ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Monday, March 7, 2016

कन्हैया आणि गोपी

वर्तमान परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी किती समर्पक रुपकं आपल्या पौराणिक / ऐतिहासिक कथा-कल्पनांमधे सापडतात नाही? उदाहरणार्थ, यमुनेच्या पात्रात जलक्रिडेसाठी उतरलेल्या गोपी आणि काठावर काढून ठेवलेले त्यांचे कपडे पळवणारा कन्हैया! म्हणजे असं बघा की, गोपींचे कपडे त्यांनी स्वतःच उतरवले होते, त्यात कृष्णाचा दोष नव्हता. बरं, त्यांचे कपडे पळवून त्याला ना ते स्वतःला घालायचे होते, ना कुठं नेऊन विकायचे होते. सार्वजनिक ठिकाणी कपडे काढून जलक्रीडा करण्याच्या कृतीची जबाबदारी गोपींनी स्वीकारावी, एवढीच बिचा-याची अपेक्षा असणार, नाही का? म्हणजे कसंय, निवडणुकीच्या वेळी वारेमाप आश्वासनं दिली एखाद्या नेत्यानं आणि सत्तेवर आल्यावर त्या आश्वासनांची वस्त्रं उतरवून सत्तेचा उपभोग घ्यायचा प्रयत्न केला, तर ती वस्त्रं चढवण्याची आणि उतरवण्याची जबाबदारी पण स्वीकारावी की नाही? का आपणच उतरवून ठेवलेली वस्त्रं एखाद्या कन्हैयानं पळवून जगाला दाखवली तर त्यालाच पूर्ण दोष द्यायचा? तो काही म्हणाला नव्हता, तुम्ही वस्त्रं चढवा किंवा उतरवा म्हणून. फक्त ती वस्त्रं 'आत्ता' तुमच्या अंगावर नाहीत, एवढंच तो सांगतोय. मग एवढा राग कशाचा येतोय नक्की? आपण उघडे पडल्याचा की ती वस्त्रंच खोटी असण्याचा?
(डिस्क्लेमर -  सदर रुपकात कोणाही जिवंत किंवा मृत व्यक्तिचे अथवा पक्षाचे नाव घेण्यात आले नसल्याने जो-तो आपापल्या इच्छेनुसार यात नावे घालू शकतो. त्यावरुन दुखावल्या जाणा-या भावना अथवा होणा-या गुदगुल्या या दोन्हींची जबाबदारी प्रस्तुत लेखक स्वीकारत नाही.)


Share/Bookmark

No comments:

Post a Comment