ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Wednesday, March 18, 2020

Slow Down Zindagi

स्लो डाऊन, जिंदगी!

फक्त गाडीचा स्पीड कमी केल्यामुळं ९०% अपघात टाळता येणार असतील, तर १०० फुटात १० स्पीडब्रेकर बसवले पाहिजेत, असं आता वाटायला लागलंय.

स्पीडब्रेकर चुकीच्या पद्धतीनं बांधले तर ते दुरुस्त करता येतील, पण स्पीडब्रेकर नसतीलच तर सुरक्षित गाडी चालवायची जबाबदारी लोक स्वतः घेत नाहीत असा अनुभव आहे.

मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, वाहने सावकाश चालवा, वाहने चालवताना मोबाईलचा वापर टाळा, वगैरे पाट्या आपल्याला फालतू वाटतात. आपण सिग्नल पाळत नाही. चौकात गाड्या उलट्या घालतो. नो एन्ट्रीचा बोर्ड आपल्याला अपमानास्पद वाटतो. ट्रॅफिक पोलिसाशी आपण वाद घालतो किंवा त्यालाच खिशात घालतो. फक्त स्पीडब्रेकर ही अशी गोष्ट आहे जी टाळता येत नाही. त्यावरुन जाताना स्पीड कमी करायलाच लागतो.

विनाकारण भरधाव गाडी चालवणाऱ्यांमुळं निष्पाप लोकांचा जीव जाताना बघून या निष्कर्षापर्यंत आलेलो आहे. स्पीडब्रेकरचा राग-राग करणाऱ्यांच्या भावना समजू शकतो, माझं मतसुद्धा काही वर्षांपूर्वीपर्यंत स्पीडब्रेकरविरोधीच होतं. पण आपल्या लोकांची वृत्ती लक्षात घेता, स्पीडब्रेकरला पर्याय नाही... 🛑🚗💨 🙏🙏

#SlowDownZindagi


Share/Bookmark

Monday, March 16, 2020

SMC Workshop at Satara


School Management Committee Workshop at Padegaon Tal. Lonand Dist. Satara

Parents, teachers and NGO representatives attended the workshop. Structure, roles and responsibilities of the committee were discussed.

SMC members, both parents and teachers emphasized on need of guidance and support for smooth and effective functioning of the committee.


Share/Bookmark

Tuesday, March 10, 2020

Corona, Media, and We The People

कोरोना घातक आहे, काळजी घेतली पाहिजे, वगैरे ठीक आहे. पण फोन लावला की खोकल्याचा आवाज आणि मिडीयामध्ये सारखे रुग्णांचे आकडे, हे जरा अतीच व्हायला लागलंय, नाही का?

मागे स्वाईन फ्ल्यू आला तेव्हा पेपरमध्ये 'डेली काउंट' प्रसिद्ध केला जायचा.

"रुग्णांची संख्या २५ च्या वर..."

"पुण्यात ३० वा रुग्ण आढळला..."

"राज्यात एकूण रुग्णांची संख्या ५२..." वगैरे वगैरे.

काही वर्षांपूर्वी असेच 'डेली काउंट' शेतकरी आत्महत्त्येचे दिले जायचे. आणि सोशल मिडीया यायच्या आधी एका वर्षी तर 'दहावी परीक्षेतील अपयशाने आत्महत्त्या'देखील ट्रेन्डीन्ग केल्या होत्या पेपरवाल्यांनी...

आज पुण्यात २ आत्महत्त्या, काल नागपुरात ३ आत्महत्त्या, परवा लातुरात ४ आत्महत्त्या, राज्यात एकूण १७ आत्महत्त्या, वगैरे वगैरे.

मग अचानक हा काउंट बंद झाला. म्हणजे शेतकऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्त्या थांबल्या का? मिडीयालाच ठाऊक!

