ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Monday, July 25, 2011

साहिर आणि जादू

('नया ज्ञानोदय' या हिंदी मासिकासाठी गुलजार, 'मेरे अपने' नावाचा स्तंभ लिहितात. जानेवारी २०११ च्या अंकात त्यांनी साहिर लुधियानवी आणि जावेद अख्तर यांच्या आठवणी लिहिल्या होत्या. त्या लेखाचा मी केलेला मराठी अनुवाद - मंदार शिंदे 9822401246)
साहिर आणि जादू

ही साहिरच्या अंत्ययात्रेपूर्वीची गोष्ट आहे.
मी गोष्ट 'जादू'ची सांगतोय, पण संदर्भ साहिर लुधियानवींचा आहे.
जादू आणि साहिरचं नातं मोठं विचित्र होतं. जादू हे जावेद अख्तरचं टोपणनाव. एकदम शायराना अंदाज... आख्खं खानदानच असं. बाप जाँ निसार अख्तर. मामा मजाज आणि आता सासरे कैफी आझमी.
बापाबद्दल आदर कधीच नव्हता त्याला. कसलातरी राग होता. नाराजी होती त्याच्या नसानसांत. आपल्या बापाविरुद्ध. आई जिवंत असताना कसाबसा सहन करायचा. पण ती गेल्यावर, छोट्या-छोट्या गोष्टींवर घर सोडून बाहेर पडायचा आणि सरळ साहिरच्या घरी जाऊन पोहोचायचा. त्याचं तोंड बघूनच साहिरना समजून जायचं की परत बापाशी भांडून आलाय. पण ते अजिबात त्यावर बोलत नसत. त्यांना ठाऊक होतं पहिलं तर जादू भडकून उठेल आणि मग रडायला लागेल. दोन्ही परिस्थितींत त्याला सांभाळणं कठीण होतं.
थोडी उसंत घेऊन ते म्हणत, “जादू, चल ये, नाष्टा करुन घे.”
आणि मग नाष्टा करता-करता जादू स्वतःच भडभडून बोलायला लागायचा आणि तो बिघडलेला दिवस त्यांच्याकडंच घालवायचा. पण कधी-कधी काय व्हायचं, साहिर त्याला सावध करायचे, “अख्तर येतोय. दुपारच्या जेवणाला.”
जादू मान वर करुन पहायचा, इथंही चैन नाही. त्याला वाटलं तर तो साहिरसमोरच बोलला असता, “हा बाप, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी. का?”
जादू मुलगा होता जाँ निसार अख्तर चा, पण स्वभावानं आपल्या मामावर, मजाज वर गेला होता. अतिशय भावूक आणि भयंकर तापट... साहिरनी त्याला मुलासारखं पोसलं आणि मित्रासारखं सांभाळलं. साहिर म्हणत, “जादू, 'ऐरोज'ला मस्त पिक्चर लागलाय यार. काय बरं नाव... जा जाऊन बघून ये...”
आणि अशा प्रकारे ते बाप-लेकाचं समोरासमोर येणं टाळत. मोठं विलक्षण नातं होतं, साहिर आणि जादूचं.
एकदा तो साहिरच्या घरातूनही निघून गेला.
तुम्हीच जास्त डोक्यावर चढवून ठेवलंय माझ्या बापाला.”
साहिरना हसू आलं. त्यावर जादू म्हणाला, “माझा बाप पण असाच हसतो माझ्यावर. मला नकोय कुणीच. ना तो ना तुम्ही.” आणि भांडून घरातून निघून गेला.
काही दिवस गायब झाला. अतिशय स्वाभिमानी. कुठं झोपायचा, कुठं खायचा, कुणास ठाऊक.
