शिकून करायचंय काय?
घरचे सगळे लग्नकार्यासाठी बाहेरगावी निघाले की लहान मुलांपुढं धर्मसंकट उभं रहायचं. शाळा बुडेल म्हणून येणार नाही असं म्हणायची सोय नव्हती. शिकून लय मोठा कलेक्टर/बॅलिस्टर होनारेस काय? असा प्रश्न तयार असायचा. खूप जास्त (अर्थात खूप वर्षं) शिकत गेलं की, बॅरिस्टर किंवा कलेक्टर होता येतं एवढंच त्यावेळी कळायचं.
इंजिनियरिंगला प्रवेश मिळाला की घराण्याचा उद्धार (चांगल्या अर्थानं) झाल्यागत ट्रीटमेंट मिळायची. गणित चांगलं पाहिजे इंजिनियरिंगसाठी, अशी धमकी शाळेपासूनच दिली जायची. गणित विषय कच्चा ठेवला तर इंजिनियरिंगपासून वाचता येईल, अशा भ्रमात असलेल्यांवर कुणीतरी नवीनच बॉम्ब टाकून जायचं… पोराचं ड्रॉईंग चांगलं आहे, इंजिनियरिंगला घाला, असा सल्ला देणारे भेटायचे. दोन डोंगरांच्या मधोमध उगवणारा हसरा सूर्य, त्याच्या गळ्यातून पाझरणारी नदी, त्या नदीच्या काठावर नारळाचं झाड आणि झाडाखाली कौलारु घर, ह्या असल्या ‘ड्रॉईंग’चा इंजिनियरिंगशी संबंध लावणारे उपदेशक भेटले की धन्य धन्य वाटायचं.
पुन्या-मुंबैला चार-पाच वर्षं नोकरीत घालवली की गावाकडं आल्यावर ठरलेले प्रश्न आदळायचे. कौन बनेगा करोडपती जणू… पहिला सवाल, पगार किती वाढला? दुसरा सवाल, पर्मनंट झाला का? आणि तिसरा सवाल, मॅनेंजर कधी होनार?
बॅरिस्टर, कलेक्टर, इंजिनियर, आणि मॅनेजर… करियर मोजायची मापं होती मागच्या पिढीपर्यंत तरी. किलोग्रॅम, मिलीग्रॅम, सेंटीग्रॅम ह्यासारखी. आधी बीएस्सी बीकॉम करुन डीबीयम करायचे किंवा नुसत्या अनुभवाच्या आधारावर मॅनेंजर व्हायचे. मग डायरेक्ट मॅनेंजरच बनवनारी यम्बीए डिग्री आली. उगंच हिकडं-तिकडं वेळ घालवायला नको. डिग्री घेतली की थेट मॅनेंजरची खुर्ची, केबिन, गाडी, वगैरे वगैरे.
प्रत्यक्ष फील्डवर काम करनारे ऑप्रेटर क्याटेगरीत मोडतात (खरोखर मोडतात). धंद्यात पैसा गुंतवनारे मालक किंवा डायरेक्टर म्हनून वळखले जातात. मालकाच्या मर्जीनुसार ऑप्रेटरकडून काम करुन घेनाऱ्यांची मॅनेंजर नावाची जात निर्मान झाली. प्लॅनिंग करायचं, त्यानुसार काम होतंय का बघायचं, झालं तर बक्षिस मिळवायचं, नाही झालं तर रिपोर्टमधे कारण लिहून कळवायचं. मालकाएवढी रिस्क नाही आणि ऑप्रेटरएवढे कष्ट नाहीत. मला सांगा, सुख म्हणजे आणखी काय असतं?
पण कहानीमधे नवा ट्विस्ट आला. सॉरी, कॉम्प्युटर आला. मागोमाग ढीगभर सॉफ्टवेअर आणि इंटरनेट आले. एक माणूस सात दिवसांत एक भिंत बांधतो, तर एका दिवसात भिंत बांधायला किती माणसं लागतील? असा प्रश्न कॉम्प्युटरला विचारा. तुम्हाला फक्त माणसांचा आकडा मिळेल काय? नाही! मागच्या पाचशे वर्षांत जगभरात बांधलेल्या भिंतींची उंची, खपलेल्या विटा आणि सिमेंट, रुपये पैसे डॉलर युरोमध्ये एकूण खर्च, सरासरी वेळ आणि भिंतींचं आयुष्य, ज्ञानेश्वरांनी चालवलेल्या भिंतीपासून चीननं बांधलेल्या आणि जर्मनीनं पाडलेल्या भिंतींपर्यंत सगळा इतिहास, भूगोल, गणित, सामान्य विज्ञान, असामान्य अर्थशास्त्र आणि अतिसामान्य नागरिकशास्त्र आपल्यासमोर सादर करणारा अल्लाउद्दीनच्या दिव्यातला राक्षस जन्माला आला आणि त्यानं मॅनेंजर जातीचं आयुष्य कुरतडायला सुरुवात केली.
