ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Tuesday, July 25, 2017

खर्‍या ज्ञानाची निर्मिती

राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) यांच्या 'राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५' साठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष प्रा. यश पाल हे होते. सदर आराखड्याच्या प्रस्तावनेत प्रा. यश पाल यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडून त्यांची शिक्षणाविषयी संकल्पना स्पष्ट केली आहे.

या प्रस्तावनेमधे प्रा. यश पाल म्हणतात की, कोणतीही गोष्ट 'समजून घेण्याची' आपली क्षमता आपण विसरुन गेलो आहोत. त्याऐवजी आपण पाठांतरावर आधारित, अल्प काळ टिकणारं, 'माहिती गोळा करण्याचं कौशल्य' आत्मसात केलं आहे. आणि आता ह्या माहितीच्या साठ्याचा विस्फोट होण्याची परिस्थिती येऊन ठेपलेली असल्यानं आपल्याला पुन्हा उलटा प्रवास करणं गरजेचं झालं आहे.

प्रा. यश पाल यांच्या मते, या 'समजून घेण्याच्या प्रक्रिये'ची ओळख आपण आपल्या मुलांना करुन दिली पाहिजे, जेणेकरुन ते जगण्याच्या अनुभवांतून स्वतःचं ज्ञान निर्माण करु शकतील. यामुळं आपल्या मुलांची शिकण्याची प्रक्रिया खर्‍या अर्थानं सृजनात्मक आणि आनंददायी होऊ शकेल, परिपूर्ण होऊ शकेल. परीक्षा नावाच्या अडथळ्यांच्या शर्यतीपूर्वी, थोड्या वेळापुरती, जास्तीत जास्त माहिती साठवण्याचा मुलांवर येणारा ताण कमी करण्यासाठी ही 'समजून घेण्याची कला' उपयोगी ठरेल.

प्रा. यश पाल पुढं असं म्हणतात की, कागदांवर शाईच्या ठिपक्यांच्या रुपात किंवा कॉम्प्युटरच्या डिस्कवर बिट्सच्या रुपात साठवून ठेवण्याची माहिती आपण मुलांच्या आठवणींमधे - स्मृतीमधे कोंबण्याचा प्रयत्न करीत आहोत. अशा प्रकारे माहिती साठवण्यातली व्यर्थता आणि मुलांची शिकण्याची क्षमता आपण समजून घेतली पाहिजे, मान्य केली पाहिजे.

प्रा. यश पाल यांच्या मते, शिक्षण ही पोस्टानं पाठवायची किंवा शिक्षकांच्या मार्फत मुलांपर्यंत पोचवायची भौतिक वस्तू नाही. मुलांच्या सुपिक मेंदूमधे विविध संकल्पनांची पेरणी करावी लागते आणि पालक, शिक्षक, मित्रमंडळी, समाज यांच्याशी होणार्‍या परस्पर संवादातून हे पीक जोपासावं लागतं. खर्‍याखुर्‍या ज्ञानाच्या निर्मितीप्रक्रियेत मुलांबरोबर शिक्षकसुद्धा शिकत जातो.

याही पुढं जाऊन प्रा. यश पाल म्हणतात की, मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांची निरीक्षण करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळं कोणत्याही प्रकारच्या ज्ञानाची निर्मिती करण्यामधे मुलांची भूमिका जास्त महत्त्वाची असते. "माझ्या मर्यादीत समजेचा बहुतांश भाग मला लहान मुलांशी झालेल्या संवादातून प्राप्त झालेला आहे," असं प्रा. यश पाल प्रामाणिकपणे कबूल करतात.

दूरदर्शनवर 'टर्निंग पॉइंट' कार्यक्रमात अवघड शास्त्रीय संकल्पना सोप्या शब्दांत समजावून सांगणारे प्रा. यश पाल आता आपल्यात नाहीत. पण शिकण्या-शिकवण्याबद्दल, खर्‍या ज्ञानाच्या निर्मितीबद्दल त्यांनी मांडलेले विचार आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करत राहतील.

- मंदार शंकर शिंदे
9822401246
(25/07/2017)


Share/Bookmark

No comments:

Post a Comment