ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Wednesday, August 5, 2020

Prestige for Labour


गप्पा श्रमप्रतिष्ठेच्या    'श्रमाला प्रतिष्ठा मिळायला हवी', 'कोणतेही काम हलक्या दर्जाचे नसते', 'श्रमाला सन्मान मिळायला हवा', अशा प्रकारची चर्चा आपल्याला नेहमी ऐकायला मिळते. पण श्रमप्रतिष्ठा म्हणजे नेमके काय आणि श्रमाला प्रतिष्ठा/सन्मान मिळवून देण्यासाठी नक्की काय करावे लागेल, याबद्दल फारसे (व्यवहार्य) उपाय सहसा सापडत नाहीत. श्रमाला प्रतिष्ठा का मिळत नाही, विशिष्ट प्रकारचे काम करायला माणसे तयार का होत नाहीत किंवा ठराविकच व्यवसायांचे आकर्षण बहुतेकांना का वाटत राहते, याबद्दल प्रामाणिक आणि वस्तुनिष्ठ विचार करायची गरज आहे, असे मला वाटते.

    माझ्या मते, खरोखर श्रमाला प्रतिष्ठा मिळवून द्यायची असेल, तर त्यासाठी 'कमी श्रमात जास्त पैसे' हे सूत्र बदलून, 'जितके जास्त पैसे हवेत तितके जास्त श्रम' हे सूत्र अंमलात आणावे लागेल.

    या ठिकाणी 'श्रम' या संकल्पनेकडे 'मोजता येणारा (मेझरेबल) घटक' या अर्थाने बघावे लागेल. अर्थातच मग शारीरिक श्रमाची किंमत तथाकथित बौद्धिक श्रमापेक्षा कित्येक पटींनी वाढेल. (कदाचित त्यामुळेच 'हुशार' लोकांकडून बौद्धिक श्रमाचे महत्त्व वाढवत नेले जाऊन शारीरिक श्रम दुय्यम ठरत गेले असावेत, असा एक अंदाज.)

    'श्रमाला सन्मान मिळायला हवा' असा आग्रह धरणाऱ्या 'श्रमजीवी' व्यक्तींपेक्षा 'बुद्धीजीवी' व्यक्तींची संख्या जास्त असावी, हा एक मोठा (व काहीसा विनोदी) विरोधाभास आहे, असे मला वाटते. याचे कारण म्हणजे, वर सांगितलेले सूत्र अंमलात आणायचे ठरवल्यास, बुद्धीजीवी व्यक्तिंचे उत्पन्न घटत जाऊन, श्रमजीवींच्या उत्पन्नात (व पर्यायाने प्रतिष्ठेत) वाढ होण्याची शक्यता असते. ही गोष्ट बुद्धीजीवींना पक्की ठाऊक असते व म्हणूनच हे सूत्र कधीही प्रत्यक्ष अंमलात येऊ शकत नाही (किंवा येऊ दिले जात नाही). मग 'श्रमाला प्रतिष्ठा मिळायला हवी' ही अपेक्षा अपराधीभावातून (गिल्टी फीलिंगमधून) जन्माला येत असावी का, असाही प्रश्न पडतो.

    श्रमाला प्रतिष्ठा का उरली नाही हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊ. समजा, मी एक हॉटेल चालवत असून माझ्याकडे दोन कुक काम करत असतील, तर त्यांनी पूर्ण वेळ पूर्ण श्रमाचे काम केल्याखेरीज माझ्या हॉटेलमध्ये पदार्थ तयार होऊ शकणार नाही. त्यामुळे हॉटेलच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा वाटा त्यांच्याकडे जाणे अपेक्षित आहे. परंतु, मी हॉटेलचा 'मालक' असल्याने मला प्रत्यक्ष शारीरिक श्रम न करता आणि माझ्या व्यवसायात गुंतवणूक करणाऱ्यांना शारीरिक किंवा बौद्धिक असे कोणतेही श्रम न करता, जास्तीत जास्त 'रिटर्न्स' अपेक्षित असतात. मग ज्यांच्यामुळे हा व्यवसाय चालतो, त्यांना सर्वांत कमी मोबदला दिला जातो. पर्यायाने, ते करत असलेल्या कामासाठी योग्य पात्रतेच्या, कुशल, व सक्षम व्यक्ती मिळणे कठीण होत जाते आणि अशा प्रकारे, संबंधित कामाला काहीच प्रतिष्ठा उरत नाही.