भविष्यात करायच्या कामाचं नियोजन, त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा अंदाज, चालू कामावर देखरेख, झालेल्या कामाचं रिपोर्टींग, ह्या सगळ्या गोष्टी कॉम्प्युटरच करायला लागलाय. इमारतीपासून गाडीपर्यंत सगळ्यांचं डिझाईन फट् म्हणता समोर हजर! रोगाची लक्षणं टाईप केली की औषधांची यादी तयार. गुन्हा सांगितला की पीनल कोडमधली कलमं सांगणार आणि त्यातून पळून जायच्या वाटासुद्धा तोच सांगणार. जन्मतारीख आणि वेळ सांगितली की कुंडलीसुद्धा काढून देणार. इंजिनियरपासून भटजीपर्यंत सगळ्यांच्या पोटावर पाय देणारा वामनाचा अवतारच जणू…
अक्षर चांगलं येण्यासाठी दुरेघी, चौरेघी वह्यांमध्ये बालपण पिळून वाळत घातलं जायचं. आता चेकवरसुद्धा सही करायची गरज नाही, कार्ड स्वाईप करायचं नाहीतर ऑनलाईन ओटीपी टाकायचा. आयुष्यातली कोवळी वर्षं झिजवून घडवलेलं मोत्यासारखं अक्षर आता दाखवायचं कुणाला आणि कुठं? इंग्रजीतला धडा मराठीत आणि मराठीतला इंग्रजीत करायला शिकलेल्यांनी गुगल ट्रान्सलेटला कुठं गाठून प्रश्न करावा, “तुम मुझे पहले क्यूँ नहीं मिले?”
वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत ज्यांच्या गल्लीत वीस घरांमधे मिळून एक लॅन्डलाईन होता, त्यांनी चाळीशी गाठेपर्यंत माणशी किमान एक स्मार्टफोन हातात आलेला बघितला. तंत्रज्ञानाचा वेग म्हणतात त्यो ह्यालाच काय? मग ह्या रोज बदलणाऱ्या तंत्रज्ञानाला आवरु शकेल, सावरु शकेल, असे बदल आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये होताना दिसतायत का?
वर सांगितलेली सगळी उदाहरणं पहिली ते दहावीपर्यंत शिकत असलेल्या पोरा-पोरींना दाखवू नका. इंजिनियर आणि मॅनेंजर व्हायला निघालेल्या तरुण पोरांपासूनसुद्धा लपवून ठेवा. कारण ही पिढी गपगुमान ऐकून घेणारी नाही, प्रश्न विचारणारी आहे. आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची तुमची-आमची कपॅसिटीच नाही. इथं आपलं आपल्याला कळंना झालंय, टेक्नॉलॉजी म्हंत्यात ती नेमकी कुठनं घुसली आणि कुठनं बाहेर आलीया.
तंत्रज्ञानाच्या वेगामुळं झीट येऊन पडले नाहीत असे काही विचारवंत अजून आपल्या आजूबाजूला शिल्लक आहेत. त्यांनी मागचा-पुढचा नीट अभ्यास करुन मत मांडलेलं आहे की, इथून पुढं एक तर लई वरचे जॉब शिल्लक राहतील नाहीतर एकदम खालचे. मधल्या लोकांचं काम संपलं. म्हणजे मालक आणि ऑप्रेटरची गरज इथून पुढं राहिली तरी मॅनेंजर नावाच्या मध्यस्थाचा टाईम औट झालेला आहे. मशीन तयार करणारा आणि मशीन चालवणारा, अशा दोनच प्रकारच्या लोकांची गरज इथून पुढं राहील. त्यामुळं नुसत्या इंजिनियरला काम मिळणं अवघड आहे. त्यानं एकतर इंजिनियर-कम-सायंटीस्ट व्हायचं, नाहीतर इंजिनियर-कमी-ऑप्रेटर-जास्त व्हायचं.
आज शाळेत आणि कॉलेजात शिकणाऱ्या देवाघरच्या फुलांना आपण हे निर्माल्याचं सत्य कधी दाखवणार आहोत? आपलं कोंबडं आरवलं नाही तरी त्यांचा सूर्य उगवणारच आहे. किमान आपण त्यांना वेळेवर सावध केल्याचं समाधान तरी पदरी पाडून घ्यायचं का नाहीच? गणित, पाढे, प्रमेय, सिद्धांत, हस्ताक्षर, भाषांतर, परीक्षा, मार्क, स्पर्धा, ऐडमिशन, ह्या चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूला आपण बाहेर काढायचा प्रयत्न करणार, की महाभारताची पुनरावृत्ती करत अजूनच त्याला घेरून टाकणार?
शिक्षणासाठी आजच्या आणि कालच्या पिढीनं अमाप कष्ट उपसले ही वस्तुस्थिती आहे. परवाची पिढी विचारायची, शिकून लय मोठा कलेक्टर होनारेस काय? आता उद्याची पिढी विचारेल, आम्ही शिकून नक्की करायचंय काय? वर्तुळ पूर्ण व्हायला लागलंय बहुतेक. अडचण एवढीच आहे की, आपण त्या वर्तुळाच्या आतमध्ये अडकलोय. टोकं जुळायच्या आधी आपल्याला उत्तर शोधलंच पाहिजे - शिकून नक्की करायचंय काय?
- मंदार शिंदे
०३/०३/२०२०
Mobile: 9822401246
E-mail: shindemandar@yahoo.com
Books on Amazon: https://www.amazon.in/dp/B089VKFWJ9
Hach sawal roj manat yeto uttam mandlays dada dhanyawad 😊
ReplyDelete