जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद...
दुःखाला आधार नको का? तेहि कधीतरी येते
दोस्त होऊनी हातच माझा अपुल्या हाती घेते,
जो जो येईल त्याचे स्वागत, दार न कधीही बंद
जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद...
झाडाची झुलणारी फांदी कधी लावणी भासे
साधा कोरा कागदही कधी चंद्र होऊनी हासे,
सर्वत्रच तो बघतो धुंदी, डोळे ज्याचे धुंद
जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद...
कधी कुणाचे आसू पुसता बोटांनी हळूवार
हात होतसे वाद्य : सुरांचे पाझरती झंकार,
प्रेमाच्या या गाण्यासाठी प्रेमाचा हा छंद
जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद...
- कवी मंगेश पाडगांवकर
SUNDER
ReplyDelete