माल साहेबांच्या, कमाल अमरोहींच्या प्रॉडक्शन मॅनेजरशी दोस्ती होती. संध्याकाळ त्याच्यासोबतच घालावायचा आणि रात्री तिथंच स्टुडिओ मध्ये, प्रॉडक्शन स्टोअर मध्ये झोपून जायचा. अशा स्टोअरमध्ये जिथं सगळ्या प्रकारचं प्रॉडक्शनचं सामान पण भरुन ठेवलेलं होतं. मीना कुमारीच्या दोन फिल्म फेअर अवॉर्डच्या ट्रॉफी पण पडल्या होत्या तिथं. हा पठ्ठ्या आरशासमोर उभा राहून स्वतःला ट्रॉफी सादर करायचा, मग ती ट्रॉफी स्वतःच स्वीकारायचा, मग उपस्थितांच्या वतीनं टाळ्या पण वाजवायचा, आणि मग कमरेत झुकून लोकांना अभिवादनही करायचा. जादूनं एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की जवळपास रोज, झोपण्यापूर्वी तो अशी रिहर्सल करायचा. बरेच दिवस काढले त्यानं स्टुडिओमध्ये.
त्यानंतर जेव्हा साहिरच्या घरी दिसला तेव्हा चेहरा उतरला होता, तोंड सुकलं होतं. साहिरनी प्रेमानं बोलावलं पण जादूचा राग अजून गेला नव्हता.
फक्त आंघोळीसाठी तुमचं बाथरुम आणि साबण वापरायचाय. तुमची काही हरकत नसेल तर.”
जरुर.” साहिरनी परवानगी दिली आणि म्हटलं, “काहीतरी खाऊन घे.”
खाईन कुठंतरी. तुमच्याकडं खायचं नाहीये मला.”
आंघोळ करुन आला तर साहिर, ड्रेसिंग टेबलवर शंभरची नोट समोर ठेऊन, उगाचच आपल्या केसांतून कंगवा फिरवत बसले होते. खरं तर, मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव करत होते, जावेदला कसं म्हणावं शंभर रुपये ठेव म्हणून. जावेदच्या स्वाभिमानी बाण्याची भीतीही वाटे आणि आदरही. अखेर घाबरत-घाबरत बोलून टाकलं.
जादू, हे शंभर रुपये ठेव. मी घेईन तुझ्याकडून.”
शंभर रुपये त्या जमान्यात खूप मोठी रक्कम होती. शंभरची नोट मोडायची तर लोक बँकेत जात, किंवा पेट्रोल पंपावर.
जादूनं नोट अशी घेतली की जणू साहिरवर उपकारच करतोय,
ठेवून घेतोय. परत करेन. पगार होईल तेव्हा.”
जावेद, शंकर मुखर्जींकडं असिस्टंट म्हणून लागला होता जिथं त्याची ओळख सलीम खानशी झाली. खूप कमावलं त्यानंतर त्यानं. दारु प्यायचा मामासारखी आणि पिऊन बापावर राग काढायचा, साहिर स्टाइलनं. पण ते शंभर रुपये त्यानं कधी परत नाही दिले. हजारो कमावले, मग लाखोही आले, पण नेहमी हेच म्हणायचा साहिरना,
तुमचे शंभर रुपये तर मी गडप केले.”
आणि साहिर पण नेहमी म्हणत, “ते तर मी तुझ्याकडून वसूल करेनच बेट्या...!”
ही छेड-छाड, साहिर आणि जादू मध्ये अखेरपर्यंत चालू रहिली, आणि दोस्ती अखंड कायम राहिली.
साहिरचा खूप मोठा मित्रपरिवार तर नव्हता, पण ते माणसांत रमायचे, आणि संध्याकाळची पिऊन झाली की कित्येकांची ऐशी-तैशी करुन टाकायचे. जेव्हा कृष्णचंद्रवाल्या घरी होते, तेव्हा त्यांचे जुने स्नेही ओम प्रकाश अश्क बरीच वर्षं त्यांच्यासोबत राहिले. एकदा माझ्यादेखतच अश्क साहेब म्हणाले होते पंजाबीतून,
साहिर, दारु पिल्यावर तू शिवीगाळ का करायला लागतोस?”
साहिरनी पंजाबीतच उत्तर दिलं होतं, “दारु सोबत चकना पण पाहिजे ना यार.”
साहिरच्या मित्रमंडळीमध्ये एक डॉक्टर कपूर पण होते, जे स्वतः हृदयरोगी होते, पण साहिरचे डॉक्टर. साहिर म्हणत असत, “कपूर, मी तुला बघायला येऊ, की स्वतःला दाखवायला येऊ!”