दहा-एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सांगलीहून पुण्याला बसने प्रवास करत होतो. रात्री साडेअकराला ट्रॅव्हल्सची बस निघाली. स्वाईन फ्ल्यू पासून बचाव कसा करावा, यावर  मेसेज फिरत होते त्यावेळी. बसमध्ये सुद्धा चर्चा सुरु होती. 'पुण्यापर्यंत आलाय म्हणे स्वाईन फ्ल्यू...' अशी बातमी होती.

बस सांगलीमधून निघाली आणि थोड्या वेळात दिवे बंद झाले, निजानीज झाली. कात्रज नवीन बोगद्यापर्यंत बस पोहोचली तेव्हा जाग आली. आजूबाजूला बघितलं तर माणसं मास्क लावून बसली होती. होय, तेच पाच-दहा रुपयांना रस्त्याच्या कडेला विकत मिळणारे कापडी हिरवे मास्क! म्हणजे पुण्याची हद्द सुरु झाली की व्हायरसचं इन्फेक्शन सुरु होणार याची केवढी ती खात्री.. आणि जागतिक दर्जाच्या व्हायरसला थोपवण्यासाठी पाच रुपयांच्या मास्कवर किती तो विश्वास...

मिडीयाला चढलेला कोरोना फीवर उतरेपर्यंत व्हॉट्सऐपवरच बोलू आपण. बाकी काही नाही, पण त्या व्हायरसची वाटत नाही एवढी भीती कानात कुणीतरी खोकण्याची वाटते. समजून घ्या...

बाय द वे, ८ः५० च्या शोची तिकीटं काढली असतील तर किती वाजता थिएटरमध्ये पोहोचावं, म्हणजे हॉस्पिटल के बाहर खडे होकर फू फू करनेवाला नंदू आणि फेफडे की बीमारीचा एक्स-रे बघणं टाळता येईल? कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावं ही विनंती!


Share/Bookmark

Monday, March 9, 2020

SMC GR Simplified

संवादाची सोपी भाषा…

मुलांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या पालकांचा सहभाग घेण्यासाठी 'शाळा व्यवस्थापन समिती' हा प्रकार अस्तित्वात आला. समितीचे सदस्य होणाऱ्या पालकांना शाळेसंदर्भात काही अधिकार आणि जबाबदाऱ्या दिल्या गेल्या. पण गंमत म्हणजे, पालकांनाच या प्रकाराची माहिती नीटशी कळालेली नसते, मग ते अधिकार वापरणार कसे आणि जबाबदारी पार पाडणार कशी?

पालकांना या समितीची रचना, कार्ये, महत्त्व समजावून सांगण्यासाठी शाळा पातळीवर त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे. शासनाकडून, शाळेकडून, काही संस्थांकडून हे काम गेल्या दहा वर्षांपासून वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरु आहे. पण महाराष्ट्र राज्याचा आणि त्यातल्या शाळांचा आवाका लक्षात घेतला तर हे काम किती अवघड आहे याची कल्पना येईल.

गडचिरोली जिल्ह्यातल्या घाटी, रांगी, मार्कंडादेव, अशा काही आश्रमशाळांमध्ये गेलो होतो. आश्रमशाळेमध्ये आजूबाजूच्या परिसरातली मुलं-मुली शिकण्यासाठी राहतात, त्यांच्या पालकांशी 'शाळा व्यवस्थापन समिती'बद्दल चर्चा करायची होती. ही चर्चा आधारलेली होती महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागानं १४ डिसेंबर २०१८ तारखेला काढलेल्या शासन निर्णयावर.

शासन निर्णय नावाच्या डॉक्युमेंटला मराठीत जी.आर. असं म्हणतात. तर या जी.आर.च्या प्रथम पृष्ठावरील प्रथम परिच्छेदातील (म्हणजे पहिल्या पानावरच्या पहिल्या पॅराग्राफमधली) काही शब्द/वाक्यरचना उदाहरणादाखल अशी आहे - 

व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक, वरिष्ठ 
पातळीवरून मंजुरी, विलंबित निर्णयांचा विपरित परिणाम, सर्वसमावेशक शासन निर्णय निर्गमित करण्याचे प्रस्तावित, वगैरे वगैरे...