    मग 'मालक' म्हणून मला किंवा गुंतवणूक करणाऱ्या संबंधितांना व्यवसायाच्या उत्पन्नाचा काहीच वाटा मिळू नये का? याचे उत्तर 'होय' किंवा 'नाही' असे देता येणार नाही. जर त्या दोन कर्मचाऱ्यांपैकी एकाच्या जागी मी स्वतः उभे राहून काम करणार असेन, तर मलाही समान मोबदला नक्कीच मिळू शकतो. किंवा पैशाची गुंतवणूक करणाऱ्यांना 'रिटर्न्स' देण्याआधी श्रमाची गुंतवणूक करणाऱ्यांना योग्य मोबदला मिळण्याची खात्री मी करून दिली पाहिजे.

    माझे विचार कदाचित साम्यवादाच्या जवळ जाणारे वाटू शकतील. परंतु 'श्रमाला सन्मान मिळायला हवा' हादेखील साम्यवादी विचारच आहे, असे मला वाटते. जोपर्यंत श्रमाला योग्य आर्थिक मोबदला मिळत नाही, तोपर्यंत श्रमाला प्रतिष्ठा मिळणे शक्य नाही. (जसे, स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त होत नाही तोपर्यंत स्त्रीमुक्तीची संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकत नाही.)

    कोणत्याही माणसाला नैसर्गिकपणे कमी कष्टात जास्त मोबदला मिळवावासा वाटणे साहजिक आहे. तशा असंख्य संधीदेखील जागतिकीकरण आणि खुल्या बाजारपेठेच्या आजच्या व्यवस्थेमध्ये, अक्कलहुशारी वापरून शोधता येतात. परंतु रिझर्व्ह बँकेने किती नोटा छापायच्या याला मर्यादा असल्यामुळे, एकाला जास्त पैसे मिळणार असतील तर दुसऱ्याला कमी पैसे मिळणार हे सरळ गणित आहे. मग आयुष्यभर खूप कष्ट करत बसण्यापेक्षा अक्कलहुशारी वापरून पटकन कमी श्रमाच्या संधी शोधायला सुरुवात होते. म्हणजेच, श्रमाची प्रतिष्ठा कमी होत जाते.

    दुसरीकडे, वाढत्या लोकसंख्येमुळे एकाच प्रकारचे काम करायला अनेक माणसे उपलब्ध होत जातात. कमी लोकसंख्येच्या प्रदेशात (किंवा कोविड-१९ लॉकडाऊनसारख्या परिस्थितीत) घरगुती श्रमाची कामे करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्धच होत नसेल, तर प्रत्येकाला आपल्या रोजच्या चोवीस तासांमधून ठराविक वेळ आणि श्रम खर्च करून धुणी-भांडी, स्वच्छता, स्वयंपाक, अशी कामे करावीच लागतात. पण खूप मोठी लोकसंख्या अशी श्रमाची कामे करण्यासाठी उपलब्ध होत असेल, तर डिमांड आणि सप्लायच्या सूत्रानुसार त्यांना मोबदलाही कमी मिळतो आणि त्या कामांना प्रतिष्ठाही उरत नाही. ज्या ठिकाणी अशी कामे करण्यासाठी बाहेरून मदतनीस येत नसतील, त्या घरांमधील समस्त स्त्री-वर्ग विना-मोबदला हे श्रम करत राहतो. कर्तव्य, जबाबदारी, प्रेम, सेवावृत्तीच्या नावाखाली स्त्रियांनी केलेल्या श्रमांना प्रतिष्ठा मात्र मिळत नाही. तीच कामे पुरुषांना करावी लागली की आपोआप त्या श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त होताना दिसते. (उदाहरणार्थ, घरातील पुरुष माणसाने एक दिवस स्वयंपाक केला किंवा भांडी घासली, तर त्याचे फोटो सोशल मिडीयावर टाकले जातात व या श्रमाचे कौतुक केले जाते. स्त्रीने रोज या कामाचे फोटो टाकले तर तसेच कौतुक केले जाईल का, हा प्रश्न स्वतःला विचारून पहावा.)