त्या संध्याकाळी... त्या अखेरच्या संध्याकाळीही असंच झालं. दरम्यानच्या काळात, साहिरनी स्वतःचं घर बांधलं होतं. 'परछाइयाँ'. डॉ. कपूर वर्सोव्याच्या एका बंगल्यात जाऊन राहिले होते. जादू एक प्रचंड यशस्वी रायटर बनला होता. त्या संध्याकाळी साहिर, डॉ. कपूरना बघायला गेले होते. निरोप आला होता की त्यांची तब्येत ठीक नाही. हार्ट स्पेशलिस्ट डॉ. सेठ त्यांना बघायला येणार होते. बहुतेक रामानंद सागर पण होते तिथं. किंवा नंतर आले असतील. साहिरनी कपूरांच्या करमणुकीसाठी पत्ते मागवले आणि त्यांच्याच बिछान्यात बसून खेळू लागले. पत्ते वाटता-वाटता अचानक डॉ. कपूरनी पाहिलं, साहिरचा चेहरा आखडत चाललाय. बहुदा कळ दाबायचा प्रयत्न करत होते ते. कपूरनी आवाज दिला, 'साहिर'!
आणि त्याबरोबर साहिर, त्या बिछान्यात लवंडले. डॉ. सेठ येऊन पोहोचले. खूप प्रयत्न केला हृदय पूर्ववत करण्याचा. पण साहिर निवर्तले होते. डॉ. कपूरांना घाबरं-घुबरं झालेलं पाहून रामानंद सागर, त्यांना ताबडतोब तिथून हलवून आपल्या घरी घेऊन गेले.
साहिरचा ड्रायव्हर अन्वर धावत आला. त्यानं प्रेत ताब्यात घेतलं. यश चोप्रा त्यांच्या अगदी जवळ रहायचे. त्यांच्याकडं निरोप पाठवला तर ते श्रीनगरला गेले होते. त्यानंतर जादूला कळवलं. ड्रायव्हर नव्हता तर ते टॅक्सी घेऊन पोहोचले. आणि त्या टॅक्सीतून जादू, साहिरना त्यांच्या घरी घेऊन आले, परछाइयाँ मध्ये. अन्वर आणि टॅक्सीवाल्याच्या मदतीनं त्यांना वर घेऊन गेले. फर्स्ट फ्लोअर वर, जिथं ते रहायचे.
जादूनं जणू मौनव्रत घेतलं होतं. पण घरी पोहोचताच तो ज्या पद्धतीनं त्यांच्या गळ्यात पडून रडला, आयुष्यात कधी असा रडला नव्हता. रात्रीचा एक वाजला असेल. कुठं जायचं? कुणाला बोलवायचं? काही नाही केलं जादूनं. एकटा बसून राहिला त्यांच्या शेजारी. शेजार-पाजारचे लोक पोहोचले होते. एक शेजारी म्हणाला, थोड्या वेळात प्रेत आखडू लागेल. दोन्ही हात छातीवर घेऊन बांधून टाका. नंतर अवघड होऊन बसेल.
जादू अखंड रडत होता आणि लोक जे काही सांगतील ते सगळं करत राहिला.
मग सकाळ होता-होता लोकांना फोन करणं सुरु केलं. बातमी पसरत गेली तसतसे लोक जमा होऊ लागले. बसायला सतरंज्या काढा. इथल्या खुर्च्या हलवा. तिकडचा दरवाजा उघडा. लहान मुलासारखे, जादूचे अश्रू वाहतच होते आणि तो ही सगळी कामं करत होता.
अंत्ययात्रेच्या तयारीसाठी खाली आला तर पाहिलं की टॅक्सीवाला तिथंच उभा आहे.
ऊफ्‍! सांगितलं का नाहीस? किती पैसे झाले तुझे?”
तो कुणी पापभीरु मनुष्य होता. ताबडतोब हात जोडले.
मी साहेब... नाही पैशांसाठी नाही थांबलो. हे असं झाल्यावर कुठं जाणार होतो रात्री?”
जादूनं खिशातून पाकीट काढलं.
टॅक्सीवाला पुन्हा म्हणाला,
नाही साहेब, राहू द्या साहेब.”
जादू जवळजवळ ओरडून म्हणाला, “हे घे, ठेव हे शंभर रुपये. मेल्यावर पण वसूल केले आपले पैसे.”
आणि धाय मोकलून रडू लागला.
ही साहिरच्या अंत्ययात्रेपूर्वीची गोष्ट आहे.
~~0~~


Share/Bookmark

No comments:

Post a Comment