ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Friday, March 4, 2016

कन्हैया कुमार - एक नवी आशा



                जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटी (जेएनयु) मधे देशविरोधी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आणि देशद्रोही घोषणा दिल्याबद्दल तीन आठवडे तुरुंगात टाकलेल्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारला अखेर सोडून द्यावंच लागलं. मीडिया, केंद्र सरकार, गृहमंत्र्यांसहीत अनेक महत्त्वाचे मंत्री, खासदार, आमदार, विद्यार्थी संघटना, अशा अनेक स्वयंघोषित देशभक्त लोकांनी आटोकाट प्रयत्न करुनही एका सामान्य विद्यार्थी कार्यकर्त्याचा आवाज ते दडपू शकले नाहीत. तुरुंगातून बाहेर आल्यावर कन्हैयानं दिलेलं भाषण म्हणजे सर्वसामान्यांना देशातल्या सध्याच्या परिस्थितीबद्दल वाटणा-या भावनांचंच प्रतीक आहे. ज्या घोषणांच्या व्हिडीयोमधे मोडतोड करुन भाजपा सरकार आणि मीडियानं कन्हैयाला देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न केला, त्याच घोषणा त्यानं तुरुंगातून बाहेर आल्यावर आपल्या भाषणात दिल्यात. 'हम क्या चाहते - आजादी! है हक हमारा - आजादी! भ्रष्टाचार से - आजादी! भूकमरी से - आजादी! सामंतवाद से - आजादी!' या त्या घोषणा. कन्हैयाबरोबर इतर शेकडो विद्यार्थी कार्यकर्ते न घाबरता, न लाजता या घोषणा देतात हे चित्र नक्कीच आशादायक आहे, असं मला वाटतं.

                आपल्या भाषणामधे कन्हैयानं स्पष्ट केलंय की, 'आमच्या मनात (ज्यांच्यामुळं या 'देशद्रोही' प्रकरणाची सुरुवात झाली त्या) एबीव्हीपीबद्दल कसलीही वाईट भावना नाही, कारण आम्ही खरोखर लोकशाहीवादी आहोत. आमचा खरोखर राज्यघटनेवर पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच आम्ही त्यांना शत्रू नाही तर विरोधक मानतो.' शत्रू आणि विरोधक यातला फरक या देशाच्या सरकारला समजू शकला नसला तरी एका विद्यार्थ्याला तो समजला ही फारच पॉझिटीव्ह गोष्ट मला वाटते.

                आपल्या भाषणात कन्हैयानं जेएनयुचे आणि या लढ्यामधे जेएनयुसोबत उभं राहिलेल्या सर्वांचे आभार मानलेत. देशाचं सरकार आणि बहुतांश मीडिया ज्या व्यक्तिच्या, संस्थेच्या विरुद्ध कट-कारस्थानं रचतायत, ज्यांना देशद्रोही ठरवण्यासाठी जिवाचं रान करतायत, त्यांच्या बाजूनं उभं राहणं ही सोपी गोष्ट नाही. म्हणूनच कन्हैया फक्त त्याला स्वतःला सपोर्ट करणा-यांना नव्हे तर 'सही को सही और गलत को गलत' म्हणणा-या सर्वांना सलाम करतोय. या संपूर्ण प्रकरणाचा एक मजेशीर पैलू त्यानं उलगडून दाखवला. जेएनयुला देशद्रोह्यांचा अड्डा ठरवणं, विद्यार्थी कार्यकर्त्यांची फेलोशिप बंद करुन त्यांना आर्थिकदृष्ट्या लाचार बनवणं, स्वतंत्र विचार करु शकणा-या व्यक्ती आणि संस्थांवर खोटेनाटे आरोप करुन त्यांना आधी बदनाम आणि नंतर बंद पाडणं, एबीव्हीपी - जेएनयु प्रशासन - दिल्ली पोलिस यांच्या संगनमतानं कन्हैयाला देशद्रोहासारख्या गंभीर गुन्ह्यात गोवणं, हे सगळं पूर्वनियोजित कारस्थान होतं. खूप मोठमोठे नेते, मंत्री, मीडिया या सगळ्यांनी मिळून विचारपूर्वक हा कट रचला. पण त्यावर देशभरातून इतकी मोठी प्रतिक्रिया येईल ह्याचा अंदाजच त्यांना आला नसेल. कन्हैया म्हणतो, 'उनका सबकुछ प्लॅन्ड था, हमारा सबकुछ स्पाँटेनियस था।' खरंच, खोटं शंभर वेळा बोलून ते खरं ठरवण्याची युक्ती यावेळी तरी फसली असंच म्हणावं लागेल.