    शारीरिक श्रमाच्या कामात कौशल्य कमी आणि अंगमेहनत जास्त लागते असा एक सर्वसाधारण समज असल्यामुळे, औपचारिक शिक्षण, डिग्री, ट्रेनिंग वगैरे न घेऊ शकलेले असंख्य लोक कोणतेही अंगमेहनतीचे काम करायला तयार होतात. उदाहरणार्थ, 'शिकला नाहीस तर वाण्याच्या दुकानात पुड्या बांधायला लागतील,' असे लहानपणापासून मुलांना ऐकवले जाते. किंवा 'शिकली नाहीस तर काय धुण्या-भांड्याची कामे करणार आहेस का,' असे (खास करून मुलींना) विचारले जाते. किंवा 'एवढे शिक्षण घेऊन शेवटी काय हॉटेलच टाकलेस ना,' अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. म्हणजेच, वाण्याच्या दुकानात काम करणे, कपडे धुणे, भांडी घासणे, जेवण बनवणे व वाढणे, ही कामे कमी दर्जाची, नाईलाज म्हणून करण्याची, आणि कोणत्याही कौशल्य किंवा प्रशिक्षणाची गरज नसलेली कामे आहेत, हे लहानपणापासून मनावर बिंबवले जाते. उलट, 'शिकून मोठ्ठा साहेब हो, कलेक्टर हो, ऑफिसर हो, डॉक्टर हो, इंजिनियर हो,' वगैरे आशीर्वाद दिले जातात किंवा तशी स्वप्ने मुलांच्या डोळ्यांत पेरली जातात. थोडक्यात, जास्त श्रम करत बसणारा माणूस अपयशी आणि कमी श्रमात जास्त पैसे कमावणारा माणूस यशस्वी अशी श्रमप्रतिष्ठेच्या विपरित मांडणी केली जाते.

    अनेकदा सेलिब्रिटी, फिल्म स्टार, राजकारणी व्यक्ती, खेळाडू, यांची उदाहरणे डोळ्यांसमोर ठेवली जातात, त्यांना 'रोल मॉडेल' बनवले जाते. त्यांच्याप्रमाणे, वर्षातून एक-दोन फिल्म्स करून, राजकारण 'खेळून' किंवा खरोखर मैदानात काही सामने खेळून खूप पैसा कमावता येतो, असा एक सर्वसाधारण (गैर)समज बाळगला जातो. प्रत्यक्षात, या सेलिब्रिटींची उत्पन्नाची साधने दिसतात त्यापेक्षा वेगळी असू शकतात. हॉटेल किंवा दुकान चालवणे, काही उत्पादने बनवून विकणे, किंवा आपापल्या कौशल्यांच्या, ओळखींच्या, गुंतवणुकीच्या आधारे निरनिराळे उद्योग हे लोक करत असतात. (आत्ता कोविड-१९ लॉकडाऊनमध्ये काही सेलिब्रिटींच्या उत्पन्नाचे समांतर स्रोत लोकांसमोर आले आहेत.) परंतु, सर्व सेलिब्रिटी आपले सर्व उद्योग उघड करत नसल्यामुळे, त्यांच्या एकाच मुख्य सेलिब्रिटी उद्योगाकडे (अभिनय, खेळ, राजकारण) कमी वेळात आणि कमी श्रमात खूप पैसे देणारा व्यवसाय म्हणून बघितले जाते आणि त्यांना जमले तर आपणही प्रयत्न करू, अशा भाबड्या आशेमुळे पुन्हा श्रमाची प्रतिष्ठा कमी-कमी होत जाते.

