बद्दलच्या प्रश्नांना उत्तरं न म्हणता विचारमंथन म्हणणं जास्त योग्य ठरेल असं मला वाटतं.
तर अगदी सोपं उदाहरण देऊन ‘होम स्कूलिंग’वर बोलायचं ठरवलं आणि चटकन घराच्या बाबतीत माझ्या मित्रानं मांडलेले मुद्दे आठवले. वास्तविक, स्वत-ची जागा घेऊन घर बांधायचं की मोठय़ा सोसायटीत फ्लॅट घेऊन राहायचं हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण तुलनाच करायची झाली तर शिकण्यासाठी औपचारिक शाळेत मुलाला दाखल करणं (फॉर्मल स्कूलिंग) म्हणजे तयार सोसायटीत फ्लॅट विकत घेणं आणि स्वत- वेळ देऊन निरनिराळे स्रोत शोधून मुलाचं शिक्षण घडवून आणणं (होम स्कूलिंग) म्हणजे स्वत-च्या जागेत स्वतंत्र घर बांधणं असं म्हणता येईल. आता या दोन्हीपैकी कुठला पर्याय निवडायचा हे प्रत्येकानं आपापली क्षमता, शक्यता आणि आवड बघून ठरवावं, पण ‘‘शाळेत गेल्याशिवाय मूल शिकूच शकत नाही’’ असं आजच्या काळात म्हणणं म्हणजे ‘‘कुणी स्वत-चं स्वतंत्र घर बांधूच शकत नाही’’ असं म्हटल्यासारखं होईल, पण मुळात होम स्कूलिंगचा पर्याय निवडावासा (काही) पालकांना का वाटत असेल यावर थोडा विचार करू.
प्रस्थापित औपचारिक शिक्षण पद्धती अर्थात फॉर्मल स्कूलिंगबद्दल शिकलेल्या पालकांच्या मनात काही तक्रारी निर्माण झाल्या आहेत. उदाहरणार्थ – मुलांचा कल लक्षात न घेता साचेबद्ध शिकवण्याची पद्धत, सर्वांना समान वागवण्यामुळं काही अंशी दडपली जाणारी मुलांची अंगभूत कौशल्यं, परीक्षा आणि गुणमापन पद्धतींचा (मार्ंकग सिस्टमचा) अतिरेक, व्यक्तिगत मार्गदर्शनाचा अभाव, शालेय शिक्षणासाठी मोजावी लागणारी प्रचंड किंमत इत्यादी. या गोष्टींवर कुणाकडंही रामबाण उपाय तयार नसले तरी या समस्या टाळण्याच्या दृष्टीनं लोकांनी पर्यायी शिक्षण पद्धतींचा विचार करायला सुरुवात केली असावी असं वाटतं.
होम स्कूलिंगबद्दल सर्वसामान्य लोकांच्या मनात एक गमतीशीर गैरसमज असतो. होम स्कूलिंग करणारी मुलं शाळेत न जाता सकाळी आंघोळ करून, 12 सूर्यनमस्कार घालून, डोळे मिटून बोधीवृक्षाखाली समाधी लावून बसतात आणि अशा प्रकारे त्यांना ‘आपल्या आपण’ ज्ञानप्राप्ती होते असा काहीतरी स्वयं-अध्ययनाचा (सेल्फ लर्निंगचा) मजेदार अर्थ अनेकांनी लावलेला दिसतो. स्वत- शिकण्यावर भर असला तरी होम स्कूलिंगमध्ये शाळेइतकेच (किंबहुना जास्तच) रिसोर्सेस वापरावे लागतात, मोठय़ा माणसांची किंवा तज्ञांची मदत आणि मार्गदर्शन घ्यावं लागतंच. फक्त हे रिसोर्सेस शाळेत एका ठिकाणी मिळाले असते, त्याऐवजी आई-वडिलांनी वेगवेगळ्या ठिकाणी शोधून असे मार्गदर्शक आणि साधनं मुलांना उपलब्ध करून द्यायची असतात. अशा प्रकारे समाजातल्या विविध स्तरांतील, विविध क्षेत्रांतील, विविध वयोगटांतील व्यक्तींशी संवाद साधण्यातून मुलांचं सामाजिकीकरण (सोशलायझेशन) उत्तम प्रकारे होऊ शकतं (फक्त शाळेत गेल्यानंच मुलांचं सामाजिकीकरण होतं या कल्पनेला छेद देणारा हा विचार आहे).
माहितीचे स्रोत मर्यादित होते तेव्हा शाळेत गेल्याशिवाय शिक्षण शक्य(च) नाही असं वाटणं साहजिक होतं. आज माहितीचे स्रोत घरात, खिशात, हातात येऊन पोहोचले आहेत. फक्त ही माहिती ‘प्रोसेस’ कशी करायची आणि ‘अप्लाय’ कशी करायची याचं मार्गदर्शन करण्याची गरज आहे. पुन्हा याबद्दल बहुतेकांचा आक्षेप असा असतो की, होम स्कूलिंगसाठी आई-वडिलांना पूर्ण वेळ देणं शक्य आहे का किंवा आई-वडील स्वत-च्या मुलांना शिकवण्याइतके सक्षम, प्रशिक्षित, क्वॉलिफाईड असतील का किंवा शाळेबाहेर हे सर्व रिसोर्सेस उपलब्ध करून देण्यासाठी आई-वडील श्रीमंतच असले पाहिजेत वगैरे वगैरे.