                कन्हैयानं जेएनयुच्या विद्यार्थ्यांसमोर याआधी दिलेली भाषणं, त्यात मांडलेले मुद्दे, दिलेल्या घोषणा यांची 'विरोधकां'नी मोडतोड केली खरी, पण यावेळच्या भाषणात कन्हैयानं अगदी स्पष्ट सांगितलंय, 'भारत 'से' नही मेरे भाईयों, भारत 'में' आजादी माँग रहे हैं।' भारतीय राज्यघटनेतल्या 'समानते'च्या तत्त्वाची अगदी सोप्या शब्दांत व्याख्या कन्हैयानं केलीय, 'इक्वॅलिटी मतलब चपरासी का बेटा और राष्ट्रपती का बेटा एक स्कूल में पढाई कर सके।' आहे का आपल्यात धमक हे चॅलेंज स्वीकारायची? नेते, राजकारणी, मंत्री यांचं जाऊ द्या, पण तुम्हा-आम्हाला तरी ही इक्वॅलिटी समजलीय का? समजली तर पटेल का? इस बात पे सलाम, कन्हैया!

                एक विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून विद्यापीठाच्या आवारात आंदोलनं करणं आणि थेट केंद्र सरकारला भिडून आपला घटनात्मक हक्क मागणं, ह्यातला फरक स्वतः कन्हैयाच्याही आता लक्षात आलाय. 'सेल्फ क्रिटीसिझम' करताना कन्हैया म्हणतो, 'पहले पढता जादा था, सिस्टम को झेलता कम था। इस बार पढा कम हूँ, सिस्टम को झेला जादा है।' सिस्टमला 'झेलण्या'साठी काय ताकद लागते ते स्वतः अनुभव घेतल्याशिवाय नाही कळायचं. आपल्याला लहानपणापासून सिस्टमशी जुळवून घ्यायलाच शिकवलं जातं. 'सही को सही, गलत को गलत' म्हणणा-याला लोक एक तर हसतात किंवा संपवतात. सिस्टमला झेलायला लागलो की आपलं पुस्तकी ज्ञान किती तोकडं आहे, हे कळायला लागतं. पण ताठ मानेनं जगायचं असेल तर सिस्टमशी एडजस्ट करुन नाही तर सिस्टमला भिडून दाखवावं लागतं. कुणाची इच्छा असेल हा अनुभव घ्यायची, तर चार दिवस माझ्याबरोबर राहून बघा. कन्हैयाबद्दल मला वाटणा-या कळकळीचं मूळ त्यात सापडेल तुम्हाला!

                मीडिया आणि केंद्र सरकारनं पद्धतशीरपणे जेएनयु आणि कन्हैयाची इमेज तोडण्याचा प्रयत्न केला. त्याचेच शब्द, त्याचीच भाषणं मोडतोड करुन लोकांपर्यंत पोचवली आणि सर्वसामान्यांसमोर 'देशद्रोही' म्हणून त्याला उभं केलं. कन्हैया आणि जेएनयुचे मुद्दे, त्यांची जिद्द, त्यांचा संघर्ष सर्वसामान्यांपर्यंत पोचलाच नाही. जे पोचलं ते संदर्भहीन आणि चुकीचं पोचलं. याबद्दल आत्मपरीक्षण करताना कन्हैया म्हणतो, 'जेएनयु के लोग बहुत सभ्य, शालीन तरीके से बात करते हैं, लेकीन बहुत ही भारी टर्मिनॉलॉजी में बोलते हैं। ये बात देश के आम लोगों के समझ में नही आती। उनका दोष नही है। वो इमानदार, नेक, समझदार लोग हैं। आपही उनके लेवल पे जाकर चीजों को नही रखते।' हा कन्हैयाच्या भाषणाचा हायलाईट होता असं मला वाटतं. बुद्धीवादी, वैचारीक कार्यकर्त्यांमागं गर्दी उभी राहत नाही, कारण त्यांचे मुद्दे फारच तात्विक, तार्किक, आणि समजायला अवघड असतात. पण जी व्यक्ती सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत हेच मुद्दे मांडू शकली तिच्यामागं अख्खा देश उभा राहिला, हादेखील याच देशाचा इतिहास आहे. त्यामुळं मुद्देसूदपणासोबत हे सेल्फ-क्रिटीसिझम कन्हैया आणि त्याच्या साथीदारांना तर मोठं यश मिळवून देऊ शकेलच, पण इतरही कर्यकर्त्यांनी या दिशेनं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे, असं मला वाटतं.