    आम्ही आमच्या बुद्धीच्या जोरावर, विशेष कौशल्य प्राप्त करून 'प्रगती' केली, प्रमोशन मिळवले, पगारात वाढ करून घेतली, 'हाताखाली' माणसे नेमली, या सर्व संकल्पना 'श्रमप्रतिष्ठे'च्या संकल्पनेला छेद देणाऱ्या आहेत. एक व्यक्ती दोन हात, दोन पाय, दोन डोळे, एक तोंड, आणि एक मेंदू वापरून चोवीस तासांमध्ये किती काम करू शकते, याला निश्चित मर्यादा आहेत. 'श्रमप्रतिष्ठे'च्या प्रेमापोटी 'जितके श्रम तितका पैसा' हे सूत्र अंमलात आणले, तर या मर्यादेबाहेर कुणालाही पैसे कमावता येणार नाहीत. दुसऱ्या व्यक्तीने माझ्या 'हाताखाली' किंवा माझ्या'साठी' काम करणे, म्हणजे त्यांचे चोवीस तासांचे श्रम माझ्या नावावर करण्यासारखे आहे. मग मी त्या मोबदल्यात (मला परवडेल इतका) उत्पन्नाचा वाटा त्यांना देतो. यातून माझ्या व त्यांच्या उत्पन्नातील दरी वाढत जाते, ते अजून अजून श्रम करत राहतात आणि माझ्या उत्पन्नात (आणि पर्यायाने प्रतिष्ठेत) अजून अजून भर पडत जाते. मग 'श्रमाला प्रतिष्ठा मिळावी' हे स्वप्न स्वप्नच राहते.

    मल्टी-लेव्हल मार्केटींग (एमएलएम) किंवा 'घरबसल्या पैसे कमवा' अशा स्कीम्स यशस्वी आणि लोकप्रिय का होतात, हे वरील विश्लेष्णावरून लक्षात येईल. शेअर मार्केटमध्ये एखाद्या आयटी कंपनीत गुंतवणूक करण्याची हुशारी दाखवणाऱ्या व्यक्तीला घरी बसून पैसे मिळत राहणार असतील, किंवा वडिलोपार्जित मालमत्तेचे भाडे दर महिन्याला बँक अकाउंटमध्ये जमा होत राहणार असेल, किंवा 'कल्पना' सुचवणाऱ्या सल्लागाराला काही तासांसाठी काही हजार रुपये मिळणार असतील पण तीच कल्पना अंमलात आणणाऱ्यांना त्या तुलनेत कमी पैसे मिळत राहणार असतील, तर 'श्रमप्रतिष्ठा' हा फक्त चर्चेचा (आणि फॅण्टसीचा) विषय राहील, यात शंका नाही. एक तर आपण वस्तुस्थितीचा प्रामाणिकपणे स्वीकार करून 'खरोखर' श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी (प्रसंगी आपल्या पायावर धोंडा मारून घेण्याची तयारी ठेवून) प्रयत्न करावेत, किंवा 'श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे' यावरची पोकळ चर्चा थांबवावी, असे मला वाटते.- मंदार शिंदे

०५/०८/२०२०


Mobile: 9822401246

E-mail: shindemandar@yahoo.com

Blog: http://aisiakshare.blogspot.com

Books on Amazon: http://amazon.com/author/aksharmannShare/Bookmark

No comments:

Post a Comment