दरवर्षी स्वित्झर्लंडमधले 'दावोस' तिथे होणाऱ्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मुळे चर्चेत राहते. दरवर्षी जगातले सर्वांत धनाढ्य आणि आर्थिक धोरणांवर प्रभाव टाकणारे लोक इथे एकत्र जमतात. जगातील विविध आर्थिक, सामाजिक विषयांवर इथे चर्चा घडते. दावोसमधील धनाढ्यांच्या संमेलनात ‘ऑक्सफॅम’ने आपला ‘टाइम टू केअर’ हा जागतिक आर्थिक असमतोलाबद्दल भाष्य करणारा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालातील काही महत्त्वाच्या नोंदी:
१. जगातील संपत्ती एक टक्का व्यक्तींच्या हातात एकवटली आहे. त्यातील बहुसंख्य पुरुषच आहेत.
२. सध्याच्या आर्थिक रचनेत एक स्त्री करत असलेल्या घरकामाला, मुलांना वाढविण्याच्या प्रक्रियेला आणि ती साऱ्या समाजाची काळजी वाहण्याचे काम करते तो भाग या आर्थिक रचनेत पूर्णपणे दुर्लक्षलेला आहे. यामुळे स्त्रिया आणि पुरुषांमधली विषमता वाढतेच, त्याबरोबरच आर्थिक विषमताही वाढते.
३. २०१९ मध्ये जगातील २,१५९ लोक अब्जाधीश होते. या लोकांकडे जगातल्या ४.६ अब्ज लोकांपेक्षा अधिक संपत्ती एकवटलेली आहे.
४. जगातील २२ सर्वांत श्रीमंत पुरुषांकडे असलेली संपत्ती ही संपूर्ण आफ्रिका खंडात राहणाऱ्या सर्व स्त्रियांपेक्षा अधिक आहे.
५. इजिप्तमध्ये पिरॅमिड्स उभे राहिले तेव्हापासून तुम्ही रोज १०,००० डॉलर बाजूला ठेवत राहिलात, तरीही तुमच्याकडे जमा झालेली रक्कम ही जगातील ५ सर्वांत श्रीमंत अब्जाधीशांच्या सरासरी संपत्तीच्या केवळ १/५ एवढीच असेल!
६. जगातील सर्वांत श्रीमंत एक टक्का लोकांकडे असलेली संपत्ती जगातल्या ६.९ अब्ज लोकांकडे असलेल्या संपत्तीच्या दुपटीपेक्षा अधिक आहे.
७. जगातील वय वर्ष १५ आणि त्यावरील स्त्रियांच्या श्रमाची किंमत मोजायची ठरवली, तर ती कमीत कमी १०.८ ट्रिलियन डॉलर एवढी भरते. हा आकडा जगातील तंत्रज्ञान क्षेत्रातील उलाढालीच्या सुमारे ३ पटीने अधिक आहे!
८. जगातील सर्वांत श्रीमंत एक टक्का लोकांच्या ०.५ % अधिक संपत्तीवर पुढच्या १० वर्षांसाठी कर लावण्यात आला, तर जमा झालेली रक्कम, शिक्षण, आरोग्य, ज्येष्ठांची काळजी घेणे व अशा इतर सेवा क्षेत्रांमध्ये ११.७ कोटी लोकांसाठी रोजगार निर्माण करायला पुरी पडू शकेल.
९. जगातले १/३ अब्जाधीश हे केवळ वारसाहक्काने मिळालेल्या रकमेमुळे श्रीमंत झाले आहेत.
१०. पुरुषांकडे स्त्रियांपेक्षा ५०% अधिक रक्कम एकवटलेली आहे.
११. जगातील राजकीय सत्ताधारी वर्गापैकी केवळ ३८% या स्त्रिया आहेत.
१२. ‘सर्वसमावेशक वाढ’ या ७४ देशांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक हा ६२ वा आहे.
१३. भारताच्या २०१९ च्या अर्थसंकल्पाएवढी रक्कम भारतातील ६३ अब्जाधीशांकडे आहे.
१४. भारतातील एक टक्का श्रीमंतांकडे देशातल्या ७० % लोकांकडे असते तेवढी रक्कम आहे.
१५. भारतात ४,१६,००० नवीन कोट्यधीश तयार झाले आहेत. आधीच्या कोट्यधीशांची संपत्ती तब्बल ४६ % ने वाढली आहे.
१६. घरकामात मदत करणाऱ्या मावशींना, भारतातील सर्वात मोठ्या कंपनीचा प्रमुख एका वर्षात जेवढी रक्कम मिळवतो तेवढी मिळवण्यासाठी २२,२७७ वर्षे कष्ट करावे लागतील.
संदर्भ: "संपत्ती एकवटली पुरुषांकडे" - प्रज्ञा शिदोरे, दै. सकाळ ०६/०२/२०२०
No comments:
Post a Comment