युनिसेफ आणि 'असर'तर्फे भारतातल्या बालशिक्षणाच्या परिणामांचा अभ्यास - दी इंडीया अर्ली चाइल्डहूड एज्युकेशन इम्पॅक्ट स्टडी (आयईसीईआय) - करण्यात आला. यामधे, आसाम, राजस्थान, तेलंगणा राज्यातल्या ग्रामीण भागांतून १४,००० मुलांचं त्यांच्या वयाच्या ४ ते ८ वर्षांपर्यंत निरीक्षण करण्यात आलं.
अहवालात नोंदवलेली निरीक्षणं :
१. ग्रामीण भागात ७०% मुलं वयाच्या चौथ्या वर्षी अंगणवाडी / बालवाडी / खाजगी पूर्वप्राथमिक शाळांमधे दाखल झालेली दिसतात.
२. वयानुसार आखून दिलेला अभ्यासक्रम आणि मुलांची प्रत्यक्ष शिकण्याची क्षमता/प्रगती यांमधे तफावत दिसून येते. उदाहरणार्थ, काही ठिकाणी चार वर्षांची मुलं प्राथमिक शाळेत बसून पहिलीचा अभ्यासक्रम शिकतायत, तर सहा-सात वर्षांच्या मुलांवर पूर्वप्राथमिकमधे काम सुरु आहे. आपण समजतो तसा, वय आणि इयत्तांचा फारसा परस्परसंबंध प्रत्यक्षात दिसून येत नाही.
३. प्राथमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमानुसार, पाच-सहा वर्षांच्या मुलाची भाषिक आणि सांख्यिक अनुभूती जेवढी अपेक्षित आहे, तेवढी सध्याच्या पूर्वप्राथमिक अभ्यासक्रमातून साध्य होत नाही. शाळेत गेल्यावर पहिल्या इयत्तेपासून पुढं ही दरी आणखी रुंदावत जाते.
(मुलं प्राथमिक शिक्षण सुरु करण्यासाठी तयार आहेत का हे तपासण्यासाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नांमधे, चार झाडांची चित्रं दाखवून सर्वांत जास्त/कमी फळं लागलेलं झाड ओळखणं, नळातून बादलीत पाणी भरताना चार चित्रं दाखवून रिकामी ते भरलेली बादली असा क्रम लावणं, वस्तूंची संख्या आणि अंक यांची जोडी लावणं, यांचा समावेश होता.)
४. शासकीय अंगणवाड्या आणि खाजगी पूर्वप्राथमिक शाळा या दोन्हींमधे मुलांच्या वयानुरुप विकासासाठी आवश्यक वातावरणाचा आणि साधनांचा अभाव दिसतो. अंगणवाडीचा भर पोषक आहार आणि लहान मुलांसाठी पाळणाघर चालवण्यावर दिसतो. खाजगी पूर्वप्राथमिक शाळा प्राथमिक शाळांचा जोड-उपक्रम म्हणून चालवल्या जातात, ज्यामधे वाचन-लेखन-गणित या औपचारिक शिक्षणावर जास्त भर दिलेला दिसतो.
वरील निरीक्षणांवरुन अहवालात केलेल्या धोरणात्मक सूचना :
१. सर्व मुलांना ठोस पायाभूत शिक्षण उपलब्ध होण्यासाठी पूर्वप्राथमिक/बालशिक्षणाला शिक्षण हक्क कायद्यात समाविष्ट करुन घेणं. (सध्या ६ ते १४ वयोगटातल्या मुलांना, म्हणजे पहिलीच्या पुढं शिक्षण हक्क कायदा लागू होतो.)
२. प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमासाठी पूर्वतयारी झाल्यावरच मुलांना प्राथमिक शाळेत प्रवेश देणं. (काही ठिकाणी सहा वर्षांखालील मुलांना पहिलीत प्रवेश दिलेला आढळला, त्यावरुन ही सूचना आलेली दिसते. मुलांवर प्राथमिक शिक्षणाचा ताण पडू नये असा हेतू यामागं आहे.)
