नाट्यछटा म्हणजे नाटकातला एक प्रसंग नव्हे. नाट्यछटा म्हणजे स्वगत नव्हे. नाट्यछटा म्हणजे एकपात्री प्रयोगसुद्धा नव्हे. स्वप्नरंजन नव्हे किंवा 'मी पंतप्रधान झालो तर' टाईप निबंध नव्हे.
एकाच पात्रानं दुसऱ्या पात्राशी (किंवा पात्रांशी) साधलेला संवाद म्हणजे नाट्यछटा. पण ही दुसरी पात्रं अदृश्य असतात आणि एकाच पात्राच्या बोलण्यातून पूर्ण संवादाचा आभास निर्माण केला जातो. लिहायला अवघड पण वाचायला-बघायला भारी प्रकार असतो.
नाट्यछटा
काळजी
(पात्रः साधारण वीस ते पंचवीस वर्षे वयाची मुलगी)
कसंय ना मावशी, मला तुमची खूपच काळजी वाटते. तुमची म्हणजे तुझी, आत्याची, काकूची, मामीची, वहिनीची आणि आईची सुद्धा… कशाबद्दल? तुम्हाला सगळ्यांना माझी कित्ती काळजी वाटते, याचा विचार करून मलाच तुमची काळजी वाटायला लागलीय बघ... नाही समजलं? आता हेच बघ ना, मी लहान होते तेव्हा कधी मोठी होणार याची काळजी; आता मोठी झाले तर माझं शिक्षण कधी संपणार याची काळजी; शिक्षण संपेपर्यंत लग्नाची काळजी; लग्न होत नाही तोवर मुलं कधी होणार याची काळजी… बाप्रे! मला तर हे बोलतानासुद्धा धाप लागली बघ. आणि तुम्ही सदान्कदा यावरच चर्चा करताना कशा काय दमत नाही हाच प्रश्न पडतो मला... अगं हो, माहित्येय मला, तुम्ही नाही करणार तर कोण करणार माझी काळजी? पण मी काय म्हणते, तुम्हाला आधीच स्वतःच्या काळज्या कमी आहेत का? स्वतःच्या म्हणजे आपापल्या मुला-बाळांच्या... हो हो, मीसुद्धा तुला मुलीसारखीच आहे. मान्य आहे ना… पण तुझ्या स्नेहलला तीन वर्षांचा कोर्स पूर्ण करायला चार वर्षं लागली, याची काळजी कमी होती का तुला? नाही, तशी मीनाआत्यापेक्षा कमीच म्हणायची तुझी काळजी… तुला नाही सांगितलं तिनं? अगं तिचा दिनेश… तीन वर्षं अडकून राहिला ना सेकन्ड इयरमधे… शेवटी सुटला म्हणतेस? छे गं, कसला सुटतोय तो! सिलॅबसच बदलला त्याच्या कोर्सचा, मग कॉलेजनं परत ऐडमिशन घ्यायला सांगितली. तेव्हापासून कॉलेजचं तोंड नाही बघितलं त्यानं… अय्या, तुलापण हेच सांगितलं का आत्यानं? त्याला डिग्री मिळाली म्हणून? वाटलंच मला! आता तूच सांग, तिच्यापुढं हा एवढा काळज्यांचा डोंगर उभा असताना तिनं माझी काळजी करायची काही गरज आहे का? काय केलं विचारू नकोस… आईला म्हणाली, प्रियाला डिग्रीचा अभ्यास झेपत नसेल तर पटकन लग्न उरकून टाका. लग्नानंतर मिळवेल हळू-हळू डिग्री, चार-पाच वर्षांत… बिच्चारी! मी नाही गं, मीनाआत्या. कित्ती काळजी करते माझी… बरं, तिचं जाऊ दे, ती स्वतः कधी गेली होती कॉलेजला? पण शोभाकाकूचं काय, ती तर स्वतः शिकलेली आहे ना? हो हो, तिची कोमल झाली ना इंजिनियर… नाही नाही, चारच वर्षं लागली तिला. राधामामीच्या राहुलसारखी सहा वर्षं लागली असती तर खचलीच असती… कोमल नाही गं, शोभाकाकू! तिचं प्लॅनिंग कसं पर्फेक्ट असतं ना एकदम. जरासुद्धा इकडं-तिकडं झालेलं चालत नाही तिला. आईला म्हणाली, पंचवीशीच्या आत मुलींची लग्नं झालीच पाहिजेत, म्हणजे तिशीच्या आत दोन मुलं पदरात! …मला तर ऐकूनच टेन्शन आलं बघ. नाही नाही, मी अजून पंचवीसच्या आतच आहे गं, पण तिची कोमल सरकली ना तिशीकडं… आधी म्हणाली, जॉब करायचाय, मग म्हणाली, अजून शिकायचंय… कलेक्टरच व्हायचंय म्हणे तिला आता. होऊ दे बिचारी! पण तिशीच्या आत दोन मुलं नाही झाली, तर शोभाकाकूच्या प्लॅनिंगचं काय? बघ, आहेत की नाही प्रत्येकाला स्वतःच्या काळज्या? तरी माझी अजून काळजी करायची असते तुम्हाला… अगं, तू कुठं निघालीस गडबडीनं? तुमच्या सगळ्यांचे सल्ले ऐकून-ऐकून आई मला काय म्हणाली ते सांगायचं राहिलंय अजून… नको, पुढच्या वेळी कशाला? आत्ताच ऐकून जा ना… पुढच्या वेळी दीपावहिनीची काळजी का वाटते त्याबद्दल सांगेन सविस्तर… नाहीच का थांबता येणार? ठीकाय मग… ए आई, मावशी निघालीय बघ गडबडीनं… नाही नाही, गेलीसुद्धा बाहेर. पोहोचली असेल आता निम्म्या वाटेत… मी कशाला घालवतीये तिला? गेली बिचारी स्वतःच उठून. काळजीच वाटते मला तुमची सगळ्यांची…
© मंदार शिंदे
२३/०७/२०२०
Mobile: 9822401246
E-mail: shindemandar@yahoo.com
Blog: http://aisiakshare.blogspot.com
Books on Amazon: http://amazon.com/author/aksharmann
No comments:
Post a Comment