                आपल्या भाषणात कन्हैयानं संघ, भाजपा सरकार, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका केलीय. विशेष म्हणजे ही टीका राजकीय न वाटता, सर्वसामान्य जनतेची प्रातिनिधिक प्रतिक्रिया वाटते. 'काँग्रेसमुक्त भारता'ची घोषणा देऊन मोदींनी केंद्रात आणि काही राज्यांत सत्ता मिळवली खरी, पण निवडणुकीच्या वेळी ज्या चमत्कारांच्या जोरावर, आश्वासनांच्या खैरातीवर जनतेला त्यांनी भुलवलं, त्यातलं काहीच प्रत्यक्षात घडताना दिसत नाही. काळा पैसा परत आणण्याच्या वचनावर मोदी मूग गिळून गप्प बसलेत. भ्रष्टाचाराच्या बाबतीत काँग्रेस सरकार आणि भाजप सरकार यांच्यात फरक काय हेच कळत नाहीये. धार्मिक तेढ वाढवण्याचे प्रयत्न वारंवार अधिकृत प्रवक्ते, मंत्री, आणि लोकप्रतिनिधीच करताना दिसतायत. ज्या कन्हैयाचे वडील शेतकरी आणि भाऊ सैनिक आहे, त्याच कन्हैयाला 'देशद्रोही' ठरवून सैनिक विरुद्ध कार्यकर्ते असा काहीतरी खोटा संघर्ष निर्माण करायचा प्रयत्न केला गेला. आणि मनमोहन सिंगांच्या मौनव्रताची वारंवार बालीश खिल्ली उडवणारे आपले बोलघेवडे पंतप्रधान मोदी या प्रकरणावर मात्र चुकूनसुद्धा काही बोलले नाहीत. उलट थातुर-मातुर गोष्टींवर 'मन की बात' करत राहिले. खोट्या व्हिडियोच्या आधारे देशातील एका प्रतिष्ठित युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षाला हॉस्टेलमधे घुसून अटक केली जाते, कोर्टाच्या आवारात त्याला पोलिसांदेखत मारहाण केली जाते, कुठलाही गुन्हा सिद्ध झालेला नसताना मीडिया त्याला 'देशद्रोही, देशद्रोही' म्हणून देशभर बदनाम करते, केंद्रीय गृहमंत्री खोट्या ट्विटच्या आधारे त्याचे संबंध पाकिस्तानशी जुळवून टाकतात, आणि कसलाही गुन्हा केलेला नसताना सर्वसामान्य कुटुंबातला एक निरपराध विद्यार्थी तीन आठवडे तुरुंगात पडून राहतो, या सगळ्यावर बोलण्यासाठी आपल्या पंतप्रधानांना एक तर वेळ नाही किंवा त्यांना हे प्रकरण तितकं महत्त्वाचं वाटत नाही. याशिवाय तिसरी शक्यता जास्त धोकादायक आहे, ते म्हणजे - मोदींना या सगळ्या प्रकरणाच्या खोटारडेपणाची माहिती आधीपासूनच होती आणि स्वतःची 'इमेज' जपण्यासाठी त्यांनी मूक संमती देऊन यावर प्रत्यक्ष बोलणं मुद्दामहून टाळलं. यातलं नक्की खरं काय ते मोदी स्वतःच सांगू शकतील, पुढच्या एखाद्या 'मन की बात' मधून. कन्हैयाची 'ये मन की बात कहते है, सुनते नही।' ही टीका मोदीभक्त, भाजपप्रेमी, आणि संघवाल्यांना जरुर झोंबणार आहे, पण म्हणून काही ते पुन्हा कन्हैयाला 'देशद्रोही' ठरवू शकणार नाहीत. आता तरी त्यांनी कन्हैयाच्या भाषणाला मुद्देसूद उत्तर द्यावं, उगाच 'विद्यार्थ्यांनी शिकताना राजकारण करु नये' अशी बालिश आणि निर्बुद्ध वक्तव्यं करुन स्वतःचंच हसं करुन घेऊ नये.

