गोष्ट बायकांच्या बस प्रवासाची
- मंदार शिंदे ९८२२४०१२४६
(वाचन वेळः ६ मिनिटे)
संगीताचा नवरा एका कंपनीत नोकरी करतो. घरापासून कंपनी दहा-बारा किलोमीटर अंतरावर आहे. रोज कंपनीत जाऊन परत यायला साधारण अर्धा लीटर पेट्रोल बाईकमधे टाकावं लागतं. म्हणजे जवळपास रोजचे चाळीस रुपये खर्च होतात. महिन्याचे साधारण एक हजार रुपये.
दहा-बारा हजार रुपये पगारावर काम करणाऱ्या संगीताच्या नवऱ्याला हे प्रवासाचे हजार रुपये परवडत नाहीत, पण त्याशिवाय तो कामावर जाऊच शकणार नाही. नाईलाज आहे.
संगीतासुद्धा कामाला जाते, पण ती कुठल्या कंपनीत नोकरीला नाही.
सकाळी लवकर तीन-चार ऑफीसेसमधे साफसफाईचं काम असतं. डॉक्टरांचं क्लिनिक, सीए साहेबांचं ऑफीस, कोचिंग क्लासेस, अशा ठिकाणी तिला सकाळी दहा वाजेपर्यंत काम संपवावं लागतं. कालचा दिवसभर साठलेला कचरा टाकणं, झाडून-पुसून ऑफीस स्वच्छ करणं, टेबलं आणि खिडक्यांच्या काचा रोज साफ करणं, असं साधारणपणे काम असतं.
दुपारच्या वेळेत एका पाळणाघराची सफाई आणि संध्याकाळी एक-दोन कामं उरकून संगीता घरी येते.
संगीता काम करत असलेलं पाळणाघर तिच्या घरापासून सगळ्यात लांब म्हणजे पाच किलोमीटर अंतरावर आहे. पण वेगवेगळ्या ऑफिसच्या वेगवेगळ्या बिल्डींग एकमेकांपासून लांब-लांब आहेत. हिशोबच केला तर दिवसभरात संगीताला सुद्धा पंधरा-वीस किलोमीटरचा प्रवास पडतो.
पण संगीताकडं स्वतःची गाडी नाही आणि बसमधे एकदा बसलं की दहा रुपयांचं तिकीट काढायला लागतं. दिवसातून पाच-सहा वेळा चढ-उतार करून पन्नास-साठ रूपये खर्च करणं तिला शक्य नाही. सगळीकडची कामं धरून तिचं महिन्याचं उत्पन्न सहा-सात हजारांच्या आतच आहे.
कधीतरी खूपच दमायला झालं तर संगीता बस स्टॉपवर जाऊन थांबते. पण मग स्टॉपच्या समोर लावलेलं मोठ्ठं होर्डींग तिला दिसतं. एक आई आपल्या मुलाला हॉर्लिक्स घालून दुधाचा ग्लास देताना दिसते. किंवा किंडरजॉय चॉकलेटसाठी हट्ट करणारा मुलगा आणि कौतुकानं त्याला किंडरजॉय घेऊन देणारी आई दिसते. मग संगीता पुन्हा चालत-चालत घरी जायला निघते. बस तिकीटाच्या वाचवलेल्या दहा रुपयांची इवलीशी कॅडबरी मुलासाठी आठवणीनं घेऊन जाते.
नेहा एका सॉफ्टवेअर कंपनीत जॉब करते. नेहाचा नवरा एका बँकेत जॉब करतो. नेहाची कंपनी आणि तिच्या नवऱ्याची बँक घरापासून पंधरा-वीस किलोमीटर अंतरावर आहेत. नेहाकडं स्वतःची स्कूटी आहे आणि तिच्या नवऱ्याकडं बाईक आहे.
नेहाचा नवरा रोज बँकेत बाईक घेऊन जातो. त्याच्या बाईकचं ऐव्हरेज चांगलं आहे. नेहाची कंपनी छोटी आहे, त्यामुळं कॅब वगैरे न्यायला येत नाही. स्कूटीचं ऐव्हरेज कमी असल्यामुळं ती परवडत नाही. नेहाला दोनदा बस बदलून ऑफीसला जावं लागतं.
येताना कधी-कधी नेहाचा नवरा तिला पिक-अप करतो, पण त्याच्या सोयीनुसार! बहुतेक वेळेला त्याला बँक बंद झाल्यावर मित्रांसोबत पार्टीला 'जावं लागतं'. नेहाला आवडत नसताना बसचा प्रवास करावा लागतो. दोन बस बदलल्यामुळं तिकीटाचे पैसेसुद्धा जास्तच खर्च होतात.
महिन्याच्या जमा-खर्चाचा हिशोब मांडला की नेहा आणि तिच्या नवऱ्याची नेहमी भांडणं होतात. नेहाचा पगार तिच्या नवऱ्याच्या पगारापेक्षा कमी असूनसुद्धा तिचा रोजचा बस तिकीटांचा खर्च त्याच्या बाईकच्या पेट्रोल खर्चापेक्षा जास्त होतो. यावरून तिचा नवरा कधी चेष्टेत तर कधी रागानं तिला बोलतो. होम-लोनचे हप्ते सुरु असल्यानं नेहाला जॉब सोडणंसुद्धा शक्य होत नाही.
