ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Monday, August 10, 2020

Funny Things Overheard in Recent Times

 सध्या कानावर पडणाऱ्या काही गप्पा-गोष्टी

(इंडिया डेव्हलपमेंट रिव्ह्यू वेबसाईट, ३ ऑगस्ट २०२०)


१. स्थळ - भाजीचं दुकान; वेळ - संध्याकाळी ५:३०

हो ना, वेबिनार सुरुच आहे अजून. पण मी बोलणार आहे त्याला आणखी अर्धा तास वेळ आहे, म्हणून मग मी बाहेर आले भाजी घ्यायला… रात्रीच्या जेवणाची सोय नको का करायला? मी कशावर बोलणार आहे? तेच गं, मागच्या आठवड्यातल्या वेबिनारमध्ये दिलं होतं तेच भाषण आहे. ‘कामाच्या ठिकाणी आणि घरामध्ये स्त्री-पुरुषांच्या कामातील समानता आणि असमानता.’ हो ना, हे वेबिनार लवकर संपलं तर बरं होईल. त्यानंतर मलाच जेवण बनवायचंय… राजीवचं माहित्येय ना तुला, त्याला तर साधा चहासुद्धा नाही बनवता येत.”


२. स्थळ - सोसायटीतलं गार्डन; वेळ - संध्याकाळी ६

अरे काय सांगू भावा, जॉब गेला ना माझा. काढूनच टाकलं मला डायरेक्ट… काय झालं म्हणून काय विचारतोस? माझं स्क्रीन शेअरिंग सुरुच राहिलं, माझ्या लक्षातच नाही आलं ते… माझ्या ब्राऊजरमध्ये उघडलेले सगळे टॅब दिसले ना त्यांना… बरं ते जाऊ दे आता, ‘रेफरन्स चेक’ न करता कुणी जॉब देणार असेल तुझ्या माहितीत, तर नक्की सांग बरं का मला.”


३. स्थळ - किराणा दुकान; वेळ - दुपारी १

मी काय म्हणतो… तुझ्या माहितीत असं कुठलं वायफाय कनेक्शन आहे का, ज्याचा स्पीड अगदी म्हणजे अगदी कमी असेल आणि जे काम करताना सारखं-सारखं मधे-मधे बंद पडत असेल?”


४. स्थळ - ऑनलाईन योगा क्लास; वेळ - सकाळी ७:३०

“…आणि त्या दिवशी काय झालं माहित्येय? माझ्या ऑफिसमधल्या एकीनं नवऱ्याला सांगितलं, ‘जरा बाळाला म्यूटवर टाकता का, माझी मिटींग सुरु आहे…’ बाई गं, लोक आता ‘झूम’च्याच भाषेत बोलायला लागलेत…”


५. स्थळ - ऑनलाईन गप्पांचा अड्डा; वेळ - संध्याकाळी ६:३०

खरं सांगू का, प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा मला हे व्हिडीओ कॉलच आवडायला लागलेत सध्या… कशामुळं? लोकांची नावंच लक्षात राहत नाहीत ना माझ्या, आणि समोर भेटलं की मग एकदम अवघडल्यासारखं होतं. व्हिडीओ कॉलमध्ये ती भानगडच नाही ना!”


६. स्थळ - सार्वजनिक उद्यान; वेळ - संध्याकाळी ७

मलाही कळतंय, विनाकारण घराबाहेर पडणं बरोबर नाही ते… पण काय करणार, माझ्या मांजरीला सवयच नाही ना मला पूर्ण वेळ घरात बघायची. वैतागून गेलीय बिचारी. मग मीच बाहेर पडले… म्हटलं जरा पाय मोकळे करून येऊ.”


७. स्थळ - चौपाटी; वेळ - सकाळी ६

फारच दानशूर उद्योगपती आहेत ते… मला परवा काळजीच्या स्वरात म्हणत होते, ‘ह्या कोविड-19 आजारामुळं सगळे भेदभाव गळून पडलेत, कोण गरीब कोण श्रीमंत, सगळ्यांना एकसारखं नुकसान सोसायला लागतंय…’ तुझ्या माहितीसाठी सांगतो, या शहरातली दोन मोठी हॉस्पिटल्स त्यांच्या मालकीची आहेत बरं का!”Original piece in English at https://idronline.org/overheard-in-the-social-sector
Share/Bookmark

No comments:

Post a Comment