खरं तर होम स्कूलिंग करण्यासाठी आई-वडिलांनी शिक्षकाचीच भूमिका घेणं गरजेचं नसतं. मुलांना नवनवीन ठिकाणी घेऊन जाणं, निरनिराळ्या क्षेत्रात काम करणाऱया माणसांशी ओळख करून देणं, अनेक कार्यशाळा आणि प्रशिक्षणांमध्ये सहभागी करून देणं अशी कामं त्यांना करावी लागतात. मूल स्वत- एकटं घराबाहेर पडण्याच्या किंवा प्रवास करण्याच्या वयाचं होईपर्यंत आई-वडिलांपैकी कुणीतरी एकानं किंवा दोघांनीही त्याच्या सोबत जास्तीत जास्त वेळ घालवणं अपेक्षित आहेच. त्या अर्थानं होम स्कूलिंग करणाऱ्या मुलांचं संपूर्ण कुटुंबच नव्यानं ‘शिकण्याच्या’ प्रक्रियेतून जात असतं असं म्हणायला हरकत नाही. होम स्कूलिंग करण्यासाठी आई-वडिलांनी श्रीमंत असणं गरजेचं नाही, पण ‘रिसोर्सफुल’ असणं फायद्याचं आहे. म्हणजेच मुलाच्या शिक्षणासाठी आवश्यक स्रोत कुठं उपलब्ध होतील याची माहिती आई-वडिलांना असणं, नसेल तर ती शोधून काढणं आणि मुलांना त्या स्रोतांशी जोडून देणं असं ‘फॅसिलिटेटर’चं काम त्यांना करावं लागतं. मग ते ‘बेस्ट टीचर’ नसले तरी चालतं, फक्त ‘गुड फॅसिलिटेटर’ असणं महत्त्वाचं !
खरं तर होम स्कूलिंग करण्यासाठी आई-वडिलांनी शिक्षकाचीच भूमिका घेणं गरजेचं नसतं. मुलांना नवनवीन ठिकाणी घेऊन जाणं, निरनिराळ्या क्षेत्रात काम करणाऱया माणसांशी ओळख करून देणं, अनेक कार्यशाळा आणि प्रशिक्षणांमध्ये सहभागी करून देणं अशी कामं त्यांना करावी लागतात. मूल स्वत- एकटं घराबाहेर पडण्याच्या किंवा प्रवास करण्याच्या वयाचं होईपर्यंत आई-वडिलांपैकी कुणीतरी एकानं किंवा दोघांनीही त्याच्या सोबत जास्तीत जास्त वेळ घालवणं अपेक्षित आहेच. त्या अर्थानं होम स्कूलिंग करणाऱ्या मुलांचं संपूर्ण कुटुंबच नव्यानं ‘शिकण्याच्या’ प्रक्रियेतून जात असतं असं म्हणायला हरकत नाही. होम स्कूलिंग करण्यासाठी आई-वडिलांनी श्रीमंत असणं गरजेचं नाही, पण ‘रिसोर्सफुल’ असणं फायद्याचं आहे. म्हणजेच मुलाच्या शिक्षणासाठी आवश्यक स्रोत कुठं उपलब्ध होतील याची माहिती आई-वडिलांना असणं, नसेल तर ती शोधून काढणं आणि मुलांना त्या स्रोतांशी जोडून देणं असं ‘फॅसिलिटेटर’चं काम त्यांना करावं लागतं. मग ते ‘बेस्ट टीचर’ नसले तरी चालतं, फक्त ‘गुड फॅसिलिटेटर’ असणं महत्त्वाचं !
एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, होम स्कूलिंग हा औपचारिक शाळेला पर्याय नव्हे. आजही लाखो मुलं अशी आहेत, ज्यांना घरातून, समाजातून शिकण्याचे स्रोत आणि साधनं उपलब्ध होणं शक्य नाही. आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक समस्यांमुळं शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांनी आजही (आणि उद्या-परवादेखील) औपचारिक शाळेत गेल्याशिवाय पुरेसं शिक्षण शक्य नाही. त्यामुळं होम स्कूलिंग सुरू झाल्यावर औपचारिक शाळा बंद कराव्या लागतील हे विधान निराधार आहे. उलट वर उल्लेख केल्यानुसार, होम स्कूलिंग करणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठीचा एक स्रोत औपचारिक शाळादेखील असू शकतेच की ! फक्त त्यासाठी शाळांनी मोकळेपणानं ‘शिकण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी’ आपले दरवाजे उघडे ठेवले पाहिजेत. कारण शाळा हा आता शिक्षणाचा ‘एकमेव स्रोत’ उरला नसून ‘अनेक स्रोतांपैकी एक’ स्रोत बनला आहे. महाराष्ट्र शासनानं मुक्त शिक्षणासाठी अधिकृत बोर्डाच्या समकक्ष पर्याय उपलब्ध करून देऊन त्या दिशेनंच महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे.
shindemandar@yahoo.com
(लेखक शिक्षण अभ्यासक आहेत)
No comments:
Post a Comment