व्हॉट्सॲपवर टाईप करताना महत्त्वाचा मजकूर 'बोल्ड' किंवा 'इटॅलिक' कसा करायचा याबद्दल शक्यतो सगळ्यांना माहिती असतेच. विशिष्ट शब्दाच्या किंवा पॅराग्राफच्या मागे आणि पुढे (*) किंवा (_) अशी चिन्हे टाईप करून अपेक्षित फॉरमॅटींग साध्य करता येते.
पण नेहमीच्या फॉरमॅटपेक्षा एका वेगळ्या फॉरमॅटमध्ये व्हॉट्सॲपवर मेसेज बनवता येतो हे तुम्हाला माहिती आहे का? नक्की काय वेगळेपण आहे यात?
हा एक वेगळा 'मोनोस्पेस' फॉरमॅट आहे. यात प्रत्येक अक्षराला एकसमान जाडी ठरवून दिली जाते. दर दोन शब्दांच्या मधे एका अक्षराएवढी स्पेस सोडली जाते. स्टँडर्ड फॉरमॅटमधे कुणी जाडा असतो तर कुणी सुकडा. दोन शब्दांच्या मधली स्पेससुद्धा फक्त दोन शब्द वेगळे दाखवण्यापुरती असते.
व्हॉट्सॲपवर बोल्ड लेटर्ससाठी जसे स्टार (*) चिन्ह टाईप करतो, तसेच मोनोस्पेससाठी पॅराग्राफच्या सुरुवातीला आणि शेवटी (`) हे टिकलीसारखे चिन्ह तीन वेळा टाकायचे.
हे चिन्ह अवतरण चिन्हापेक्षा (') वेगळे आहे. नेहमी वापरात नसल्याने पटकन सापडत नाही. शक्यतो (~) आणि (।) अशा पाहुण्या कलाकारांसोबत निवांत बसलेले असते. कामाच्या वेळी त्याला शोधून आणावे लागते.
उदाहरणार्थ, व्हॉट्सॲपमध्ये खालीलप्रमाणे टाईप करून बघा -
Standard Format
```Monospace Format```
मराठीत हा फॉरमॅट वापरल्यावर फक्त दोन शब्दांच्या मधली स्पेस मोठी होते. इंग्रजी फॉन्ट मात्र पूर्ण वेगळा दिसतो. सगळ्यात मोठा फरक इंग्रजी 'आय' अक्षराच्या बाबतीत दिसतो.
व्हॉट्सॲपमध्ये असे टाईप केल्यावर तुम्हाला हा फरक लक्षात येईल -
India (Standard)
```India``` (Monospace)
Illegal (Standard)
```Illegal``` (Monospace)
यामुळे 'एल' आणि 'आय' या अक्षरांमधे कन्फ्युजन होत नाही.
आपले व्हॉट्सॲप मेसेज इतरांपेक्षा वेगळे दिसावेत असे वाटत असेल तर नक्की हा (`) टिकलीवाला मोनोस्पेस फॉरमॅट वापरून बघा. खास करून, ग्रुपवर खूप लोक आपापली 'बदके पिल्ले अनेक' सोडत असताना तुमचे एखादेच 'कुरूप वेडे' पिल्लू (मेसेज) नक्कीच उठून दिसेल.
पण हा मेसेज ग्रुपवरच फॉरवर्ड झाला तर मात्र सगळ्यांना ही युक्ती समजेल हेसुद्धा लक्षात राहू द्या...
- मंदार शिंदे
११/०७/२०२०
Mobile: 9822401246
E-mail: shindemandar@yahoo.com
Blog: http://aisiakshare.blogspot.com
Books on Amazon: http://amazon.com/author/aksharmann
No comments:
Post a Comment