तर शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांशी, म्हणजे पालकांशी चर्चा करण्याआधी एक महत्त्वाचं काम करायला लागणार होतं, ते म्हणजे हा जी.आर. मराठीत ट्रान्सलेट करणं. सोप्या, सुटसुटीत, आणि लक्षात राहील अशा पद्धतीनं अधिकृत माहिती कशी सांगता येईल असा विचार करत होतो. शेकडो वर्षांपूर्वी समाज साक्षर नसताना, संपर्काची माध्यमं उपलब्ध नसताना, सगळ्या लोकांपर्यंत महत्त्वाचे विचार कसे पोहोचवले जात होते, हे आठवलं आणि तीच पद्धत पुन्हा वापरायचा मोह झाला.

शासकीय आश्रमशाळा
'शाळा व्यवस्थापन समिती' रचना

समिती करावी स्थापन। शाळेचे करण्या व्यवस्थापन।
पालक शिक्षक मिळून। चालवावी शाळा॥

शासनाचा असावा सहभाग। निधी पुरवावा आवश्यक।
मार्गदर्शक नि प्रशिक्षक। रहावी भूमिका॥

पालकांची समिती प्रथम। शिकवून करावी सक्षम।
मुलांसाठी सर्वोत्तम। निर्णय घ्यावा॥

मुलांच्या हिताची खातरी। पालक समितीची जबाबदारी।
त्यासाठी नसावी जरुरी। शासन मंजुरी॥

निर्णयांच्या ठेवी नोंदी। जमाखर्च हिशेब मांडी।
मुख्याध्यापकांची मोठी। जबाबदारी॥

निधी जमा होई। समितीच्या बँक खाती।
खर्च झाला पुन्हा येई। निरंतर॥

मूल ज्याचे शाळेत। तोच होई अध्यक्ष।
आमदार नि खासदार। मागे राही॥

मुख्याध्यापक अधीक्षक। सचिव आणि सहसचिव।
बैठक चर्चा निर्णयांची। व्यवस्था करिती।

विद्यार्थी आणि विद्यार्थिनी। मुलांचे हे प्रतिनिधी।
समस्या नि सूचना मांडती। ठामपणे॥

एक सदस्य स्थानिक। शोधावा तो जाणकार।
यंत्रणा योजना प्रक्रियांवर। भाष्य करी॥

एकूण सदस्य अठरा-वीस। पैकी बारा पालक।
सहा तरी किमान। महिला असाव्या॥

समितीची करावी रचना। दोन वर्षांनी पुन्हा पुन्हा।
नवनवीन पालकांना। संधी मिळावी॥

अध्यक्ष आणि उपाध्यक्ष। दोघांचेही शिक्षण।
लेखन आणि वाचन। आवश्यक॥

समितीचे जे जे सदस्य। ओळख त्यांची विशेष।
सर्वांना मिळावे अवश्य। ओळखपत्र॥

गडचिरोली जिल्ह्यातल्या रामगड, येंगलखेडा, सोनसरी, कोरची, कारवाफा, येरमागड, सोडे, भाकरोंडी, कुरंडीमाल, पोटेगाव, अशा दुर्गम गावांमधून आलेल्या पालकांशी या पद्धतीनं संवाद साधता आला. यातून मिळालेल्या माहितीचा प्रत्यक्ष किती उपयोग केला जातोय, हे स्थानिक संस्था अपेक्षा सोसायटी आणि संबंधित आश्रमशाळांचे मुख्याध्यापकच सांगू शकतील. पण जी.आर.मधून शासनाला नक्की काय सांगायचंय हे आम्हाला समजलं, असं पालकांना तरी वाटत होतं.

तुम्हाला काय वाटतंय?