यावर नेहानंच एक उपाय शोधून काढलाय. ऑफीसपासून घराच्या उलट्या दिशेनं अर्धा-एक किलोमीटर चालत गेलं की मोठा चौक लागतो. तिथून तिच्या घराच्या दिशेनं जाणारी बस मिळू शकते.
आता ऑफिसच्या दारातून बस पकडून नंतर दुसरी बस पकडण्याऐवजी, नेहा रोज सकाळ-संध्याकाळ एक-एक किलोमीटर चालत जाते. चालण्याचा आणि स्टॉपवर बसची वाट बघण्याचा तासभर वेळ जास्त जातो खरा, पण दोनऐवजी एकाच बसचं तिकीट काढायला लागतं. असं करून महिन्याचा प्रवासखर्च एकाच महिन्यात तिनं निम्म्यावर आणून ठेवलाय. आयताच व्यायाम होतोय याचं समाधानही आहेच.
दोघांचा मिळून महिन्याचा प्रवासखर्च कमी झाला म्हणून नेहाचा नवरा खूष आहे. याच महिन्यात त्याचं प्रमोशनसुद्धा ड्यू आहे. आपण वरची पोस्ट घ्यायला लायक आहोत हे इम्प्रेशन मॅनेजमेंटवर पाडण्यासाठी त्यानं कार घ्यायचं ठरवलंय. कार लोनसाठी अप्लायसुद्धा केलंय. नेहा तसाही बसच्या तिकिटांवर खर्च करत असते, म्हणून तिची 'पडून राहिलेली' स्कूटी विकून कारच्या डाऊन पेमेंटची तयारी तिचा नवरा करतोय.
रचनाच्या कॉलेजचा ग्रुप नाट्यस्पर्धेत उतरतोय. तालमीला कॉलेजजवळ जागा मिळत नाही, म्हणून एका ग्रुप मेम्बरच्या सोसायटीत गच्चीवर तालमी करायचं ठरलंय. पण ती सोसायटी शहरापासून थोडी लांब आहे. रचनाच्या घरापासून तर कॉलेज दहा किलोमीटर आणि तालमीचं ठिकाण तिथून पुढं दहा किलोमीटर.
घरून नाटकात काम करायला विरोध नाही, पण बसनं प्रवास करायचा म्हणजे अजून पैसे खर्च होणार. कॉलेज संपल्यावर कुणाच्या तरी गाडीवर बसून जायचा विचार केला. पण बाकीचे सगळे तिकडच्याच भागात राहणारे. त्यामुळं तालमीनंतर एकटीलाच बसनं परत येणं भाग पडणार!
कॉलेजचं अजून एक वर्ष बाकी आहे. शेवटच्या वर्षी प्रोजेक्ट वगैरेसाठी जास्त पैसे खर्च होणारच आहेत. शिवाय वर्षभर वह्या-पुस्तकं, सहली, गॅदरिंग, काही ना काही खर्च असतातच. धाकटा भाऊसुद्धा दहावीत आहे. त्याच्या कॉलेजसाठी पुन्हा खर्च वाढणारच. आत्ता महिना-दीड महिन्यासाठी फक्त बसभाड्याचे जादा हजार रुपये आपल्याला कसे परवडतील?
रचनानं नाटकात काम करायला नकार दिलाय. त्या ऐवजी कॉलेजच्या जवळच एका कॉम्प्युटर इन्स्टीट्यूटमधे पार्ट-टाईम जॉबसाठी इंटरव्ह्यू देऊन आलीय. पुढच्या वर्षी नाटकात भाग घ्यायचा असेल तर बस भाड्यापुरते तरी पैसे आपल्या स्वत:च्या पर्समधे असावेत असा विचार तिनं केलाय.
बसच्या तिकीटांचा खर्च परवडत नाही म्हणून बायका काही किलोमीटर रोज चालत जातात, किंवा बसच्या प्रवासासाठी पैसे खर्च होतील म्हणून त्यांना काही संधी सोडाव्या लागतात, यावर संगीताच्या नवऱ्याचा, नेहाच्या नवऱ्याचा, रचनाच्या मित्रांचा विश्वास बसत नाही. संगीता, नेहा, आणि रचना त्यांना ही गोष्ट समजावण्याच्या किंवा पटवून देण्याच्या भानगडीत पडत नाहीत.
बसच्या रोजच्या प्रवासाला पैसे पडणार नसतील तर आपले किती कष्ट वाचतील किंवा आपल्याला कुठल्या संधी मिळू शकतील, यावर संगीता, नेहा, आणि रचना विचार करतायत. बायकांचा रोजचा बसचा प्रवास हा मुद्दा पुढच्या निवडणुकीत राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर येऊ शकेल का, हा विचार मात्र अजून त्या तिघींपैकी कुणाच्याही डोक्यात आलेला दिसत नाही…
- मंदार शिंदे ९८२२४०१२४६
२९/१०/२०१९