                कन्हैया म्हणतो की देशातल्या जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर सरकारला चर्चाच करायची नाहीये. उलट जनतेचं लक्ष त्यावरुन कसं भरकटेल यासाठीच सरकार प्रयत्न करतंय. मग त्यासाठी आज जेएनयुला 'देशद्रोह्यांचा अड्डा' म्हणतील, तर उद्या 'मंदीर वही बनायेंगे'ची टूम काढतील. तुरुंगात असताना कन्हैयानं बघितलं की आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास वर्गातील माणसंच पोलिस खात्यात नोकरी करतायत. त्यानं स्वतः कॉन्स्टेबलपासून इन्स्पेक्टरपर्यंत पोलिसांशी संवाद साधला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हे आणि आपण सारखेच आहोत. फक्त आपण अजून विचार करु शकतोय आणि ह्यांनी विचार करणं सोडून दिलंय किंवा व्यवस्थेनं त्यांना भरकटून सोडलंय. कन्हैयाचे तुरुंगवासातले अनुभव खरोखर ऐकण्यासारखे आहेत. त्याला एका पोलिसानं विचारलं, 'धरम मानते हो?' यावर कन्हैया म्हणाला, 'धरम जानते ही नहीं। पहले जान ले, फिर मानेंगे।' आणि मग त्यानं त्या पोलिसाला विचारलं, 'माझ्या माहितीनुसार हे विश्व देवानं बनवलंय आणि इथल्या कणाकणात ईश्वर आहे, पण मग काही लोक 'देवासाठी' काहीतरी बांधायचं म्हणतायत, तुमचं म्हणणं काय आहे?' सर्वसामान्य कुटुंबातनं आलेला तो पोलिस म्हणाला, 'महाबुड़बक आयडीया है।' (बुड़बक म्हणजे मूर्ख, स्टुपिड.) योग्य पद्धतीनं सर्वसामान्यांशी संवाद साधला, त्यांच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष टिकवून ठेवलं तर जनता पुन्हा-पुन्हा भूलथापांना आणि विषारी प्रचाराला बळी पडणार नाही, अशी आशा या अनुभवांमधून निर्माण होते.

                आपल्या भाषणाच्या शेवटी कन्हैया पुन्हा एकदा स्वातंत्र्याची घोषणा देतोय. त्याचं म्हणणं आहे की, स्वातंत्र्याच्या या घोषणा संपूर्ण देशातल्या जनतेपर्यंत पोचल्या पाहिजेत. तो म्हणतो, 'भारतसे नही, भारत को लूटनेवालोंसे आजादी माँगते हैं। हम क्या चाहते - आजादी। है हक हमारा - आजादी। भ्रष्टाचार से आजादी। भूकमरी से आजादी। सामंतवाद से आजादी। हम लेके रहेंगे - आजादी।'

                हे फक्त कन्हैयाच्या भाषणाचं रिपोर्टिंग नाही. कन्हैयानं कित्येकांच्या मनातल्या भावनांना शब्द दिलेत, आवाज दिलाय. मला स्वतःला हा आवाज, हे शब्द ओळखीचे वाटतायत, म्हणून इथं मांडलेत. तुम्हालाही ते ओळखीचे वाटले तर जरुर सांगा. गप्प राहून चालणार नाही. न मागता काहीही मिळणार नाही. आपल्याला काय वाटतंय, काय पटतंय, हे मांडता येणार नसेल तर आपल्या शिक्षणाचा उपयोगच काय?




Share/Bookmark

No comments:

Post a Comment