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६
(संदर्भः महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय दि. १४ डिसेंबर २०१८)


Share/Bookmark

Evadhe Lakshat Theva (Ghazal by Vinda Karandikar)


"एवढे लक्षात ठेवा" (गजल)
- विंदा करंदीकर


Share/Bookmark

Saturday, March 7, 2020

Baai (Poem)

“बाई”

पुरुष म्हणून जन्माला आल्यानं
मला आपोआप मिळालेला मोठेपणा
आणि बाई म्हणून जन्मल्यानं
तुझ्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या,
समानतेच्या गप्पा मारत स्वीकारलं
आपण सोयीस्करपणे जसंच्या तसं…

यात दोष ना तुझा ना माझा
दोष फक्त व्यवस्थेचा!

आणि व्यवस्था बदलणं म्हणजे
सोपी गोष्ट नव्हे…
त्याला लागतील शंभर-दीडशे
कदाचित पाचशे वर्षं.

एवढी मोठी लढाई तू नाही,
मीच लढू शकतो तुझ्यासाठी…

कारण मला फक्त गायची आहेत
गाणी तुझ्या क्रांतीची..
द्यायचे आहेत शब्द
तुझ्या व्यथा आणि वेदनांना..
मांडायची आहेत दुःखे तुझी
जाहीर सभा-भाषणांतून..
शे-दीडशे कदाचित पाचशे वर्षं…

एवढी मोठी लढाई तू नाही,
मीच लढू शकतो तुझ्यासाठी…

कारण तुला प्रत्यक्ष भोगायच्या आहेत
त्या व्यथा आणि वेदना.
आणि पुरवायचे आहेत शब्द
माझ्या भाषणांना आणि गाण्यांना.
ती गाणी ऐकत सोसत राहशील सारं
शे-दीडशे कदाचित पाचशे वर्षं
कधीतरी व्यवस्था बदलेल या आशेवर.

व्यवस्था बदलेल की नाही कोणास ठाऊक
पण एक दिवस मी जन्मेन बाई म्हणून
आणि तू जन्म घे पुरुष होऊन.
मग पाचशे वर्षं गायलेली गाणी
मी जगून बघेन पन्नास वर्षं.
एवढीशी खळबळ माजली व्यवस्थेत
तरी पुरे पाचशे वर्षांमध्ये…

- अक्षर्मन ९८२२४०१२४६


Share/Bookmark

Thursday, March 5, 2020

Ajunahi (Poem)

"अजूनही…"

अजूनही मोडकं-तोडकं
जुनं-पानं काहीतरी
वही, पाकीट, बुकमार्कसारखं
बनवत राहतो घरच्या घरी.
बाजारात विकत मिळतंच सगळं
वस्तू, जागा, माणसं, नाती..
तरीही त्याला मुद्दामच हौस
विकतपेक्षा बनवलेलीच बरी!
पाठकोरे कागद, पुडीचा दोरा,
गिफ्ट रॅप पेपर, तिकीटं, टाचणी..
वापरणार कधी ठाऊक नाही
साठवून तरी ठेवलीत खरी.
बाहेरचे हसतात, घरचे चिडतात
दरिद्री, कंजूष लक्षणं अशी..
म्हणतात, जगासोबत चालू नकोस
पण जगाकडं एकदा बघ तरी.
बघ, जग पुढं गेलंय... बघ
विज्ञान, तंत्रज्ञान, विकास, प्रगती...
तो म्हणतो, छान! लिहून ठेवेन
आणि बाहेर काढतो एक लाल डायरी.
आजची तारीख टाकतो पानावर
आणि लिहितो फक्त दोन ओळी -
'माणसाचं मशीन झालंय बहुतेक
माझी इच्छा नाही अजून तरी...'
मग पुन्हा मोडकं-तोडकं
जुनं-पानं काहीतरी
ग्रिटींग कार्ड, पेन स्टँडसारखं
बनवत बसतो घरच्या घरी…

- अक्षर्मन (९८२२४०१२४६)


Share/Bookmark