३. प्राथमिक शिक्षणासाठी आवश्यक क्षमता मुलांमधे विकसित व्हाव्यात म्हणून सध्या वय वर्षे 'पाच ते तीन' अशा वयोगटासाठी अभ्यासक्रम ठरवला जातो. त्याऐवजी, जास्तीत जास्त खेळावर आधारीत, संधी आणि अनुभवातून शिकता येईल असा, 'तीन ते पाच' वयोगटासाठी अभ्यासक्रम तयार करणं. त्यादृष्टीनं शिक्षक प्रशिक्षणात बदल करणं. (मुलांना योग्य वयात योग्य शिक्षण मिळावं हा उद्देश आहे. पुढच्या इयत्तांसाठी त्यांना तयार करणं हाच उद्देश असेल तर वयानुरुप शिक्षण शक्य होत नाही.)
४. मुलांच्या जडणघडणीच्या महत्त्वाच्या वर्षांमधे त्यांना दिलं जाणारं शिक्षण आणि वातावरण यांच्या नियमनासाठी कार्यक्षम यंत्रणा / मानांकन पद्धत निश्चित करणं. अंगणवाडी, खाजगी पूर्वप्राथमिक शाळा, स्वयंसेवी संस्थांचे अनौपचारिक वर्ग या सर्वांसोबत या यंत्रणेनं काम करणं आवश्यक.
५. मुलांच्या योग्य विकासासाठी बाल शिक्षण अभ्यासक्रम / पद्धत याबद्दल शिक्षक, पालक, आणि इतर घटकांशी संवाद साधून जागृती करणं. पूर्वप्राथमिक शिक्षणात सोप्या पद्धती व साधनांवर भर देऊन पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करणं.
बाल शिक्षण आणि संगोपनाचा आदर्श नमुनाः
१. प्रशिक्षित शिक्षक.
२. प्रत्येक मुलाकडं वैयक्तिक लक्ष.
३. मुलांना प्रश्न पडावेत व त्यांनी प्रश्न विचारावेत यासाठी पूरक वातावरण.
४. नियमित दैनंदिन नियोजनबद्ध अभ्यासक्रम.
५. व्यक्तिगत व सामूहीक खेळ आधारीत उपक्रम.
६. मुक्त खेळ आणि मार्गदर्शनाखालील खेळ यांवर आधारीत उपक्रम.
७. भाषा आणि गणिताच्या संकल्पनांची पायाभरणी.
८. प्राथमिक शाळा/शिक्षण यांच्यासाठी तयारी करुन घेणं.
९. वाचन, लेखन, गणितीय क्रिया औपचारिकपणे शिकवण्यास मनाई.
सहा वर्षांच्या मुलांची शालेय शिक्षण सुरु करण्यासाठी तयारी म्हणजेः
१. शाळेच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी वैयक्तिक/सामूहीक तयारी.
२. भाषा आणि गणिताचे विषय शिकण्यासाठी पुरेशी समज.
युनिसेफ आणि 'असर'चा हा मूळ रिपोर्ट http://unicef.in/Uploads/Publications/Resources/pub_doc146.pdf या लिंकवर उपलब्ध आहे.
मूल दोन-अडीच वर्षांचं झालं की एखादी ब्रॅन्डेड नर्सरी/प्लेग्रुप शोधून त्याला अडकवून टाकणं, याच्या पलीकडं जाऊन सर्व पालकांनी विचार करणं गरजेचं आहे. ('केजी टू पीजी' अशी सोय असेल तर पालकांना मूल काय शिकतंय यावर अजिबातच विचार करावा लागत नाही.)
वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत मुलाच्या मेंदूचा खरा विकास होत असतो. त्या वयात मुलाला आपण (आई-वडील, शिक्षक, समाज) काय देतोय, हे एकदा प्रत्येकानं स्वतःपुरतं तरी तपासून बघावं, असं मला वाटतं. युनिसेफच्या या रिपोर्टचा निष्कर्षही असाच काहीतरी आहे.
- मंदार शिंदे
9822401246
(३० जुलै २०१७)
No comments:
Post a Comment